आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरं बनवण्याचा काळा धंदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरेपणाचं वेड वर्षानुवर्षं भारतीयांना आहे. गोरं होण्यासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. आणि त्वचेचं आयुष्यभरासाठी नुकसान करून घेतात. रंग उजळवणाऱ्या औषधांमागची कहाणी उलगडणारी ही कव्हर स्टोरी.

मंजू कॉलेजला दुसऱ्या वर्षात शिकणारी चुणचुणीत मुलगी. माझ्यासमोर चेहरा पाडून बसलेली, तिची आई हवालदिल. चेहऱ्यावर दोन-तीनशे पिंपलसारखे पू भरलेले फोड. महिनाभरापासून कॉलेजही बंद. कारण काय तर गोरं दिसण्यासाठी तीन-चार महिन्यांपासून ती एक मलम लावत होती. सुरुवातीला महिनाभर चेहरा छान उजळला. दुसऱ्या महिन्यापासून बारीक फोड येणं सुरू झालं. आता तर मोठाले फोड येऊन पूर्ण चेहऱ्यावरच पू जमा झालेला. हे सर्व फोड कापून काढावे लागणार व त्याचे व्रण आयुष्यभर जाणार नाहीत, हे समजून मी कळवळून विचारले, ‘काय केलंस हे?’ मैत्रिणीने सुचवलेलं क्रीम तिचा चेहरा उजळला म्हणून मंजूने वापरलं. त्या मैत्रिणीला एका औषध दुकानदाराने हे मलम सुचवलेलं. या दोघींच्या आणखी पाच-दहा मैत्रिणींनी वापरण्यास सुरुवात केलेली. एकंदरीत ही साखळी लांबवर पसरलेली. या मलमात त्वचेला घातक स्टेरॉइडचा समावेश होता. शेवटी तिच्या चेहऱ्यावरील फोड कापून काढावे लागले. गालावर आयुष्यभर व्रण राहणार होता. तिच्या सौंदर्यावर व आत्मविश्वासावर उठलेला ओरखडा तर आयुष्यभर मिटणार नव्हता.

मंजू ही एक प्रातिनिधिक केस. असे निदान आठ-दहा तरी नवीन रुग्ण दररोज पाहण्यात येतात, ज्यांनी स्टेरॉइडच्या मलमांनी चेहरा खराब करून घेतला आहे. मीच नाही, देशभरातील आम्हा आठ-दहा हजार त्वचारोगतज्ज्ञांकडे हीच परिस्थिती. महिन्याला लाखाे लोकांचे चेहरे या गोरं बनवणाऱ्या स्टेरॉइडयुक्त मलमांनी खराब होत चाललेले आहेत. ही त्वचेच्या आत्महत्येची साथ मागील दोन वर्षांपासून तर प्रचंड वेगाने वाढत चाललेली आहे.

गोरं दिसणं ही प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनातील सुप्त इच्छा असते. गोरी त्वचा म्हणजे सौंदर्य, असं समीकरण आपल्याकडे अनेक शतकांपासून मांडलं गेलं आहे. हे आर्यांच्या आक्रमणानंतर झालेल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून आलं असावं. अन्यथा नेटिव्ह द्रविड काळे होते आणि सुंदरही होते. जगभरात आक्रमक गोरे होते म्हणून गोरा रंग श्रेष्ठ ठरवला गेला. काळे लोक आक्रमणकर्ते असते तर कदाचित इतिहास वेगळा असता. गोरं बनण्याचा व बनवण्याचा उद्योगही शेकडो वर्षांपासूनचा आहे. त्वचा उजळवण्याच्या अनेक घरगुती व आयुर्वेदिक उपचारांची परंपरा आताच्या फेअरनेस क्रीमच्या प्रचंड आर्थिक उलाढालीच्या बाजारपेठेत येऊन स्थिरावली आहे.

