आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Yashaswini Tupkary Article About Life Partner

स्वत: लाच विचारा प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जोडीदार निवडताना’ या लेखाच्या पूर्वार्धात आपण आधी स्वत:ला ओळखायला शिकले पाहिजे, याबद्दल विचार केला.त्याशिवाय प्रेम, भावना, व्यवहार्यता या पातळ्यांवरही विचार करणे किती अावश्यक आहे, हे जाणून घेऊयात लेखाच्या उत्तरार्धात...
सर्वसाधारणत: असे पाहायला मिळते की, घरच्या मंडळींनी ठरवलेल्या लग्नांमध्ये प्रेम आणि भावना यांचा विचार तुलनेने कमी होतो तर प्रेमविवाहात बऱ्याचदा केवळ भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतला जातो. व्यवहार्यतेचा विचार फार कमी होतो, म्हणून प्रश्न निर्माण होतात. (प्रेम आंधळं असतं, असं उगीच का म्हणतात?)
म्हणून गृहपाठ करताना अजूनही काही पैलूंचा विचार करायला हवा. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगी व मुलगा यांना कदाचित वेगवेगळ्या पैलूंचा विचार करण्याची गरज भासू शकते. स्वत:ला विचारलेले काही प्रश्न वास्तव समजायला नक्की उपयोगी पडू शकतात. नवऱ्याच्या आर्थिक स्थितीबद्दलची माझी अपेक्षा काय? लग्नानंतर माझ्याकडून एकत्र कुटुंबात राहण्याची अपेक्षा आहे की स्वतंत्र? सासरच्या घरात वडीलधारी मंडळी असावीत, त्यांचा आधार असतो, असं मला वाटतं की, त्यांची अडचणच वाटेल? दोघांच्या भाषेत, खाण्यापिण्याच्या पध्दतीत, अपेक्षित वेषभूषेत, रीतिरिवाजात, देवाधर्माच्या पध्दतीत, धार्मिक श्रध्दांमधे फरक असू शकतो. त्या भिन्नतेशी जुळवून घेणे मला जमेल का? जुळवून घेण्याची मला सक्ती असेल की, स्वातंत्र्य? प्रेमविवाहात, विशेषत: आंतरजातीय विवाहात, सामाजिक रोष पत्करण्याची वेळ येऊ शकते. दोन्ही कुटुंबांचा आधार मिळेलच याची शाश्वती धरता येत नाही. अशा वेळी खंबीर राहाणे मला जमेल का? मी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर राहाणे कितपत रुचणार आहे? नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जावे लागले तर मला आवडेल की, नाही? एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना दोघांच्याही मतांचा आदर केला जाईल की, परस्पर निर्णय घेतला जाईल? व्यसनांसंबंधीची (उदा. सिगरेट,दारू) माझी धारणा काय? जोडीदाराला कोणते छंद आहेत? सुट्टीचा दिवस किंवा मोकळा वेळ कसा घालवावा असे त्याला/तिला वाटते? दोघांचे जीवनाचे ध्येय (Goal), जगण्याची प्रेरणा एकच आहे का? ती जुळते का? तुम्ही एकमेकांना पूरक, पोषक ठरू शकाल असे वाटते का? समानता व परस्परपूरकता मान्य आहे की, वर्चस्व? ही व्यक्ती संवेदनशील आहे का? मला माझ्या भावना, मनातील विचार व्यक्त करायला मोकळीक वाटेल का? त्या व्यक्तीच्या सान्निध्यात तुम्हाला शांत, सुरक्षित वाटतं का आणि तरीही तुमचं स्वातंत्र्य जपलं जाईल, असं वाटतं का? स्व-विकासाचा तो/ती रोज प्रयत्न करते का? (ज्यांचे मौज-मजा हे ध्येय असते, ते सहसा स्व-विकासासाठी प्रयत्नशील नसतात.) ती व्यक्ती इतरांशी कशी वागते? (Ability to give pleasure to others) स्वत:च्याच आनंदात मग्न असते की...? ज्यांच्याशी गोड, उत्तम वागण्याची त्याला/तिला गरज नाही उदा. वेटर, टॅक्सी ड्रायव्हर, केर-कचरा गोळा करणारी मुलं, घरातील नोकर-चाकर यांच्याशी तो/ती कशी वागते? आईवडिलांशी, भावंडांशी कशी वागते? कृतज्ञता भाव तिच्यात आहे का?
या वयात वाटणारं प्रेम (प्रेमविवाहांबाबतीत) हे केवळ आकर्षण (Infatuation) सुध्दा असू शकतं. ते शाश्वत आहे की नाही हे तपासायला हवं. लग्नाबाबतचा निर्णय घाईघाईनं, प्रतिक्रिया म्हणून, क्षणिक वाटलेल्या भावनांमुळे, दबावाखाली, आमिषामुळे, स्वत:ला कमी लेखल्यामुळे घेतलेला नसावा. एखादी व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे असे वाटल्यानंतरही झटपट निर्णय न घेता शांतपणे सर्व मुद्द्यांचा विचार करावा. दोघांचीही पूर्ण सहमती होईपर्यंत दम धरता येणं, थांबता येणं, हे भावनिक बुध्दिमत्तेचं एक मोठं लक्षण आहे. (Love understands and therefore waits.) निर्णय घेताना केलेली घाई नंतर आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरू शकते. म्हणून डोळसपणा हवा. जोडीदार निवडताना, हृदयापेक्षा, भावनांपेक्षा बुध्दीचा, डोक्याचा वापर जास्त करा. एकदा लग्न झाले की, मग मात्र भावनांना झुकते माप द्या. निर्णय घेताना दोन्ही डोळे पूर्ण उघडे ठेवा. विश्वासू व्यक्तींशी, आईवडिलांशी जरूर बोला, जेणेकरून आपल्याला न सुचलेल्या काही पैलूंची जाणीव ते करून देऊ शकतील. मनाची १००% खात्री होईपर्यंत निर्णयाची घाई करू नये; पण एकदा घेतलेला निर्णय निभवण्याची जबाबदारी मात्र मुला-मुलींनी स्वत: घ्यायला हवी.
करिअर निवडण्यापूर्वी जशी अॅप्टिट्यूड टेस्ट केली जाते, त्याप्रमाणेच जोडीदार निवडताना विवाहपूर्व समुपदेशनाचा जरुर उपयोग करावा. असे केल्याने सहजीवनाची खोली (Happiness Quotient) वाढू शकते.

