आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहब्बत के सिपाही (डॉ. प्रदीप आवटे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमध्ये राहणारी दीपिका आपल्या दूरच्या नात्यातल्याच विभोर शर्माच्या प्रेमात पडली. पण ज्या घरातून आपण पूर्वी कधी मुलगी केलेली आहे, तिथे मुलगी द्यायची नसते. याला ‘आटा साटा’ म्हणतात. आपल्याकडच्या साट्यालोट्यासारखे. केवळ या आटा साटा कारणासाठी दीपिकाच्या वडलांनी तिच्या या प्रेमाला विरोध केला. नुसता विरोध नाही केला, तर दारू पिऊन सुशील नाव असलेल्या तिच्या भावाने आणि तिच्या वडिलांनी लॉ करत असलेल्या आपल्या बहिणीला-मुलीला नागवी करून बदड बदड बदडली. या घटनेने दीपिका शारीरिक इजेपेक्षाही मानसिक आघाताने इतकी हलली की, आपल्या सोबत ही ‘गंदी’ हरकत करणाऱ्या बाप आणि भावाच्या नात्यावरला तिचा विश्वासच उडाला. ती विभोरसोबत पळून गेली. रजनीकांत शर्मा या तिच्या बापाने, या दोघांच्या शोधासाठी पैसे चारून पोलिस पिटाळले. सापडल्या क्षणी दोघांचे मुडदे पडतील, अशी व्यवस्था केली. एका शहरातून दुसऱ्या शहरात पळत राहणे, हाच विभोर-दीपिकाचा दिनक्रम बनला. मरणाच्या भीतीने असे किती काळ पळत राहणार? आणि मग या दोघांच्या मदतीला आले - मोहब्बत के सिपाही - लव्ह कमांडोज. या लव्ह कमांडोजने या प्रेमी युगुलाला तात्पुरता निवारा दिला, त्यांचे लग्न लावून दिले आणि कुटुंबीयांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याकरिता मदत केली, त्यांना संरक्षण दिले. एक प्रेमी युगुल एकमेकांच्या उबदार मिठीत विसावले आणि मोहब्बत के सिपाही खूश हुये. पण त्यांचे काम इथेच संपले होते थोडेच. ज्या देशात निरपेक्ष प्रेमाची ओळखच हरवली आहे, तिथं रोज नवे विभोर, रोज नवी दीपिका पारंपरिक, सनातनी मंडळीना चुकवत गल्लीबोळातून पळत राहते आणि उबदार निवारा शोधत राहते, जिथे जिवलगाच्या डोळ्यांत अवघं आभाळ असेल आणि तिच्या मिठीत सगळी पृथ्वी वसली असेल. मृत्यू असा पाठलाग करत असताना या जोडप्यांच्या मदतीला येतात ते लव्ह कमांडोज.
‘लव्ह कमांडोज’??? हे काय प्रकरण आहे? लव्ह कमांडोज ही एक स्वयंसेवी संस्था आहे. संजय सचदेव, हर्ष मल्होत्रा आणि त्यांच्या पाच-सहा साथीदारांनी २००७मध्ये ही संस्था स्थापन केली. प्रेमीजनांना सर्वतोपरी मदत करणं, हेच या संस्थेचं प्रमुख काम आहे. प्रेमी जोडप्यांची लग्नं लावून देणं, त्यांना कोणाकडून धोका असेल तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना निवारा उपलब्ध करून देणं, त्यांची न्यायाची लढाई लढण्याकरिता कायदेशीर मदत करणं, हे काम लव्ह कमांडोज करतात. ‘प्यार करना पाप नहीं और विरोधी हमारा बाप नहीं’, अशी वरवर पाहता पोरकट वाटणारी घोषणा करणारी ही संस्था तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचे काम करते आहे. ऑनर किलिंगच्या विरोधात ठाम भूमिका घेते आहे. आज संस्थेची दिल्ली आणि इतरत्र अनेक मेक शिफ्ट शेल्टर्स आहेत. असंख्य उत्साही तरुण या कामात जोडले गेले आहेत. संस्थेने आजवर पन्नास हजारांहून अधिक जोडप्यांना मदत केली आहे. आमीर खान, आंतरराष्ट्रीय टेनिस पटू बियॉन बोर्ग अशा मान्यवरांनी संस्थेच्या कामाची वाखाणणी केली आहे. रशिया, जर्मनी, स्पेन अशा देशांत संस्थेच्या कामाची उल्लेखनीय नोंद घेण्यात आली आहे.