दर नियंत्रणामुळे स्टेरॉइड मलमे १०-१२ रुपयांना मिळू लागली. ही मलमे फेअरनेस क्रीम म्हणून वापरण्यास अर्धशिक्षित डॉक्टर सर्वांनाच सांगू लागले. कारण लोकप्रिय क्रीम ४० रुपयांना तर स्टेरॉइड मलम १० रुपयांना. वास्तविक त्वचेच्या अॅलर्जी, इसबवर लावायचे हे मलम दर नियंत्रणात येण्यासारखे जीवनावश्यक वगैरे मुळीच नाही. पण या गरिबांसाठीच्या दर सूचीत मलमांपैकी काहीतरी असावे, एवढ्या उथळ तर्काने ही मलमे घुसवण्यात आली.

...हे व्यसनच!
स्टेरॉइडयुक्त मलम पायावर इसब व अॅलर्जीसाठी वापरावयाचे मलम आहे. त्याचा चेहऱ्यावर वापर निषिद्ध आहे. स्टेरॉइडमुळे पुरळ येणे, पिंपल वाढणे, त्वचा फाटून स्ट्रेचमार्क येणे, त्वचा कायमची लाल व संवेदनशील असे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात. स्टेरॉइडमुळे चेहरा खराब होणे पूर्वी क्वचित पाहण्यात येत असे. मागील दोन-तीन वर्षांत अशा रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली.

आता या प्रकाराला TSDF - Topical Steroid Damaged Face म्हणजे स्टेरॉइड मलमांमुळे खराब झालेला चेहरा ही संज्ञा प्राप्त होऊन त्याचा पुस्तकातही समावेश झाला आहे. ही त्वचा अतिशय संवेदनशील या प्रकारात मोडते. त्यावर इतर कुठल्याही मलमाने काहीच फरक पडत नाही. परत नाइलाजाने तेच मलम लावावे लागते. मद्यपीला जसे दारूचे व्यसन लागते तसे त्वचेला स्टेरॉइड मलमाचे व्यसन लागते. त्यातून बाहेर काढण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ व रुग्णांनाही बराच काळ मेहनत घ्यावी लागते.

गोरं बनवणाऱ्या औषधी
त्वचेचा रंग मेलॅनीन या रंगद्रव्यामुळे असतो. गोरं बनवणारी मलमं या मेलॅनीनच्या निर्मितीत अडथळा करून ब्लीचिंगचा परिणाम साधतात. हायड्रोक्विनोन या गटातील प्रातिनिधिक औषध दोन टक्के प्रमाणात खूप थोड्या मात्रेमध्ये आठवड्यात दोन-तीनच वेळा वापरले व उन्हापासून बचाव केला तर रंग उजळतो. पण सध्या चार टक्के ते दहा टक्के प्रमाणात स्टेरॉइडच्या मलमामध्ये घातक मिश्रणे बाजारात येत आहेत. आफ्रिकेमध्ये तर पूर्ण शरीरावर लावण्यासाठी मोठ्या बरणीत हे मलम मिळते. तिथेही लाखो लाेकांच्या त्वचेत ओक्रोनोसिस हा कायमचा बिघाड झालाय. या मलमावर जपानमध्ये पूर्ण बंदी आहे. भारतात डॉक्टरांच्या चिठ्ठीमुळेच मिळावे, असा नियम आहे.

एका लोकप्रिय मलमात सौम्य प्रभावाचे लिकोरिस हे मूलद्रव्य असते. दुसरे एक मलम डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच मिळत असे, तोपर्यंत परिस्थिती ठीक होती. अलीकडे ही मलमे चिठ्ठीशिवाय औषध दुकानदारांनी परस्पर विकायला सुरुवात केली आणि परिस्थिती बिघडली. या सर्वात स्टेरॉइडयुक्त मलमे ही दुष्परिणाम करण्यात आघाडीवर आहे. मागील तीन वर्षांत लाखो लोकांची त्वचा कायमची खराब झाली. या वावटळीमागे काय कारणं आहेत, हे शोधू जाता अनेक धक्कादायक तथ्ये आढळून आली.

