आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहब्बत की कोई मंझिल नहीं है...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ लग्न करणे, दोघांनी एकत्र येणे ही प्रेमाची अंतिम निष्पत्ती नसते. “प्रेम कोणत्याही ध्येयापल्याड असणारी गोष्ट आहे. मोहब्बत की कोई मंझिल नहीं है... प्रत्येक सीमा, प्रत्येक बांध ओलांडण्याचे बळ केवळ प्रेमच तुम्हाला देऊ शकते.”
“दलितांसाठी काहीही चांदीच्या ताटात वाढले जात नाही. प्रेम तर नाहीच नाही.” तो असे म्हणताना लक्ष्मी आणि सिवजीची कहाणी त्याच्या समोर असते.
ता मीळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यातील पुडूपट्टी गावात, मुथू नावाची एक देवी आहे. दर फाल्गुन महिन्यात तिची मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील सारे लोक येतात. मुथू देवीच्या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही, तर तिच्या चौथऱ्यावर एक काटेरी झुडूप आहे. आयाबाया त्या झुडपाला बांगड्या, मंगळसूत्र, छोटे पाळणे बांधून स्वतःच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस बोलतात. मात्र या जत्रा उत्सवात गावातील अनुप्पा गौंडर या उच्च जातीचे लोक अजिबात सहभागी होत नाहीत; उलट ते उत्सव काळात गावातून निघून जातात आणि उत्सव झाल्यानंतरच गावात परततात. अशी पूर्वापार प्रथा आहे म्हणे. पण जरा चौकशी केली की, मुथू देवीच्या देवत्वामागील दंतकथा उघड होऊ लागते, आणि युगानुयुगे सुरू असलेली एक मानवी कहाणी आपल्यासमोर उलगडत जाते...

मुथू ही सात भावांत एकुलती एक बहीण... दिसायला सुंदर, पण तथाकथित हलक्या जातीत जन्माला आलेली. “तू अजिबात घराबाहेर पडत जाऊ नकोस,” अशी तंबीच तिला तिच्या प्रेमळ भावांनी दिलेली. पण ती बिचारी किती काळ घरात बसून राहणार. तिची वहिनी ताक विकायला शेजारच्या गावात जायची, तिच्या सोबत ती एकदा घराबाहेर पडली आणि नको तेच झाले. गावातील जमीनदाराने तिला पाहिले. त्याचे लोक ती कुठे राहते, याची चौकशी करून गेले. कदाचित तिलाही तो आवडला असावा. झाले, भावांचे पित्त खवळले. आपल्या प्रेमळ भावांच्या रागाला घाबरून मुथू घरातून पळून गेली, आणि एका काटेरी झुडपाआड लपून बसली. तरी पण भावांनी तिला हुडकून काढलीच. सात भावांनी मिळून आपल्या नाजूक देखण्या बहिणीला काठ्यांनी मरेपर्यंत झोडपली. आता त्याच झुडपाची मुथू देवी झाली आहे. या देवीसमोर बकरी बळी दिली जाते, पण ती नेहमीप्रमाणे कापली जात नाहीत, तर ती काठ्यांनी बदडून मारली जातात. मुथूच्या प्रेमळ भावांची आठवण! आणि त्या जमीनदाराचे जातबांधव या उत्सवात सहभागी होत नाहीत. जाणते लोक सांगतात, तामीळनाडूत अशा दंतकथा असलेल्या किमान तीन-चारशे देवी आहेत. गावोगाव एखादी ज्ञात-अज्ञात मुथू आहे. तिच्या फसलेल्या प्रेमाची डोळे भरणारी कथा आहे.

...जगण्याचं आसपासचं नेपथ्य असं रक्तरंजित असताना तिलाकम, काथिरला भेटते. १९९०च्या आसपासचा काळ. दोघेही ‘पीपल्स वॉच’ या स्वयंसेवी संस्थेत सामाजिक काम करताहेत. ओळख अधिक गहिरी होत जाते. आपण प्रेमात पडलो आहोत, हे दोघांनाही उमजते. पण... तिलाकम उच्च जातीतील आहे, आणि काथिर ख्रिश्चन. पण पूर्वीचा दलितच. एक उच्च जातीतील मुलगी, दलित तरुणाशी लग्न करणार? कसं शक्य आहे? तिलाकमच्या नातेवाइकांनी, शेजारपाजाऱ्यांनी एकच गलका सुरू केला. जात, घराणे, प्रतिष्ठा हे सारे शब्द ऐरणीवर आले. पण तिलाकमचे वडील आणि तिचा भाऊ तिच्या बाजूने होते. तिलाकमचे वडील कम्युनिस्ट, तर खुद्द भावाने दलित मुलीशी लग्न केलेले. त्यामुळे ते दोघेही तिच्या बाजूने उभे राहिले. वडिलांनी समाजाच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले. उलट कोणताही डामडौल न करता तुम्ही हे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार साध्या नोंदणी पद्धतीने करा, असा सल्ला दिला. काथिरच्या आईवडिलांना हे लग्न खिश्चन पद्धतीने व्हावे वाटत होते; पण काथिरने त्यांची समजूत काढली आणि दोघांचे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार पार पडले.

