आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Jyoti Dhaemadhikari Article On Bahinabai Chaudhari

घरघरीतून माले मले ऐकू येतो सूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबादेत बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत सुरू असलेलं सातवं मराठवाडा लेखिका संमेलन नुकतंच पार पडलं.

या निमित्ताने बहिणाबाईंच्या ओवीगीतातील समृद्ध आणि काव्यात्म बाजूंवर एक दृष्टिक्षेप...

स्त्रीसाहित्याची निर्मिती तिच्या स्वत:शीच गुणगुणण्यामुळे झाली असावी. तालबद्ध, लयबद्ध गुणगुणत कष्टप्रद कामे हलकी करण्याची किमया तिला निसर्गत:च साध्य झाली आहे. भारताच्या विविध भागांतल्या स्त्रियांच्या गाण्याची उदाहरणे हेच दर्शवतात. भातशेतीची लागवड करताना सामूहिक ताल धरणाऱ्या स्त्रिया, जोंधळ्याच्या खळ्यावर गडीमाणसांच्या हाताखाली होपले उचलणाऱ्या स्त्रिया, आसामात चहाच्या मळ्यांमध्ये खुडणी करणाऱ्या स्त्रिया गाणे म्हणतात. ही गाणी लोकगीतांचा खजिनाच आहेत. गाण्याच्या ठेक्यावर कामे उरकण्याच्या तिच्या कौशल्याला तोड नाही. पूर्वापार चालत आलेली शेती संस्कृतीइतकीच पूर्वापार चालत आली आहे स्त्रियांच्या गाण्यांची परंपरा. त्यामुळे स्त्री लेखिका केव्हा झाली, हा मुद्दा गौण ठरावा. शिक्षणाच्या अभावामुळे तिला कित्येक शतके लिखित स्वरूपात व्यक्त होता आले नाही, पण ती साहित्यिक केव्हा झाली असावी? तर स्त्री म्हणून तिने स्वत:ची नैसर्गिक कर्तव्ये स्वीकारली तेव्हाच तिने शब्दबद्ध होण्याची कला अवगत केली, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रात ही स्त्रियांच्या मौखिक गीतांची मोठी परंपरा आहे. भोंडला, नागपंचमी, मंगळागौरीची गाणी, जात्यावरच्या ओव्या मौखिक साहित्याच्या रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत होते. आता बाजारात पुस्तकरूपाने या सगळ्या कविता, गाणी उपलब्ध होत आहेत. ऐकलेली गाणी शब्दबद्ध करून जतन करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र पूर्वापार अशिक्षित स्त्री आपल्या संसाराशी, दैनंदिन कर्तव्याशी प्रामाणिक राहून वाट्याला आलेली कामे निमूटपणे करते असे. अपरिहार्य कष्टाची रास उपसताना उपजत तरलता, भावुकता स्त्रियांनी काव्यात्म अाविष्कारातून जपून ठेवली आहे.

सातव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीची उभारणी उस्मानाबाद येथे झाली आहे. बहिणाबाईंच्या ओवीगीतातील समृद्ध आणि काव्यात्म बाजूकडे दृष्टिक्षेप टाकताना स्त्रीही अभिजात साहित्यिक आहे, असे म्हणावेसे वाटते. कारण बहिणाबाईंच्या सृजनात्मक अाविष्कारावर पारंपरिक गीतांचा संस्कारही तितकाच महत्त्वाचा ठरतो. बहिणाबाईंनी गायलेल्या ओव्या त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी लिहून काढल्या. बहिणाबाईंचं व्यक्तिमत्त्व तर त्यातून उजागर होतंच; परंतु त्यांचा भवताल, त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे निष्कर्ष कवितांमधून व्यक्त होतात. दळणकांडणाची श्रमाची कामे करताना मराठमोळ्या स्त्रियांनी आपली सुखदु:खे तालबद्ध गुंफली. बहिणाबाईंच्या कविता या मराठी स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. बहिणाबाई म्हणतात,
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या
अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले.
तत्कालीन विचार, जीवनपद्धती या ओवीतून व्यक्त होते. नशिबाला बोल न लावता राहायला आलेलं आयुष्य स्वीकारण्याची स्वाभाविक वृत्ती व्यक्त होते. जात्याच्या पाळूच्या घरघरीशी एकरूप होऊन गायलेली ही ओवी बघा-
दाने दयतां दयतां,
जशी घामाने मी भिजे
तुझी घरोटा घरोटा,
तशी पाऊ तुझी झिजे.
मौखिक ओवीगीतांचे वैशिष्ट म्हणजे, ती कोणालाही उद्देशून रचलेली नाहीत. एेकणारा वर्ग ओवीगीतामध्ये गृहीत धरलेला नाही. ओवी ही स्वत:शीच गुणगुणत स्वत:ला चार सल्ले देण्याचाही प्रपंच आहे. बहिणाबाई म्हणतात,
अरे संसार संसार, नही रडनं, कुढनं

येड्या गयातला हार, म्हणू नको रे लोढनं.
जीवनविषयक आकलन व्यक्त करताना बहिणाबाई दु:खाकडे डोळेझाक करतात, तसे करायला सुचवतात. पराकोटीच्या आनंदमयी जीवनाची ओढ आपल्या ओवीतून, नादमयतेतून व्यक्त करतात. स्वत:साठीच म्हटलेली गाणी खुल्या मनाने कष्टमय आयुष्याची कबुली देतात. यात कुठेही तक्रारीचा सूर नसतो. गाणं सहज फुलतं. व्यक्त होतं. निसर्गाने सोपवलेली जबाबदारी पेलताना उत्कट काव्यात्म आकृतीबंध सहज अवतरतो…

गाण्याचे विषय स्त्रियांच्या भावविश्वाशी निगडित आहेत. घर, नातेसंबंध, पती, त्यांची माणसे यांचा या भावबंधामध्ये समावेश होतो. आई, भाऊ, बहीण अशी आत्मीय गुंफण ओव्यांमध्यून होते. स्त्री उपजत उत्सवप्रिय, समारंभप्रिय आहे. बहिणाबाईंच्या काही ओव्या अशा मराठी सणसमारंभाचे औचित्य साधतात.

बहिणाबाईंच्या ओवीगीतातील विषयवैविध्य त्यांच्या विश्वातून आलेले आहे आणि ते थक्क करणारे आहे. जीवनाविषयी तक्रारींचा सूर त्यातून उमटत नाही. त्या मनाला फिरून, वळवून आणतात. स्त्रीचं जिणं ही ‘नशिबाची रेघ’ न मानता आपल्या काव्यात्मक अाविष्कारातून सहज सुलभ करण्याचा प्रयत्न करतात.

आज स्त्रियांच्या मानसिक व्यापारात आमूलाग्र बदल झाले. आधुनिक स्त्रीचा लढा वेगळ्या पातळीवर तेवढाच कष्टप्रद आणि अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. व्यक्त होण्याची परंपरा मुक्ताई, जनाबाई, बहिणाबाई यांच्यापासून आजतागायत स्त्रीने जपली आहे. अधिक प्रगल्भतेने स्त्रीही व्यक्त होत आहे. हातात लेखणी आल्याने स्त्री संवेदनांना ‘माणूसपणाचे’ आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य मिळाले आहे.
jyotijayantk@gmail.com