आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनस्पतीजन्य औषधेही जपून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनस्पतीजन्य औषध किंवा त्यांचे रस पूर्णपणे सुरक्षित आहेत या गैरसमजाखाली अशा औषधांचे नियमित सेवन केले जाते. बरेच लोक जाहिरातींमधील माहितीच्या आधारे बरेच प्राश, आसवं, अरिष्टं, चूर्णं, कल्प मनानेच घेत असतात.
वनस्पतींच्या संशोधनाकडे बघता, त्या वनस्पती सर्वांसाठी उपयुक्त ठरतीलच असे नाही. वनस्पतींचा वापर करताना आजार, त्याची अवस्था, रुग्णावस्था, रुग्णाचे बळ, वातावरण इत्यादी अनेक बाबींचा विचार करावाच लागतो.
आयुर्वेदाने प्राकृत दिनचर्येत व ऋतुचर्येत असे वनस्पतीचे रस नियमित घेण्याचे संदर्भ कुठेही दिलेले आढळत नाही. उदाहरणादाखल मधुमेहाचे रुग्ण कारले, कडुनिंब, मेथी वा अन्य कडू वनस्पतीचे रस नियमित घेताना आढळून येतात. बऱ्याच व्यक्ती प्रकृती चांगली राहाण्यासाठी व तारुण्य राखण्यासाठी म्हणून आवळा, गुळवेल रसाचे सेवन करतात. वनस्पतीजन्य औषध किंवा त्यांचे रस पूर्णपणे सुरक्षित आहेत या गैरसमजाखाली अशा औषधांचे नियमित सेवन केले जाते. उच्चभ्रू लोकांमध्ये Red grape seed extracts, resveratrol, Glucosamine sulphate, silymarin अशा एक ना अनेक वनस्पती औषधींचा स्वत:वर मारा करून घेण्याचे फॅड पसरत चालले आहे. बरेच लोक जाहिरातींमधील माहितीच्या आधारे बरीच आयुर्वेदिक औषधे मनानेच घेत असतात. यात बरेच प्राश, आसव, अरिष्ट, चूर्ण, कल्प यांचा समावेश होतो. आयुर्वेदाने अत्यंत शास्त्रशुद्धरित्या या औषधांचा वापर वर्णन केला आहे व तो त्याचप्रमाणे होणे अपेक्षित आहे. अशा पूरक पोषणमूल्य असलेल्या वनस्पतींच्या सेवनाने व त्यांचा अनावश्यक वापर केल्याने दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
बरेच लोक शंखपुष्पीसारख्या वनस्पतीचा बुद्धिवर्धक म्हणून वापर करतात. असा वापर अपस्मारासाठी औषध सुरू असलेल्या व्यक्तींनी केल्यास त्यांचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. याच प्रमाणात काळाचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ नये व आपले वय कमी दिसावे म्हणून resveratrolसारख्या वनस्पतीचा वापर करतात. resveratrol हे काळ्या द्राक्षांच्या सालातील औषधी सक्रीय तत्त्व असून बऱ्याच आजारांवर ते उपयुक्त आहे. प्रत्येक आजारपरत्वे व अवस्थेनुसार त्याची वेगवेगळी मात्रा लागते. resveratrol ची बॉरफॅरिन व अॅस्पिरिन या रक्त पातळ ठेवणाऱ्या औषधांबरोबर क्लिष्ट प्रक्रिया होऊन रक्तस्त्राव बळावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशी औषधे मनानेच व सल्ल्याशिवाय घेणे हानिकारक ठरते. याचप्रमाणे बरेच लोक वजन नियंत्रणात आणण्यासाठी दुधीभोपळ्याचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचे रुग्णदेखील दुधीभोपळ्याच्या रसाचे सेवन करताना दिसून येतात. बऱ्याच वेळा सर्वमुखी चिकित्सा सोडून दुधीभोपळा सेवन करणारे लोकसुद्धा आढळून येतात. वास्तविक दुधीभोपळ्याच्या खूप प्रजाती आहेत. त्यातील कुठल्या दुधीभोपळ्याचे हे गुणधर्म आहेत याची शास्त्रीय माहिती आढळत नाही. त्यामुळे असे उपाय करत असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच ते करणे गरजेचे आहे.

वनस्पतींच्या संशोधनाकडे बघता जवळजवळ सर्व वनस्पतींमध्ये कुठल्या ना कुठल्या पेशीमध्ये काम करणारी अॅन्टीऑक्सिडंट अॅक्टिव्हिटी आढळून येते. याचा अर्थ त्या वनस्पती सर्वांसाठीच उपयुक्त ठरतीलच असे नाही. वनस्पतींचा वापर करताना आजार, त्याची अवस्था, रुग्णावस्था, रुग्णाचे बळ, वातावरण इत्यादी अनेक बाबींचा विचार करावयास लागतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीपरत्वे औषध त्यांची मात्रा व स्वरूप यांच्यामध्ये बदल घडवून आणावयास लागतात. त्यावेळेसच वनस्पती आपले कार्य व्यवस्थित दर्शवू शकतात. त्यामुळे वरील सर्व बाबी लक्षात घेता आपल्या शरीरास पूरक पोषणमूल्यांची प्रत्येक वेळेस गरज पडत नाही. आपण आपला आहार नियंत्रित ठेवल्यास व आपली दिनचर्या शिस्तबद्ध ठेवल्यास, मानसिक अवस्था प्रसन्न ठेवल्यास निश्चितपणे आरोग्यसंपन्न व दीर्घायुषी राहू शकतो. यामध्ये सातत्याने बिघाड होत गेल्यास पूरक पोषणमूल्ये यातून आपल्याला वाचवू शकत नाही, हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकिरता पूरक पोषकमूल्यांचा उपयोग मनाने न करता तो अतिशय कटाक्षाने तज्ज्ञांच्या सल्लाने व आवश्यकता असल्यासच करावा.
डाॅ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com