आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रसिया’तील प्राकृतिक सत्य!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप राज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सुनीता झाडे यांच्या ‘रसिया’तील स्त्रीत्वाची वेदना बहुपेडी आहे. या अनुभवाचे मूल्य त्यातील सच्चेपणात आणि प्रांजळ अभिव्यक्तीत शोधणे महत्त्वाचे आहे...
सुनीता झाडे यांचे ‘रसिया’ हे पुस्तक लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे काव्यात्म ललितबंध असले तरी हे वैशिष्ट्य केवळ आकृतीबंधाच्या संरचनेनुसार सांगता येते. पुस्तकातील ‘रसियां’ची मांडणी आणि आशयाची सूत्रे तपशिलासह तपासली तर स्त्रीत्वाच्या भंगलेल्या किंवा अपूर्ण, अतृप्त प्रेमाच्या या काव्यात्म सत्यकथा असल्याचे सिद्ध होते. या ४० कथांचे एकच सूत्र असल्याने या पुस्तकाला काव्यात्म लघुकादंबरीसुद्धा म्हणता येणे शक्य आहे. सुनीता झाडे यांची ‘रसिया’ ही काव्यात्म आत्मकथा म्हणावी का? असाही प्रश्न निर्माण होतो. ‘रसिया’तील अनेक स्त्रियांच्या त्यांच्या त्यांच्या रसियाच्या अनुभूती लक्षात घेतल्या तर काही स्त्रियांचे प्रेमाच्या विसंवादी वर्तुळातील मर्यादित काव्यात्म चरित्रही असल्याचे मत मांडता येऊ शकेल.
‘रसिया’ सांस्कृतिक-प्राकृतिक अनुबंधाचे मानवी मूल्य कलात्मक पातळीवर व्यक्त करते. प्रेमाची सांस्कृतिक संकल्पना निष्ठेच्या मूल्यात्मकतेने ओथंबून जुळताना प्रेमसंबंधाचे नाते का बदलते? निष्ठा आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष संस्कृती व प्रकृती यांच्या विसंगतीवर प्रकाश टाकते. प्रकृतीच्या सोयी लावूनच संस्कृती सुरक्षित राहू शकते. विकसितही होऊ शकते. म्हणून प्राकृतिक सत्याची हेळसांड योग्य नव्हेच!
एका सखीचा पती तिला त्याची इस्टेट समजतो आणि तिचा मित्र तिला ‘स्टेटस देतो’. तिच्या मनातील रसिया तिला मनापासून जपणारा, तिच्या भावनांची दखल घेणारा, तिच्या पंखांना बळ देणारा आहे. तेव्हा तिच्या नजरेत पती आणि प्रियकर यांच्यात ‘गफलत’ आहे. पण तरीही शरीर अन‌् मनाची रेषा पुसट व्हायची तिला भीती वाटते. तिचे मनोविश्लेषण सुनीता झाडे यांनी सुंदर केलंय.
आपण ‘त्याला’ फक्त शरीराने साथ देऊन फसवत तर नाही ना! किंवा स्पर्शाविना प्रेमाची भाषा कोरडी, बाष्कळ बडबड तर ठरत नाही?

सखीमधील ‘इव्ह’ला पडलेला हा प्रश्न आदिम स्त्रीत्वाच्या अंतरंगातील गुंता मांडतो. अर्थात, त्याचे उत्तर स्त्रीलाही मिळत नाही, मग पुरुषाला कसे मिळावे?
मित्राचा प्रेयसीला प्रश्न असतो की, “तुझा प्रत्येक विषय ‘तो’ शी संबंधित असतो. त्याच्याशिवाय काहीच दिसत नाही का?” ‘तो’पासून जरा वेगळी होणारी ही सखी एका नव्या सत्याला समोरे जाताना, तिचा मित्रच त्याची जागा घेत असल्याचे अनुभवते! पुरुष स्पर्धाचे प्राकृतिक सत्य मांडणारी ही सखी, नैतिक की अनैतिक, अशा कोंडीत सापडते!
भारतीय संस्कृती विवाहितेला मित्र किंवा प्रियकर असावा, या सूत्राच्या विरोधात रुजलेली आहे. प्रियकर आणि मित्र यांच्यातील सीमारेषाही धूसरच असते. सुनीता झाडे यांच्या रसियातील प्रियकर मित्र जरी असला आणि तो पतीच्या तुलनेत प्रेयसीच्या भावना समजून घेणारा असला तरी तो शेवटी पतीचा द्वेष करता करता पतीचीच जागा घेऊ पाहतो. पती व प्रियकर दोन्ही रूपे स्वार्थी पुरुष म्हणूनच सखीच्या वाट्याला आलीत. तेव्हा सर्व रसिया सारखेच असतात का? ही शंका स्वाभाविक मानता येईल.
सारांश, ही सखी स्वत:शी प्रामाणिक राहण्याच्या विरोधात भूमिका मांडतेय. चार अतृप्त इच्छांच्या खिळ्यांनी ठोकलेल्या तसबिरीतील कोरा चेहरा हेच एका सखीचं कोरं बायबल आणि कोरं कुराण असल्याची अनुभूती सुनीता झाडे यांनी समर्थपणे व्यक्त केलीय.
