आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता पुस्तक नात्याच्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय कवींनी पुस्तकांचे श्रेष्ठत्व सांगणाऱ्या कित्येक कविता लिहिल्या आहेत. सफदर हाश्मी, गुलजार, सतीश काळसेकर, किशोर पाठक या आणि अशा मान्यवरांच्या पुस्तकांवरील कविता मराठी वाचकांना ज्ञात आहेत. हिंदी, पंजाबी, नेपाळी भाषेतील पुस्तकांविषयीच्या या काही कविता पुस्तकांविषयीचे आपले आकलन विस्तारण्यास साहाय्यभूत ठराव्या अशा आहेत.

पुस्तकांमुळेच मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण झालं. विकासाच्या एक टप्प्यावर हाती लागलेल्या पुस्तकांनी मानवी इतिहास, संस्कृती आणि ज्ञान यांची जोपासना केली. पुस्तकांमधूनच माणसाचे माणूसपण आकाराला आले.

त्यामुळे अमानवी प्रवृत्तींना पुस्तके नेहमीच शत्रू वाटत आली आहेत. जगाचा भूतकाळ तपासला तर युद्धखोर लोकांच्या निशाण्यावर प्राचीन काळापासून पुस्तके राहात आली आहेत. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या, पुस्तकांची जोपासणा करणाऱ्या लोकांना संपवण्याचे प्रयत्न होत राहिले आहेत. शत्रूचा नायनाट करताना त्याने निर्माण केलेल्या पुस्तकांना नष्ट करण्याकडे अशा प्रवृत्तींचा कल जगभर दिसतो आहे. आपल्याकडची नालंदा, तक्षशिला ही विद्यापीठे आणि त्यांची समृद्ध वैभवशाली ग्रंथालये याच युद्धखोर प्रवृत्तींनी नष्ट केली, हा इतिहास आहे.

अर्थात पुस्तकांना नष्ट करणारे हात जसे आजुबाजूला आहेत, तद्वतच पुस्तकांचे रक्षण करणारे लोकही आपल्या सभोवताली आहेत. प्राणांवर उदार होऊन त्यांनी पुस्तके जतन केली आहेत. जोपासली आहेत. पुस्तकांच्या जोपासनेतून संपन्न वारसा आणि उज्ज्वल भविष्य यांचीच जोपासना आपण करत असतो.

भारतीय कवींनी पुस्तकांचे श्रेष्ठत्व सांगणाऱ्या कित्येक कविता लिहिल्या आहेत. सफदर हाश्मी, गुलजार, सतीश काळसेकर, किशोर पाठक अशा आणि अशा मान्यवरांच्या पुस्तकांवरील कविता मराठी वाचकांना ज्ञात आहेत. हिंदी, पंजाबी, नेपाळी भाषेतील पुस्तकांविषयीच्या या काही कविता पुस्तकांविषयीचे आपले आकलन विस्तारण्यास साहाय्यभूत ठराव्या अशा आहेत.

पुस्तक आणि सुरी

नरेश जैन (हिंदी)
एक पुस्तक
कसं रुपांतरीत होतं सुरीमध्ये
आणि उतरत जातं
खोल खोल आत, आतड्यात
एक सुरी
कशी परावर्तीत होते पुस्तकात
आणि उतरत जाते
मेंदूच्या नसानसांत
कोणतं पुस्तक
सुरीच्या विरोधात
आपली पानं फडकवतं?
कोणती सुरी
पुस्तकाची पानं फाडण्यासाठी
उतावीळ होते?
कोण सांगणार
हे सगळं तुला?
कोण वाचवणार तुला
या पुस्तकापासून
त्या सुरीपासून?
कुणापासून शिकणार आहेस तू
पुस्तकापासून की सुरीपासून?

