आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅण्ड बाय मी...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येशू हा देवाचा पुत्र... पण मग तो गोरा कसा? की देवही गोराच आहे? त्याच्या बालमनाला प्रश्न पडत होते. अगदी ‘लास्ट सपर’मध्ये असणारा प्रत्येक जणसुद्धा गोराच कसा? सांताक्लॉजसुद्धा गोराच.

मग ब्लॅक देवदूत कोणी आहे की नाही? एकही ब्लॅक हिरो नाही, असे कसे?
ओडेसा तिच्या लहानग्याला घेऊन बसस्टॉपवर उभी होती. किती तरी वेळ झाला पण बस यायला तयार नव्हती. लहानगा तहानला. त्याच्या तहानल्या चेहऱ्याकडे पाहून नाइलाजाने तिनं बसस्टॉपजवळच्या घराचा दरवाजा खटखटवला. दार उघडले. एक गौरवर्णीय गृहस्थ डोकावले. या दोघा मायलेकरांकडे नजर गेली आणि त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“माझ्या या लहानग्याकरता ग्लासभर पाणी मिळेल, प्लीज...” ओडेसा अजीजीने म्हणाली.
“आय कान्ट हेल्प यू,” असे म्हणत त्या गृहस्थाने दार त्राग्याने बंद केले.
छोट्या कॅशियसला काहीच उमगले नाही. पण त्या माणसाने आपल्याला पाणी का दिले नसावे, हा प्रश्न त्याच्या इवल्याशा डोक्यात घुमत राहिला. पण ही केवळ सुरुवात होती.
‘व्हाईट‌्स ओन्ली’ असं निर्लज्जपणे मिरवणारी हॉटेल्स त्याला आजूबाजूला दिसत होती. एके दिवशी वर्तमानपत्रात त्याने एक भयंकर फोटो पाहिला. त्याच्याच वयाच्या इमेट टिल नावाच्या मुलाचा मृतदेह शवपेटीत ठेवलेला होता. त्याचा चेहरा अत्यंत विद्रूप झाला होता. तो बातमी वाचू लागला. या चौदा वर्षांच्या काळ्या मुलाने म्हणे कोणा गौरवर्णीय महिलेला पाहून शिट्टी मारली आणि म्हणून तिच्या नवऱ्याने त्याचे अपहरण करून त्याला अत्यंत छळ करून जिवंत मारले. तो फोटो पाहून कॅशियसला प्रचंड संताप आला. त्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून गावातल्या रेल्वे यार्डात धिंगाणा घातला. पण हा केवळ निरर्थक वैताग आहे, हे त्याला तेव्हाही कळत होते.
एका गरीब आफ्रिकन अमेरिकन कुटुंबात तो जन्माला आला होता. वडील पेंटिंगची कामं करीत, तर आई थोरामोठ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून राबत होती. मम्मा इतकी प्रेमळ की हा तिला लाडाने ‘मम्मा बर्ड’ म्हणून हाक मारायचा. आईबापाच्या पंखांखाली दोघं भावंडं वाढत होती, पण वास्तवाचं रणरणतं ऊन अखेर प्रत्येक घरट्यापर्यंत येऊन पोहचतंच ना. चर्चमधील चित्रं तो पाहात होता. येशू हा देवाचा पुत्र... पण मग तो गोरा कसा? की देवही गोराच आहे? त्याच्या बालमनाला प्रश्न पडत होते. अगदी ‘लास्ट सपर’मध्ये असणारा प्रत्येक जणसुद्धा गोराच कसा? सांताक्लॉजसुद्धा गोराच. मग ब्लॅक देवदूत कोणी आहे की नाही? एकही ब्लॅक हिरो नाही, असे कसे? अगदी बच्चे कंपनी जेव्हा हॅलोविनचा खेळ खेळत, तेव्हा सुपरहिरोचा पोशाख करणारा मुलगा आपला चेहरा पांढरा करे, कारण त्या बिचाऱ्याने काळा सुपरहिरो कधी पाहिलेलाच नसे.
