आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक देवर्षी: डॉ. आशुतोष कोतवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिग्ज बोसॉन या मूलकणाशिवाय वस्तुमाननिर्मिती होऊ शकत नाही. या मूलकणाला ‘देवकण’ असे संबोधण्यात आले. हिग्जची कल्पना केल्याशिवाय इतर मूलकणांबाबत माहिती देता येणारी, ही डॉ. आशुतोष कोतवाल यांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आहे.

पुराणकाळामध्ये विश्वोत्पत्तीचे रहस्य काही भारतीय ऋषींना ज्ञात होते, असा समज आहे. ऋग्वेदामध्ये या रहस्यांचा तपशील पाहायला मिळतो. भारतीय ऋषींनी, आधुनिक भारतीय संशोधक व शास्त्रज्ञांनी मूलभूत असे संशोधन करून जगाला किंबहुना विश्वनिर्मितीला मोठी देणगी दिली आहे. या गौरवशाली भारतीय संशोधक व्यक्तींच्या यादीत जुलै २०१२मध्ये आणखी एका वैज्ञानिकाचे नाव समाविष्ट झाले. विश्वनिर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना सूक्ष्म मूलकण ‘हिग्ज बोसॉन’चा शोध आणि त्याच्या गुणधर्माचा व वस्तुमानाचा अचूक अंदाज बांधणाऱ्या या आधुनिक देवऋषीचे नाव आहे, आशुतोष कोतवाल. सातत्यपूर्ण प्रयोग, अभ्यास आणि सूक्ष्म गुणवत्तेच्या भगीरथ प्रयत्नानंतर त्यांना हे यश प्राप्त झाले. गर्वाने प्रत्येक भारतीयाची मान त्यामुळे उंचावली. या शास्त्रज्ञाचे जीवनचरित्र तरुण पिढीला, संशोधकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावे, असेच आहे. शिवाय, ‘हिग्ज बोसॉन’चे नेमके रूप काय? याचा तपशीलवार अभ्यासही उत्कंठावर्धक आहे. या दोन्ही उद्देशांना समोर ठेवून ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे मूलभूत वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांचे चरित्र त्यांची आई माणिक कोतवाल यांनी लिहिले आहे. विश्वनिर्मितीची घटना अवकाश आणि काळ यांचा आधुनिक विज्ञानाला अभिप्रेत असलेला संदर्भ आणि संबंध भारतीय पौराणिक संशोधन व्यक्त करत नाही. विश्वाची निर्मिती एका सुक्ष्मातिसूक्ष्म बिंदूमधून होऊन विस्तारत गेली. यासाठी आधुनिक जगभराच्या संशोधकांनी एका महास्फोटाची कल्पना केली, त्याला बिगबँग असे नाव देण्यात आले. आधुनिक विज्ञान शाखेने लाखो वर्षांपूर्वी बिगबँग मार्फत विश्वनिर्मिती झाली, असे प्रमाणित केले.

विश्वनिर्मितीच्या पूर्वी एका आमटीच्या वाडग्याच्या (Soup Bowl) रूपात क्वाकर्स, लेव्हॉन्स हे ठोकळे आणि ग्लूऑन्स फोटॉन्स, डब्लू व झी हे बोसॉन्स मूलकण वेगवेगळे तरंगत होते. बिगबँगनंतर वेगवेगळी असलेली आंदोलने एकत्र आली आणि भार (ऊर्जा) आणि वस्तुमानरूपी विश्व आकाराला आले, असे मानण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विश्वनिर्मितीच्या मूलकणांचा म्हणजेच डब्लू व सी बोझॉनचा शोध भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांनी लावला होता. जीवशास्त्रामध्ये डी.एन.ए.ला जे महत्त्व प्राप्त आहे, तेच महत्त्व विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत हिग्ज बोझॉन या मूलकणाचे आहे. हिग्ज बोसॉन या मूलकणाशिवाय वस्तुमाननिर्मिती होऊ शकत नाही. या मूलकणाशिवाय विश्व, पृथ्वी व मानव यांचा इतिहास निर्माण होऊ शकला नसता. त्यामुळे या मूलकणाला ‘देवकण’ (The Good Particle) असे संबोधण्यात आले. हिग्जची कल्पना केल्याशिवाय इतर मूलकणांचा खुलासा करता येणार नाही, ही डॉ. आशुतोष यांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आहे. हिग्जचे अस्तित्व मान्य करणारे प्रमाण प्रारूप सिद्धांत (SMT) पूर्वीच प्रसिद्ध झाले होते. हिग्जचे अस्तित्व त्यानंतर मान्य झाले.

