आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Nishigandha Vyaware Article About Life Priority

प्राधान्यक्रम हवाच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्ताच होळी झाली, २/३ दिवस लागून सुट्ट्या होत्या. शाळेतल्या जुन्या मैत्रिणींचं कधीच सुरू होतं, एकदा भेटूया सर्वजणी. हो नाही करत भेटण्याचा दिवस, जागा सर्व काही सर्वानुमते ठरले. भेटलो, खूप गप्पा, खूप धमाल केली. जुने दिवस, जुन्या आठवणी, थोडंफार शेअरिंंग असं हातात असलेल्या वेळात जे काही करणं शक्य होतं ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला सर्वांनीच आणि पुन्हा भेटण्याच्या ओढीने आपापल्या गावी मार्गस्थ झालो... हे इतकं चित्र खूप सुखद होतं पण ज्या मैत्रिणी येऊ शकल्या नाहीत, आल्या नाहीत त्यांचे चेहरे पाठलाग करत राहिले बराच वेळ...
ही का आली नाही, ती का आली नाही, अगं, तिनेच तर पुढाकार घेतला होता नं, भेटायचं म्हणून एवढ्या उड्या मारत होती ती. मग काय झालं अचानक? ती येणार होती पण तिचा नवरा कडक आहे स्वभावाने, अमुकचे सासू सासरे आले गावाकडून, तमुकच्या मुलांच्या परीक्षा आल्या ८ दिवसांवर, अमुक निघाली होती पण परत जाताना सोबत नव्हती म्हणून आली नाही, येऊ दिलं नाही, घरातलं सगळं सोडून कसं येणार गं. एक दिवस गावाला गेलं की घर अस्ताव्यस्त होतं, मिस्टरांना वेळ नव्हता सोबत यायला, मी तर माझ्या सासूबाईंना मस्का मारायचं िशकले आता, मी ठरवलं आिण मी आले यांना घेऊन... असे बरेच संवाद सगळ्यांमध्ये भेटीदरम्यान सुरू होते. अडचणी असताना न येणे हे खूप स्वाभािवक आहे. पण खूपदा अडचणी असतातच असं नाही. मात्र स्त्रियांचा पाय संसारात असा गुंतलेला असतो की, तो त्यांना सोडवता येत नाही. तो सोडवला तर आपण चुकू, हे कित्येक शतकांपासून स्त्रियांच्या मनावर बिंबवले गेले आहे.
मध्यंतरी शबाना आझमींची एक मुलाखत बघण्यात आली. त्यात त्यांनी एक किस्सा सांगितला. त्यांनी घरासाठी नवे पडदे आणले होते. कित्येक दिवस त्या ठरवत होत्या की, आज बोलू, उद्या बोलू. पण कामाच्या व्यापात पडदे बदलणे काही शक्य होत नव्हते. एके दिवशी त्या घरी आल्या आिण रडायला लागल्या. जावेद अख्तर यांनी काय झालं, असं िवचारल्यावर त्यांनी सांगितलं, मी किती दिवसांपासून ठरवतेय की पडदे बदलायचेत. पण तेही माझ्याकडून होत नाहीये. शबानाजींसारखी कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींत कळत नकळत प्रत्येक संसारी स्त्री अडकलेली असते आिण हे अडकणं मुद्दामहून असतं असं नाही, पण अडकत असतो हे मात्र खरंय. यात गैरही काही नाही. हे अडकणं आपल्यावर झालेल्या कित्येक पिढ्यांच्या संस्कारातून येत गेलं आहे. अनेक कामं सातत्याने करत असतो, या कामाचा संबंध स्व-प्रतिमेशी, समाजाने आखून दिलेल्या प्रतिमेशी जोडत असतो. घरासमोरच्या रांगोळीपासून लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार होतो. दाराबाहेरूनच घरातल्या स्त्रीविषयीचे दृष्टिकोन तयार होऊ लागतात आिण जवळजवळ प्रत्येक स्त्री आिण पर्यायाने आजूबाजूचे सर्वच जण स्त्रियांना या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात. या चौकटीमुळे अनेक गुंते तयार होतात. हे झालं सामाजिक कारण. दुसरं कारण असंही आहे की, स्त्रियांचं बारीकसारीक
