आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dhananjay Ashturkar Article About Selfie Photo

‘सेल्फी’ मत ले रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस आणि तंत्रज्ञान यातलं नातं एका नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. हे वळण जितकं माणसाच्या बुद्धितेजाला झळाळी देणारं ठरलं आहे, त्याहीपेक्षा ते मनाचं संतुलन घाल‌वणारं ठरू लागलं आहे. याचाच धागा पकडत अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनने एकसारखे सेल्फी घेत राहण्याच्या कृतीचा मनोविकारांच्या यादीत समावेश केल्याची बातमी प्रसृत होणं भविष्यात येऊ घातलेल्या संकटांची चाहूल देणारं आहे…

अफवा या शेवटी अफवा असतात. परंतु काही अफवा खऱ्या ठरणार, हेही आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं. असंच काहीसं अमेरिकन सायकिअॅट्रिक असोसिएशनचा संदर्भ देऊन बातमीरूपात प्रसिद्ध झालेल्या ‘अफवे’बाबत मला वाटतंय. या बातमीनुसार ‘एपीएस’ने स्मार्ट फोनचा वापर करून सतत सेल्फी घेत राहण्याच्या कृतीचा सायकिअॅट्रिक डिसऑर्डर अर्थात, मनोविकारांच्या यादीत समावेश केला आहे. प्रत्यक्षात ‘एपीएस’च्या वेबसाइटवर अशा प्रकारच्या बातमीचा कुठेही उल्लेख नाही. मात्र, एपीएसने या बातमीचे समर्थन केले नसले तरी खंडनही केलेले नाही. हीच बाब मला धोक्याची सूचना देणारी वाटतेय. दर पाच वर्षांनी एपीएस नवी संशोधने, नवे निष्कर्ष जगापुढे मांडत असते. २०१९मध्ये जेव्हा एपीएसची पुढची बैठक होईल, तेव्हा कदाचित अधिकृतपणे ही गोष्ट जगापुढे येईल; पण म्हणून तोवर समोर दिसत असलेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही.

हे सेल्फीचे युग आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंतच्या सगळ्यांनीच स्मार्ट फोनचा वापर करून सेल्फी घेण्याच्या कृतीला जणू मान्यता मिळवून दिली आहे. अगदी तीन-चार वर्षांच्या मुला-मुलींपासून ते वयाची साठी-सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सेल्फी घेणं आणि तो सोशल मीडियावर अपलोड करत राहणं, ही नित्याची आणि शिष्टसंमत बाब झाली आहे. पण, या अमेरिकेतल्या डॅनी ब्रोमॅनच्या केसने धोक्याची घंटा वाजवली आहे. हा डॅनी दिवसाला दोनशे ते अडीचशे सेल्फी घेऊन ते अपलोड करत राहायचा. कुणी प्रतिसाद नाही दिला की अस्वस्थ व्हायचा. त्याची सेल्फीबद्दल वाटणारी आसक्ती इतकी टोकाला गेली की, त्याला नैराश्याने घेरलं. नैराश्याच्या भरात त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मानसोपचार तज्ज्ञांनी महत्प्रयासाने त्याला त्या जाळ्यातून सोडवलं, पण डॅनीची ही अवस्था यूट्यूबच्या माध्यमातून जगभर पोहोचलीच.

तिथूनच बहुधा हा विषय प्राधान्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विषय खरोखर गंभीर आहे. आपण गंमत म्हणून, आठवण म्हणून किंवा एक थ्रील म्हणून सेल्फी घेत असलो तरीही, मानसशास्त्र खूप बारकाईने जीवनशैलीतला हा बदल टिपू लागलंय. आज जी मंडळी व्यसन जडल्यासारखं सेल्फी घेताहेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे, यातले काही लोक वृत्तीने ‘नार्सिसिस्ट’ म्हणजे आत्मप्रेमात आकंठ बुडालेले आहेत, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंगंड आहे. स्वत:चे चांगल्यात चांगले फोटो काढावेत आणि ते पोस्ट करत जावेत, जेणेकरून लोकांचे अव्याहत कौतुक मिळत राहील, असा त्यांचा उद्देश आहे. दुसऱ्या प्रकारातले लोक न्यूनगंड असलेले आहेत, हा न्यूनगंड कुटुंब-नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींपासूनच्या तुटलेपणातून आलेला आहे. नात्यांमध्ये आलेल्या दुराव्यातून आलेला आहे. कुणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपल्या अस्तित्वाची सतत दखल घ्यावी, ही त्यांची मानसिक गरज आहे. त्यातून त्यांना सेल्फी घेण्याचा नाद लागतोय.

