आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक खरी खुरी दंतकथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या पितृसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या नवजात त्वचेवर इथल्या समाजव्यवस्थेनं घातलेली, परंपरेच्या धुळीनं माखलेली ही पांघरुणं ओरबाडून काढणं अगदीच जिकिरीचं होऊन जातं. ही पांघरुणं आपल्याला उराउरी भेटू देत नाहीत, अनेकदा जिवाची घुसमट होते; पण अनेकदा फसगतही होते आणि त्याच पांघरुणात सुरक्षित वाटू लागतं!

आपण मालक असतो, प्रियकर आपल्याला होता येत नाही. सहजीवनात, प्रेमात चुकायची ही मुभा असायला हवी, ही गोष्टच आपण विसरून गेलो आहोत.

दारावर टकटक वाजले आणि आतून आवाज आला,
“कोण आहे?”

“मी आहे.”
“मी? मी कोण?” जोवर बाहेर उभा असलेला ‘मी’ आहे, तोवर दरवाजा उघडला जात नाही.

कधी काळी स्वामी विवेकानंदांच्या साहित्यात वाचलेला हा प्रसंग. वाचलेलं, ऐकलेलं, पाहिलेलं किती तरी काळाच्या ओघात विस्मृतीच्या डोहात बुडून गेलं, नाही असं नाही; पण हे असे काही प्रसंग अजूनही पृष्ठभागावर तरंगत राहतात. असाच आणखी एक तरंगणारा प्रसंग म्हणजे साने गुरुजींबद्दलचा. गुरुजी अविवाहित होते त्याबद्दल कोणी तरी छेडले असता गुरुजी म्हणाले की, लग्नानंतर जी मुलगी मला रोज तिची लुगडी धुण्याची परवानगी देईल, तिच्याशी मी लग्न करेन. म्हटलं तर वेगवेगळ्या पातळीवरील हे प्रसंग; पण आज आठवले. आणि आठवणींना कुठं काय लॉजिक असतं?

आपण जन्माला येतो. आपले जैविक आईवडील आपल्याला हे जग दाखवतात. पण त्यानंतर अक्षरशः प्रत्येक क्षणी आपण नव्याने जन्मत असतो. आपलं सामाजिक स्थान- आजच्या अॅकेडेमिक भाषेत सोशल लोकेशन-आपल्या नव्यानव्या जन्मामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. जात, धर्म, लिंग, आर्थिक स्तर अशा अनेक अंगाने आपण स्वतःला रोज लोकेट करत जातो. खरं तर ही प्रत्येक ओळख आपल्याला एका वर्तुळात बांधत जाते, हे अधिक खरं. ही सारी म्हटलं तर तकलादू पण अत्यंत चिवट अशी वर्तुळं भेदण्याची आपल्यामध्ये असलेली निसर्गदत्त ताकद आपल्याला साऱ्या सीमा ओलांडून प्रेम करण्याची हिंमत देते. जात, धर्म यांच्या वर्तुळाबद्दल आपण आजवर अनेकदा बोललो आहोत. आर्थिक विषमतेतून येणाऱ्या विलगतेचा दुष्काळी अनुभव आपण रोज घेतो आहोत. पण या पितृसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुष म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या नवजात त्वचेवर इथल्या समाजव्यवस्थेनं घातलेली, परंपरेच्या धुळीनं माखलेली ही पांघरुणं ओरबाडून काढणं अगदीच जिकिरीचं होऊन जातं. ही पांघरुणं आपल्याला उराउरी भेटू देत नाहीत, अनेकदा जिवाची घुसमट होते, पण अनेकदा फसगतही होते आणि त्याच पांघरुणात सुरक्षित वाटू लागतं, असंही काहीसं...! पण कोणी भेटते, कधी सत्यकथा म्हणून, कधी दंतकथेचं वेषांतर करून आणि वर्तुळं भेदण्याची किल्ली हातात देऊन जातं. माझ्या टीन एजच्या आसपास मला अशीच एक दंतकथा भेटली. एक खरीखुरी दंतकथा...! आज या दंतकथेतील सारी पात्रं कुठं आहेत, पुढं काय झालं, मला माहीत नाही. पण त्याची गरजही नाही.आपण कथा जिथे संपली म्हणतो, तिथं ती संपते थोडीच, ती तर अव्याहत वाहातच असते.