सर्न या स्वित्झर्लंड येथील व फर्मी या अमेरिकास्थित प्रयोगशाळांमध्ये प्रोटोन्स व प्रतिप्रोटोन्सच्या टकरी घडवून आणून विश्वनिर्मितीच्या महास्फोटाची सूक्ष्म प्रमाणात प्रतिकृती घडवणे हे मोठे आव्हान होते. त्यातच या प्रयोगामधून कृष्णविवर निर्माण होऊन विश्व नष्ट होण्याची भीती काही वैज्ञानिक व्यक्त करत होते. या प्रतिगामी प्रचाराला तोंड देत, महाकाय कोलायडरच्या साहाय्याने प्रोटोन्सच्या टकरी घडवून आणण्यात आल्या. डॉ. आशुतोष व त्यांच्या वैज्ञानिक गटाने अहोरात्र प्रयत्न करून हिग्ज बोसॉन निश्चितता केली. डब्लू बोसॉनच्या अगदी अचूक वस्तुमानासाठी डॉ. आशुतोष यांनी अनेक गृहीतके मांडत 0.02% हे अचूक वस्तुमान निश्चित केले. डब्लू बोसॉनचे अचूक वस्तुमान, 80,387 Gev+17Mev/c2 इतके आहे. डब्लू बोसॉनच्या वस्तुमानाच्या अचूकतेमुळे हिग्ज बोसॉनचा ठावठिकाणा निश्चित करता येऊ शकला. हे क्लिष्ट वैज्ञानिक भाषेतले संशोधन माणिक कोतवाल यांनी साध्या सोप्या भाषेमध्ये वर्णन केले आहे. फेब्रुवारी २०१२मध्ये हिग्जचा शोध निश्चित झाला. सर्न, फर्मी या प्रयोगशाळा व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांनी त्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच ४ जुलै २०१२ रोजी केली. डॉ. आशुतोष कोतवाल हे या शोधाचे जनक ठरले.

अतिशय विस्मयकारी, रोमांचक अशा या शोधाचे टप्पे ‘पुत्र व्हावा ऐसा’ या पुस्तकात वर्णन केले आहेत. अर्थात, केवळ संशोधन जगासमोर आणणे, हाच एकमेव उद्देश या पुस्तकाचा नाही. शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुस्तकात उलगडून दाखवले आहे. त्यांची जडणघडण, त्यांचे मनोव्यापार यांचे वर्णन अनेक प्रकरणांमध्ये विभागले आहे. देदीप्यमान शालेय प्रगतीनंतर, पदवी व डॉक्टरेट शिक्षण डॉ. आशुतोष यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण केले. यु पेन येथे पदवीसाठी दाखल झाल्यावर शिष्यवृत्ती दैनंदिन खर्च तेथील विद्यापीठाने मान्य केले. आशुतोषसाठी त्यांच्याच काही नियमांना बगल देत या विद्यापीठाने सन्मानाने आशुतोष यांना शिक्षणासाठी आमंत्रित केले. समर पे रोलसाठी त्यांनी सर्न लॅबमध्ये पगारी काम केले. पुढे या लॅबचे त्यांच्याशी नाते वृद्धिंगत होत गेले, ते त्यांच्या मूलगामी संशोधनापर्यंत टिकून राहिले. संशोधनादरम्यान करोडो रुपयांचे शक्तिशाली कोलायडर सर्न व फर्मी लॅबने
डॉ. आशुतोष यांना उपलब्ध करून दिले, हीदेखील एक गौरवाची व विश्वासाची बाब आहे.
असामान्य बुद्धिमत्ता, चिकाटी यासोबतच मानवी संबंध जपणे हे जिकिरीचे काम त्यांना संशोधनाच्या काळात करावे लागले. त्यांच्या वैज्ञानिक गटातील शास्त्रज्ञांकडून चिकाटीची कामे करवून घेताना त्यांच्या समायोजन कौशल्याचे दर्शन घडते. कोणतेही यश हे एकट्याचे असू नये, याची पूर्व जाणीव ठेवून आपल्या या गटातून मनाजोगे संशोधन त्यांनी घडवून आणले. ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे डॉ. आशुतोष कोतवाल या वैज्ञानिक देवऋषीचे चरित्र त्यांची आई माणिक कोतवाल यांच्या लेखणीतून प्रसिद्ध झाले. मात्र त्यांच्या जीवनाचा पट उघडून दाखवताना त्यांचं संशोधन आणि कर्तृत्वाची ओळख करून देताना आपले आई म्हणून असलेले अस्तित्व त्यांनी आंकुचित करून घेतले. केवळ एक सूक्ष्म निरीक्षक या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून डॉ. आशुतोष यांचे व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर मांडले आहे.

मानवी बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात, विविध परिस्थितीमध्ये, अनेक व्यक्तींसोबत येणारा संबंध, आणि त्यांना ती व्यक्ती कशा प्रकारे हाताळते, यामुळे कर्तृत्वाची ओळख निर्माण करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. बुद्धी आणि समायोजन हे दोन गुण व्यक्तीला ध्येयाप्रत पोहोचवतात. डॉ. आशुतोष यांच्या या गुणांचा मागोवाही या पुस्तकातून मिळतो आणि हा मागोवा अनेकांना मार्गदर्शक ठरावा.

(jyotijayantk@gmail.com)

‘पुत्र व्हावा ऐसा’
लेखिका : माणिक कोतवाल
प्रकाशक : राजहंस, पुणे
पृष्ठे : २९०
किंमत : ~ ३००/-
बातम्या आणखी आहेत...