जुनी पुस्तकं
मनोहर बंधोपाध्याय (हिंदी)
जुनी पुस्तकं ज्यांना लपवत आलो
मित्रांपासून, नातेवाइकांपासून
आता खूपच जुनी झाली आहेत
पानांचे कोपरे मुडपले आहेत
काही पानं फाटली आहेत
शिलाई उसवली आहे
जुन्या नात्यांसारखीच
त्यांच्यावर नजर पडताच
जुन्या दिवसांच्या आठवणी
ताज्या होतात
प्रत्येक पुस्तकाशी जोडलेल्या आहेत
काही घटना, काही मुलाखती, काही हळवे क्षण
मी त्यांच्यावर साचलेली धूळ झटकतो
खालून वरुन साफ करुन पुन्हा जागेवर ठेवतो
वाचण्यासाठी वेळ मिळाला तर पुन्हा हाताळण्यासाठी
पण ते मला एकटक बघत राहतात पाणावल्या डोळ्यांनी
आणि मी त्यांना विश्वास देत राहतो
कुशीत घेण्याचा विश्वास, वाचण्याचा विश्वास.
आणि पुन्हा साचत जाते धूळ, इच्छांवर धावपळीची
तिथेच पडलेली आहेत पुस्तके, जिथे होती
मैत्री सांभाळत, माझ्याकडे एकटक पाहात.

पोथीच्या बाहेर
कुबेर दत्त (हिंदी)
पोथीत काय शोधत आहेस रामदास?
तिथे तर वापरुन गुळगुळीत झालेल्या शब्दांची प्रेतं आहेत
डीप फ्रिजरमध्ये ठेवलेली
शोधायचं असेल काही
तर वाळवीच्या आत
जळतेय जी आग
तिच्या इंधनात जिवंत
शीतयुद्धाच्या आघाडीवर शोध घे त्याचा
जे पोथीत नाहीय.


पुस्तक जाळणारे
जीवन नामदुंग (नेपाळी)
पुस्तक जाळणाऱ्यांची
खूप भीती वाटते मला
पुस्तकाच्या नावाखाली ते
आपलाच इतिहास जाळत असतात
आपली माती आणि आपलं सत्य जाळत असतात
विश्वयुद्धाची घोषणा करणाऱ्यांची मला भीती वाटत नाही
विमान हल्ले करणाऱ्यांशी मला घेणे देणे नाही
पण पुस्तक जाळणारांना खूप भिऊन असतो मी
पुस्तक जाळून थंडी पळवून लावणारे आजूबाजूलाच आहेत माझ्या
माझ्या शेजारी राहतात कागदाच्या नावेवर स्वार होऊन
आगीचा समुद्र ओलांडणारे लोक
भूसुरुंग पेरणारांची मला भीती वाटत नाही
काटेरी मुकुट घालणारांची भीती वाटत नाही
टोकदार कुंपण बनवणारांविषयी माझी तक्रार नाही
पण पुस्तक जाळणारांबद्दल मला काळजी वाटते
पुस्तकांच्या नावाखाली
ते एक देश जाळत असतात
सभ्यतेचे संस्कृतीचे शिल्लक अवशेष जाळत असतात.

पूर्वजांची कविता
भुपिंदरकौर प्रीत (पंजाबी)
पिवळ्या झालेल्या पानांच्या पुस्तकाला
जेव्हाही हात लावायचे
फडफडू लागत त्याची पानं
जशी झडू लागतात पानगळीत वृक्षांची पानं
त्या पुस्तकांची पिवळी पानं
हळूवार उलटवून
मी माझ्या आत रुजवून घेतले
पूर्वजांच्या कवितेचे बियाणे
चंद्र तारे
सूर्य वारे
निसर्गाची आरती करणारे शब्द
निर्मळ निरवैर
शब्द शब्द उतरुन घेतला कवितेचा
पुन्हा नव्या पानांवर
अशीच तर पुढे जात आहे कविता
पानं फडफडतात
पण कविता कधीच मरत नाही.
वडिलांचा शब्दकोश
मनोज चौहान (हिंदी)
कपड्यात गुंडाळलेला
वडिलांनी दिलेला शब्दकोश
आता झाला आहे जुना
त्याचंही वय आता होत आलं आहे
वडिलांच्या चेहऱ्यावर वाढत जात आहेत सुरुकुत्या
पण उभे आहेत ठामपणे दोघेही आपापल्या जागेवर
थबकतो जेव्हा कधी मी
तेव्हा उपयोगी पडतो शब्दकोश आजही
उलटवत जातो पानं
स्पर्श होताच बोटांच्या पेरांना जाणवतं
वडील सोबत आहेत माझ्या
बोट धरुन वडील जणू समजावून सांगताहेत
जीवनाचा अर्थ
वाट दाखवताहेत उजेडाची
जगाच्या कृतघ्न खेळीत सतावले गेलेले स्वाभिमानी वडील
होत गेले टणक बाहेरुन
ते लपवत राहिले नेहमीच
त्यांच्या आतील मधाळपणा
आता ते चिंता करत नाहीत
निश्चिंत असतात आम्हा मुलांबद्दल
पण तरीही
आम्ही कितीही सांगितलं तरी
निघून जातात कामावर
घरी रिकामं बसणं मान्यच नाही त्यांना
त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते रिकामपणानं
वडील दूर खेड्यात राहतात आजही
पण त्यांनी दिलेला शब्दकोश
शिकवत राहतो मला
आणि देत राहतो
वडील माझ्यासोबत असल्याचा विश्वास