निर्बुद्ध सरकारी धोरण
२००४मध्ये शासनाने स्टेराॅइड व प्रतिजैविकं असणाऱ्या मलमांचा समावेश दर नियंत्रण सूचीमध्ये केला. या सूचीतील औषधांची किंमत कंपन्यांना वाढवता येत नाही. रक्तदाब, हृदयरोग, किडनी वगैरेसाठी वापरली जाणारी ठरावीक औषधं या सूचीमध्ये येतात. दर नियंत्रणात एखादे औषध आले की, नफा कमी झाल्यामुळे औषध कंपन्यांचा रस संपतो व ते औषध जीवनावश्यक व स्वस्त असूनही बाजारातून गायब होत जाअते. स्टेरॉइड मलमाबाबत मात्र उलट झाले. दर कमी झाले व खप मात्र वाढत गेला.

दर नियंत्रणामुळे स्टेरॉइड मलमे दहा-बारा रुपयांना मिळू लागली. ही मलमे फेअरनेस क्रीम म्हणून वापरण्यास अर्धशिक्षित डॉक्टर सर्वांनाच सांगू लागले. कारण लोकप्रिय क्रीम ४० रुपयांना तर स्टेरॉइड मलम १० रुपयांना. वास्तविक त्वचेच्या अॅलर्जी, इसबवर लावायचे हे मलम दर नियंत्रणात येण्यासारखे जीवनावश्यक वगैरे मुळीच नाही. पण या गरिबांसाठीच्या दर सूचीत मलमांच्यापैकी काहीतरी असावे, एवढ्या उथळ तर्काने ही मलमे घुसवण्यात आली.

>औषध कंपन्यांची निर्लज्ज नफेखोरी : औषध कंपन्यांना कळले की, या मलमांना गोरेपणासाठी भरपूर मागणी आहे. मग त्यांनी ही मलमे प्रचंड संख्येने खपवण्यास सुरुवात केली. वास्तविक स्टेरॉइड मलमे त्वचारोगतज्ज्ञ वा अधिकृत डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विकता येत नाहीत. औषध कंपन्यांनी छोट्या-छोट्या गावातील जनरल प्रॅक्टिशनरना ही मलमे गोरेपणासाठी वापरण्यास उद्युक्त केले. औषध दुकानदारांना वेगवेगळ्या स्क्रीम देऊन लाखोंनी या मलमांची उलाढाल सुरू केली. एक कप चहाच्या किमतीत गोरे बनवणारे मलम भारतात लोकप्रिय न होते तरच नवल. पूर्वी मोजक्याच कंपन्या हे मलम बनवत. आता प्रत्येक कंपनी त्यात उतरली आहे. कायद्यानुसार डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारे मलम आता औषध दुकानदार स्वत:हून लोकांना देऊ लागले आहेत. ही मलमे वापरणारे पहिले एक-दोन महिने चेहरा छान झाला म्हणून खुशीत असतात. पाच-दहा मित्रांना आवर्जून वापरायला देतात. पहिल्या रुग्णाचा चेहरा खराब होईपर्यंत ही साखळी पैसे दुप्पट करण्याच्या साखळीसारखी दूरवर पोहोचलेली असते. आता राजरोसपणे वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देण्यापर्यंत या कंपन्यांची मजल गेली. लोकांची मागणी व चिठ्ठीशिवाय मलम विकणारे औषध दुकानदार हे या कंपन्यांच्या धंद्याचा अाधार.

गोरे बनवणाऱ्या उद्योगाच्या साखळीत जाणता-अजाणता हातभार लावणारे अनेक घटक आहे. निर्बुद्ध सरकारी धोरण व औषध कंपन्यांची नफेखोरी, स्वत:हून औषध देणारे औषधी दुकानदार, गोरेपणाच्या हव्यासापोटी काहीही करायला तयार असणारे लोक व या वेडाला खतपाणी घालणारी संपर्क माध्यमे. आम्ही आमच्या स्किन सिटी हाॅस्पिटलमध्ये एक सर्व्हे केला. त्यात आढळून आले की, साधारणत: दोन तृतीयांश लोक स्वत: किंवा शेजाऱ्याचे पाहून ही मलमे लावतात व त्यांना ती औषध दुकानात सहज उपलब्ध होतात. औषध दुकानदार स्वत:च ही मलमे सुचवतात. काही जनरल प्रॅक्टिशनरही मलमे सुचवतात. तर पाच टक्के केसेसमध्ये त्वचारोगतज्ज्ञांनी ही मलमे सुचवली व रुग्णांनी परत न विचारता चालू ठेवली.