‘ना हिंदू, न मुस्लिम, ना शीख न ईसाई
हम तो है, मोहब्बत के सिपाही’
या भावनेने हे काम सुरू आहे.

‘लव्ह कमांडोज’चे चेअरमन असणाऱ्या संजय सचदेव यांनी साठी ओलांडली आहे, पण त्यांचा या कामातला उत्साह आणि निष्ठा ‘अभी तो मैं जवान हूं’ स्वरूपाची आहे. मूळचे पत्रकार असणाऱ्या सचदेवांनी आपल्या जवळच्या मित्राचा मुलगा प्रेम प्रकरणात खोट्यानाट्या बलात्काराच्या आरोपात अडकला, तेव्हा त्याला मदत केली आणि त्यातून प्रेमात पडणाऱ्या जोडप्यांना काय काय दिव्यातून जावे लागते, याची त्यांना कल्पना आली. त्यातूनच लव्ह कमांडोजचा जन्म झाला.
आज भारत हा तरुणांचा देश आहे. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त तरुण वर्ग आज आपल्या देशात नांदतो आहे. पण या देशाची मानसिकता तरुण व्हायला तयार नाही, या देशाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला तरुणाईची भाषा आकळायला तयार नाही. प्रेम हा तरुणाईचा धर्म पण या प्रेमाला होणारा सामाजिक विरोध एवढा दाहक आहे की, तरुणांच्या या देशात दरवर्षी एक हजाराहून अधिक ‘ऑनर किलिंग’(?) होतात आणि हा देश पाहात राहतो. या देशात आपलं प्रेम मिळविण्याकरिताच तरुणाईची अवघी ऊर्जा खर्च होते आणि विज्ञान, कला, क्रीडा या क्षेत्रात लावायला ऊर्जाच उरत नाही. अनेकदा हे प्रेम मिळवण्याकरिता ऊर्जाच काय आपलं आयुष्यही काही जणांना गमवावं लागतं आणि मग अंगणात प्रेमच न उमललेली तरुणाई जगण्यातलं काव्य आणि उत्साहच हरवून बसते. “कधी कधी उगीच वाटते, पोर मनात झुरते काय? तुळशीखालच्या मातीमध्ये सगळी स्वप्नं पुरते काय?”, ही खंत सामाजिक संवादामध्ये अभावानेच आढळत असताना आणि प्रेमाचा अवकाश असा संकुचित होत जात असताना ‘लव्ह कमांडोज’सारख्या संस्था आपल्या मनात नवी उमेद जागवतात.
संजय सचदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या कामामागची भूमिका अगदी स्वच्छ आणि नेमकी आहे. १ ऑक्टोबर १९७८ रोजी भारतीय संसदेने लग्नातील ‘पालकत्वा’ची आवश्यकता मोडीत काढली आणि तरीही आजदेखील आपल्या सगळ्या लग्नपत्रिकांमध्ये आई बाप आपल्याला त्यांच्या लाडक्या मुलामुलींच्या विवाहाप्रीत्यर्थ आमंत्रित करत असतात. भारतीय संविधानानं अनुच्छेद २१ अन्वये दिलेला ‘मॅरेज बाय चॉईस’चा तरुणाईचा अधिकार आपण अशा प्रत्येक प्रसंगी नाकारत असतो. “अरे १८ वर्षांचा तरुण जर या देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, तर तो आपला जोडीदार का निवडू शकत नाही?,” संजय सचदेव विचारतात. पण आपल्याला आजही आपल्या तरुण मुलामुलींना हा अधिकार द्यावासा वाटत नाही. आपण आपल्या कळत-नकळत आपल्या परंपरांचे रखवालदार होतो. खरे तर, या परंपरांचा अर्थही आपल्याला नीट लावता येत नाही. पण तरीही आपल्यालाच न उमगलेल्या तथाकथित परंपरांसाठी आपण आपल्या तरुणाईचे पंख छाटत राहतो. शिव-पार्वतीचा विवाह हा जगातला पहिला आंतरजातीय विवाह होता. या विवाहाला तेव्हाही विरोध झाला होता, कोणीही लग्न सोहळ्यात सहभागी झालं नाही, म्हणून तर त्याला ‘भूतों की बारात’ असे संबोधले गेले... सचदेव सांगत असतात. आपण राधा-कृष्णाची पूजा करतो, भक्ती करतो, पण ते दोघे प्रेमी जीव