वस्तुस्थिती ही आहे की, पुरुष असो वा स्त्री; दोहोंनाही सारख्याच प्रमाणात सेल्फीचा नाद लागला आहे. पण त्यातही मुलींमध्ये अॅप्रिसिएशनची, अटेन्शनची भूक थोडी अधिकच असल्याचं दिसतंय. आपण सतत चांगलं दिसावं, या उद्देशाने सेल्फी घेऊन मुली थांबत नाहीएत, तर जोपर्यंत मनासारखे फोटो येत नाहीत, तोपर्यंत काढलेल्या फोटोंवर ‘फोटोशॉप’ तंत्राने कलाकुसर करण्यातही त्या मागे नाहीएत. सेल्फी घेणे आणि एडिट करत राहणे, हाच अनेकांचा पासटाइम झालेला आहे. मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या डॉ. इरा दत्त यांनी नुकतीच २३० कॉलेजवयीन मुला-मुलींच्या सर्वेक्षणातून बाहेर आलेली निरीक्षणं आमच्याशी शेअर केलेली आहेत. त्यात त्यांनी असं निरीक्षण नोंदवलंय की, सर्वेक्षण झालेल्यांपैकी ४५ टक्के मुलं-मुली सातत्याने सेल्फी घेणारे आहेत. त्यातली १० टक्के मुलं-मुली सेल्फी घेतल्यानंतर तो एडिट करून मगच सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करणारे आहेत. त्यात आठवड्यात चार ते पाच वेळा सेल्फी घेणाऱ्यांचे प्रमाण ६५ टक्के इतकं मोठं आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, एकच क्रिया पुन:पुन्हा करत राहणे आणि त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे, ही सेल्फी घेणाऱ्यांची मानसिकता बनत चालली आहे.

दुसऱ्या एका सर्वेक्षणात ६ टक्के लहान वयातली मुलं इंटरनेटचा अतिवापर करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आमच्या मते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण धोकादायक आणि म्हणूनच चिंताजनक आहे. मानसशास्त्राच्या भाषेत अशा प्रकारच्या वर्तणुकीला बिहेविअरल अॅडिक्शन म्हणजे, व्यसनकेंद्रित वर्तणूक असं म्हटलं जातं.

आपल्याला आठवत असेल, या आधीचं शतक हे दारू-ड्रग्ज आदी व्यसनांचं होतं, मात्र एकविसावं शतक हे ‘बिहेविअरल अॅडिक्शन’चं असणार आहे. माणूस आणि तंत्रज्ञान या नात्यामधल्या ताण-तणावाचा हा परिपाक आहे. तंत्र आणि तंत्रज्ञानाच्या अति आहारी गेल्यामुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय. मुलांचा कुटुंबीय आणि शेजार-पाजाऱ्यांशी संवाद कमी होतोय. वागणूक विक्षिप्तपणाकडे झुकू लागली आहे. सगळ्यांशीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद होत असल्यामुळे प्रत्यक्ष संवादासाठी, सामाजिक व्यवहारांसाठी लागणाऱ्या कौशल्याचा त्यांच्याकडे अभाव निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे इतरांशी संवाद टाळण्याच्या हेतूनेही एका खोलीत स्वत:ला बंद करून घेणे, पसंत करू लागली आहेत. आत्मरत (सेल्फ ऑब्सेस्ट) असलेली ही मुलं मनाने खूप अस्थिर आणि अस्वस्थ राहू लागली आहेत. ‘कम्पल्सिव्ह डिसऑर्डर’मुळे त्यांना नैराश्य येऊ लागलंय. हिंसेला उत्तेजन देणाऱ्या अनावश्यक माहितीच्या माऱ्यामुळे त्यांच्यातली भावनिक आक्रमकता अनेकदा टोक गाठू लागली आहे.

(dr.ashturkar@gmail.com)
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ तसेच इंडियन सायकिअॅट्रिक सोसायटीच्या महाराष्ट्र विभागाचे सचिव आहेत.)