आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Mrunmayee Bhajak Writes About After The Accident ...

अपघातानंतर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या सासूबाई आमच्याकडे काही महिने राहायला आल्या होत्या. त्यादरम्यान मुलाच्याही शाळेला सुट्टी होती. आमच्या गावात फेरफटका मारण्यासाठी मी, सासूबाई आणि मुलगा गाडीने निघालो होतो. मी गाडी चालवत होते. आता अमेरिकन ड्रायविंगला मी बऱ्यापैकी रुळले होते. मुख्य म्हणजे रस्ते माहितीचे झाले होते. नाहीतर सुरुवातीला सगळं काही ‘जीपीएस भरौसे’च असायचं. मला खूप छान वाटत होतं की, आता मला जवळपासचे बहुतेक सगळे रस्ते ओळखीचे झाले होते, आणि गाडी चालवताना आत्मविश्वासही वाटत होता. मी आणि मुलगा बाहेर दिसणाऱ्या रस्त्यांची आणि ठिकाणांची भरभरून माहिती सासूबाईंना देत होतो. काही महिन्यांपूर्वीच अगदी अनोळखी असणारा भाग आता आपलासा वाटत होता म्हणूनच कदाचित मी आणि मुलगा अगदी उत्साहात होतो. रस्त्यात एके ठिकाणी लाल सिग्नल लागला आणि अमेरिकन पद्धतीप्रमाणे सुरक्षित अंतर ठेवून मी गाडी थांबवली. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अगदी पुढच्याच चौकात होतं. आमचं माहिती सत्र चालू असतानाच कसला तरी जोरात आवाज झाला आणि धक्का लागल्यासारखं वाटलं. काही क्षणांनी कळलं की, आमच्या गाडीला मागच्या गाडीने जोरात ठोकले आहे. माझी चूक काहीच नव्हती, गाडी शांतपणे सिग्नलला उभी होती, सिग्नल सुटायलाही अजून अवकाश होता. काहीसा भांडणाचा पवित्रा घेऊनच मी गाडीतून खाली उतरले, आणि मागच्या माणसाशी तावातावाने भांडायला सज्ज झाले. माझ्या मागच्या गाडीतून सत्तरीच्या पुढचे गृहस्थ उतरले आणि मी काही बोलायच्या आतच ते म्हणाले, “माफ करा हं, ही सगळी माझीच चूक आहे, मी याची सर्व जबाबदारी घेतो.” माझा सगळा जोश एकदम फुस्स झाला. एवढ्यात सिग्नल सुटला. आजूबाजूची सर्व वाहने आमच्याकडे बघत शिस्तीत पुढे गेली. कुणीही थांबलं नाही, कुणीही कुणालाही मौल्यवान सल्ले दिले नाहीत. आमची दोन्ही वाहने रस्त्यावरच त्याच स्थितीत उभी होती, रस्ता मोठा असल्याने, इतर वाहने शांतपणे आमच्या बाजूने पुढे जाऊ लागली. वाहतूक अजिबात ठप्प झाली नाही. कुणी साधा एक हाॅर्नदेखील वाजवला नाही. “मी मनापासून तुमची माफी मागतो, चूक शंभर टक्के माझीच आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. माझ्या इन्शुरन्समध्ये मी तुमच्या गाडीचीही नुकसान भरपाई करेन. फक्त आता आपण गाड्या जरा कडेला घेऊया, म्हणजे कुणाला अडथळा होणार नाही,” ते म्हणाले. आम्ही गाड्या रस्त्याच्या कडेला घेतल्या. आता पोलिस येणार या विचारांनी मी जरा घाबरले होते. माझ्याकडे असणाऱ्या कागदपत्रांची मी मनातल्या मनात शहानिशा करत होते. दोनच दिवसांपूर्वी आम्ही गाडीची कागदपत्रं नीट बघून घेतली होती. आमची गाडी नवऱ्याच्या कंपनीकडून असल्यामुळे सगळे पेपर्स त्याच्याच नावे होते, पण वेगळ्याच एका कारणासाठी मी दोनच दिवसांपूर्वी माझेही नाव त्यात घालून घेतले होते. आणि माझ्या त्या पेपरवरील नावामुळे त्या दिवशी मी वाचणार होते. पण त्यावेळी जर काही कागदपत्रं माझ्याकडे नसती तर मात्र मला फार मोठा भुर्दंड भरावा लागला असता. आपल्या कल्पनेपेक्षाही हा भुर्दंड फार मोठा असतो. माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीने गाडीचा वेग जास्त ठेवला होता म्हणून दोनशे डॉलर्स (साधारण बारा हजार रुपये) भरले होते. आणि असेच काही किस्से ऐकिवात होते. आता पुढे काय करायचं, हे मात्र मला माहीत नव्हतं. ड्रायव्हिंगची लेखी परीक्षा देताना अपघातानंतर काय करायचं अशा प्रकारचं काही पुस्तकात होतं का, हे मी आठवू लागले. परदेशात गाडी चालवणं ठीक आहे, पण परदेशात अपघात होणं काही माझ्या पचनी पडत नव्हतं. खरंतर आमच्या छोट्याशा गावात अपघात वगैरे काही होऊ शकतो असं वाटलंच नव्हतं. मी काहीतरी विचारात आहे हे जाणवताच ते आजोबा माझ्या जवळ आले. त्यांनी मला त्यांचा नंबर, नाव, पत्ता, इन्शुरन्स कंपनी वगैरे सगळी माहिती दिली. पोलिस केस टाळण्यासाठी सामोपचाराने ते प्रकरण मिटवताहेत, असं मला वाटलं. एका दृष्टीने मलाही बरंच वाटलं. जरी माझी काहीही चूक नसली आणि समोरचे गृहस्थ चांगले असले तरीही माझ्या मनात उगीचच शंकाकुशंका येऊ लागल्या. माझ्याकडे नसलेली कागदपत्रं त्यांनी विचारली तर? किंवा ऐन वेळी त्या आजोबांनी तिसरंच काही सांगितलं तर? आता तर तिथे कुणी साक्षीदारही नव्हते. “बरं मग आता पुढे काय करायचं?” मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, “सगळ्यात आधी पोलिसांना फोन लावूया, माझा फोन सापडत नाहीये, तुम्ही फोन लावाल का प्लीज?” मी माझा फोन घेतला, पण कुणाला फोन लावायचा हेच मला माहीत नव्हतं. त्यांनी मला नंबर सांगितला. पण त्यावेळी मला जाणवलं की, हे नंबर माहीत असणं खरंतर आवश्यक होतं. समजा मी एकटीच एखाद्या संकटात सापडले असते तर? मी फोन लावायला घेतला पण एवढ्यात पोलिसांची गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. एवढ्या तातडीने, फोन लावायच्या आधीच पोलिस तिथे कसे पोहोचले, हे कोडं अजूनही माझ्या मनात आहे. त्यानंतर सगळी इत्थंभूत चौकशी झाली. लायसन्स, गाडीचे पेपर्स वगैरे. आणि ते प्रकरण त्यांच्या पद्धतीने कायदेशीररीत्या पुढे गेलं.

drmrunmayeeb@gmail.com