आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Prithviraj Taur About Mothers Poem, Rasik, Divya Marathi

'आई'चे पंजाबी काव्यरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आई’ हे नातं काहीसं असं आहे की, या नात्यासंदर्भात उच्चारला वा लिहिला गेलेला प्रत्येक शब्द हा भावनांनी ओथंबलेला असतो. या नात्यासंदर्भातील कवितांना विक्रीमूल्य आहे, हे लक्षात आल्यामुळेच अतिशय वर्णनपर आणि पृष्ठस्तरीय रचनांची निर्मितीही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक पंजाबी कवितेतील आईबाबतच्या या काही कविता आहेत. या कविता अभिव्यक्त होण्याच्या पद्धतीमुळे जशा लक्षात राहणाऱ्या आहेत, तद्वतच आशयाच्या निराळेपणामुळेही त्या आठवणीत राहणाऱ्या आहेत.

पद्मश्री सुरजीत पातर, निरुपमा दत्त, गुरप्रीत, दर्शन बुट्टर, अमरजीत कौंके हे पाचही कवी स्वातंत्र्योत्तर पंजाबी कवितेतील महत्त्वाचे कवी आहेत. सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कारांनी पातर यांच्या कवितेचा सन्मान करण्यात आलेला आहे. सूक्ष्म जिवंत अनुभूती, ज्वलंत समकालीन वास्तव आणि पवित्र मानवी संवेदना आपल्या जादुई भाषेतून सुरजीत पातर मांडतात. निरुपमा दत्त या व्यवसायाने पत्रकार आहेत. स्त्री-पुरुष विसंवाद आणि धगधगीत मानवी संबंध यांना त्यांनी आपल्या कवितेतून नीडरपणे शब्दबद्ध केले आहेत. गुरप्रीत हे पंजाबी युवा कवितेतील महत्त्वाचे नाव. त्यांनी कविता, गजल आणि हायकूंची रचना केली आहे. समाज, निसर्ग आणि सृष्टीच्या आंतरसंबंधांना त्यांची कविता अधोरेखित करते. दर्शन बुट्टर यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. मौलिक अनुभव विश्व, नवा दृष्टिकोन, लयबद्ध भाषा आणि ताज्या प्रतीकांमुळे दर्शन बुट्टर यांची कविता उठून दिसते. अमरजीत कौंके हे कवी, अनुवादक आणि ‘प्रतिमान’ या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही परिचित आहेत. सूक्ष्म आणि अस्पर्शित मानवी व्यवहारांना नव्या काव्यभाषेत उतरवण्यात कौंके कमालीचे यशस्वी झालेले आहेत.
पंजाबी कवितेला संपन्न परंपरा आहे. अमृता प्रीतम, कर्तार सिंह दुग्गल, भाई वीर सिंह, देव, पाश, तरसेम, सुतिंदरसिंह नूर, परमिंदरजीत या सहज आठवलेल्या कवींनी आधुनिक पंजाबी कविता अधिक अर्थपूर्ण केली आहे.

आई
आईत माझा जीवय
यासाठी नाही
की तिनं जन्म दिला मला
आईत माझा जीवय
यासाठी नाही
की तिनं पालनपोषण केलं माझं
आईत माझा जीवय
कारण
एक शब्द न उच्चारताही
तिला समजून येतं
मला काय म्हणायचंय.
आई नावाची एक पणती
कधीच घरदार न ओलांडणारी
आई निघून गेली त्या वाटेवर
जिथून कुणीच परतत नाही
तिच्या शिवाय प्रत्येक गोष्ट
जागच्या जागीय.
शहरात पूर्वीसारखीच
धावतायत माणसं
कामाधंद्यात व्यस्त आहेत
धडधडणारे कारखाने
डांबरी सडकेवर त्रस्त गर्दी
अगदी पूर्वीसारखीचय
अगदी तशीच
उतरलीय ही संध्याकाळ
शहरावर सरकतेय रात्र
हळूहळू झगमगतंय अवघं
शहर दिव्यांच्या रोशणाईनं
फक्त आई नावाची पणती
आता विझली आहे.
मूळ पंजाबी : अमरजीत कौंके

