आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्‍या' नात्‍याचं भावनिक व्‍यवस्‍थापन (डॉ. निशीगंधा व्यवहारे )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुरिमा पुरवणीत ‘तळ्यात मळ्यात’ हे सादर सुरू झाल्यापासून मेल बॉक्समध्ये येणाऱ्या मेल्सचा ओघ वाढला आहे. त्यात कुणी अनुभवकथन केलेले असते, कुणी त्यांच्या समस्या मांडून त्यावर समाधान सांगा, म्हणून विनंती केलेली असते. प्रत्येकाच्या समस्येवर वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य होत नाही, पण त्यातल्या काही प्रातिनिधिक समस्यांबाबत या सदरातून लिहिण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. आज त्यातलाच ‘विवाहबाह्य संबंधातलं नातं’ हा विषय घेऊन लिहिते आहे. विषय नवीन नाही, यावर फार उघड उघड बोललं जात नसलं तरी लोक हा विषय चवीने चघळत असतात. एखाद्या व्यक्तीचं विवाहबाह्य नातं असणं हे चूक आहे की बरोबर, नैतिक आहे की अनैतिक, याचा ऊहापोह आणि पोकळ चर्चा करण्यापेक्षा अशा नात्यांमध्ये गुंतणाऱ्यांची टक्केवारी दिवसेंदिवस का वाढते आहे, याचा खोलवर विचार व्हायला हवा...
विवाहबाह्य संबंधातल्या नात्यात गुंतलेल्या, फसलेल्या, फसवल्या गेलेल्या, अपराधीभाव असलेल्या व्यक्तींच्या, त्यांच्या वैवाहिक साथीदारांच्या भावनिक, मानसिक समस्या बऱ्याचदा खूप गंभीर वळण घेताना दिसतात. अशा नात्यात गुंतलेल्या व्यक्तीच नाही तर अशा संबंधांची कुणकुण लागलेल्या कुटुंबीयांची मन:स्थितीही विचित्र आणि नकारात्मक होऊ लागते. अविश्वास, शंका-कुशंकांवरून सुरू झालेल्या या प्रवासाचा शेवट जीव देण्या-घेण्याच्या दुष्कृत्यावरही येऊन संपतो आणि मागे उरलेल्यांच्या अवस्थेचा विचारही करवत नाही, इतका त्रासदायक होऊन राहतो. मुळात नाजूक असलेल्या पती-पत्नीच्या नात्यात ‘तो’ किंवा ‘ती’ म्हणवणारी तिसरी व्यक्ती येते तेव्हा त्यामागे कारणांची यादी खूप मोठी असते.
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणं, नाशिकच्या अंजली नावाच्या एका मैत्रिणीच्या मेलचा हा सारांश. वैवाहिक आयुष्याबाबत घेतलेला निर्णय चुकल्यानंतर एकाकी झालेल्या अंजलीला ती काम करत असलेल्या बँकेतील तिच्याच एका सहकाऱ्यानं भावनिकदृष्ट्या सावरलं होतं. कामाच्या ठिकाणीही खूप साहाय्य केलं होतं. कळत-नकळत दोघंही एकमेकांत गुंतली. भविष्याची स्वप्नं रंगवली गेली. वचनांची देवाण-घेवाण झाली आणि एके दिवशी त्याने हे सगळं निर्विकारपणे संपवलं. काही महिन्यातच दुसऱ्या गावी बदली करून घेतली. अंजली भावनिकरीत्या खूप अडकलेली त्याच्यात. तो असं काही करूच शकत नाही. तो परत आपल्याकडे येईल, या आशेवर त्यानं परत येण्यासाठी अंजली प्रयत्न करत राहिली आणि प्रत्येक प्रयत्नांती आतून कोलमडत राहिली. आज नैराश्याच्या टोकाला जाऊन आत्महत्येच्या विचारापाशी घुटमळत क्षणांना मोजत बसलीय... उच्चशिक्षित, स्वावलंबी, कुटुंबाची, छोट्या २ मुलाची जबाबदारी असणारी, पण परिस्थितीची जाणीव असूनही, सगळं समजत असूनही यातून बाहेर पडू न शकणारी अंजली... तिची वैचारिक आंदोलनं, भावनिक गुंतागुंत तिला यातून बाहेर पडू देत नाहीये.

