आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला प्रजनन असे नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राण्यांमध्ये विविधता आढळते. शिवाय हवामान, वनस्पती, भूरचना, ऋतू, अन्न उपलब्धता असे पर्यावरणीय घटक प्राण्यांच्या जीवनशैलीवर परिणाम करत असतात. त्या जीवनशैलीतही विविधता प्रकट होत असते. प्रजनन हा जीवनशैलीचाच भाग. त्यामुळे प्रजनन प्रकारांतली विविधता स्वाभाविक आहे.
प्रा णी प्रजननासंदर्भातली नोंद घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे, वनस्पती आणि प्राणी या सजीवांतला फरक. वनस्पती अचल, तर प्राणी चल. तथापि नियमालादेखील अपवाद असतात. तसाच अपवाद या नियमालाही आहे. काही प्राणी अचलही (Stationary) असतात. हे सहसा जल सजीवांबाबतीत घडतं. बहुतांश जलचर पोहू शकतात. आपल्या इच्छेनुसार स्थलांतर करू शकतात. तथापि काही जल सजीव तरंगते असतात. ‘मेरी मर्जी’नुसार नव्हे, तर प्रवाहानुसार त्यांची स्थलांतरं होत असतात. आपण यांना फार तर ‘प्रवाहपतित’ म्हणून संबोधू.

प्लॅक्टोन (Plankton) प्रजातीचे जीव, असे वाहते सजीव असतात. त्यांच्यातही दोन वर्ग आहेत. अशा वनस्पतीजन्य सजीवांना Phytoplankton म्हणतात, तर प्राणीजन्य जिवांना Zooplankton हे नामाभिधान आहे. Phytoplankton सहसा सूक्ष्म आकाराचे असतात. Zooplankton बाकी उघड्या डोळ्यांना दिसू शकतात. उदा. कोळंबी, ही २ सें.मी. ते २० सें.मी. या आकारात आढळते. तर जेलीफिश हे प्लॅक्टोन २० सें.मी. ते २ मीटर या विस्तारात आढळतात. त्यांना Megaplankton म्हटलं जातं.

सर्वांचा आद्य सजीव प्रोटोझोआ. या परिसंघाची उत्क्रांती होत होत नाना प्रकारचे सजीव पृथ्वीतलावर विकसित झाले. नंतरची उत्क्रांत पायरी होती, छिद्रवंत(स्पंज) प्राणी. त्यानंतर जंत, अळ्या, संधीपाद, मृदकवची, कंकणी असे अनेक जीव अवतरले. उत्क्रांतीची पुढची पायरी महत्त्वाची होती, पाठीचा कणा असलेले प्राणी. त्यांचं वर्गीकरण असं करण्यात आलं आहे-
१. मत्स्य (जलचर) २. कत्स्य (उभयचर Amphibians प्राणी) ३. सर्पट (Reptiles) ४. पक्षी ५. सस्तन प्राणी.

इथंही अपवाद आहेत. शीतसागरातले सील्स आणि व्हेल्स, तसंच निकोबार सागरात मिळणारा ड्युगाँग (सी काऊ) हे जलचर सस्तन आहेत.

पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांतही पोटभेद आहेत. - १. उष्ण रक्ताचे प्राणी २. शीत रक्ताचे प्राणी. उष्ण रक्ताच्या प्राण्यांचं शारीरिक तापमान सहसा बदलत नाही, स्थिर असतं. उष्ण रक्ताच्या प्राण्यांत उपवर्ग- १. पक्षी २. सस्तन प्राणी.

पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यातला ढोबळ शारीरिक फरक पक्ष्यांना पिसं असतात, तर सस्तन प्राण्यांच्या शरीरावर केस किंवा लव असते. सस्तन प्राणी पिलांना आपल्या शरीरामार्फतच जन्म देतात, आणि दूध पाजून त्यांचं संगोपन करतात.

बहुतेक प्राण्यांच्यात लिंगभेद असतात. नर, मादी अशी भिन्नता असते. तसेच काही प्राणी द्विलिंगी वा उभयलिंगी (एकाच व्यक्तिमत्त्वात दोन्ही लिंगे) असतात. भिन्नलिंगीतील ज्या प्राण्याकडे शुक्राणूंचा (शुक्रजंतू) साठा असतो, तो नर; तर जिच्याकडे बिजांडांचा कोष असतो, ती मादी. प्राथमिक किंवा अविकसित प्राणी अलिंगी असतात. प्राण्यांच्या अशा नाना तऱ्हा, अशी विविधता. शिवाय हवामान (उष्ण, शीत, दमट, कोरडी), वनस्पती, भूरचना, ऋतू, अन्न उपलब्धता असे पर्यावरणीय घटक प्राण्यांच्या जीवनशैलीवर परिणाम करत असतात. त्या जीवनशैलीतही विविधता प्रकट होत असते. प्रजनन हा जीवनशैलीचाच भाग. त्यामुळे प्रजनन प्रकारांतली विविधता स्वाभाविक आहे.

प्राथमिक अवस्थेतले प्राणी अलिंगी असले, तरी ते शेकडो, हजारो पिढ्या निर्माण करू शकतात. त्यांचे प्रजनन हे कदाचित गूढ वाटू शकते. तथापि सर्वात साधी, सोपी, सरळ अशी ती प्रजनन क्रिया असते. हे प्रजनन अलैंगिक प्रजनन म्हणून ओळखले जाते.
eknathjosh@gmail.com