आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्‍यरेषा: प्रियाराधनाची सुरेल त-हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस असो, प्राणी असो वा पक्षी; प्रियाराधन कुणाला चुकत नाही. पण ते साधण्याची प्रत्येकाची तऱ्हा निराळी. त्यातही प्रणयात हरवताना निरनिराळ्या पक्ष्यांनी लावलेला सूर हा निसर्गाने निर्माण केलेला स्वतंत्र असा पंचरंगी ऑर्केस्ट्राच असतो...
जलपक्षी आणि रानपक्षी यांच्यात गुणात्मक फरक आहे. एक म्हणजे, जलपक्ष्यांचे रंग फारसे आकर्षक नसतात. ही रंगबहार पाहायची झाली तर थेट रानातच धाव घ्यावी लागते. तसंच बहुतेक जलपक्ष्यांचा आवाज चिरका वा कर्कश्य असतो. पेंग्विन त्यांच्या चालीच्या ढबीमुळे लाडके ठरतात. परंतु त्यांच्या आवाजाचा गलका, नको रे बाप्पा! कावळा आदी पक्ष्यांची कावकाव नकोशी होते. तथापि बहुतेक रानपक्ष्यांचा आवाज श्रवणीय म्हणजेच मेलोडियस अर्थात कर्णमधुर असतो. त्यातही आकाराने जेवढा छोटा तेवढा जास्त मेलोडियस, हे गुणोत्तरही निरखण्यात येतं. याला कारण हे पक्षी झाडीत कुठंतरी लपलेले असतात. अशा लपलेल्या प्रियतमेला आकृष्ट करण्यासाठी सादही तशीच मधुर हवी.

पक्षीप्रेमींची गर्दी जलस्थानीच जास्त असते. याचं कारण हे पक्षी सहजपणे निरखता येतात. झाडीत लपलेला पक्षी सहजासहजी दृष्टीस येत नाही. तिथं त्यांच्या आवाजावरून (बर्ड कॉल) त्यांच्या अस्तित्वाची खूणगाठ बांधता येते. अर्थातच, या कॉल्सना संकेतांची किनार असते. प्रियाराधनेचा कॉल, अन्य कारणासाठीचा कॉल त्यांचे कोड असतात म्हणा वा त्यांची स्वत:ची अशी भाषा म्हणा. उदा. मराठीत कवड्या नर्तक तर इंग्लिशमध्ये फ्लायकॅचर, या दोन्हीही उपाध्यांना न्याय देणारा पक्षी. त्याच्या हवेतल्या हवेत मारलेल्या गिरक्या, उड्या या पक्षीप्रेमींचं आकर्षण असतात. किडे पकडण्यासाठी त्याची ही कसरत सुरू असते. किडे पकडताना तो चक∽चक असा काहीसा कर्कश आवाज काढतो. परंतु विणीच्या हंगामात प्रियतमेला घातलेली साद मंजुळ आणि कर्णमधुर असते.
बुलबुल हा असाच पक्षी. शेत, बागबगीचे, परसातली झाडी असा कुठंही आढळतो. याला मधुर आवाजाची निसर्गदत्त देणगी आहे. तथापि हा पक्षी भांडखोरही समजला जातो. इतरांशी त्याची सतत भांडणं चालू असतात. गवयाचं पोर सुरात रडतं, असं म्हणतात. भांडतानादेखील हा पक्षी मधुर आवाजात भांडत असतो. हे काहीही असलं तरी हा पक्षी आनंदाचं प्रतीक मानला जातो. मधुर आवाजात ‘गा मेरे मन गा’ तो सतत गात असतो. अशा पक्ष्याची संगत कुणाला आवडणार नाही? गुलुगुलु गोष्टी करत मादीशी हितगुज करण्यात हा पटाईत. (भांडखोर नवऱ्यांनी त्याचा हा गुणही उचलावा.) त्याच्या गुलगुलीने मादी त्याच्यावर आशक होते. मग दोघांचं गुलुगुलु सुरू होतं. त्यावर आपण आशक होतो. जोडी जमते. बॉलीवूडच्या नायक-नायिकेसारखे शेत, बागा अशा रम्य स्थळी प्रणयक्रीडांना ऊत येतो. त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो. हॅपी एंडिंग!
बुलबुल एवढं नसलं तरी राखी टिटचं (कोल टिट) गाणंही श्रवणीय असतं. हाही बुलबुलसारखा आनंदी वृत्तीचा. व्हीच∽व्हीच आवाजात तो साद देतो, तेव्हा शीळ घालणाऱ्या रोडसाइड रोमिओची आठवण येते. तथापि कॉलपेक्षाही याचे नखरे विलोभनीय असतात. चिमणीएवढा छोटा असला तरी भलताच नखरेबाज. नखरे आणि गोड गाणं याद्वारा मादीला आकर्षित करतोच करतो. हुप्पीदेखील असाच नखरेबाज पक्षी. याची उडान तर मस्त लयदार. गळ्यावरचे भस्मासारखे पांढरे पट्टे आणि डोईवरचा जपानी पंख्यासारखा तुरा याच्या नखऱ्यात चार चांद लावतात. तुरा भलताच आकर्षक असतो. हुप∽हुप अशा आवाजाने मादीला साद देतो, म्हणून हुप्पी. हुप∽हुप हा केवळ कॉल नसतो. त्याला एक लय असते. ते एक गीतच असतं. हे गीत गाताना त्याचा गळा किंचितसा फुगतो. तरीदेखील मान खाली-वर करून ८-१० मिनिटं त्याचं गायन चाललेलंच असतं. पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी नर-मादी दोघंही घेतात. पिल्लांना धोक्याचा इशारा देताना दोघंही क्याव∽क्याव आवाजात ओरडतात.