> त्वचारोगतज्ज्ञांचा लढा : देशभरामध्ये साथीप्रमाणे वाढलेल्या या प्रकाराने त्वचारोगतज्ज्ञ संघटना खडबडून जागी झाली. आम्ही मग भारताच्या मुख्य औषध नियंत्रकांची भेट घेतली व ही परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आम्हाला हतबुद्ध करणारे होते. ‘डॉक्टर आमच्या खात्याकडे मनुष्यबळ कमी आहे. औषध निरीक्षकांच्या निम्म्या जागा रिकाम्या आहेत. नकली औषधे, नशेची औषधे, हृदयशस्त्रक्रियेतील बनावट स्टेंट, झोपेच्या औषधांचा गैरवापर व गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर यांसारख्या बाबींकडेसुद्धा आम्हाला पुरेसे लक्ष पुरवता येत नाही. तुमच्या मलमांच्या समस्येसाठी खरेच वेळ नाही.’ मग आम्ही त्वचारोगतज्ज्ञांनी स्वत:च लढायचे ठरवले. रुग्णांना जागं करण्यासाठी प्रत्येक त्वचारोगतज्ज्ञाने प्रयत्न करायचे ठरले. औषध कंपन्यांच्या मॅनेजरना धमकी देऊन पाहिली. पण कुणी बधले नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ज्या २४८ औषधांवर बंदी आणली, त्यात काही स्टेरॉइड मलमांचा समावेश आहे.

मागच्या वर्षभरापासून एक कंपनी वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देऊन ही स्टेरॉइडयुक्त मलमे गोरेपणासाठी खपवत आहे. त्याविरुद्ध अन्न व आैषध प्रशासनाकडे महाराष्ट्र त्वचारोग संघटनेने दाद मागितली. मग एफडीएने या जाहिरातीवर बंदी घातली. कंपनी उच्च न्यायालयात गेली. त्वचारोग संघटना त्यात तक्रारदार म्हणून पार्टी झाली. सुनावणीच्या दोनच तारखांमध्ये तांत्रिक मुद्द्यांवरून कंपनीने मागणीनुसार न्यायालयाने ही जाहिरात बंदी उठवली. आमची संघटना अजूनही लढतेच आहे. हा मुद्दा माध्यमातून उठवावा म्हटले तरी मर्यादा येतात. एका औषध कंपनीचा स्टेरॉइडयुक्त गोरेपणाच्या मलमाचा धंदा दीडशे ते चारशे कोटी प्रतिवर्षाचा. अशा शे-दीडशे कंपन्या. त्यांचे जाहिरातीचे बजेट दरवर्षी पाच-पन्नास कोटींचे.

या गलबल्यात त्वचारोगतज्ज्ञांच्या निषेधाचा आवाज माध्यमात क्षीणच उमटला. नुकतीच केंद्र सरकारने काही अनावश्यक औषधी मिश्रणे रद्द ठरवली. त्यामध्ये काही मलमांचा समावेश आहे. हे आमच्या त्वचारोग संघटनेच्या पाठपुराव्याचेच यश आहे. पण अजूनही बरीच मलमे बाजारात आहेत. या गंभीर समस्येचे भान सरकार माध्यमे व लोकांना जितक्या लवकर येईल तेवढे लक्षावधी चेहरे खराब होण्यापासून टळतील. हे गोरं होण्याचं गारूड भारतीय मनावरून खरंच कधी उतरेल का?
- लेखक त्वचारोगतज्ज्ञ आहेत.
(niteendhepe@gmail.com)