आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनर्जन्‍माचा पाश्‍चात्‍य अन्वयार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशीच एक संध्याकाळ. एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये मोजकीच मंडळी जमली होती. डॉ. डॉमिनिक गॅसकेट या फ्रेंच विदुषीचं व्याख्यान होतं. विषय होता, ‘डायलॉग ऑफ कल्चर्स : मार्गारेट युरसेनार अ‍ँड हर फॅसिनेशन फॉर दि ओरिएंट’. डॉ. डॉमिनिक या पॅरिस विद्यापीठातील फ्रेंच साहित्याच्या प्राध्यापक. त्यांनी दिल्ली विद्यापीठातही चार वर्षे हाच विषय शिकवला होता. त्या फ्रेंच एम्बसीत लिंग्विस्टिक्स व कल्चरल विभागाच्या प्रमुख होत्या. सोरबॉर्न विद्यापीठातून त्यांनी मार्गारेट युरसेनार व मिशिमा युकियो यांच्यावर संशोधन करून विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली. ‘कल्चर्स’मधील संवाद
लॅटिन ‘कल्चुराचं’ इंग्लिशमध्ये ‘कल्चर’ झालं. ‘जमिनीची मशागत’ असा त्याचा मूळ लॅटिन शब्दार्थ. ‘मनाची मशागत व क्षमतांचा विकास’, असा अर्थ घेऊन ‘कल्चर’ हा शब्द जुन्या इंग्लिशमध्ये आला. ‘कला तसेच मानवी प्रज्ञेचे व प्रतिभेचे विविध आविष्कार, प्रज्ञाप्रतिभेची कामगिरी यांचा समुच्चय’ असा ‘कल्चर’चा आधुनिक इंग्लिश शब्दार्थ. याला मराठीत प्रतिशब्द ‘संस्कृती’. जगातील ‘कल्चर्स’मध्ये वादविवाद, विसंवाद व संवाद सतत घडत आले आहेत. बहुविध संस्कृतींनी परस्परांवर प्रभाव टाकला आहे. पाश्चात्त्य व पौर्वात्य संस्कृतींच्या संवादांचा ललितकलांवर पडलेला प्रभाव डॉ. डॉमिनिक यांनी एशियाटिकमधील व्याख्यानादरम्यान सादर केला. कला व वास्तव ‘हाऊ वॉज वँग फो सेव्ड?’ या चिनी पुराणकथेचा मार्गारेट युरसेनार यांनी अनुवाद केला आहे. वँग फो हा उत्तम चित्रकार असतो. लींग नावाचा त्याचा शिष्य असतो. एक दिवस राजा वँग फोची चित्रं पाहतो. राजा चित्रकाराला म्हणतो, “तू खोटारडा आहेस. तू चित्रात जे दाखवलं आहेस, ते जादुई विश्व किती सुंदर आहे; पण माझ्या राज्यातलं वास्तव असं सुंदर नाही. तुझं चित्रं वास्तवापेक्षा फारच प्रभावी आहे. लोकं त्यावर विश्वास ठेवतील. माझ्यापेक्षा लोक तुला मोठा मानतील. तुला शिक्षा झालीच पाहिजे.” अर्थात, निर्मितीच्या ताकदीपेक्षा राजसत्ता कमी प्रतीची असते, हे राजानं मनोमन जाणलं होतं. तरीही, “तुझे हात कलम केले जातील, डोळे फोडण्यात येतील व तुझ्या शिष्याला देहान्त” असं राजा म्हणतो. त्यावर, “मला हे चित्र पुरं करू दे, मग तू मला शिक्षा दे.” असं चित्रकार विनवतो.
राजा त्याला चित्रं पुरं करण्याची परवानगी देतो. चित्रकार त्या चित्रात एक बोट चितारतो. आणि चित्रकार त्याच बोटीत बसून शिरच्छेद झालेल्या लींगला घेऊन निसटतो. लींग पुनर्जन्म घेतो, चित्रकाराला भेटतो. म्हणतो, “तू जिवंत आहेस, मग मी कसा मरेन?”
डॉ. डॉमिनिक या कथेचा अन्वयार्थ उलगडताना म्हणाल्या, कला स्वत:चं एक वास्तव निर्माण करते. हे वास्तव जादुई असतं. ते वाचकाला निराळ्याच विश्वात घेऊन जातं. निराळी अंतर्दृष्टी देतं. जगण्यापासून निराळ्या विश्वात जाण्याचा कला निर्मिती हा कलाकारासाठी सुटकेचा मार्ग असतो.’
पाश्चात्त्य संस्कृतीत काल एकदिशीय, तर पौर्वात्य संस्कृतीत काल चक्राकार. कलानिर्मितीच्या संदर्भात पुनर्जन्म हे एक रूपक आहे. कलाकार निर्मिती करताना स्वत:चा पुनर्शोध घेतो आणि त्या द्वारे त्याचा जणू पुनर्जन्म होतो. शरीर संपलं तरी कलाकार त्याच्या कलाकृतीतून जिवंत राहतो. जेव्हा लींग म्हणतो, “तू जिवंत आहेस, मग मी कसा मरेन?” याचा हा अर्थ. कलाकृतीतून पुढील पिढ्या स्फूर्ती घेतात, निर्मितीचं ‘कलाचक्र’ व ‘कालचक्र’ चालू राहतं. कलावंताचं मृत्यूनंतरचं जीवन त्याच्या कलाकृतीतून सुरूच असतं. कलावंत त्याला समजलेलं सत्य सांगण्यासाठी जीव देण्यासही तयार होतो. मानवामध्ये कलाकार होण्याची नैसर्गिक ऊर्मी असते, प्रज्ञाप्रतिभा असते. पौर्वात्यांच्या तुलनेत पाश्चात्त्य संस्कृतीत कलेची मीमांसा, मूल्यमापन, समीक्षा वगैरे घडतं. पण कलेच्या जादुई प्रभावात समरस होऊन कलेचा स्वीकार करणं, समजून घेणं, हे अधिक महत्त्वाचं. हा विचार देत डॉ. डॉमिनिक यांनी त्यांचं व्याख्यान संपवलं.
मार्गारेट युरसेनार [१९०३-१९८७]
या फ्रेंच विदुषीनं विपुल लेखन केलं. वयाच्या २७व्या वर्षापासून त्या ‘ओरिएंटल कल्चर’कडे आकर्षित झाल्या. मुख्यत्वेकरून त्यांनी जपानी कल्चरचा अभ्यास केला. त्या भारतातही येऊन गेल्या होत्या.

मिशिमा युकियो [१९२५-१९७०]
हे जपानी लेखक. त्यांनी कथा-नाटकं लिहिली. वयाच्या २५व्या वर्षापासून त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीत रस निर्माण झाला. ऑस्कर वाइल्ड, जीन कॉक्ट्यु, मारक्विस दि सेद, जॉर्जेस बॅटिले, मार्गारेट युरसेनार या लेखकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या कथांचा, नाटकांचा मार्गारेट युरसेनार यांनी फ्रेंच अनुवाद केला आहे. मिशिमा युकियो यांचे नोबेलसाठी तीन वेळा नामांकन झाले होते. अमेरिकेने जपानचा केलेला पराभव, ते स्वीकारू शकले नाहीत. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी हाराकिरी केली. मार्गारेट युरसेनार यांनी ‘मिशिमा अ‍ँड व्हिजन ऑफ एमटिनेस’ हा निबंध लिहिला आहे.
dranand5@yahoo.co.in