आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Leela Patil Write About Women Marriage Life And Their Security

लग्न‍ाशिवाय'सिक्युरिटी'नाही ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाशिवाय ‘सिक्युरिटी’ नाही. आयुष्याला जोडीदार मिळाल्याने सुरक्षितता लाभते अशी अनेकजणींची अपेक्षा असते. सामाजिक ‘सेफ्टी,’ सांस्कृतिक दर्जा, आर्थिक सुरक्षितता यासाठी लग्न हवे, असे आपल्याकडील स्त्रियांना ठामपणे वाटते. बहुसंख्य जणींना हक्काचं आपलं माणूस, नवरा हवा, मूल हवं म्हणून पती असावा. सामाजिक मान्यतेच्या चौकटीत आयुष्याला बसवावं म्हणूनही लग्नाशिवाय चांगला पर्याय दुसरा नाही, अशीही अनेकजणींची भूमिका असते.
जोडीदार आपल्याला सिक्युरिटी देईल नव्हे देणारच, वखवखलेल्या नजरांपासून सुरक्षित ठेवणार अशी अपेक्षा ठेवून नयनानं लग्न केलं. परिचय, मैत्री, प्रेम या क्रमाने नाही वाटचाल. सरळ रीतीप्रमाणे दाखवून पाहून नयनाचं निखिलशी लग्न झालं. निखिल ख्यातनाम कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर. दिसायला यथातथाच तसा पण हेल्दी हसमुख बोलघेवडा व हुशार. आर्थिक सुस्थिती. कार, बऱ्यापैकी फर्निश्ड पॉश इंटिरिअर करून घेतलेला ब्लॉक. नयनाला संसारात स्थैर्य हवं होतं. नवरा, दोन मुलं व आपण असं झकास स्वप्न. या स्वप्नावर आरूढ होऊन निखिलची सहचारिणी म्हणून संसारात आलेली नयना.

केतकी रंग, टपोरे डोळे, सरळ नाक, पातळ ओठ, कमनीय बांधा, उंच मान अशी नयना जणू सौंदर्याची खाण सापडली निखिलला जोडीदारीण म्हणून. तिनं निखिलला कसं पसंत केलं असे अनेकांच्या नजरेतले व चेहऱ्यावरचे भाव वाचूनही तिकडे दुर्लक्ष करीत नयनाने वैवाहिक जीवन भरभरून जगायला सुरुवात केलेली. जीव लावत, प्रेमाची पखरण करत निखिलला स्वत:शी बांधून ठेवलं तिनं. नयना सुस्वभावी, बोलकी. आयुष्याचा पार्टनर म्हणून निवडलेल्याशी पूर्ण कमिटेड अशी. मुलगा झाला आणि नयना-निखिलच्या आयुष्याला एक वेगळीच संवादाची लय वाढली.

नयनाच्या मुलाचा पहिला वाढदिवस. दणक्यात साजरा करण्याचे प्लॅनिंग. सगळी जबाबदारी नयनानं उचलली. उत्साह भरून राहिलेला. मुलगा अथर्व गोंडस. नयनाचं रूप उचललेला. निखिलची मित्रमंडळी, नातेवाईक, बॉस, सहकारी कार्यक्रमाला हजर. त्यांच्या बहुतेकांच्या नजरा नयनावर फिरून फिरून. इतकं उमललेलं, बहरून आलेलं, ओतप्रोत सोज्वळ व मादकतेचं कॉम्बिनेशन असलेलं देखणं सौंदर्य आणि मातृत्वाच्या तृप्तीचा मुलामा. जिंकलं जणू सगळ्यांना नयनानं. बोलणं मिठ्ठास, वागणं मार्दवशील व ऐटबाज अशी नयना. आले-गेलेल्यांनी स्तुतीसुमनं कार्यक्रमावर उधळलीच, पण विशेषत: नयनावर. निखिल थोडा बाजू बाजूलाच राहिलेला.
त्याच दिवशी सुखी संसाराला जणू दृष्ट लागली. मत्सराची ठिणगी पडली. द्वेषाचा वणवा पेटला. नयनाला ‘नवरेवास’ सुरू झाला. कशाचीही तमा न बाळगता छळ सुरू झाला. नयना सुंदर व आपण यथातथाच. तेव्हा हीच तर तुलना मनात घेऊन न्यूनगंडाचे सावट पसरत राहिले निखिलच्या मनावर. विवेकाचे विस्मरण, संयमाची ताटातूट, संवेदनशीलतेस ओहोटी लागली निखिलच्या. टोचून बोलणं, उद्दामपणे टोमणे, उपेक्षा व अपेक्षाभंग करणारी उत्तरं आणि नको तेवढा अपमान असं सततचं छळवादी वर्तन निखिलचं. पुरुषार्थ गाजवायच्या विकृत तऱ्हांनी पिडायला सुरुवात. काय करणार नयना? अवघड जागचं दुखणं.

नयनाच्या शारीरिक तक्रारी सुरू झाल्या. मन स्वस्थ नसेल तर शरीर स्वस्थ कसं राहणार? नयनाचा हा छळवाद निखिलच्या मावसभावाच्या लक्षात आला. त्याने त्यावरून त्याला छेडले तर उलट परिणाम. त्याचाही संशय घ्यायला लागला निखिल. सौंदर्य हा शाप ठरला संसारसुखाच्या दृष्टीने. सुंदर असणं व दिसणं हे डिस्क्वालिफिकेशन ठरलं.
अनेकांनी सल्ला दिलाय की, घटस्फोट घे निखिलपासून. पण नयना मानायला तयार नाही. एकतर इतकी पाॅश राहणी, क्वालिटी स्कूल क्लासेस महागडे अथर्वसाठी हे सगळं निखिलच्या कमावतेपणामुळेच. भक्कम आर्थिक सुस्थितीची लाइफस्टाइल सोडून जाणार कुठं? बरं अथर्वचा खर्च आहेच. तिला अजूनही आशा वाटतेय ही निखिल सुधारेल. ब्रोकन रिलेशनशिपमध्ये बदल होऊन पॅच अप होईल. निखिलचा कमबॅक होईल.

पूर्वीचं नातं गवसेल. अनस्पोकन कन्सेप्ट अशी की, स्त्रीजवळ संयम, सोशिकता आणि मुलासाठी सगळं सहन करण्याची शक्ती असते. शिवाय पुरुष हा कदाचित नॅचरली पोलोगामस (Polygamous) असू शकतो मात्र स्त्री मोनोगामस (monogamous) असते, असे मानले जाते. अर्थात अपवाद असतील. तरीही नयना एकपतीत्व, एकनिष्ठता व त्याच मानसिक दृढ भावनेने भारावलेली असल्याने निखिलला जिंकेन मी आणि मागे हटणार नाही, वाकेन पण मोडणार नाही. घर नाहीच सोडणार अथर्वसाठी व स्वत:साठीसुद्धा. जगेनच मात्र जिवाचे काही बरेवाईट करणार नाही. लग्न टिकलं, नव्हे टिकवलंय नयनानं! तिला सिक्युरिटी हवी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक.