आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहले आप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन कपडे, अमेरिकन खाणं, अमेरिकन फॅशन, अमेरिकन संगीत आपल्याला आवडू लागलंय. पण त्यांची शिस्त, स्वच्छता, का नाही आवडत?
आपल्या रोजच्या व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी असतात, ज्या आपण सहज करू शकतो, आणि दुसऱ्याला थोडासा दिलासा, थोडा आनंद देऊ शकतो. त्या तरी आपण अंगी बाणवल्या पाहिजेत ना?

अमेरिकेत येऊन आता आठवडा झाला होता. सामान, घर आवराआवर, यामध्ये आठ दिवस निघून गेले. आज मुलाचीही शाळा सुरू झाली. घरातली सकाळची कामं आवरून बाहेर फेरफटका मारण्यासाठी मी निघालेे. हवेत थोडासा गारवा होता, पण खूप थंडी नव्हती. आजूबाजूचा परिसर जाणून घेण्यास मी उत्सुक होते. सोसायटीबाहेरचा मुख्य रस्ता मी धरला. फूटपाथवरून सरळ चालत गेले. तिथून समोर दिसणारा एक रस्ता दिसला. त्या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर झाडी होती. त्यातलं एक झाड अगदी वेगळं होतं. फांद्या पुढे येऊन कंबरेत वाकल्यासारख्या दिसत होत्या. जणू वाकून स्वागत करत होतं ते झाड. मी त्या रस्त्यावरून जायचं ठरवलं. गाड्यांची फारशी वर्दळ नव्हती. मी रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या थोडी पुढे आले. एक गाडी येत होती, म्हणून मी थांबले. ती गाडी जवळ आली तसा गाडीचा वेग अगदीच मंदावला आणि मी उभी होते तिथेच ती गाडी येऊन थांबली. गाडीमधल्या पन्नाशीच्या गृहस्थांनी माझ्याकडे पाहून ओळख असल्यासारखं स्मितहास्य केलं. मी पण हसले; पण मला कळेना, यांना कुठे भेटलोय आपण. इथे येऊन तर फक्त आठवडाच लोटला होता. पण एका आठवड्यात दोन-तीन शाळा आणि नवऱ्याच्या ऑफिसातल्या काही लोकांना मी भेटले होते. अजून तरी मला इथले सगळे चेहरे सारखेच दिसत होते. सांगितलेली नावं कळतच नव्हती, त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण तरीही या गृहस्थांना कुठेही भेटल्यासारखं किंवा पाहिल्यासारखं मला अजिबातच वाटत नव्हतं. रस्त्याच्या कडेला मी उभी होते आणि मला पाहून यांनी गाडी थांबवण्याएवढी ओळख तर नक्कीच नव्हती. मी विचार करत तशीच उभी राहिले. तो माणूसही तसाच गाडी थांबवून उभा होता. पुन्हा नजरानजर झाल्यावर मी पुन्हा हसले, पण तो हसला नाही. काय करावं, हे कळेना. मी पटकन रस्ता ओलांडला. मागे वळून पाहिलं तर गाडी निघून गेली होती.
मी पुढच्या रस्त्यावर चालू लागले. ज्या झाडाला पाहण्यासाठी मी रस्ता ओलांडला होता ते झाड मागे पडलं होतं. मी बरीच पुढे आले होते. माझं आजूबाजूला काही लक्षच नव्हतं. कारण मघाशी काय झालं हे मला कळलंच नव्हतं. विचार करता करता रस्ता बराच मागे पडला होता. आता रस्त्याचं दुसरं वळण आलं होतं. पुन्हा रस्ता ओलांडण्यासाठी मी उभी राहिले आणि पुन्हा एक कार माझ्यापाशी थांबली. मला जरा टेन्शनच आलं. आत एक बाई होत्या. त्याही माझ्याकडे पाहून हसल्या. त्यांनी खुणेनेच मला ‘रस्ता ओलांड’ असं सांगितलं. मी रस्ता ओलांडला आणि कार निघून गेली. आणि मग डोक्यात प्रकाश पडला. अच्छा, म्हणजे ती मघाचची गाडी मी रस्ता ओलांडण्यासाठी थांबली होती तर! पुढे बऱ्याच ठिकाणी असे अनुभव येऊ लागले. विशेषतः सोसायटी किंवा मॉलच्या बाहेर मोठ्या पार्किंगच्या जागेत आपल्या सवयीप्रमाणे गाडी जाण्यासाठी आपण थांबायचं आणि त्यांच्या सवयीप्रमाणे पादचाऱ्यांना आधी जाण्यासाठी गाड्या थांबायच्या आणि मग ‘पहले आप पहले आप’सारखं व्हायचं. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मॉल, दुकानांमध्ये दारातून आत जाताना पण ‘पहले आप’ असाच अनुभव यायचा. हे तरी ठीक. पण नंतर जशी मी मुलाच्या शाळेत वारंवार जाऊ लागले, तशी आणखी एक गंमत जाणवू लागली. सकाळच्या शाळेच्या वेळात बरेच पालक शाळेत येत-जात असत. खरं तर ती सकाळची घाईची वेळ असायची. एकदा माझ्या पुढे एक बाई होत्या. त्या आधी दरवाजाजवळ पोहोचल्या. मी जवळजवळ वीस-एक पावलं त्यांच्या मागे होते आणि दाराकडे जात होते. दार सोडल्यावर आपोआप बंद होणारं होतं. त्या बाई माझ्यासाठी दार उघडून तिथेच थांबल्या होत्या. मी जवळ गेल्यावर आधी ‘गुड मॉर्निंग’ झालं. मी आधी आत गेले, मग त्यानंतर त्या आत आल्या आणि मग त्यांनी तो दरवाजा सोडला. बाप रे! सुरुवातीला या प्रकाराने मला फारच अवघडल्यासारखं व्हायचं. आपण अगदी जवळ असताना आपल्यासाठी दरवाजा धरून ठेवणं ठीक आहे; पण आपण लांब असतानाही एक अनोळखी व्यक्ती एवढा वेळ दार धरून उभी राहाते, ही गोष्टच अवघडल्यासारखी होती. तिथली सगळीच दारं अापोआप बंद होणारी, पण लोक मात्र शांतपणे आणि हसतमुखाने आपल्यासाठी दार धरून उभे राहतात. खरं तर काय गरज आहे याची, असंही मला वाटायचं. आणि आपणही असं कुणासाठी तरी दार धरून उभं राहायला हवं, हे बऱ्याचदा लक्षातच यायचं नाही. एकदा काय झालं, हिवाळ्याचे दिवस होते. आमचं घर लेकच्या जवळ असल्यामुळे थंड, बोचरा वाराही सुटला होता. तिथे थंडी परवडली, पण वाऱ्याला मिनिटभरही उभं राहावत नसे. मी आणि मुलगा वाणसामानाच्या पिशव्या दोन्ही हातात धरून येत होतो. पार्किंगपासून बिल्डिंगपर्यंत येणं हीदेखील अवघड गोष्ट वाटायची. कारण थंडी आणि वारा असे की, भारतात विशेषतः महाराष्ट्रात आपण ते कधीच अनुभवलेले नसतात. अशा वातावरणात दोन फेऱ्या करायला नकोत, म्हणून सगळं सामान दोन्ही हातांमध्ये कोंबून मी आणि मुलगा कधी एकदा बिल्डिंग गाठतोय, असे घाईघाईनं निघालो होतो. कारण बिल्डिंग हवाबंद होती. बिल्डिंगमध्ये प्रवेश केला की झालं. पण बिल्डिंगचं दार बाहेरून येताना किल्लीने उघडायला लागायचं. आता हातातलं सामान खाली ठेवूनच दाराची किल्ली पर्समधून काढावी लागेल, असा विचार मी करत होते. आत्ता जर कोणी दार धरून उभं राहिलं असतं तर किती बरं झालं असतं ना, नाहीतर नको तिथे दार धरून उभे राहतात हे अमेरिकन लोक. मी मनातल्या मनात विचार करत होते. मी जशी बिल्डिंगच्या जवळ गेले तसा बिल्डिंगचा दरवाजा आतून उघडला गेला. कुणीतरी दार उघडून बाहेर जात असावं. मला इतकं हायसं वाटलं, मी तर विचार केला की, जे कोणी असेल त्याला दार तसंच धरून ठेवायची विनंती करायची. पण मी दाराच्या अगदी जवळ जाईपर्यंत कुणी बाहेर आलंच नाही. पण दार आतून धरलेलं होतं. मी आणि मुलगा लगेच आत गेलो. माझ्या खाली, पहिल्या मजल्यावर राहणारी अमेरिकन बाई आतून दार धरून उभी होती. तिने मला आणि मुलाला धावत येताना तिच्या बाल्कनीतून पाहिलं होतं, आणि ती दार उघडण्यासाठी एक जिना उतरून खाली आली होती. तिने आतून दरवाजा उघडला आणि धरून ठेवला होता. खरं तर आम्ही कधी फारशा बोललोही नव्हतो एकमेकींशी. मला खूपच आश्चर्य वाटलं. त्या कुडकुडत्या थंडीत तिने केलेली ही छोटी गोष्ट मोठा दिलासा देणारी होती. त्या प्रसंगानंतर मात्र मागून कुणी येत असेल तर आवर्जून दार धरून उभं राहणं, माझ्याकडूनही आपसूकच घडू लागलं. चांगल्या गोष्टीही संसर्गजन्य असतात, याची ती अनुभूती होती. ग्लोबलायझेशनचं जग आलं. आपण अमेरिकन लोकांच्या अनेक गोष्टी आपल्याशा केल्या. अमेरिकन कपडे, अमेरिकन खाणं, अमेरिकन फॅशन, अमेरिकन संगीत. मग अमेरिकन लोकांकडून अशा चांगुलपणाच्या गोष्टी घ्यायला काय हरकत आहे? हो म्हणजे अगदी तंतोतंत त्याच गोष्टी असं नाही; पण आपल्या रोजच्या व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी असतात ना, ज्या आपण सहज करू शकतो, आणि दुसऱ्याला थोडासा दिलासा, थोडा आनंद देऊ शकतो. आपल्या वागण्यात चिमूटभर चांगुलपणा मिसळला तर जगणं आणखी चविष्ट होईल, नाही का?
डॉ. मृण्मयी भजक, पुणे
drmrunmayeeb@gmail.com