आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोल सावरताना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेच्या सुरक्षित वातावरणातून कॉलेजलाइफमध्ये प्रवेश केलेले टीनएजर्स अनेक भावनिक-मानसिक आंदोलनांना सामोरे जात असतात. जीवनातं ‘गोल सेटिंग’ नसलं की अशा समस्या उद‌्भवतात. अशा वेळी पालकांनी त्यांना विश्वासात घ्यावं. आत्मभान जागं करून द्यावं. जेणेकरून टीनएजर्सचा हा प्रवास सुसह्य होईल.
आदेशला त्याचे आईवडील काउन्सेलिंगसाठी घेऊन आले तेव्हा १६ वर्षांचा तो मुलगा इतका हताश झाला होता की, निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याला इथे यायचं नव्हतं. शिकायचं नव्हतं. मला काहीच करायचं नाही, असं तो म्हणत होता. अकरावीचं वर्ष म्हणजे ‘रेस्ट इयर’ म्हणून तो स्वच्छंदी आणि मनमुक्त जगत होता. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच त्याची आणि रूपाची मैत्री झाली होती. त्याचं पटायचंही चांगलं. रूपाली करिअरच्या बाबतीत फोकस्ड होती. तिला आर्मीत डॉक्टर व्हायचं होतं. आदेशला जाणवायला लागलं होतं की, तो रूपाशिवाय राहू शकत नाही. बहुतेक रूपाच्या प्रेमात पडलोय, असं त्याला वाटायला लागलं. रूपाली हसली की, तिच्या एका तुटक्या दाताने आणखीच गोड दिसायची. सगळ्यांना मोह पडायचा. आदेशने तेवढं वर्ष तर संयमाने काढलं, पण बारावीत व्हॅलेंटाइन डेला तो तिला समुद्रकिनारी घेऊन गेला. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय, म्हणाला. वाळूवर बसताच तिचा हात हातात घेऊन त्यानं तिला प्रपोज केलं. प्रेम व्यक्त केलं. रूपाली पहिल्यांदा गांगरली. हात सोडवून घेत म्हणाली, ‘आदेश, तू माझा चांगला मित्र आहेस, पण तुझं प्रेम मी स्वीकारू शकत नाही. मी माझ्या करिअरबाबत फोकस्ड आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही. तू हे मनातून टाक. प्रेमबिम वेडेपणा असतो, मात्र मैत्री कायम राहील.’ रूपाला त्याने खूप समजावलं, पण ती ध्येयाबद्दल स्पष्ट होती. तिचा नकार आदेश पचवू शकला नाही.

जेव्हा असे टीनएजर्स काही अडचणीत अडकतात तेव्हा त्यांना वाटतं की, आता आयुष्यच संपलं. प्रेम, अभ्यास, मैत्री, पॉकेटमनी, करिअर, रॅगिंग अशी कोणतीही अडचण असली आणि काउन्सेलिंगला मुलं आली की जाणवतं, जीवन जगण्यासाठी जी कौशल्यं लागतात त्यामध्ये ही मुलं तयार नसतात. तेच आदेशच्या बाबतीत झालं होतं. आदेश एका सुरक्षित, उबदार वातावरणातून म्हणजे शाळा, घर या जगातून स्वतंत्र जगात आला होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करताना परिस्थितीशी जुळवून घेणं त्याला कठीण जात होतं. आयुष्यात नेमकं काय हवंय, काय करायचं, तिथे पोहोचण्यासाठी ज्या कौशल्यांची गरज असते त्यापैकी कोणती कौशल्यं आपल्याकडे आहेत, प्लस-मायनस पॉइंट‌्स याबाबत विचार करणं घडलेलं नव्हतं. नकार पचवता येत नव्हता. याचं कारण जसं आदेशनं शोधलं नाही, तसंच बऱ्याच मुलांचं होतं. काय हवंय, काय करायचं, ही ध्येयनिश्चिती झालेली नसल्याने करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं, काय प्रयत्न करायला हवेत, नियोजन कसं करावं, याचा गांभीर्याने विचार केला जात नाही.

आधी कुठे जायचं, ते ठरवावं लागतं तेव्हा प्रवास करण्याची तयारी आपण करतो. काय करायचं ठरलं की काय करायचं नाही, हे मनात स्पष्ट होतं. मग वेगवेगळे मोहाचे क्षण आले तरी त्यांना बळी पडणं होत नाही. जीवनात समर्थपणे उभं राहता येतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली एक भूमिका असते. आदेश आणि रूपाली विद्यार्थ्याच्या भूमिकेत होते. आदेशचं गोलसेटिंग नसल्याने तो गोंधळला आणि डिप्रेशनमध्ये गेला. रूपालीच्या विचारात स्पष्टता होती, म्हणून तिने निवडलेल्या मार्गावर पाय घट्ट रोवून उभं राहणं पसंत केलं. पुस्तकी शिक्षण घेऊन डिग्री घेणं हे जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच लाइफ स्किल्स आत्मसात करण्यालाही असतं. मी कोण आहे, म्हणजेच माझ्या क्षमता कोणत्या आहेत आणि किती प्रमाणात मी त्यांचा उपयोग करू शकेन, याचा विचार करणं ही जीवनकौशल्यांची सुरुवात आहे. स्वत:ची जाणीव अर्थात सेल्फ अवेअरनेस असला तर अवघड वयातील प्रेमाचे, मैत्रीचे, अभ्यासातील अपयशाचे, लैंगिक बाबतीतले, पैशाअभावी निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचे, पीअर प्रेशरचे, त्यातून चुकीच्या मार्गाला जाण्याचे, असूया, ईर्षा, राग यातून मारामारीचे, स्वत:बद्दल न्यूनगंडाची भावना असल्याने असुरक्षित वाटण्याचे हे जे प्रश्न आहेत ते निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि निर्माण झालेच तर त्यांना टक्कर देण्याचं सामर्थ्य निर्माण होतं.