आई आणि माझी कविता
आईला माझी कविता कळली नाही
जरी माझी कविता मातृभाषेत
लिहिलेली होती
तिला तर एवढंच कळलं
की मुलाच्या काळजात
काहीतरी सल आहे
‘मी असताना
मुलाजवळ
कुठून आलं हे दुःख?’
खूप लक्ष देऊन न्याहाळली
माझ्या निरक्षर आईनं माझी कविता
बघा लोकहो,
जिच्या कुशीत जन्मला
त्या आईला सोडून
हा कागदांना दुःखं सांगतोय
माझ्या आईनं कागद उचलून
छातीशी कुरवाळले
कदाचित अशा पद्धतीनं तरी
जवळ यावा तिचा मुलगा.
- मूळ पंजाबी : सुरजीत पातर

आई आणि मी
कदाचित माझ्या लहानपणी तिनं
एखाद्या राजकुमाराची गोष्ट सांगितलीही असेल,
मला आठवत नाही.
आणि आता जेव्हा दिवसभराच्या धुळीत माखलेले
पाय धुऊन तिच्या शेजारी पसरते
तेव्हा ती म्हणते-
हो गं, सगळा धूर माझ्या तोंडावरच उडव
अगं नशीब समज आज तुझे वडील नाहीत
त्यांच्यापुढं तू अशी सिगरेट पिऊ शकली नसतीस.
तुझा बापसुद्धा अजबच होता बघ,
सगळी बंधनं फक्त स्त्रियांसाठीच
आणि स्वतः … तुझे वडील
आणि माझेही.
असो वडील, नवरा, मुलगा
सगळे एकाच शिक्षेला पात्र आहेत,
ही पुरुषांची जातच गं अशी
त्यांचा भरवसा करणं हीच चूक आहे.
मी विचारते- कुणीतरी असेलच नं गं
कुठेतरी एखादा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा
तर ती चिडचिड करते
सिगरेट तिकडे फेक आणि जास्त बोलू नको
मोठी आली विश्वास करणारी
विश्वास ठेवलास आणि मग बघितलं नाहीस का तू?
मुळुमुळु रडत मरायला पळशील
मला बाई नवलच वाटतं तुम्हा लोकांचं
पुरुष जातीसाठी मरुन जाणं
यापेक्षा मोठा वेडेपणा तो कोणता असणार?
यांच्याशिवाय राहता येत नाही,
हा काय आमचा काळ आहे.
तू तर कमवतेस-खातेस
बुटांच्या टोकावर उडव यांना
आणि मजा कर
माझ्या पुढं नको बोलू
मी पासष्ट पावसाळे बघितले आहेत.
खूपच सोप्पं उत्तर असतं, आईचं
ती तर असंही सांगते, जिथं प्रेम करशील
लग्न करु नको, प्रेम म्हणजे, शुद्ध प्रेम म्हणते मी
आजकालसारखं नाही.
लग्नापूर्वी तो देव वाटतो आणि नंतर
माती विटांच्या घरात इतरांसारखाच फटीचर
ईश्वराची मूर्ती नसते गं फोडायची
आई, पुरुषांना काहीच समजत नाही
त्यांना शिव्या शाप देते, उठता बसता नावं ठेवते
पण जर एखाद्या मुलाचं पत्र येण्यास उशीर झाला
तर रात्री पांघरुणाखाली लपून रडत बसते
आणि सकाळी उठून घोषणा करते
पोरांचा काहीच दोष नाहीय गं
ही पुरुषांची जातच अशी आहे...
मूळ पंजाबी : निरुपमा दत्त

(सर्व कवितांचा अनुवाद : पृथ्वीराज तौर)