आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरिबाना- तिरकी रचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरिबानाचे उभ्या फांद्या खोचून केलेले प्रकार आपण बघितले. तिरक्या रचनेत वक्राकार वाढलेल्या तसेच तिरक्या फांद्या घेतात व त्या तिरक्या खोचतात.

▪️पात्र— कोणत्याही आकाराचे बसके पात्र.
प्रमुख फांदी (स्वर्ग)— निसर्गातील झांडाचे सूक्ष्म अवलोकन करून, कोणत्याही प्रकारची तिरपी वाढणारी फांदी निवडावी. फोटोत पेरूची निवडलेली आहे. तिची उंची साधारणपणे पात्राची लांबी+उंचीच्या बेरजेइतकी असते. पण हवी असल्यास बदल करता येतात .

◾️दुय्यम फांदी (मानव)— या फांदीसाठी स्वर्ग फांदीच्या जातीचीच दुसरी फांदी घेतात. तिरक्या रचनेच तिची उंची प्रमुख फांदीच्या अर्धी घेतात.

🔺तृतीय (पृथ्वी) फांदी— शक्यतोवर फूल किंवा फुलांची फांदी वापरतात. ती प्रमुख फांदीच्या साधारण एक १/३ उंचीची घेतात.

पूरक फांद्या— काही जण स्वर्ग व मानव फांदीच्या जातीच्याच पूरक फांद्या वापरतात. त्या प्रमुख फांद्यांपेक्षा कमी उंचीच्या घेतात व त्यांना मुख्य फांद्याच्या मध्ये खोचतात. पूरक फांद्या सारख्या उंचीच्या नसाव्या.

♻️कृती— या प्रकारात मुख्य स्वर्ग फांदी पिनहोल्डरच्या पुढील बाजूस तिरकी खोचावी. खोचताना ७० अंशाचा कोन करून बाजूला व ४५ अंशाचा कोन करून (फोटोत दाखविल्याप्रमाणे पेरूची मोठी फांदी) डौलदार दिसेल, अशी डाव्या बाजूला झुकवून खोचावी. दुय्यम मानव फांदी पिनहोल्डरच्या मागील बाजूस सरळच खोचावी (फोटोत पेरूची उभी फांदी). तृतीय पृथ्वी फांदी (फोटोत लाल जरबेरा) स्वर्ग फांदीच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पिनहोल्डरमध्ये उजव्या टोकाला समोर खोचावी. ती उजव्या बाजूस ५० अंश तर पुढून ३० अंशाचा कोन करून खोचावी. पूरक फांद्या (फोटोत केशरी जरबेरा व जांभळी शेवंती) स्वर्ग फांदीशी संवाद साधतील, अशा लावाव्या.
बैठक— रचना तीन बाजूंनी दिसते, म्हणून भिंतीशी लागून किंवा खोलीच्या कोपऱ्यात ठेवावी. पुढील भागात आपण मोरिबाना झुलती
(cascade type) रचना अभ्यासू या!

drjayantipc@gmail.com