मुलांचं समुपदेशन करताना मुलांना सर्वप्रथम जाणीव द्यावी लागते की, प्रथम याचा विचार करू या की, तुम्ही कोण आहात आणि जे काही करत आहात त्यासाठी तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमता कोणत्या आणि किती आहेत. मुलांना हे समजायला लागलं की, त्यांचा विचार त्या पद्धतीने केला जातो आणि मग आत्मविश्वासाने, स्पष्ट विचारांनी मुले पुढची मार्गक्रमणा करू शकतात.

आपल्या मुलांमध्ये ‘स्व’ची जाणीव निर्माण करायची असेल तर आईवडिलांनी संयम दाखवायला हवा. मुलांना त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून द्यायला हवी. जसं त्यांच्यातील प्रतिभा ओळखायला पालकांनी मुलांना मदत करावी, तसं त्यांच्यातल्या उणिवा, त्रुटी याही सौम्य भाषेत सांगाव्या. त्या कमी करण्यासाठी त्यांना आधार द्यावा. त्यांना स्वत:ला ओळखण्याची, स्वत:चे मूल्यमापन करण्याची आणि योग्य मार्गाने जाण्याची संधी द्यावी. हे सारं करताना हस्तक्षेप न करता सोबत असावं.

काही मुलांमध्ये न्यूनगंड असतो, स्वत:बद्दल आत्मविश्वास नसतो की, मी सुंदर नाही/ मी असा नाही/ मी तसा नाही वगैरे. अशा विचारांमध्ये मुलं गुंतलेली असतात. याच्या बरोबर उलटी म्हणजे अतिआत्मविश्वासू मुलंही असतात. दोन्ही परिस्थितीत असं होतं की, मुलगा किंवा मुलगी प्रेमात गुंतली की, समस्या निर्माण होतात. एखाद्या मुलीशी एखादा मुलगा खूप काळजीने बोलत असेल, प्रेमाने वागत असेल तर त्यांना ते आकर्षण इतकं असतं की, जणू काही हेच प्रेम आहे, असं वाटतं. स्वत:बद्दलची पुरेशी जाणीव नसल्याने ते भरकटत जातात. हळूहळू भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं हे आकर्षण इतकं वाढत जातं की, त्यासाठी ही मुलं सर्वस्व द्यायला तयार होतात. कारण ही स्वप्नाळू, प्रेमाची अवस्था असते.

या वयातील मुलांशी वागताना त्यांना उपदेश करण्यापेक्षा किंवा त्यांची अक्कल काढण्यापेक्षा यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी त्यांना मदत करायला हवी. कारण या वयात मुलं धाडस करतात. परिणामांचा विचार करत नाहीत. म्हणूनच आदेशबाबत जे घडलं तेव्हा त्याला पालकांच्या भावनिक आधाराची गरज होती.

“मला कळतंच रूपाने तुला नाही म्हटलं, याचा तुला खूप त्रास होतोय ना. आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. तुला पहिल्या प्रेमात असा अनुभव आला. आय रिसपेक्ट युवर इमोशन्स,’ असं नुसतं मी म्हटलं तरी आदेश खूप शांत झाला. आदेशच्या भावना खऱ्या होत्या. त्या त्याने योग्य पद्धतीने व्यक्तही केल्या होत्या. मात्र त्या व्यक्त करण्याचं त्याचं वय बरंच लहान होतं. आदेशला त्याची या वयातली भूमिका पटली. खरं तर ती त्याने समजून घेतली. रूपाचं नाही म्हणणं या गोष्टीशी जुळवून घेणं सोप्पं नव्हतं, तरी ते आता त्याच्यासाठी अशक्य राहिलं नाही.

मला शिकायचं नाही, काही करायचं नाही, असं म्हणणारा आदेश
अडचणीला सामोरा गेला. स्वत:शी त्याची नव्याने ओळख झाली. जोपर्यंत आपण स्वत: बदलणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. या पद्धतीने तो विचार करायला लागला. झालेल्या प्रसंगामुळे काही काळ आयुष्य थांबून गेलं होतं. पण त्या वळणावर तो थांबला. विचार केला. आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा पाहिली. खरं तर त्याने स्वत:ला गुगल केलं. कुठेकुठे चुकलं ते तपासून शोधून काढलं. अवघड वयातल्या नाजूक वळणावर पडतापडता त्याने तोल सावरला आणि हा तोल सावरताना आईवडिलांनी त्याच्या भावनांची कदरही केली. त्याच वेळी त्याला जबाबदारीची जाणीव दिली. समुपदेशनातून त्याला स्व-ओळख झाली. आत्मभान आलं. आपण आईवडिलांना हवे आहोत, त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, आपला स्वत:वर विश्वास आहे, या भावनांमधून परिपक्व युवकाकडे त्याचा प्रवास नुकताच सुरू झालाय.
ganooswati@gmail.com
बातम्या आणखी आहेत...