काय नाव होतं बरं तिचं? त्या पुस्तकाची जीर्ण, पिवळसर पानं माझ्या डोळ्यांसमोर अजूनही फडफडताहेत. अस्पष्टसं, अंधुकसं आठवतंय काही. रेणू... बरोबर... रेणूच ती. काय भन्नाट लिहायची. तिच्या काही कादंबऱ्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, त्या काळी. तिनं वामनशी प्रेमविवाह केला. वामन साहित्य रसिक, उमदा समीक्षक. दोघंही साहित्यवेडे... साहित्यात आकंठ बुडालेलं जोडपं. वामन तसा शांत, संयत स्वभावाचा.

ती आणि तो... दोघं प्रेमात पडले... त्यांनी लग्न केलं आणि मग ते सुखानं जगू लागले. अशा चार वाक्यांत कोणतीच गोष्ट सांगता येत नाही.

रेणू आणि वामनचे दिवस मस्त चालले होते. आणि एका संध्याकाळची गोष्ट... वामन त्याच्या खोलीत काही लिहीत वाचत बसला होता. तेवढ्यात त्याचा मित्र देविदास आला. देविदास नावाजलेला चित्रकार, फोटोग्राफर, ललित लेखक. देविदास खरं म्हणजे त्या दोघांचाही कॉमन फ्रेन्ड...! वामन त्याला भेटायला म्हणून हॉलमध्ये आला.

“काय म्हणतोयस देविदास? कसा काय आला होतास?” वामनने देविदासला विचारले.

“रेणूला नेण्यासाठी आलो होतो.” देविदास बोलला.

“अच्छा, कुठं चालला आहात का तुम्ही?” असं स्वतःशी पुटपुटल्यासारखं वामन बोलला, तोवर आतल्या खोलीतून रेणू आली. तिच्या हातात तिची सुटकेस आणि बाकीचं सामान होतं. वामनला काही कळेचना. पण रेणू स्पष्टच बोलली, “वामन, मी हे घर सोडून चालले आहे. मी विदाससोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

एकदम वीज कोसळावी, तसा हा आघात होता. देविदास वुमनायझर होता... त्याच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ अनेकांना पडायची. त्याची यापूर्वीचीही अनेक अफेअर्स वामन ऐकून होता. पण आता खुद्द त्याची बायको, त्याच्याशी हट्टाने प्रेमविवाह केलेली रेणू देविदासच्या सोबत जाण्याची गोष्ट करत होती आणि तेही याची आधी जराही पूर्वकल्पना न देता...! आपल्याला तर संशयदेखील नाही आला असा कधी...! वामनने रेणूकडे पाहिले आणि तिच्यासोबतचे कितीतरी हळवे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. त्याच्या पापण्या ओलावल्या; पण तरीही वामनने स्वतःला सावरले आणि तो त्या दोघांनाही बोलला, “देविदास आणि रेणू, तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही दोघेही जाणते आहात. सारा साधकबाधक विचार तुम्ही केलेलाच असणार. माझी फक्त एक विनंती आहे.”

क्षणभर कुणी काहीच बोलले नाही. मग वामनच पुढं बोलला, “देविदास, अरे काही नाही रे, रेणू जाणारच आहे तुझ्यासोबत. तिचा निर्णय झालाय. रेणू, माझी विनंती फक्त एकच आहे, तू आजच्या ऐवजी उद्या जा. मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. मग तू खुशाल निघून जा.”
“ठिकाय्ये”, असं म्हणून देविदास निघून गेला. आणि एका अपरिचित वळणावर रेणू आणि वामन दोघंही उभे होते. आपल्याच घरात परक्यासारखे. काय बोलायचं होतं? कुठून सुरुवात करायची होती?