केवळ लग्न करणे, दोघांनी एकत्र येणे, ही प्रेमाची अंतिम निष्पत्ती नसते. महत्त्वाचे असते, एकत्र हातात हात घेऊन चालताना तुम्ही कोणत्या वाटेने चालता, कोणती मूल्ये अंगिकारता? तिलाकम आणि काथिर यांच्या लग्नाला आज पंधरा वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. काथिर सांगतो ते कानात जीव आणून ऐकावं, असं आहे. तो म्हणतो, “कोणत्याही नात्यामध्ये संघर्ष येतो, लैंगिक भेदभावाचे प्रश्न येतात; पण आपण प्रत्येक बाबीचा सर्व बाजूंनी शहाणपणाने विचार करून हे प्रश्न सोडवायचे असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कौटुंबिक नातेसंबंधांचे लोकशाहीकरण होणे खूप गरजेचे आहे, तरच प्रत्येकाला हवाहवासा अवकाश मिळतो.”

तिलाकम आणि काथिर केवळ स्वतःपुरते जगत नाहीत. त्यांनी मदुराईत ‘इविडन्स’ नावाची एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. ‘सर्वांना समता आणि न्याय प्रदान करणारी व्यवस्था निर्माण करणे,’ हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही संस्था दीन-दलितांच्या, स्त्रियांच्या मानवी हक्कांसंबंधी काम करते. आंतरजातीय विवाह हा त्यातील एक छोटासा भाग. तिलाकम आजही आपले आडनाव लावत नाही, कारण तिला आपल्या खांद्यावरील जातीचे हे ओझे फेकून द्यायचे आहे. ती म्हणते, “आम्ही दोघांनीही परस्परांना भेटण्यापूर्वीच जातीचे जोखड फेकून दिले होते; पण तरीही आमच्यामध्ये मूलभूत फरक आहे. मी जात टाकून देण्याचा प्रयत्न करते आहे, तर काथिरचे लहानपणीचे जातीय भेदभावाचे दाहक अनुभव त्याची जातीय ओळख अधिक ठळक, अधिक अधोरेखित करत राहतात. त्यामुळे त्याला ती आपली ओळख म्हणून अधिक प्रकर्षाने जाणवत राहते. त्याला ती स्पष्टपणे घोषित करावीशी वाटते.”

म्हणून तर थोड्याशा खिन्नतेने काथिर म्हणतो, “दलितांसाठी काहीही चांदीच्या ताटात वाढले जात नाही. प्रेम तर नाहीच नाही.” तो असे म्हणताना लक्ष्मी-सिवजीची कहाणी त्याच्यासमोर असते.

दिंडीगुल जिल्ह्यातल्या निलाकोट्टाई गावात लक्ष्मी राहायची. अल्पशिक्षित म्हणजे काय, तर दुसरीपर्यंत कसेबसे शिक्षण. तिच्याच गावात सिवजी नावाचा एक टमटम ड्रायव्हर. तो शेतमजुरांची ने-आण करायचा. अशाच प्रवासातून लक्ष्मी आणि सिवजीची गट्टी जमली. प्रेम फुलले. पण लक्ष्मी उच्च जातीची, तर सिवजी दलित. चार वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, पण एके दिवशी लक्ष्मीच्या घरच्यांना हे सारे कळले आणि त्यांनी तिला तिच्या या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकेना. मग तिला तिच्या बहिणीच्या घरी नजरकैदेत ठेवले. तिने सिवजीचा नाद सोडावा, म्हणून तिला हरप्रकारे त्रास दिला. आई, वडील, भाऊ, इतर नातेवाईक तिला खूप मारायचे. पण ती तिचा हट्ट सोडत नव्हती आणि आईवडील त्यांचा. अखेरीस सिवजीने तिची या त्रासातून सोडवणूक केली. एके दिवशी दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. एका दूरच्या गावी खोली करून दोघांनी आपला गोडगुलाबी संसार सुरू केला. नवे दिवस, नवी ओढ...! लक्ष्मी आणि सिवजीच्या प्रेमवेलीवर पहिलावहिला मोहर दिसू लागला. लक्ष्मीला दिवस गेले. एके दिवशी दोघे प्रेमी जीव सुखसंवादात रमलेले असताना दारावर थाप पडली. दार उघडले, तर लक्ष्मीचे दोन भाऊ आणि दहा-पंधरा लोक घरात घुसले. सगळ्यांनी सिवजीला जातीवरून अचकट-विचकट शिव्या दिल्या, मारहाण केली आणि लक्ष्मीच्या डोळ्यांसमोर त्याला फरफटत ओढत एका गाडीत घालून निघून गेले. दुसऱ्या दिवशी थिवूर गावात या निष्ठूर लोकांनी सिवजीला विळ्याने चिरून मारले.
पुढील स्लाइडवर वाचा, उर्वरित लेख