आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Prithviraj Taur Article About Sitakant Mahapatra Poem

उडिया मातीचा गंध....

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण ज्या भाषेत स्वप्न पाहतो त्याच भाषेत कविता लिहिली पाहिजे.’ असे ज्ञानपीठप्राप्त कवी सीताकांत महापात्र म्हणतात. स्वप्नांची ती सहजता आणि काळाला व शब्दांना अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य आपल्याला महापात्र यांच्या कवितेतून सहज लक्षात येते.
सीताकांत महापात्र हे उडिया भाषेतील प्रमुख कवींपैकी एक आहेत. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, कबीर सन्मान, सोविएत लँड नेहरू अॅवॉर्ड, सारला पुरस्कार, कुमारन आशन पुरस्कार यांच्या समवेत पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९६१ ते १९९५ या काळात भारतीय प्रशासन सेवेत (आय. ए. एस.) त्यांनी विविध पदांवर कार्य केले. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे.

कविता, निबंध, संशोधन, संकलन, प्रवासवर्णन आदी वाङ‌्मयप्रकारात उडिया आणि इंग्रजी भाषेत सीताकांत महापात्र यांची शंभरपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांची कविता भाषांतरित झाली आहे. ‘चिमणे गं बाई तुज काय ठावे’ (अनुवाद- कमलाकर सोनटक्के) या संग्रहातून त्यांची कविता मराठीतही अनुवादित झालेली आहे. होमी भाभा फेलोशिप अंतर्गत त्यांनी भारतीय आदिम समूहांच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. सामाजिक मानवशास्त्रासंदर्भातील त्यांचे दोन ग्रंथ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केले आहेत. हॉर्वर्ड व केंब्रिज युनिव्हर्सिटीचे ते फेलो असून अलीकडेच त्यांना सार्क साहित्य महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गोपीनाथ मोहंती आणि सच्चिदानंद राऊतराय यांच्यानंतर उडिया भाषेतील साहित्य सेवेसाठी महापात्र यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापात्र हे राऊतराय, रमाकांत रथ, जगन्नाथप्रसाद दास, सौभाग्यकुमार मिश्र, हरप्रसाद दास अशा महत्त्वाच्या उडिया कवींपैकी एक आहेत.
सीताकांत महापात्र यांच्या कवितेला ओरिसाच्या मिथकांचा आणि मातीचा गंध आहे. चित्रोत्पला, महानदी, निरंजना आणि परिसरातील इतर नद्या, पुरीचे जगन्नाथ, सरलादास यांचे महाभारत, उडिया भागवत यांचा प्रभाव त्यांच्या कविता सृजनावरती सतत जाणवत राहतो.