त्या सखीला हवंय, बंद गोफ होणं! म्हणून तर तिला प्रश्न पडताहेत- कुठल्या गुन्ह्याचा शेवट हा आणि कुठल्या गुन्ह्याची सुरुवात? किती शिक्षा त्याला आणि कितीक मला?
रसियाचा कोरा चेहरा कोरं बायबल आणि कोरं कुराणच्या पातळीपर्यंत सखीला पवित्र वाटतो, यावरून तिच्या प्रेमाच्या उत्कटतेची व शुद्धतेची सीमा लक्षात येते.
लेखिकेला फक्त व्यामिश्र स्त्री-पुरुष संबंधातील स्त्री-प्रकृती व प्रवृत्तीचा एक तुकडा वास्तव सूत्रासह मांडायचाय. सुनीता झाडे यांना समाज व संस्कृतीच्या विरोधात बंडखोरी करायची नाहीय. ती त्यांची भूमिकाच नाहीय, त्यांना फक्त स्त्री-पुरुष संबंधाच्या अंत:स्थ वास्तवाची गुंतागुंत निर्भयपणे मांडायचीय. ज्या स्त्रीला अनेक रसिया हवे आहेत, तिची चूक मानायची का? नैतिकतेच्या कसोटीवर तिला कुलटा, व्यभिचारिणी म्हणून कुणी दोषीसुद्धा धरतील; पण तिच्या बाजूने विचार करताना तिची प्रकृतीच अनेक रसियावादी असेल तर तिने तिच्या प्रवृत्तीशी व निसर्गाशी इमान राखणे स्वाभाविक मानता येते. शिवाय तिची प्राकृतिक अनैतिकता इतर पुरुषांच्या सहभागाशिवाय सिद्धीस जाणार नसेल तर एकट्या त्या स्त्रीचा गुंता कसा ठरावा? आणि अशा स्त्रिया व पुरुष प्रत्येक काळात असणारच! ही वास्तविकता लक्षात घेतली तर लेखिकेने फक्त स्त्रीच्या प्रकृती व प्रवृत्तीचे नैसर्गिक सत्य लेखनात मांडल्याचे दिसते. तो तिचा सांस्कृतिक अपराध नव्हेच!
‘सुनीता झाडे त्यांच्या लेखनात नकळतपणे सांस्कृतिक पेच निर्माण करतात. हा पेच शब्दात मांडण्याचे धाडस साधारपणे स्त्रिया करीत नाहीत. त्यांचा न्यूनगंड किंवा नैतिक दडपण त्याला कारण ठरतात. पण प्रेम ही भावना नैसर्गिक असेल तर तिची अभिव्यक्ती रूपे विविध असणारच! आणि प्रकृती व प्रवृत्ती म्हणून त्यांचे नैसर्गिक मूल्य प्रमाण मानताना संस्कृतीला हादरे बसणारच! संस्कृती शुद्धीकरणाशी स्त्रीचे चारित्र्य बांधील ठेवल्याने हे लेखन अधिक तथाकथित नैतिकतेला सुरुंग लावते.
शेवटच्या टप्प्यात ‘रसिया’तील अनुभूती ‘फक्त एक दिवस तरी मनासारखा असावा’ या जाणिवेची अभिव्यक्ती करते. अर्थात संपूर्ण आयुष्यच मनासारखे जगता येत नसण्याची वास्तवता दाहक आहे. म्हणूनच निदान एक दिवस तरी मन व शरीरावरील कोणत्याही डागाची पर्वा न करता सर्व कर्तव्यांपासून दूर जाऊन एक माणूस म्हणून स्वत:साठी जगण्याची इच्छा इथे व्यक्त होते.
‘रसिया’तील स्त्रीत्वाची वेदना बहुपेडी व बहुआयामी आहे. या अनुभवविश्वाचे मूल्य त्यातील सच्चेपणात आणि प्रांजळ अभिव्यक्तीत शोधणे महत्त्वाचे आहे. नैतिक-अनैतिकतेच्या कसोट्या ‘रसिया’ला लावल्या तर उमलू पाहणाऱ्या, मनातील गुज बोलू पाहणाऱ्या स्त्रीमनाची स्पंदने सुकून जातील-कुजून जातील. या स्त्रिया मानसिक-प्राकृतिक अतृप्ततेचा-अस्वस्थतेचा शाप भोगत आहेत. त्यांना व्यभिचाराच्या गुन्ह्यात अडकवणे किंवा अनैतिकतेच्या अरोपाने बदनाम करणे अन्यायाचे होईल.

रसियाच्या आकलन-मूल्यमापनासाठी कलेचे नियम व संकेतही अपूर्ण वाटावेत. शरीरशास्त्र, मानसशास्त्र, स्त्री-पुरुषांच्या विवाहाची ऐतिहासिक परंपरा, नीतिशास्त्राची सत्यात्मकता, विवेकवादी विचारधारेचे मूल्य अशा अनेक विद्याशाखांच्या शास्त्रीय व विवेकनिष्ठ निकषावरच ‘रसिया’चे मूल्यमापन करणे अपरिहार्य आहे.
पुस्तक : रसिया
लेखक : सुनीता झाडे
प्रकाशक : दिलीप राज प्रकाशन
divyamarathirasik@gmail.com