एकदा कॅशियसने मम्मा बर्डला विचारले, “आपण मरतो तेव्हा नेमके काय होते? आपणही स्वर्गातच जातो ना?”
“अर्थात..!” ममाला त्याच्या प्रश्नाचा रोख समजलाच नाही.
“मग स्वर्गातला एकही देवदूत काळा कसा नाही?” मम्मा निरुत्तर. यावर तोच म्हणाला, “आता माझ्या लक्षात आलं, अगं बाकीचे देवदूत बाहेर हुंदडत असताना काळे देवदूत मात्र किचनमध्ये काम करत असतील, नाही का?”
ममाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिनं पाहिलेला, न पाहिलेला गुलामगिरीचा सारा इतिहास तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागला.
‘मी होईन ब्लॅक सुपरहिरो. मी दाखवून देईन या जगाला... ब्लॅक सुपरहिरोही असू शकतो.’ तो मनाशीच बोलत होता. दिवसभर बॉक्सिंगचा सराव करताना पंचिंग बॅगला ठोसे लगावताना तो हेच रोज नव्याने स्वतःला बजावत होता. वयाच्या बाराव्या वर्षापासून तो बॉक्सिंगचे धडे घेत होता. अल्पावधीत तो ल्युसविले-केंटुकी परिसरातला नावाजलेला बॉक्सर म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने केंटुकी प्रांताचे सहा गोल्डन ग्लोज मिळवले. त्याची बॉक्सिंगची शैली अनोखी होती. तो रिंगभर नाचत राह्यचा. “फ्लोट लाईक अ बटरफ्लाय अॅन्ड स्टिंग लाईक अ बी” हा त्याचा खाक्या होता. आपल्या स्पर्धकाचे वैगुण्य बरोबर हेरून त्याच्या विकपॉइन्टवर हल्ला करण्याची त्याची रणनीती होती. भल्याभल्यांना तो धूळ चारू लागला. त्याचा आत्मविश्वास कमाल होता.
“वयाच्या २१व्या वर्षी मी वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन होणार आहे. यु कॅन टेक माय ऑटोग्राफ नाऊ...!” असं तो अगदी सहज बोलत असे. अनेकांना त्याचं हे स्वप्नरंजन वाटे, कोणाला फाजीलपणा वाटे. आणि १९६०मध्ये कॅशियस मार्सीलस क्लेने कमाल केली. वयाच्या १८व्या वर्षी रोम ऑलिंपिकमध्ये कॅशियसने आपल्या सगळ्या लढती जिंकत मुष्टियुद्धातील सुवर्णपदक जिंकले. एका ब्लॅक हिरोचा जन्म झाला होता. कॅशियस अत्यंत आनंदी झाला होता. त्याच्या ममा-पपाला तर आभाळ दोन बोटे उरले होते. डिसलेक्सीया असल्याने नीट लिहू-वाचू न शकणाऱ्या या काळ्या पोराने चमत्कार केला होता. तो तर अत्यानंदाने आपले गोल्ड मेडल गळ्यात अडकवूनच सगळीकडे फिरत होता. पण ते गोल्ड मेडल गळ्यात असतानाही एके दिवशी त्याला त्याच्याच गावातल्या एका रेस्टाॅरंटमध्ये सर्व्हिस नाकारण्यात आली, कारण ते रेस्टाॅरंट केवळ गोऱ्यांसाठी होते आणि कॅशियस काळा होता. संतापलेल्या कॅशियसने आपले गोल्ड मेडल ओहिओ नदीत फेकून दिले. जर हे गोल्ड मेडल मला माणूस म्हणून ओळख देणार नसेल तर काय करायचे त्याचे?
