आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sangita Deshpande Article About Fatty Acid And Diet

मेदाम्‍लांचा अतिरेक नको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ली चयापचयात्मक आजारांचे प्रमाण वाढत आहे. बिघडलेली आहारपद्धती व चुकीची जीवनशैली हे यामागचे मुख्य कारण आहे. स्थूलता व आनुषंगिक आजारांना आहार कारणीभूत असला तरीही सूक्ष्म जीवनमूल्यांची कमतरताही या आजारांमध्ये दिसून येते.
बऱ्याच वेळा अत्यावश्यक मेदाम्ले, ठरावीक जीवनसत्त्वे व खनिजांचा अत्याधिक प्रमाणात उपयोग वरील व्याधींमध्ये दिसून येतो. चयापचयात्मक आजारांमध्ये पेशीच्या स्तरावरील विचार केल्यास त्या ठिकाणी निर्माण होणारा सूक्ष्म शोथ वा सूज कारणीभूत असते. या सूजेच्या परिणामी व्याधी अधिक गंभीर होत जातात. अत्यावश्यक मेदाम्लांची कमतरतादेखील काही अंशी ही सूज निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. अशा वेळी पूरक पोषणमूल्ये म्हणून आवश्यक मेदाम्लांचे सेवन केले जाते. आवश्यक मेदाम्लांचे (essential fatty acid) नैसर्गिक स्रोत म्हणून बदाम व अक्रोड या सुक्या मेव्याचा नियमित वापर केला जातो. पण कधी कधी हा वापर गरजेपेक्षा जास्त होतो.
चयापचयात्मक आजारांचा दुसरा परिणाम म्हणजे, पचनक्रिया बिघडणे होय. पचनशक्ती बिघडत असताना लहान व मोठ्या आतड्यातील अनुकूल सूक्ष्म जीवाणूंमध्ये अामूलाग्र बदल होतो व या बदलाच्या परिणामी आतड्यांच्या अंतर्गत स्तरावरसुद्धा सूज येते. अशा अवस्थेमध्ये सेवन केलेले औषधी स्वरूपातील आवश्यक मेदाम्ल किंवा नैसर्गिक बदाम वा अक्रोड यांचे पचन कितपत योग्य होत असेल, हा प्रश्नच असतो. बहुतांश वेळा अयोग्य पचनामुळे व न पचलेल्या मेदाम्लामुळे आतड्यातील व पेशींतील विकृती आणखी वाढण्याची शक्यता दाट असते.

आवश्यक मेदाम्ले नि:संदेह अशा आजारांमध्ये उपयुक्त ठरतात; मात्र आजारांचे स्वरूप, तीव्रता व अवस्था लक्षात घेऊन त्यांची सेवनयोग्य मात्रा ठरत असते. बहुतांश लोक तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारची औषधे सेवन करतात, व त्याचा फायदा अपेक्षित होत नाही. बऱ्याच वेळा अशा मेदाम्लांचे अतिरिक्त सेवन केल्याने यकृतामध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते. काही प्राण्यांवरील संशोधनामध्ये अतिरिक्त मेदाम्लांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता दिसून आलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता स्थूलता व आनुषंगिक आजारांचा विचार करता हे आजार पूर्ण नियंत्रणामध्ये आल्यानंतर किंवा हे आजार नियंत्रणात राहावे म्हणून आवश्यक मेदाम्लांचा अत्यंत योग्य प्रमाणात वापर करावा लागतो.
वैज्ञानिकदृष्ट्या बघता फक्त unsaturated fatty acid (असंपृक्त मेदाम्लांचा) वापर असावा, असे नाही. काही प्रमाणात प्रत्येक व्यक्तीपरत्वे saturated fatty acid (संपृक्त मेदाम्ले) या अॅसिडचा स्रोत अत्यंत महत्त्वाचा ठरतो. Saturated fatty acidची तुलनात्मक घनता जास्त असल्याने त्यापासून होणारी ऊर्जा ही उच्च दर्जाची असते व प्रमाणात वापरल्यास त्यापासून घातक परिणाम होत नाहीत. यामध्ये देशी गाईचे तूप हे सर्वात योग्य व संपृक्त मेदाम्लाचा स्रोत आहे. Essential fatty acid किंवा omega3 fatty acidsचे सातत्याने सेवन केल्यास त्याचे काही दुष्परिणामसुद्धा दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने रक्तस्राव संबंधित लक्षणे निर्माण होण्याची शक्यता असते. जवस व कारळ यांमध्येसुद्धा essential fatty acid भरपूर प्रमाणात असतात. यामुळेच बरेच लोक यांचे नियमित सेवन करताना दिसून येतात. जवस व कारळाच्या अधिक सेवनाने पचनशक्तीशी संबंधित विकार निर्माण होऊ शकतात. त्यासोबत बऱ्याच वेळा द्रवमलासारखे आजारसुद्धा होऊ शकतात. ज्या पदार्थांमध्ये gamma linolenic acid या essential fatty acidचे प्रमाण जास्त असते, असे पदार्थ अपस्माराचे वेग असणाऱ्या लोकांनी टाळावे. त्याचप्रमाणे ज्या पदार्थांमध्ये Alpha linolenic acid जास्त असते, ते पदार्थ prostate किंवा आतड्यांच्या कर्करोगामध्ये टाळावे.
या सर्व बाबी लक्षात घेता, omega3 fatty acids किंवा आवश्यक मेदाम्ले (essential fatty acid) यांचे सेवन आवश्यक प्रमाणातच असावे. त्यांच्या सेवनाचा अतिरेक झाल्यास पचनशक्ती व प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. (क्रमश:)