आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारची कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला माफ कर, मी सांगतोय तुझी गोष्ट, तुझ्या परवानगीशिवाय. असल्या चोऱ्या फार बेमालूम करतो आम्ही. तुझी गोष्ट मी सांगितली नाही तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. किती तहानले उद्या थांबतील या पाणवठ्यावर! नाव गाव घेणार नाही मी. त्यात काय असतं गं? गोष्ट अस्सल असावी लागते आणि इथं तर दिवसरात्र पाठलाग करत्येय तुझी गोष्ट...

बयो, खरं तर तुला तुझी ही कहाणी कुणालाच सांगायची नाहीय्ये. का सांगायची नाहीय्ये, असा प्रश्न विचारण्याचा मला अधिकार नाही, मला ठावं आहे, बयो. आमच्या दुष्काळी जगण्यात आम्ही एवढा जिवंत झरा नाही गं पाह्यला..! आमचे सारे झरे बुजत चालले असताना मला हा झरा दिसला तुझ्या बदनाम वस्तीतून वाहताना. मला काय वाटलं, शब्दांत सांगूच शकत नाही ग मी! पण मला माफ कर, मी सांगतोय तुझी गोष्ट, तुझ्या परवानगीशिवाय. असल्या चोऱ्या फार बेमालूम करतो आम्ही. तुझी गोष्ट मी सांगितली नाही तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. किती तहानले उद्या थांबतील या पाणवठ्यावर! नाव गाव घेणार नाही मी. त्यात काय असतं गं? गोष्ट अस्सल असावी लागते आणि इथं तर दिवसरात्र पाठलाग करत्येय तुझी गोष्ट.
पंचवीसेक वर्षं झाली असतील नाही का गं? खरं तर, केवळ त्यालाच माहीत तो का यायचा तुझ्या त्या बदनाम वस्तीत! कितीतरी आठवड्यांपासून तो त्या वस्तीत चकरा मारायचा.

संध्याकाळच्या वेळी तरण्या पोरी गजरा माळून, सगळा साजशृंगार करून रस्त्यात उभ्या असायच्या, गिऱ्हाइकाच्या शोधात आणि हा प्रत्येक चेहरा न्याहाळत इकडून तिकडं फिरायचा आणि तसाच निघून जायचा. बयो, त्याचं काय हरवलं होतं, ते तो इथं शोधायला येत होता. तुझ्या वस्तीत तर ‘पैका फेको, तमाशा देखो’ असा रोखठोक मामला. असं काय होतं, जे त्याला पलीकडच्या सभ्य वस्तीत गवसलं नव्हतं, ते इथं मिळणार होतं. पण बयो, इथं तू होतीस. या नरकात जगतानाही तुझ्या चेहऱ्यावरला निरागसपणा हरवला नव्हता. लहान मुलाच्या खेळकरपणानं तू हुंदडत राहायचीस त्या सर्वस्वाच्या बाजारातही. तुझं षोडशवर्षीय नवथर तारुण्य किती जणांनी, किती प्रकारे कुस्करून टाकलं होतं या बाजारात. पण का कोण जाणे, तरीही तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळं सौंदर्य होतं, आजही आहे. तशी तू रूढार्थानं सुंदर नाहीस; पण तुझ्या डोळ्यांत, तुझ्या चेहऱ्यात एक आंतरिक हाक आहे गं ..! त्याला ती जाणवली असली पाहिजे, म्हणूनच मागच्या कित्येक आठवड्यांपासून नुसत्याच चकरा मारणाऱ्या त्यानं धीर करून तुला खुणावलं. गिऱ्हाइकाच्या शरीराचे चोचले पुरवायचे, त्याला हवं तसं खेळू द्यायचं आपल्या शरीराशी, हा तुझ्या वस्तीचा रिवाज. पण हा खोलीत आला आणि त्यानं तुला “बस इथं” असं म्हणत पलंगाच्या एका कोपऱ्याला बसवलं आणि स्वतः तुझ्यासमोर बसला. तू क्षणभर घाबरलीस, हा विकृतबिकृत तर नाही ना? काय आहे याच्या मनात? पण मग त्यानं कसली तरी वही काढली आणि काहीही न बोलता तो वाचू लागला. ते इंग्रजी होतं, तुला काहीच कळत नव्हतं. तू कधी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतंस..! तो नाटकातल्या एखाद्या पात्रासारखा, स्वगतात रममाण होता.