गोष्टींकडे सहज लक्ष जातं. एखादी गोष्ट कशी ठेवली आहे, ती कशी ठेवायला हवी, ती नीट दिसते का, कशी ठेवली म्हणजे अधिक चांगली दिसू शकेल, अशा अनेक गोष्टींकडे ती सहज लक्ष केंद्रित करते. यातून होतं असं की, सगळं चांगलं टापटीप ठेवण्याच्या नादात सगळं
काम तीच करायला जाते आणि मग यात ती अधिकच गुंतत जाते. मी किती नेटका संसार करते, हे तिच्या ईगोशी, स्व- प्रतिमेशी जोडलं जातं. त्यामुळे इतरांनी कामात केलेली मदत तिला पटत नाही आणि ती सुपरवूमन होण्याच्या मार्गावर असते. कामाचा ताण वाढला की, तिचा स्व-संवाद सुरू होतो... दिवसभर नुसतं राबराब राबते, कुणाची मदत होत नाही,
सगळी कामं काय मीच करू? मीपण माणूस आहे, मला मोकळा वेळ नको का? मला आजारी पडल्यावर आराम करायलाही वेळ
मिळत नाही, वगैरे-वगैरे.
अर्थात छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये अडकणं हे काही वेळेस परिस्थितीजन्य असतं, पण बऱ्याचदा ते मानसिक असतं. जेव्हा ते मानसिक पातळीवर असतं तेव्हा त्यातून पाय मोकळा करण्यासाठी स्वत:च्या कामांचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. सुरुवातीला मी गेटटुगेदरविषयी बोलले, त्याचा िवचार केला तरी असा प्रश्न मला सारखा पडत होता की, काहींच्या अडचणी खरंच होत्या. पण काहींना येणं सहज शक्य होतं. त्यांनी त्यांच्या कामाचे, गरजांचे आणि इच्छांचे प्राधान्यक्रम ठरवले असते तर त्या न आल्याने त्यांना जो त्रास झाला, तो कमी झाला असता वा झालाही नसता. शबाना आझमींच्या उदाहरणात देेखील त्यांचं गुंतून पडणं त्रासाचं कारण आहे, असं जावेदजींच्या लक्षात आलं, तेव्हा ते शबानाजींना म्हणाले की, पडदे न बदलूू शकणं हे तू तुझ्या गृहकृत्यदक्ष प्रतिमेशी जोडलंस, त्यामुळे तुला त्रास झाला. हे काम तू दुसऱ्या कुणाकडूनही करून घेऊ शकली असतीस.
यातून एक लक्षात येतं की, मला जर या गुंत्यातून पाय मोकळा करायचा असेल तर माझ्या कामाची विभागणी करून त्याचा प्राधान्यक्रम ठरवणं महत्त्वाचं आहे. काही कामं इतरांवर सोपवून मोकळं होता येईल का, याचा िवचार केला पाहिजे. कामं इतरांकडे सोपवताना महत्त्वाचं आहे की, मानसिक पातळीवर तुम्हाला त्यातून मोकळं होता आलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा असं होतं की, काम तर दुुसऱ्या व्यक्तीकडे सोपवलं जातं पण तितकाच वेळ, ऊर्जा आपण हे काम कसं करावं ते सांगण्यासाठी घालवतो, व मानसिक पातळीवर त्यात गुंतून राहतो.
संसारातून लक्ष काढा, असं मला बिल्कुल सुचवायचं नाहीये. पण स्वतःला वेळ देण्यासाठी आपल्या गरजा, इच्छा, आनंदाच्या संकल्पनांची यादी करावी, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. यामुळे गरजा, इच्छा, आनंदाच्या कल्पना यांची स्वतःला जाणीव होईल आणि दुसरी म्हणजे क्रम दिल्यामुळे ते करताना आपण कौटुंबिक जबाबदारीकडे दुर्लक्ष करतोय की काय, असे प्रश्न त्रास देणार नाहीत. आणि कुठलाही अपराधीभाव मनात येणार नाही.
डॉ. निशिगंधा व्यवहारे
औरंगाबाद
v.nishigandha@gmail.com