आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाश्ता कसा असावा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता सर्व कुटुंबीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचे, याबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात एक प्रश्न असतो. आज ब्रेकफास्टला काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या घरात असतो. ब्रेकफास्ट छान झाला, चवदार झाला की, दिवसभर घरातील मंडळी खूष असतात. अशा या ब्रेकफास्टबद्दलचा शास्त्रीय दृष्टिकोन जाणून घेणे गरजेचे आहे. आजकाल सोशल मीडियावर एक ब्रेकफास्टबद्दलचा संदेश फिरत असतो. तो म्हणजे सकाळचा नाष्टा पोटभर घ्यावा, दुपारचे जेवण मध्यम व रात्रीचे
जेवण अल्प प्रमाणात घ्यावे. हा संदेश अगदी योग्य आह. प्रत्येकाने या प्रकारे आहार घेणे गरजेचे असते. पण सकाळचा नाश्ता पोटभर कोणी, कधी घ्यायचा हेही समजून घेणे गरजेचे आहे. ब्रेकफास्ट शब्दाचा अर्थ उपवास मोडणे असा होतो.

याचा अर्थ आपण आदल्या दिवशी साधारणपणे संध्याकाळी ७-८ च्या दरम्यान जेवण केलेले असल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी ७-८ वाजेपर्यंत बारा तासांचा उपवास होतो. असा उपवास झाल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट किंवा उपवास मोडण्यासाठी काही आहार घेणे अपेक्षित असते. हल्लीच्या काळात व्यवसायाच्या वेळापत्रकांमुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे रात्री उशिरा जेवण व जागरण, आणि लगेच सकाळी पोटभर नाष्टा सयुक्तिक नाही.

शास्त्राप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला अगदी कडकडून भूक लागत नाही, जोपर्यंत सकाळी योग्य पद्धतीने मल/मूत्र विसर्जन होत नाही व शरीरात पूर्णपणे हलकेपणा येत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारे अन्न सेवन करू नये. त्याचबरोबर मूल/मूत्र विसर्जनानंतर शक्यतो स्नान करून नाश्ता घेणे अपेक्षित असते. नाश्ता केल्यानंतर स्नान केल्यास ते अन्न व्यवस्थित पचत नाही. परिणामी हळूहळू पचनाचे विकार चालू होतात.

आपण मात्र हे सगळे नियम बाजूला ठेवून सकाळी अंथरुणातच चविष्ट नाश्त्याचे स्वप्न बघत असतो. सकाळी पोटभर नाश्ता घ्यावा, हा संदेश प्राकृत व्यक्तींसाठी आहे. ज्यांंना मधुमेह, स्थूलता, हृदयविकार यांसारख्या व्याधी आहेत त्यांनी डॉक्टरांच्या किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्यानुसार नाश्ता घ्यावा.

सकाळचा नाश्ता पोटभर घ्यावा, हे बरोबर. परंतु, हे करत असताना आपली दिनचर्या यथायोग्य आहे का हेही बघणे आवश्यक आहे. बेडवरून उठून लगेच टेबलवर येणे अपेक्षित नाही. पोटभर नाश्ता करायचा असेल तर त्यासाठी अगोदर योग्य व्यायामसुद्धा करणे गरजेचे आहे. तुमची आधीच्या दिवशी झोप व्यवस्थित झाली असेल, सकाळी लवकर उठून तुम्ही आवश्यक तेवढा व्यायाम केला असेल, तरच पोटभर नाश्ता करण्याची परवानगी असते, अन्यथा नाही.

ज्या व्यक्तींना व्यायाम करायची सवड नाही किंवा आवड नाही, ज्यांना सकाळी व्यवसायामुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही, ज्या व्यक्तींना पचनाचे विकार आहेत त्यांनी सकाळी पोटभर नाश्ता करणे सयुक्तिक नाही. अशा व्यक्तींनी ब्रेक घेणे जास्त योग्य असते. अशा व्यक्तींनी साधारणपणे नऊ ते साडेदहाच्या दरम्यान आपले सकाळचे जेवण आटपून घ्यावे. दुपारी अगदी प्रमाणात अल्प आहार व संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान जेवणे अपेक्षित आहे.

आपली जीवनशैली कशी आहे, आपले वय, पचनशक्ती, अानुषंगिक आजार, आपण दिवसभर करत असणारे श्रम, खाण्याच्या सवयी या सर्व बाबी लक्षात घेऊन सकाळच्या नाश्त्याचे प्रमाण ठरवावे लागते. त्याच प्रमाण आपण किती वेळ झोपतो, आपली झोप व्यवस्थित झाली आहे काय, या बाबींचाही विचार करून नाश्ता ठरवावा. सकाळच्या नाश्त्यात काय असावे व नसावे हे पुढील लेखात बघू.

डॉ. संगीता देशपांडे
औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com
(क्रमश:)