बुलबुल आणि राखी टिट हे आकाराने छोटे पक्षी, तर धनेश उर्फ हॉर्नबिल हा आकाराने मोठा. एखाद्या झाडावर बसलेला धनेश आपल्या सहज दृष्टीस येतो. तथापि सहसा दाट झाडीतच वास्तव्य करतो. त्याचा किंचाळध्वनी क∽क∽क∽ई असा लांबलचक असतो. आपल्यालाच काय, या आवाजाने मादीलाही त्याच्या अस्तित्वाचा पत्ता लागतो. धनेशाचं सर्वच काही आगळंवेगळं असतं. घरटं आणि पुढील विणीचा कार्यक्रमही याला अपवाद नाही. झाडाच्या ढोलीत सुतार पक्ष्याने सोडून दिलेल्या घरट्याची हा थोडीफार डागडुजी करतो, की झालं याचं घरकुल तयार. चोचीने ढोली थोडीशी मोठी करतो (सुतार आकाराने त्याच्यापेक्षा लहान). मादी त्यात प्रवेशते. नर तिला चिखल, गवताच्या काड्या आदी गोष्टी आणून देतो. त्यात आपली विष्ठा मिसळून या प्लॅस्टरने मादी ती ढोली अगदी पॅकबंद करते. तिची चोच बाहेर येईल एवढीच फट म्हणा वा छिद्र म्हणा, उघडं ठेवलेलं असतं. आतमध्ये एक आई आपल्या पिल्लांसह राहते, हा संशयही कुणाला येत नाही. ढोलीचा रंग झाडाच्या बुंध्यासारखाच झालेला असतो. नर धनेश बोर, पिंपळ, वड, उंबर आदी झाडांची फळं आणि काही प्रकारचे कीटक या फटीतून मादीला पुरवतो. त्यावर तिचा आणि तिच्या पिल्लांचा उदरनिर्वाह होतो. नराला बाकी बरेच कष्ट पडतात. तो चांगलाच बारीक होतो.
बुलबुल हा गाणारा हिरो, तर भारद्वाज हा नाचणारा. पक्ष्यांतला शम्मी कपूर. हा पक्षीदेखील रानावनात, बागबगीचे, शेतजमिनीत विनासायास पाहायला मिळतो. हुप∽हुप अशा आवाजात नर मादीला साद देतो. मादी जवळ आली की पंख फुलवून शेपटी खाली वर करून आपला मानस प्रकट करतो. नंतर आपलं सारं शरीर एका लयीत हालवून नाच करू लागतो. ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा’ आपल्याला याद येते. बहुतेक पक्ष्यांत प्रियाराधनेच्या नाचाचा ठेका नराला बहाल करण्यात आलेला आहे. सिरकिर ककू उर्फ जंगली तोत्याची बात औरच. तोता और मैना की ‘अजीब दास्ताँ है ये’. पटलं की नर-मादी दोघं मिळून सुंदर नाच पेश करतात, जणू बॉलीवूड हीरो-हिरॉइन (दुसरी उपमा सुचत नाही). ‘तुझी माझी जमली जोडी’ हा संकेत देताना चोच उघडून वाकून एकमेकांना प्रतिसाद प्रकट करतात. त्याचबरोबर आपली शेपटी उंचावून ताठ करून पिसारा फुलवतात. श्वेत-कृष्ण पिसांचा मनमोहक फुलोरा त्यांच्या प्रेमाला बहार आणतो. हे करताना टक∽टक आवाजात त्यांच्या गुजगोष्टी चालू असतात. मग बॉलीवूड अवतरतं.
अनेक पक्ष्यांचे हे असे ‘बोल्ड सीन्स’. पण त्यात एखादा लाजाळू असायला काय हरकत आहे? हा मक्ता पिवळ्याधमक हळद्याला बहाल करण्यात आलाय. अगोदरच चणीने लहान. त्यात लाजाळू. झाडीत कुठे तरी लपून जाणारा. ‘छुपनेवाले सामने आ’ कितीही आराधना केली तरी दर्शन दुर्लभच, म्हणजे आपणाला. प्रियतमेसाठी मधुर शीळ. ‘अनुपमा’ चित्रपटातील लाजाळू नायिकेसारखा याचा सवाल, ‘कुछ दिलने कहा’; मग ‘कुछ दिलने सुना’ हा तिचा प्रतिसाद. पुढचा शो सुरू होतो. आपल्याला बाकी सुरेल शीळ हाच नजराणा असतो.
रानपक्ष्यांच्या आयुष्यरेषांची सांगता सुगरणाशिवाय होणे नाही....
eknathjosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...