आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Anand Teltumbde Article About Dr. Ambedkar Viewed The Muslims Of India

डॉ. आंबडेकर मुस्लिम विरोधी होते: एक मिथक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समाजाची दिशाभूल करण्यासाठी व्यक्ती आणि विचारांचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण केले जाते. त्यातूनच मिथकांचा जन्म होतो. राजकीय समीकरणे नजरेपुढे ठेवून हा प्रयोग डॉ. आंबेडकरांच्या बाबतीतही सातत्याने राबवला गेला. त्यातूनच ‘डॉ. आंबेडकरांचा द्विराष्ट्रवादास पाठिंबा होता', "आंबेडकर मुस्लिमविरोधी होते' आदी संभ्रम निर्माण करणारी मिथके जनमानसात रुजवली गेली. सुगावा प्रकाशनाच्या डॉ. आनंद तेलतुंबडेलिखित आणि तुकाराम जाधव अनुवादित "डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: विपर्यास आणि वस्तुस्थिती' नावाच्या पुस्तकात यासंदर्भात इतिहासनिष्ठ विवेचन आले आहे. त्यावर आधारलेले हे टिपण...

मिथक १ : डॉ. आंबेडकर मुस्लिमविरोधी होते...

डॉ. आंबेडकरांच्या लेखनात इस्लाम आणि मुस्लिम संबंधित संदर्भ येतात. बहिष्कृत हितकारिणी सभेचे मुख्यपत्र असलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. डॉ. आंबेडकर जर इस्लामविरोधी व मुस्लिमविरोधी असते, तर महत््प्रयासांनी सुरू केलेल्या आपल्या वृत्तपत्रातील महत्त्वाची जागा त्यांनी इस्लामसारख्या विषयावर
खर्च केली नसती. इस्लाममधील समतावादी तत्त्वांमुळे आंबेडकर निश्चितच प्रभावित झाले होते व हिंदू धर्माच्या संपर्कामुळे अनिष्ट बाबींचा शिरकाव होऊन, भारतात इस्लामची जी अवनती झाली त्याबद्दल आंबेडकरांना खंतही वाटत होती. त्यांनी अनेक ठिकाणी या अवनतीबद्दल भाष्य केले आहे. हिंदू धर्माला त्यासाठी जबाबदार
ठरवले आहे.
"१९३५ मध्ये येवला येथे मृत्यूपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून नव्या धर्माचा स्वीकार करीन' अशी घोषणा केल्यानंतर त्यांच्या काही अनुयायांनी धर्मांतर करण्याचे ठरवून त्यांची भेट घेतली असता आंबेडकरांनी त्यांना इस्लामचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला होता. धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास इस्लामचा स्वीकार करा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून केले होते (१५ मार्च १९२९). आपल्या ध्येयाच्या संदर्भात विविध धर्मांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांनी बौद्ध धर्माविषयी निर्णायक मत बनवले होते. त्यामुळे आंबेडकर हे मुस्लिमविरोधी होते, असे म्हणणे किती खोडसाळपणाचे आहे, याची कल्पना येईल. घटना समितीत आंबेडकरांच्या उमेदवारीची शिफारस करण्यासाठी प्रांताच्या विधिमंडळातील एकही सदस्य तयार नव्हता. घोर निराशेमुळे त्यांची तब्येतही ढासळली होती.
अशा कसोटीच्या क्षणी त्यांना मुस्लिमांचा पाठिंबा लाभला. बंगालच्या विधिमंडळातील शेड्युल कास्ट फेडरेशनचे जोगेंद्रनाथ मंडल यांनी आंबेडकरांचे नाव सुचवले आणि मुस्लिम लीगच्या पािठंब्यामुळे त्यांची घटना समितीवर निवड झाली. भारतच काय त्यातील कोणताही जनसमुदाय एक राष्ट्रांक (Nationality) म्हणून एकसंध झालेला नसल्यामुळे इतक्या मोठ्या कोणत्याही समुदायाने त्यापासून वेगळे होण्याची भाषा करणे आंबेडकरांना अयोग्य वाटत होते. याच दृष्टिकोनातून काश्मीरचे विभाजन आणि स्वतंत्र
मतदारसंघ या मुस्लिमांच्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यासाठी त्यांनी भक्कम राजकीय किंमत मोजण्याचीसुद्धा पर्वा केली नाही. धनंजय कीर यांनी म्हटल्याप्रमाणे, १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे एन. एस. काजरोळकर यांच्यासारख्या सामान्य उमेदवाराकडून
पराभव पत्करून त्यांना या भूमिकेची किंमत चुकवावी लागली.