पुस्तके
शैलेंद्र कुमार त्रिपाठी (हिंदी)
कधी आई
कधी ताई
आणि कधी कधी सईसुद्धा
आठवते पुस्तकातून
बाबा दिसतात
आजोबांसोबत
भाऊ दिसतो
माझ्या लेकीला खांद्यावर घेऊन
पुस्तकातच
एका परिपूर्ण जाणिवेचे नाव आहे पुस्तक
एका सुखी संपन्न परिवाराचं नाव आहे पुस्तक
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी
ध्येयाच्या जपणुकीसाठी
मानवाच्या संरक्षणासाठी
खूपच गरजेची आहे
पुस्तकांची जोपासना
खूपच गरजेची.

प्रेम आणि पुस्तक
सुतिंदरसिंह नूर (पंजाबी)
प्रेम करणं
आणि पुस्तक वाचणं
यात असत नाही फारसं अंतर
काही पुस्तकांचं आपण
केवळ मुखपृष्ठच पाहतो
कंटाळताच
पानं उलटवतो, ठेवून देतो
काही पुस्तकं
ठेवतो आपण उशीखाली
केव्हाही उघडो डोळा
आपण पुढे वाचू लागतो
काही पुस्तकांचा
शब्द न‌‌‌ शब्द वाचतो
त्यांच्यात विसरून जातो स्वतःला
पुन्हा पुन्हा वाचत जातो
आणि आत्म्यात जतन करतो
काही पुस्तकांवर करतो
रंगीबेरंगी खुणा
प्रत्येक ओळीवर विचार करतो
आणि काही पुस्तकांच्या नाजुक पानांवर
साधी खूण करायलाही हात थरथरतो
प्रेम करणं आणि पुस्तक वाचणं
यात असत नाही जरासंही अंतर

एक जुनाट पुस्तक
शिव कुमार बटालवी (पंजाबी)
मित्रा, तुझं पुस्तक वाचल्यानंतर
किती दिवस उलटले
मी झोपू शकलो नाही
माझ्यासाठी तुझं पुस्तक जुनं झालं आहे
त्याच्या शब्दांचे हात थरथरतात
त्याच्या ओळींना स्मृतिभ्रंश झालाय
ही जळून विझलेल्या अर्थांची आग आहे
तुझं पुस्तक, माझ्यासाठी चितेची राख आहे
मी जेव्हा केव्हा, धापा टाकणारे शब्द वाचतो
आणि सुरुकुत्या पडलेल्या ओळींवर नजर फिरवतो
तेव्हा घरात चितेची राख पाहून भीती वाटते मला
आणि विझून गेलेल्या अर्थाच्या अग्नीत मी जळत राहतो
जेव्हा माझ्या घरात हे जुनाट पुस्तक खोकलतं
दमा झाल्याप्रमाणं श्वास घेतं
अर्थांचा घोट मागतं
तेव्हा माझ्या झोपेच्या उशाला रात्र थरथरत राहते
माझ्या मित्रा
म्हणूनच मी परत करत आहे हे जुनाट पुस्तक
जर जिवंत भेटले तर टाक पत्र
जर मरुन गेले मध्येच रस्त्यात
तर गरज नाहीय तुझ्या चिठ्ठीची
तुझ्या शहरात स्मशानांची कमतरता नाही
माझ्या दोस्ता!
तुझं पुस्तक वाचलं,
त्याला किती वर्षे लोटली
मी झोपू शकलो नाही

कवितांचा अनुवाद- डॉ. पृथ्वीराज तौर
संपर्क - ७५८८४१२१५३
drprithvirajtaur@gmail.com
बातम्या आणखी आहेत...