पण या दमदार काळ्या मुलाकडे दुर्लक्ष करणे अवघड होते. १९६४मध्ये, वयाच्या २२व्या वर्षी सोनी लिस्टनला नमवत त्याने वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनचा किताब मिळवला. पण आता कॅशियस क्ले हे गुलामगिरीच्या परंपरेतून आलेले नाव त्याला डाचत होते. गुलामाला त्याच्या मालकाचे नाव देण्याची तिथली परंपरा. आत्मभान आलेल्या कॅशियस क्लेला आता गुलामीच्या सगळ्या बेड्या तोडायच्या होत्या. त्यानं ‘नेशन ऑफ इस्लाम’मध्ये प्रवेश करून मुस्लिम धर्म स्वीकारला. मोहम्मद अली... या नव्या नावाने तो जगासमोर आला.
बॉक्सिंग रिंगच्या बाहेर वर्णविद्वेषी प्रस्थापितांना लगावलेला हा जोरकस ठोसा होता. आपली ओळख शोधण्याचा, गुलामीच्या खुणा पुसण्याचा हा प्रयत्न होता. आपल्या काळ्या बांधवांना नवी ओळख देण्याचा प्रयत्न तो करू पाहात होता. शांती आणि प्रेम या पायावर उभे असणारे जग मोहम्मद अलीच्या डोळ्यांत दिसत होते. सुफी पंथाच्या सर्वसमावेशकतेच्या तत्त्वाने तो अत्यंत प्रभावित झाला होता. तो जगातला सर्वोत्तम मुष्टियोद्धा तर होताच; पण त्याहून अधिक तो सर्व हृदयांना जोडणारा एक पूल होता, प्रेमाने ओतप्रोत भरलेला एक उदारमनस्क माणूस होता.
...त्याच्या या सर्वस्पर्शी प्रेमाची परीक्षाही होणारच होती.तीही वेळ आली. त्या वेळी अमेरिका आणि व्हिएतनामचे युद्ध सुरू होते. दक्षिण आणि उत्तर व्हिएतनामच्या भांडणात अमेरिकेने नाक खुपसले होते. आग्नेय आशियात कम्युनिस्ट शक्तींचा प्रभाव वाढू नये, याकरिता अमेरिका या युद्धात उतरली होती. १९६७मध्ये अमेरिकन सरकारने मोहम्मद अलीला व्हिएतनाममध्ये लढण्यासाठी सैन्यात सामील होण्याचा आदेश दिला. इतरही अनेक नागरिकांना सक्तीने सैन्यात भरती केले जात होते. सरकारचा आदेश पाळणे भाग होते, अन्यथा कठोर शिक्षेची तरतूद होती. पण मोहम्मद अलीचा या युद्धाला विरोध होता. खरं म्हणजे, त्याची लुटीपुटीची हिंसा बॉक्सिंग रिंगपुरती होती. कोणत्याही कारणाकरिता माणसं मारणं, त्याच्या तत्त्वात बसत नव्हतं. पण सरकार नावाच्या शक्तीला आणि तेही अमेरिका नावाच्या सुपरपॉवरला विरोध करणे सोपी बाब नव्हती. अलीच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला पटवून सांगितलं, तू सरकारचा आदेश ऐक... सैन्यात सामील हो. अन्यथा तुरुंगात जावं लागेल. तुझं सोन्यासारखं करिअर बरबाद होईल. पण अलीला या युद्धात सामील होणं, त्याच्या आतल्या आवाजाचा अपमान वाटत होता. मोहमद अलीनं सैन्यात सामील व्हायला नकार दिला.
त्यानं ठणकावून सांगितलं, “सैनिकी पोशाख घालून, दहा हजार मैलावर जाऊन निरपराध व्हिएतनामी लोकांना मारायला मला ते का सांगताहेत? का झाडायच्या गोळ्या, का टाकायचे बॉम्ब माझ्याचसारख्या दिसणाऱ्या व्हिएतनामी लोकांवर, जेव्हा इथं तुम्ही आम्हां काळ्या लोकांना कुत्र्यासारखं वागवताय, साधे मानवी हक्क नाकारताय? गुलामगिरी लादणाऱ्या तुमचं साम्राज्य वाढावं म्हणून मी का जाळावीत कुणा निष्पापांची घरंदारं? हा दुष्टावा ताबडतोब थांबला पाहिजे.”