मिथक २ : आंबेडकरांचा द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतास पाठिंबा होता…

हिंदू व मुस्लिमांचे एक राष्ट्र आहे, या कल्पनेतील फोलपणा स्पष्ट करताना धर्म हा राष्ट्रीयत्वाचा आधारभूत घटक ठरू शकत नाही, हे आंबेडकरांनी ठामपणे सांगितले आहे. त्यासाठी अरब राष्ट्रांचे तुर्कस्थानपासून विभाजन रोखण्यास इस्लाम कसा अपयशी ठरला, आणि ख्रिश्चन हा समान धर्म असतानादेखील अनेक राष्ट्रके परस्पर संघर्षात कशी गुंतली होती, याचे ते दाखले देतात.
आंबेडकरांच्या मते, राष्ट्रीयता व राष्ट्रवाद या दोन भिन्न मानसिक अवस्था आहेत. ‘राष्ट्रीयता’ म्हणजे, स्वत:च्या समूहाबद्दलचे भान, परस्परांना सांधणाऱ्या अनुबंधाची जाणीव होय, तर परस्परसंबंधामुळे जोडलेल्या समूहाची वेगळ्या राष्ट्रीय अस्तित्वाची आकांक्षा, म्हणजे ‘राष्ट्रवाद’ होय.
आंबेडकरांच्या मते, मुस्लिमांची राष्ट्र म्हणून जगण्याची निर्माण झालेली आकांक्षा त्यांच्या दुखावलेल्या मानसिकतेतून उदयाला आलेली आहे. "अवनतीपासून सुटका' या तिसऱ्या प्रकरणात हिंदू बहुसंख्यांक मुस्लिमांना दुय्यम नागरिकांप्रमाणे वागवतात आणि हीच पाकिस्तानच्या मागणीस कारणीभूत ठरलेली एक महत्त्वाची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. डिसेंबर १९३९ मध्ये हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण करताना वि. दा. सावरकर यांनी सर्वप्रथम द्विराष्ट्र सिद्धांताची मांडणी केली. जिनांनी यानंतर लवकरच या सिद्धांताचा अधिकृतपणे स्वीकार केला. जिनांचा द्विराष्ट्र-सिद्धांत हा म्हणूनच हिंदू द्विराष्ट्र-सिद्धांताच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. आंबेडकरांना आश्चर्य वाटते की, एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या वादात परस्परविरोधी असण्याऐवजी सावरकर व जिना यांचे पूर्ण एकमत आहे. भारतात मुस्लिम व हिंदू अशी दोन राष्ट्रे आहेत, यावर केवळ त्यांचे एकमतच आहे, असे नाही, तर त्याबाबत ते दोघेही आग्रही आहेत. या दोन राष्ट्रांनी कोणत्या अटी व शर्तीवर राहावे, याबाबतच फक्त त्यांच्यात मतभेद आहेत. आंबेडकरांच्या मते, सावरकरांच्या भूमिकेत केवळ विसंगतीचाच दोष आहे, असे नाही, तर सावरकर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक परिस्थिती निर्माण करत आहेत. ते म्हणतात, जो सिद्धांत अंतिमत: एक राष्ट्र निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, प्रमुख राष्ट्राने दुय्यम राष्ट्राचे दमन केले पाहिजे, अशी मांडणी करतो, त्या सिद्धांतामागील सुज्ञता समजून घेता येते. दोन राष्ट्रे असावीत, मात्र त्यात विभाजन नसावे असे मानणाऱ्या सिद्धांतांचा काय फायदा आहे, हे समजत नाही. जर ही दोन राष्ट्रे मैत्रीपूर्ण, सौहार्दाने एकत्र राहणार असतील, तरच या दृष्टिकोनाचे समर्थन करता येईल, परंतु तसे देखील नाही. कारण सावरकर मुस्लिम राष्ट्राला हिंदू राष्ट्राच्या बरोबरीचे स्थान देणार नाहीत. त्यांना हिंदू राष्ट्र प्रभुत्वशाली तर मुस्लिम राष्ट्र हे दुय्यम राष्ट्र असणे अभिप्रेत आहे. हिंदू आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये शत्रुत्वाचे बीज रुजवून त्यांनी एकाच देशात एकाच संविधानांतर्गत राहावे, असे सावरकरांना का वाटते, हे सांगणे कठीण आहे.