“रेणू, तुझ्या निर्णयानं मला वाईट वाटलंय का? ऑफ कोर्स येस्स... वाटलंय. मी हर्ट झालोय ग. पण इश्यू इज नॉट दॅट”, वामन बोलत होता... “तू देविदासच्या प्रेमात पडलीस... खरं सांगू... कुणीही त्याच्यावर फिदा व्हावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. एनर्जिटिक माणूस आहे एकदम... पण तुलाही खरं तर माहिताय ते, ही इज नॉट ट्रस्टवर्दी. तो विश्वासू नाही. सुमित्रेचं काय झालं, योगिता... चल मी सगळ्यांची नावं घ्यायची गरज नाही.”
तो दिवाणखान्यात चकरा मारत होता. “रेणू, तू माझ्यासोबतच राहावं म्हणून मी तुला आज थांबवलंय का? तसं नाहीय. पण सांगू, माझं प्रेम आहे तुझ्यावर...! आणि तू कुठंही असलीस ना, तरी आनंदी असावीस एवढीच इच्छा आहे माझी. देविदाससोबत राहून तू जर आनंदी राहणार असतीस तर मी तुला एका वाक्यानंही बोललो नसतो. पण देविदासचा एकूण फुलपाखरी स्वभाव पाहता मला ते शक्य दिसत नाही. रेणू, प्लिज डोन्ट माईण्ड, आपण सारेच कधी कधी सैरभैर होतो. गुरुत्व मध्य सुटतो हातातला...! आजची रात्र थोडी शांत हो... विचार कर आणि तुला योग्य वाटेल तो निर्णय घे. सकाळी येतोच आहे देविदास...!”

ती रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राह्यली. या एका प्रसंगाने शांत, संयत आणि म्हणूनच प्रसंगी निरस वाटणाऱ्या वामनमधील माणसाचे किती मनोज्ञ दर्शन तिला घडविले होते. हा कसला जगावेगळा पुरुष आहे? ती विचार करत होती. शेजारी पहुडलेल्या वामनच्या केसांमधून हात फिरवताना तिला जाणवत होतं... हे नवजात जावळ सोडून ती कुठं चालले होते, तापलेल्या फुफाट्यातून? तिला हुंदका फुटला आणि...

“माफ कर... मी माझा निर्णय बदललाय. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत...!” सकाळी दाराशी आलेल्या देविदासला तिनं शांतपणे सांगितलं. तेव्हा घराच्या परसात फुललेल्या जाई-जुईचा गंध रस्त्यापर्यंत पोहोचला होता. आज रेणू कुठंय, वामन कुठंय, कुठंय देविदास? मला काहीच ठावं नाही.

पण परवा पुण्यात एका साठीच्या गड्यानं, सुना आलेल्या आपल्या बायकोचं, अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडकं धडावेगळं केलं आणि तोडलेल्या मुंडक्याच्या झिपऱ्या हातात धरून रस्त्यावर रक्ताचा सडा टाकत मोठ्या मग्रुरीत पोलिस स्टेशन गाठलं... एकविसावं शतक... स्मार्ट सिटी... व्हॉट‌्सअप आणि फेसबुकनं मान खाली घातलेले तमाम ते पाहात होते आणि ते व्हिडीओ एकमेकांना फॉरवर्ड करत होते, तेव्हा मला वामनची पुन्हा एकदा आठवण झाली. आपण मालक असतो, प्रियकर आपल्याला होता येत नाही. सहजीवनात, प्रेमात चुकायचीही मुभा असायला हवी, ही गोष्टच आपण विसरून गेलो आहोत. त्यात हे पुरुष नावाचं श्वापद आपण साऱ्यांनीच आपल्यात जोपासलंय... परंपरेनं आईच्या लाडानं त्याचे नको नको ते चोचले पुरवलेत. पण याला प्रेम करता येत नाही. मिठीत शिरलं तरी त्याची नखं अंगभर ओरबाडत जातात. वामन आणि रेणूच्या या खऱ्याखुऱ्या दंतकथेनं आपल्या या गड्यापासून माणूस होण्याच्या प्रवासाला हातभार लावावा, हीच एक आस आहे.

...तरच ही विसाव्या शतकातील खरीखुरी दंतकथा एकविसाव्या शतकात सुफळ संपूर्ण.
dr.pradip.awate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...