तू त्याला थांबवायचा प्रयत्न केलास, पण त्यानं तुलाच थांबवलं आणि तो वाचत राहिला. त्याचा आवाज खालीवर होई. मध्येच त्याचा आवाज टिपेला जाई. त्यातला राग भाषा ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचत असे. कधी त्याचा स्वर हळवा होई. त्याचं वाचून झालं आणि तो तुझे आभार मानून खोलीतून बाहेर पडला. बयो, तुला हसू आलं असेल ना त्या वेळी, ज्याच्याकरता लोक इथं येतात त्यातलं काहीही न करता तो आला तसा निघून गेला. असे पैसे मिळाले तर बरंचंय की..!
तुला वाटलं, अशीही वेडी माणसं असतात आणि तू विसरून गेलीस. पण पुढच्या शुक्रवारी तो पुन्हा आला. पुन्हा तेच..! आणि मग तो दर शुक्रवारी येतच राहिला. तो शरीर मागत नव्हता, तो काहीच मागत नव्हता. त्याला त्याचं आतलं ऐकायला कुणीतरी हवं होतं. असे एक दोन महिने गेले. दर शुक्रवारी तोच प्रकार. तुझ्या कोठेवालीच्या, मालकिणीच्याही लक्षात हा प्रकार आला. एके शुक्रवारी तिनं मुद्दाम तू नाहीस, बाहेर गेली आहेस, असं सांगितलं त्याला आणि दुसरी देखणी पोरगी पुढं केली. पण तो बधला नाही. तो तुझी वाट पाहात थांबून राहिला. त्याला तूच हवी होतीस, बयो. शब्दांवाचून शब्दांपलीकडलं असं काय झिरपत जातं गं हृदयात...! त्याचं येणं चालू राहिलं. तुला तो एक्स्ट्रा पैसे तर देत नाही ना, म्हणून मालकिणीनं कितीदा तरी तुझी झडती घेतली. कोठेवालीनं या वेड्या गिऱ्हाइकाला पाहून तुझा रेट वाढवला, पण तरीही त्याला तुझ्याकडेच यायचं होतं. मग एके दिवशी तूच धाडस करून त्याला विचारलंस, “तुम्ही दर आठवड्याला येता. काहीबाही वाचता… मला त्यातलं काहीच कळत नाही. तुमची अडचण काय आहे? काय त्रास आहे तुम्हाला?”

“हे बघ, मला प्रश्न विचारू नकोस. फक्त ऐकून घे.”
“तुम्ही म्हणताय तर मी काही विचारणार नाही; पण एक तरी करा, हे समदं मला कळेल अशा भाषेत तरी वाचा. आपल्या भाषेत बोला.”
मग तो मराठीत वाचू लागला. वाचता वाचता चिडायचा, शिव्यादेखील द्यायचा आणि तुला त्याची दुखरी नस लक्षात येऊ लागली. तो जे वाचायचा ती त्याची डायरी होती. रोज त्याच्या आयुष्यात जे घडतं आहे, ते तो सांगत होता.

तो दूर मराठवाड्याकडला होता. इंजिनिअर होता तो. चांगला हुशार पण अबोल, फारसं कुणाशी न बोलणारा. त्यामुळे त्याला फारसे मित्रही नव्हते. त्याच्या वडलांच्या इच्छेखातर त्याला त्यांच्या मित्राच्या मुलीशी लग्न करावं लागलं. मृत्युशय्येवर असलेल्या वडिलांची ती अंतिम इच्छा होती. त्यानं लग्न केलं, त्याची बायको तिच्या वडलांची एकुलती एक मुलगी होती, शहरात लाडाकोडात वाढलेली. हा घरजावई म्हणून बायकोच्या घरी राहात होता. त्याची बायको अल्पशिक्षित होती, पण बापाची गडगंज संपत्ती. या संपत्तीचा अहंकार तिच्या स्वभावात उतरला होता. हा खेड्यावरून आलेला साधासरळ नवरा तिच्या खिजगणतीतही नव्हता. घरजावई झालेल्या त्याला त्या घरात काही स्थानच नव्हते. त्यातही हा अबोल, अंतर्मुख. त्यामुळे तो एकटा पडत चालला होता. सासऱ्यावर अवलंबून राह्यला नको म्हणून त्याला नोकरी करायची होती, पण या नवख्या शहरात नोकरी मिळाली तीही सासऱ्याच्या ओळखीने. सासऱ्याचं नाव एवढं मोठं की, नोकरीच्या ठिकाणीही लोक त्याला ‘फलाण्याचा जावई’ म्हणून ओळखत. त्याच्यातला कॉम्प्लेक्स वाढत चालला होता. बायकोचं आणि त्याचं नातं त्याला पोकळ भासू लागलं होतं. तो आतून उद‌्ध्वस्त झाला होता.