होते, हे मात्र पद्धतशीरपणे विसरतो. अनेक खाप पंचायती सगोत्र विवाहाला विरोध करतात, पण राम आणि सीतेचे गोत्र एकच होते, हे मात्र नजरेआड करतात. मुस्लिम निकाहमध्येही मुलीने कबूल म्हटल्याशिवाय लग्न साजरे होत नाही. पण दांभिकतेने अशा सर्व गोष्टी आम्ही केवळ उपचार म्हणून पाळतो. त्याचा मथितार्थ आमच्या गावीही नसतो. परंपरा आम्हाला उमजत नाहीत, जगण्यातील प्रेमाचे अढळ स्थान ओळखता येत नाही, म्हणून तर आजही प्रत्येक चौथा भारतीय जातीयता पाळतो, असे ताजे सर्वेक्षण सांगत राहते. एकविसाव्या शतकातील दुसरे दशक सरत आले तरी, इथे होणाऱ्या आंतरजातीय विवाहांचे प्रमाण पाच टक्क्यांवर सरकत नाही. अशा अपरंपार दुष्काळात प्रेमाचे झरे आटतात, पण जातिधर्माची मुळं मात्र जमिनीत खोलवर पसरत राहतात.
आमच्या कर्मठ बहिऱ्या कानांवर सर्वोच्च न्यायालयाचे निकालही पडत नाहीत. ते उच्चरवाने सांगत असते, ‘विवाहयोग्य वयाचे तरुण तरुणी आपल्या इच्छेनुसार आपल्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करू शकतात किंवा लग्न न करताही एकत्र राहू शकतात.’ सुप्रीम कोर्ट अधिकाधिक आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, असे मत नोंदविते. शासन व्यवस्थेने या प्रकारच्या लग्नाला प्रोत्साहन द्यायला हवे. जातीव्यवस्था ही या देशाच्या एकतेला लागलेली कीड असून आंतरजातीय विवाह हे या देशाला एकसंघ करण्यासाठी आवश्यक आहेत, असे सांगून जर प्रशासनाने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सहकार्य करण्याऐवजी कायद्याचा दुरुपयोग करून अशा जोडप्यांना त्रास दिला तर अगदी एस पी आणि जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्ट देते. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या मदतीसाठी सरकारने विशेष सेल, हेल्पलाईन, शेल्टर स्थापन करावे, असे निर्देश अगदी नुकतेच मद्रास हायकोर्टाने दिले आहेत.
सरकार या गोष्टी करेल तेव्हा करेल; पण सध्या या साऱ्या गोष्टी ‘लव्ह कमांडोज’च्या माध्यमातून संजय सचदेव आणि त्यांची टीम करते आहे. सर्वाधिक तरुण असणाऱ्या या देशातील कोणत्याही पक्षाच्या अजेंड्यावर, त्यांच्या जाहीरनाम्यात प्रेमिकांच्या सुरक्षेचा कार्यक्रम नसावा, याचे संजय सचदेव यांना आश्चर्य वाटते. उलट लव्ह कमांडोज जे काम करत आहेत, त्यामुळे सारी कर्मठ मंडळी त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत, धमक्या तर रोजच येतात. पण संजय सचदेव यांची आपल्या कामावर नितांत श्रद्धा आहे, “मरण कुणाला चुकले आहे? प्रेमिकांच्या हिताचे रक्षण करता करता मला मरण आले, तर मी प्रेमशहीद होईन.” आपल्या विरळ झालेल्या पांढऱ्या केसांमधून हात फिरवत सचदेव स्मितहास्य करत बोलतात आणि गंभीरपणे इशारा देतात, “हा देश वाचवायचा असेल, सुरक्षित ठेवायचा असेल, तर इथलं प्रेम जिवंत राह्यलं पाहिजे, इथले प्रेमिक खुशहाल असले पाहिजेत, प्रेमावर उभारलेली आपली नाती शाबूत राह्यली पाहिजेत.”

सचदेव बोलत असतात आणि कसे कोण जाणे, बॅकग्राऊंडला गाण्याचे सूर कानावर पडत असतात,
“ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो...”

dr.pradip.awate@gmail.com