निर्णय घेताना अशा प्रकारे डोळस, चौकस जरूर राहावे, पण एक महत्त्वाचे त्रिकालाबाधित सत्य डोळ्याआड करू नये. प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे, कथा-कादंबऱ्यांतून वर्णने वाचल्यामुळे लग्नाळू वयात आपण वास्तवापेक्षा स्वप्नात जास्त रमतो. त्या स्वप्नरंजनात त्रुटींना, कमतरतांना अजिबात वाव नसतो. उदा. मुलगी जेव्हा स्वप्नातील राजकुमाराचा विचार करते, तेव्हा तो दिसायला सुंदर, गाडी, बंगला असणारा, आर्थिक कमाई उत्तम असणारा, तिच्यासाठी वेळ काढणारा, तिच्या भाव-भावना समजून घेणारा, समाजात प्रतिष्ठा असणारा, उत्तम निर्णयक्षमता असणारा असा सर्वगुणसंपन्न असावा, अशी अपेक्षा असते. या स्वप्नरंजनातून बाहेर येण्याची गरज आहे. कारण कोणतीच व्यक्ती सर्वगुणसंपन्न नसते. आपण स्वत:सुध्दा नसतो. म्हणून आपल्या अपेक्षांचा, गरजांचा विचार जरूर करावा; पण यातील सर्व अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत, याचे भान जरूर ठेवावे. ज्या बाबतीत आपण तडजोड करायला अजिबात तयार नाही, अशा ३-४ मुद्द्यांवर ठाम राहायला हरकत नाही. (उदा. दारू पिणारा नवरा मला अजिबात चालणार नाही, उच्चशिक्षितच हवा, वगैरे.) पण याबरोबर याची जाणीव असायला हवी की, निर्व्यसनी व्यक्ती देखणी, सुंदर, धाडसी, भावना जपणारी असेलच असे नाही. म्हणजे २-३ गोष्टी आपल्या मनासारख्या मिळू शकतात, पण सर्वच आपल्या मनासारख्या मिळणार नाहीत. समजा १० अपेक्षा असतील, तर त्यातील तीनचारच पूर्ण हाेऊ शकतील, याची तयारी ठेवावी. यात निराशा, नाइलाजाची भावना नसावी. कारण जगात कोणत्याच दोन व्यक्ती (अगदी जुळी भावंडेसुध्दा) सारख्याच स्वभावाच्या, आवडीनिवडीच्या असू शकत नाहीत. अगदी आपल्या आईवडिलांबरोबरही आपले मतभेद असतातच. तो वेगळ्या वातावरणात, कुटुंबात, परिस्थितीत वाढला आहे. तो आणि मी अगदी सारखे असू शकत नाही. काही मुद्द्यंवर आमचे एकमत असू शकते, पण सर्व मुद्द्यांवर नाही. म्हणून मनुष्यस्वभावातील विविधता आनंदाने मान्य केली पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीचा संपूर्ण स्वीकार, तो आज जसा आहे तसा, करणे गरजेचे आहे. विश्वास, आस्था, आधार, स्वातंत्र्य यावर कोणत्याही नात्याचे यश अवलंबून असते. दुसऱ्याच्या विचारांना, मतांना, कृतीला पुरेसे स्वातंत्र्य देता आले पाहिजे. आपला व दुसऱ्याचा अवकाश दोघांनीही जपायला हवा. असे केल्यास राष्ट्र म्हणून जगात भारताकडे जे दायित्व आहे, ते आपण नक्की निभवू शकू.

थोडक्यात, जोडीदार निवडताना :
 स्वत:ला ओळखणे (स्वत:च्या गरजा ओळखणे)
 जोडीदाराच्या व आपल्या गरजा जुळतात का, हे पाहणे
 दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातील कोणत्या अंगांचे विकसन जास्त झाले आहे, हे पाहणे
 वडीलधाऱ्यांशी सर्व पैलूंची चर्चा करणे
 विवाहपूर्व समुपदेशनाचा उपयोग करणे, या पायऱ्यांचा उपयोग होऊ शकतो.
(समाप्त)

डॉ. यशस्विनी तुपकरी, औरंगाबाद
yashaswini.tupkary@gmail.com