बयो, तू त्याची कर्मकहाणी ऐकत होतीस. तो आतून बोलत होता. प्रश्न न विचारण्याची त्याची अट तू बोलू लागलीस तशी विरून गेली. तू तुझं हृदय मोकळं केलंस. त्याला फुलं बोचत होती; पण बयो, तुझ्या वाट्याला आलेलं काट्याचं रान सरता सरत नव्हतं. तुला तुझा बाप आठवला. बाप कसला कसाई होता तो! बारा-तेरा वर्षांच्या तुझ्या कोवळ्या वयात त्यानं तुझ्यावर बळजबरी केली. तू आरडाओरडा केलास तर त्यानं, त्या बाप नावाच्या नराधमानं, तुला इथं आणून या कोठेवालीला विकलं. ज्या वयात जिबल्या, गजगे खेळायचं, फुगड्या घालायच्या, त्या तुझ्या फुलपाखरी वयात बयो, तू या सर्वदुष्ट बाजारात येऊन उभी राहिलीस. तुझं बालपण करपलं, आईचा पदर हरवला, भाऊबहीण हाकेपल्याड गेले. रोज संध्याकाळी तू या बाजारात तुझं एकटेपण घेऊन उभी राहात होतीस. तुझी कहाणी, तुझी दास्तां ऐकता ऐकता त्याचे डोळे भरून आले. तुझी कहाणी त्याच्या दुःखावर मलम झाली.

‘तू तुझी गोष्ट करतोस, मी काय करायचं होतं रे?’ तू कधीच न उच्चारलेला प्रश्न त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्याला जगण्याचं नवं अवसान गवसलं. बयो, खरं तर तू त्याच्यापेक्षा कितीतरी लहान होतीस वयानं, शिक्षणानं! पण जिंदगीच्या या बेरहम, निष्ठुर शाळेत तू त्याच्या कितीतरी पुढल्या वर्गात होतीस. तुझं सहज बोलणं त्याच्यासाठी जगण्याचे नवे मंत्र ठरत होते. तुला भेटल्यापासून एक जादू झाली होती, त्याचे आणि त्याच्या बायकोचे संबंध सुधारत चालले होते. हृदयाकडं जाणारी वाट त्याला जणू गवसली होती. पूल बांधायचे की उंचच उंच भिंती बांधायच्या, हे आपल्याच हातात असतं, हे या इंजिनिअरला तुझ्या कॉलेजात उमगत होतं. तुम्हां दोघांमध्ये एक वेगळंच नातं विणलं जात होतं. पण बयो, त्याच्याशी लग्न करावं, असं तुला कधीच वाटलं नाही, कधीच! खरं तर या चिखलातून बाहेर पडायचा किती सोपा मार्ग तुला गवसला होता. ‘त्याची बायको व्हवूनशान काय साधायचं हुतं बाबा? त्याचं माझं नातं त्यापरीस लई आगळं हाय.’ बयो, मला समजेनासं होतं तुझं बोलणं. बाजारात उभी राहून तुला कसं गं बोलता येतं असं? पंचवीस वर्षांहूनही अधिक काळ दर शुक्रवारी तो तुझ्याकडं नित्यनेमानं येतो आहे, पण त्या येण्यात शरीराची आस नाही, वासनेचा लवलेश नाही. काही अनवट क्षणी, पाऊसवेळा गाठून येतात, तेव्हा तुम्ही शरीरानंही जवळ आलात, नाही असं नाही; पण बयो, त्यात अट्टाहास नव्हता. होतं ते श्रावणसरीसारखं सहज, आपसूक आणि निमित्तमात्र! “एकमेकांची सुखदुःख ऐकता ऐकता आपण बाई हावं की गडी, हे बी आपुन इसरून जातू कितीकदा”, बयो, तू बोलता बोलता सहज बोलून जातेस. बयो, ही कसली तपश्चर्या केलीयस तू शरीरापल्याड जाण्याची..!! अगं, इतक्या बाबाबुवांच्या सत्संगात असा एक क्षणही नाही गं पडत आमच्या पदरात...!
परवा तर तो त्याच्या तरुण मुलाला घेऊन आला होता तुझ्याकडं. त्याचं लग्न जमलं होतं. लग्नाआधी कितीतरी ब्रेकअप झाले होते त्याचे. त्याला आपल्या मुलाला रिलेशनशिपची जिवंत व्याख्या दाखवायची होती तुझ्या रूपात! तो तरुण पोर तुम्हा दोघांकडं पाहात राहिला. बापाशी खूप अॅटॅच्ड् आहे तो, त्याला ही जगावेगळी अॅटॅचमेन्ट समजली असावी.
बयो, आज पन्नाशी ओलांडलीय तू. वेश्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेची डायरेक्टर आहेस तू. त्यानंही पासष्टी गाठलीय. पण आजही शुक्रवार आला की संस्थेच्या ऑफिसमधून तू लवकर बाहेर पडतेस. धंद्यात नव्यानं आलेल्या पोरी एकमेकींकडं बघून हसतात. कुणीतरी कुजबुजतं, “अरे जाने दो, उसका बुढ्ढा आनेवाला होगा.”
बयो, तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी पाहात राहतो वेड्यासारखा. मी कोणतं व्रत करू बयो, म्हणजे तुझी ही शुक्रवारची कहाणी माझ्याही जगण्यात सुफळ संपूर्ण होईल.
बयोऽऽ उतणार नाही, मातणार नाही, सगळ्यांना सांगत जाईन, तुझा वसा वाटत जाईन!!!
(dr.pradip.awate@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...