आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Jayanti Chaudhari Article About Traditional And Realistic Landscape

निसर्गदृश्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोरिबानाचे पारंपरिक निसर्गदृश्य (traditional landscape) व आधुनिक वास्तववादी निसर्गदृश्य (realistic landscape) असे दोन प्रकार प्रचलित आहेत. पारंपरिक रचना साकारताना काही विशिष्ट वनस्पतींचाच उपयोग केला जातो व त्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. त्या प्रकारच्या वनस्पती सर्वांनाच उपलब्ध होत नाहीत, म्हणून नवीन ‘वास्तववादी निसर्गदृश्य’ प्रकार उदयास आला. जपानच्या ‘ओहारा’ शाळेत नवनवीन कल्पना व साहित्य वापरून सर्वांना रचना साकारणे सोपे जावे, या उद्देशाने हा प्रकार विकसित केला गेला. या प्रकारात समुद्रकिनारा, पर्वतरांगा, एखादे बेट, बगीचा, शेत, हिरवळ असलेला रस्ता यासारखे कोणतेही दृश्य किंवा आपल्याला हवे ते दर्शवता येते. एखादा चित्रकार जसा निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करून चित्र चितारत असतो, तसेच निसर्गाचे सूक्ष्म अवलोकन करून हवे ते दृश्य आपल्या कल्पनाशक्तीला व कलागुणांना चालना देऊन दर्शविता येते.
साहित्य
मोठे पसरट उथळ पात्र, नसल्यास ताम्हण किंवा ताम्हणासारखे कोणतेही पात्र, चहा देण्याचा ‘ट्रे’ वापरला तरी चालेल. लहान मोठी जशी रचना साकारायची असेल ते ठरवून घ्यावे व तसे पात्र निवडावे. जी रचना साकारायची असेल तिला प्रथम डोळ्यांसमोर साकारावे व तसे साहित्य शोधावे, किंवा जे साहित्य मिळेल त्याचा वापर करून रचना करावी. फुले, पाने, फांद्या, तुरे, दगड, शुष्क फांद्या, शिंपले, शंख इत्यादी.
पिनहोल्डर - दोन अथवा तीन पिनहोल्डर. यांची संख्या रचनेनुसार बदलता येते किंवा नाजूक फांद्या वापरायच्या असल्यास स्पंज चालतो.
कृती
या रचना काही इंचापासून काही फूट इतक्या उंचीच्याही करता येतात. आपल्याला हवे तसे निसर्गदृश्य साकारता येते. उभी, तिरपी वा झुलती फांदी वापरूनसुद्धा निसर्गदृश्य साकारता येते.
आपण आधुनिक वास्तववादी रचना बघू या. फोटोत बगीचा, त्यात वाहणारे पाणी व फुलझाडे दाखविण्यासाठी सुरूच्या फांद्या, झुलती रचना पद्धतीने लावल्या असून त्यात शेवंती, हळदीकुंकू वनस्पतीच्या फुले असलेल्या फांद्या, वाळलेले गवत, दोन प्रकारच्या क्रोटनच्या फांद्या, दगड इत्यादी साहित्याचा उपयोग केला आहे.
कुठलेही निसर्गदृश्य तीन प्रकारांत विभागतात.
१) लांबून दिसणारे - या प्रकारात उंच झाडे दर्शवणाऱ्या वनस्पतीच्या उंच फांद्या वापरतात. जसे पाईनसारख्या वृक्षाच्या फांद्या किंवा इतर उंच फांद्या.
२) मध्यभागातून दिसणारे दृश्य - यात झुडपांसारख्या वनस्पती लावतात.
३) अगदी जवळचे दृश्य - या प्रकारात फुले, पाने, लहान फांद्या जशा आपण जवळून बघितल्यास दिसतात तशा लावतात. फोटोतला प्रकार जवळचे दृश्य या प्रकारात मोडतो.
या रचनांद्वारे निसर्गचक्रातील विविध ऋतूसुद्धा साकारतात. जसे शेवंतीसारखी फुले हिवाळ्यात येतात म्हणून ती वापरून हिवाळा दर्शविता येतो. पळसाची फुले असलेल्या फांद्या उन्हाळा दर्शवितात, तर वसंत ऋतू दर्शविण्यासाठी कोवळी पालवी असलेल्या फांद्या व पिवळी फुले लावावी. उन्हाळ्यात पाणी असणारे निसर्गदृश्य साकारल्यास डोळ्यांना शीतलता मिळते.
जपानमध्ये परंपरागत रचना साकारताना फुले व फांद्या निवडण्याचे नियम बनविले आहेत. फुले व झाडांना भावनांचे प्रतीक मानले आहे. जसे एरंड चांगले नशीब दर्शवितो, झेंडू आपली उत्तम प्रकृती, कमळ प्रेम, पाईन आनंद व दीर्घायुष्य, लिली शुद्धतेचे तर डेझीची फुले निरागसतेचे प्रतीक मानतात. जरबेरा दु:खाचे तसेच गुलाब प्रेम व सौंदर्याचे प्रतीक मानतात. अशा साधारण १४० वनस्पती प्रतीके म्हणून वापरतात. पण तितके खोलात न जाता आपल्याला जसे जमेल तशी रचना साकारावी व निसर्गाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करावा. स्वनिर्मितीचा आनंद मिळण्यासाठी नियमांचा खूप विचार न करता विविध निसर्गदृश्यं साकारता येतात.

बैठक - तीन बाजूंनी बघता येणारी रचना असल्याने भिंतीच्या कडेला ठेवली आहे. अशा रचनांना रचनाकार आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुंदर नावेसुद्धा देत असतात. जसे ‘माझा बगीचा, पहाटेचा गार वारा, एक रम्य सायंकाळ... (फोटोत शेत साकारले आहे.)

drjayantipc@gmail.com