मिथक ३ : मुस्लिमांना विध्वंसक मानले …

"प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती' या ग्रंथात डॉ. आंबेडकर अरब, तुर्क, मंगोल आणि अफगाण यांच्या आक्रमणाला मुस्लिम आक्रमण संबोधण्यातील खट्याळपणा ते दाखवून देतात. वास्तवात…तो या विभिन्न राजघराण्यांमध्ये वर्चस्वासाठी चाललेला संघर्ष होता. ते म्हणतात, लोकांच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनावर कायमस्वरूपी परिणाम करण्याच्या दृष्टिकोनातून पाहता, ब्राह्मणी धर्माचे बौद्ध धर्मावरील आक्रमण इतके परिणामकारक ठरले की, त्यापुढे मुस्लिमांचे आक्रमण उथळ आणि क्षणभंगुर वाटते. मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्मीयांच्या मंदिर, मठ अशा केवळ बाह्य प्रतिकांचा नाश केला. त्यांनी हिंदू धर्माचा समूळ नाश केला नाही, अथवा लोकांच्या आध्यात्मिक जीवनातील तत्त्वांचे विच्छेदन केले नाही. आध्यात्मिक जीवनाच्या, ज्या सत्य आणि चिरंतन तत्त्वाचा बौद्ध धर्माने उपदेश दिला, आणि ज्यांचा जनसामान्यांकडून स्वीकार केला गेला अाणि ज्यांचे आचरण केले जात होते, अशा तत्त्वांवर ब्राह्मणी हल्ल्याचा सखोल परिणाम झाला. वेगळे रुपक देऊन असे म्हणता येते की, मुस्लिम आक्रमकांनी न्हाणीच्या हौदातील पाणी केवळ ढवळावे आणि तेही थोडा वेळ, त्यानंतर कंटाळा येऊन त्यांनी पाणी ढवळण्याचे सोडून दिले व गाळ खाली बसू दिला. हिंदुधर्मातील तत्त्वांना बाळ म्हटले तर, त्यांनी न्हाणीच्या पाण्याबरोबर बाळही फेकून देण्याचा प्रयोग केला नाही. ब्राह्मणांनी मात्र बौद्धांबरोबरील संघर्षात बौद्ध तत्त्वांचे बाळ न्हाणीतून फेकून त्या हौदात स्वत:चे पाणी भरून आपले बाळही बसवले.'
"हिंदू भारतावरील मुस्लिम आक्रमकांमध्येच सत्तेसाठी स्पर्धा होती. अरब, तुर्क, मंगोल आणि अफगाण आपापसात वर्चस्वासाठी लढत होते. मोहंमद गझनी तार्तार होता. मोहंमद घोरी अफगाण होता, तैमूर मंगोल होता. बाबर तार्तार होता, तर नादिरशहा आणि अहमदशहा अब्दाली अफगाण होते.' या सर्व आक्रमकांना मुस्लिम आक्रमक संबोधण्यास त्यांनी स्पष्टपणे विरोध केला, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

मिथक ४ : आंबेडकरांचा "पाकिस्तान अथवा भारताची फाळणी' हा मुस्लिमविरोधी ग्रंथ आहे…

"पाकिस्तान अथवा भारताची फाळणी' हे पुस्तक आंबेडकरांच्या मुस्लिमविषयक मतांचा सर्वात मोठा स्रोत आहे. हिंदू बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांबरोबर सत्तेचे वाटप करण्यात अपयश आल्यामुळेच भारताची फाळणी अटळ बनली, हा त्यांनी अधोरेखित केलेला मुद्दा आहे. मुस्लिमांनी केलेल्या पाकिस्तानच्या मागणीत त्यांना काहीच धक्कादायक वाटत नाही. उलट मुस्लिमांचा राष्ट्रीयत्वाचा दावा खोडण्यासाठी हिंदू-भारताचे एक राष्ट्र आहे, असा दावा करणाऱ्या हिंदूची ते टवाळी करतात. आमचे वेगळे राष्ट्र असल्याने, आम्हाला पाकिस्तान द्यावे, या मुस्लिमांच्या युक्तिवादाच्या पुढे जाऊन आंबेडकर असे प्रतिपादन करतात की, मुस्लिमांमध्ये राष्ट्रीयत्वाची नव्हे, तर राष्ट्रवादाचीच भावना विकसित होत असल्यामुळे त्यांचा पाकिस्तानचा दावा समर्थनीय ठरतो.