खरं तर अंजलीसारख्या विवाहबाह्य नातं जोडलेल्या अनेकांच्या बाबतीत असं काहीसं घडताना दिसतं. अर्थात, अशा गोष्टींकडे टाइमपास म्हणून पाहण्याचं ‘कौशल्य’ ज्यांच्याकडे असतं, अशी माणसं या घटना मनाला लावून घेत नाहीत. त्यातून ते लगेच बाहेर येऊन इतरत्र ‘सेटल’ होतात. पण प्रश्न असतो तो भावनिकरीत्या गुंतून त्यातून वेळीच बाहेर न पडू शकणाऱ्या व्यक्तींचा. मग तिथे स्त्री-पुरुष असा लिंगाधारित भेद नसतो. वास्तविक अशा नात्यामध्ये गुंतण्याची कारणे प्रत्येकाची वेगळी असतात. अशा नात्यांची सुरुवात भावनिक आधार मिळाल्याने होते. कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, ही प्रत्येकाची सुप्त गरज असते. जेव्हा ही गरज तिसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण होते, तेव्हा नकळत त्या व्यक्तीची ओढ वाटू लागते. हे झालं एक कारण. पण प्रत्येक वेळी हेच कारण असतं असे नाही. वैवाहिक जीवनात सतत तणाव असणं, वैवाहिक नात्यात समाधान नसणं, आनंद कमी असणं, गरजांची पूर्तता न होणं, गृहीत धरलं जाणं आणि गृहीत धरणं, संवाद नसणं, साथीदाराला वेळ न देऊ शकणं, नावीन्याची, विविधतेची आवड असणं, हटके करून पाहायचं म्हणून, सोशल मीडियातून या संबंधाना स्वीकृती आणि वलय मिळत गेलेलं दिसतं.

कारणं काहीही असली तरी बहुतेकांच्या वाट्याला विशिष्ट कालावधीनंतर त्रास, नैराश्य, चिंता, अस्वस्थता येते. या त्रासातून बाहेर येण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करायला पाहिजे. त्रास कमी करण्यासाठी विचारातील बदल सर्वप्रथम करावे लागतील. हे लक्षात घेतलं पाहिजे की, आयुष्यात नाती महत्त्वाची आहेत; पण फक्त नाती म्हणजेच आयुष्य नाही तर तो आयुष्याचा एक भाग आहे, त्याला जीवन-मरणाच्या प्रश्नांशी जोडू नका. आयुष्यात एखादे नाते त्रासदायक असेल तर पूर्ण आयुष्य नकोसं वाटायला नको. कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्याशी चांगलं वागते, त्या वेळेला आपण त्या चांगल्या वागण्याचं अतिसामान्यीकरण करतो. म्हणजे व्यक्ती नेहमी चांगलीच वागत असते का, तर नाही; काही वेळेला चुकतेदेखील. वागण्यातले चांगले-वाईट, चूक-बरोबर हे आपण विचारातच घेत नाही, तेव्हा एका चांगल्या वागण्याचं आपण अति सामान्यीकरण करतो. अतिसामान्यीकरण हे फक्त चांगुलपणाचंच केलं जातं असं नाही, तर वाईट वागण्याचंही केलं जातं. मानसशास्त्रीय भाषेत याला ‘बोधानिक प्रमाद’ असे म्हणतात.
कोणतंही नातं हे आपल्या सुखासाठी, आनंदासाठी आहे, पण आपल्याला जगण्यापासून दूर नेणाऱ्या नात्यांना आपण आपल्या आयुष्यात ठेवायचं की नाही, विचार करायला हवा. एखाद्या व्यक्ती किंवा नात्याला आपण आपल्या आयुष्यात जबरदस्तीने बांधून, अडवून ठेवू शकत नाही. नात्यात राहायचं की नाही, हा अधिकार दोघांकडे समान असावा. या नात्यासाठी तुम्ही कशाकशाची किंमत मोजता आहात, याचा विचार करा. या नात्यातून तुम्हाला काय मिळतंय आणि तुम्ही काय गमावत आहात, याची तटस्थपणे गोळाबेरीज करा, तुटलेल्या नात्याशी स्व-आदर जोडून तो कमी होऊ देऊ नका. स्वतःला नकारात्मकतेकडे नेणाऱ्या विचारांच्या कैदेतून मुक्त करा आणि हे सगळं करूनही तुम्हाला होत असलेला त्रास कमी होत नसेल, भावनांचे व्यवस्थापन करता येत नसेल तर तज्ज्ञ समुपदेशकाकडे आवर्जून जा.

v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...