“मी जर युद्धविरोधी भूमिका घेतली तर माझी प्रतिष्ठा, मी मिळवलेली कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती याच्यावर आच येईल, अशी भीती मला दाखविली जात आहे. पण मी एकदा काय दहादा सांगेन, मी माझ्या तत्त्वांना काळिमा फासणार नाही. न्याय, स्वातंत्र्य आणि समता यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना गुलाम करण्याच्या तुमच्या षड‌्यंत्रातील एक हत्यार मी होणार नाही.”
“या युद्धामुळे माझ्या बावीस दशलक्ष भावा-बहिणींना स्वातंत्र्य आणि समता मिळणार असेल तर मी या युद्धात एका पायावर सामील होईन. आणि माझी तत्त्वे पाळण्यासाठी जर मला तुरुंगात जावे लागणार असेल तर मी आनंदाने जाईन. अरे, गेली ४०० वर्षे आम्ही तुरुंगातच तर आहोत.”
मोहम्मद अलीच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली. सरकारमधल्या काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ‘तुला प्रत्यक्ष युद्धावर पाठविण्यात येणार नाही. तुला हातात बंदूक घ्यावी लागणार नाही. तू फक्त मी सैन्यात सामील होतो, असे म्हण.’ पण अली त्याच्या निर्णयावर ठाम होता, त्याला कसलीच तडजोड मान्य नव्हती. व्हायचे तेच झाले, अलीला अटक करण्यात आली. त्याचा ‘वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन’चा किताब काढून घेण्यात आला. दहा हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्याला बॉक्सिंग सामन्यात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली. तो सुप्रीम कोर्टात गेला, १९७१ला सुप्रीम कोर्टाने त्याला निर्दोष सोडले; तोवर त्याची ऐन उमेदीची साडेतीन वर्षे गेली होती. पण अली म्हणाला, “या साडेतीन वर्षांत मी जे मिळवले ते पाहता, मी जे गमावले ते काहीच नाही. मी अपार शांती मिळवली, हृदयातील अपार प्रेमाचा अनुभव घेतला.”
ज्या अमेरिकेने त्याचा ‘वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन’चा किताब काढून घेतला त्याच अमेरिकेने त्याला २००५मध्ये मेडल ऑफ फ्रीडम बहाल केले. युनायटेड नेशन्सने त्याला आपला शांतीदूत म्हणून घोषित केले.
खरा बॉक्सर केवळ रिंगमध्ये ठाम उभा राहात नाही, रिंगबाहेरही तो तसाच असतो. अलीने आपल्या जगण्याने हे सिद्ध केले. म्हणून तर ल्युकेमिया आजाराने ग्रासलेला त्याचा छोटा चाहता जिमी स्वतः मृत्यूशय्येवर असताना मोहम्मद अलीला प्रेमाने म्हणाला होता, “अली, आता मी देवाला भेटायला चाललोय. मी देवाला सांगणार आहे, मी अलीला भेटलोय, अली माझा मित्र आहे.”
पार्किन्सनसारख्या आजाराला सहज झेलत कालच्या ३ जूनला मोहम्मद अलीने जगाचा निरोप घेतला, तेव्हाही असंच काहीसं वाटलं आणि त्यानंच गायलेलं गाणं ओठांवर आलं-
When the night has come
And the land is dark
And the moon is the only light we’ll see
No I won’t be afraid, no I won’t be afraid
Just as long as you stand, stand by me
आजही जेव्हा जेव्हा अंधारून येईल, तेव्हा अलीच्या आठवणी अवतीभवती फुलपाखरासारख्या नाचत राहतील. धर्म, वर्ण, देशाच्या भिंती ओलांडत तो पुन्हा पुन्हा भेटत राहील.

(dr.pradip.awate@gmail.com)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...