आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजोप्रवृत्‍तीचा काळ महत्‍त्‍वाचा (डॉ. संगीता देशपांडे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिलेच्या आयुष्यात रजोनिवृत्तीच्या वेळेसचा आहार महत्त्वाचा असतो. कारण त्या आहारावर आपले रजोनिवृत्तीचे आरोग्य व मानसिक संतुलन अवलंबून असते. त्याचप्रमाणे मुली वयात येताना किंवा रजोप्रवृत्ती सुरू होण्याच्या वेळी घेतला जाणारा आहार महत्त्वपूर्ण असतो. किशोरवयीन मुलींमध्येसुद्धा रजोप्रवृत्ती सुरू होण्याच्या वेळेसचा आहार पुढील आयुष्यातील आरोग्य सांभाळण्यास मदत करतो. त्यामुळे या वयातील आहार व त्यासोबतचा व्यायाम एकमेकांस पूरक असणे गरजेचे असते.

हल्लीच्या काळात रजोप्रवृत्ती सुरू होण्याचे वय कमी कमी होत चालले आहे. बऱ्याच संशोधनातून असे निष्कर्ष निघत आहेत की, या काळातील आपली खाण्याची पद्धत, अगदी लहानपणापासूनच्या खाण्याच्या सवयी, समावेशातील वातावरण या एक ना अनेक गोष्टींमुळे पाळी सुरू होण्याचे वय अलीकडे येत चालले आहे. यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे, वयात येतानाच नव्हे तर लहानपणापासून देण्यात येणारा चुकीचा आहार व निष्क्रिय किंवा बैठी जीवनशैली, हे आहे.
रजोप्रवृत्ती सुरू होण्याच्या वयात किंबहुना त्यापेक्षाही अगोदरपासून आहाराबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. या वयातील मुलींमध्ये सध्या फास्ट फुड किंवा जंक फुड खाण्याची खूप ओढ असते. त्याचा परिणाम शरीरावर व शरीराच्या वाढीवर, चयापचयावर दिसून येतो. या वयातील मुली शाळेत व कधी मैत्रिणींबरोबर, त्यांच्या आग्रहामुळे, टीव्ही बघताना अशा प्रकारचा आहार सातत्याने सेवन करत असतात. त्याचा दूरगामी परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यात दिसून येतो. पाळी सुरू होण्याच्या वयात शरीरात बऱ्याच संप्रेरकांचे कार्य चालू होते व ही संप्रेरके एकमेकांवर अवलंबून असतात. सातत्याने जंकफूड खाणे व विशेष करून व्यायामाचा अभाव या कारणास्तव त्यांच्यामध्ये काही विकृती निर्माण होतात. यामध्ये प्रामुख्याने स्थुलतेसारखे विकार, पीसीओडीसारख्या व्याधीची सुरुवात याच वयात होत असते. याचा परिणाम म्हणून त्वचा काळवंडणे, चेहऱ्यावर केस येणे, तारुण्यपिटिका, कोंडा होणे, डोक्यावरील केस गळणे अशी अनेक लक्षणे लहान वयातच निर्माण होतात. याचा जसा शरीरावर परिणाम होतो तसा मनावरसुद्धा होत असतो. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात असाच आहार चालू ठेवल्यास पुढील वयात आणखी वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. यात पाळीत खूप जास्त पोट दुखणे, अनियमित रक्तस्राव, स्तनांचे व गर्भाशयाचे आजारसुद्धा उत्पन्न होऊ शकतात.

रजोप्रवृत्ती सुरू होण्याच्या वयात आपल्या शरीराच्या गरजा वाढलेल्या असतात. आवश्यक पोषक मूल्यांक व्यवस्थित मात्रेत लागतात. त्यात प्रामुख्याने कॅल्शियम, लोह व इतर खनिजे व्यवस्थित मात्रेत लागतात. याशिवाय काही विशिष्ट जीवनसत्त्वेसुद्धा योग्य प्रमाणात असावी लागतात. ही पोषक मूल्ये व्यवस्थित प्रमाणात असतील व शरीराला यथायोग्य व्यायाम मिळाल्यास रजोप्रवृत्ती व ते दिवस आरोग्यदायी ठरतात. यामुळे पुढील आयुष्यातही स्त्रीविषयक काही तक्रारी राहात नाहीत.
रजोप्रवृत्ती व्यवस्थित होण्यासाठी मुबलक प्रमाणात खनिजे समाविष्ट असणाऱ्या फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. आहारात आवळ्याचा वापर करावा. फळांमध्ये अननस, डाळींब, अंजीर अशा फळांचा उपयोग करावा. व्यायाम करत असल्यास दुधाचा वापर करावा. सुक्या फळांमध्ये बदाम, अक्रोड यांचा वापर करावा. आहारात सोयाबीन, अंडी, मशरुम यांचा समावेश करावा. पाण्याचे प्रमाण यथायोग्य ठेवावे. या वयातील मुली शाळेत पाण्याचे सेवन खूप कमी करताना दिसून येतात. ते टाळावे.

चॉकलेट्स, कॅटबरी, खूप गोड पदार्थ, शीत पेय, केक्स यांचा वापर मर्यादेतच ठेवावा. हे पदार्थ टाळले तरी चालेल. बहुतांश पालकांच्या मते, या वयात अधिक पोषणाची गरज असल्याने मुलींना अधिक तूप व तंतूमय पदार्थ दिले जातात. अधिक तेल व तूप टाळावे. अशा पदार्थांमुळे पेशींवर सूज येऊन संप्रेरकांमध्ये विकृती होण्याची शक्यता असते. यामुळे या वयात अगदी साधा, पचायला हलका आहार घेणे गरजेचे असते.

sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...