‘आपण ज्या भाषेत स्वप्न पाहतो त्याच भाषेत कविता लिहिली पाहिजे.’ असे महापात्र यांनी म्हटले आहे. स्वप्नांची ती सहजता आणि काळाला व शब्दांना अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य आपल्याला सीताकांत महापात्र यांच्या कवितेतून सहज लक्षात येते.
पुन्हा एकदा कविता
कुणालाच कधी वाचवू शकली नाही कविता
सुरुंगांपासून, स्फोटकांपासून
भाल्यांच्या टोकापासून, बंदुकांपासून
आगीपासून, ईर्षेपासून, दगडापासून,
पश्चात्तापापासून सिंहाच्या जबड्यापासून
किंवा सामूहिक हिंसाचारापासून.
मला ठाऊकय की शब्दांमध्ये
असत नाही कोणतीच जादू
कवितेकडून इकडची काडीसुद्धा
तिकडे होत नाही
रणरणत्या दुपारी कावळा कोकतो
शेवग्याच्या झाडावर
कविता, त्याच विस्कळीत दुपारचा चेहरा आहे
तिच्याच कपटी फास्यांचा अंश
शाळकरी मुलांच्या दप्तरातून
अर्धमेल्या चातकाप्रमाणं
एकटक बघत राहते कविता
त्यांचे झोपाळू चेहरे
परीक्षेच्या काळातील अद्भुत थकवा
मिणमिणत्या कंदिलाच्या शेजारी.
थंडगार अन्न होऊन पडून राहते कविता
जेवणाच्या घाणेरड्या परातीत
विद्वान समीक्षकांनी सुरी, काटे, चमचे
पकडलेल्या हातांखाली.
कधी कधी वाटतं, गोळा करुन फेकून द्यावेत
हे सगळेच अर्थहीन, असमर्थ शब्द
इतिहासाच्या कचराकुंडीत.
तिथेच हरपून जावं त्यांनी
मोहनजोदडो, मोगल साम्राज्य
आजोबांची काठी, तुटलेल्या खडावा आणि
आजीच्या डोळ्यांत एकाकार होऊन
येऊन बसते केवळ शब्दहीनता.
अग्नी उत्सवात ते लोक
जळते टेंभे घेऊन, पूर्वजांना बोलावत
या, या अंधारात येऊन जा, उजाडताच जा परत
तू जो कधी इथेच होतास
याच उजाड गावात
याच जळून गेलेल्या गावात
उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या बांधांवर
होमकुंडाच्या मुंडारीवर
जर तुझा आत्मा आज
या निबिड काळोखात परतला
एखाद्या व्याकूळ, आणि करुण आवाजानं
तर पुन्हा आज, हेच थोडके शब्द
मशालीची आग होऊन
तू परतून येण्याच्या वाटेला
थोडे प्रकाशित करतील.
भिकारी मुलाचा मृत्यू
सकाळपर्यंत तो नव्हता, चिमुकला देह
विश्राम करत होता, सार्वजनिक बागेतल्या कोवळ्या गवतावर
आयुष्यात एवढा मायाळू स्पर्श, त्याला भेटलाच नव्हता कधी कुणाकडूनही
रात्रभर आभाळातले तारे, त्याला बघत राहिले एकटक बसून
विझणाऱ्या पणतीची असहायता, आणि ग्लानी समजून घेत
संपून जाणाऱ्या त्याच्या अभिमानी शब्दांना
एकदाच नीट नेटकं ऐकण्यासाठी, पण तो गुपचुप राहिला
आभाळातील कोट्यवधी दिव्यांना, आपल्या विझत्या डोळ्यांनी बघता बघता
सांगण्यासारखं काहीच नव्हतं, आणि बोलण्याची नव्हती शक्तीही
कुठली इच्छाही नव्हती, एवढ्या मोठ्या पृथ्वीच्या विरोधात
त्याची कुठलीच तक्रार नव्हती, चंद्र आपल्या मायाळू किरणांनी
लहानपणी हरवलेल्या त्याच्या आईसारखं, जोजावत राहिला त्याला,
चांदण्या टिमटिमल्या दोन पाच पैस्यांच्या नाण्याप्रमाणं
जवळ अॅल्युमिनियमच्या डब्ब्यात पडत होत्या
बालपणीच्या स्मृती, वाऱ्याची अंगाई ऐकता ऐकता
(चांदोमामा ये ये…, कान्ह्याला झोप दे...)
ऐकता ऐकता गाढ, अगदी गाढ, काळोखी झोप त्याला कवटाळत राहिली.
सकाळी तो नव्हता, सकाळही नव्हती.
मूळ उडिया कविता : सीताकांत महापात्र
धांगडाचं प्रेमगीत
डोंगराच्या उतारावर, तुला मागितलं प्रेम, तुला मागितलं स्वप्न
तुला मागितला स्पर्श, तुला मागितलं तंबाखूचं पान;
तू म्हणालीस, इथे नाही, इथे नाही, इथे शेत मळ्यात खूप आहेत लोक
संध्याकाळच्या अंधारात, मोहाच्या फुलांनी धुंद गावाबाहेर
तुला मागितलं प्रेम, तुला मागितला देह
किंवा म्हणालो दे वचन, तू म्हणालीस, काजव्यांची अन‌् एकट्या ताऱ्याची
मला नेहमीच वाटते भीती, या निर्जन जागेवरुन पळून जानंच उत्तम
दाट झाडीत, निबिड वनात, जेव्हा आपल्याच छातीचे ठोके येत होते ऐकू
तुला मागितलं प्रेम, तुला मागितला स्पर्श
तू म्हणालीस, छीः, इथे तर धूळ नि माती आहे
फुलासारखा हा देह, सोन्यासारखा आत्मा
सुकून नाही का जाणार? मळून नाही का जाणार? इथे नाही, इथे नाही!
झऱ्याच्या काठावर कुणीच नव्हतं, एकटं पाखरु गात होतं गाणं
तुला मागितला स्पर्श, तुला मागितला अंधार
तू म्हणालीस, झऱ्याच्या स्वच्छ आरश्यात, सगळं कसं स्पष्ट दिसतंय.
इथे नाही रे इथे नाही.
सगळी पृथ्वी झोपली होती, इथवर की चंद्र आणि चांदण्यासुद्धा
तुला मागितलं प्रेम, तुला मागितले प्राण, माझ्या थरथरत्या आत्म्यासाठी
तुझ्या शरीराच्या घरट्यात एवढीशी जागा मागितली मी
तू म्हणालीस, अंधारातही, माझ्या डोळ्यांच्या आरशात
सगळं काही स्वच्छ दिसतंय, आत्ता नाही, इथे नाही.
तर मग, हे घे काढून दोन्ही डोळे, तुला भेट करतो आहे
आता स्पर्श दे, स्नेह दे, दे अंधार, एकाकी आत्म्याला दे आधार.
सर्व कवितांचा अनुवाद : प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com