आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिमत्त्व व साहित्यनिर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवीचे व्यक्तिमत्त्व हे सर्वसाधारण मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळे असते. त्यामुळे प्रकृतीही सर्वसाधारण मनुष्यापेक्षा वेगळीच असते. मर्ढेकरांच्या मते “सामान्य जनांचे आंतरिक व्यक्तिमत्तव योगायोगानुसारी असते, तर लेखक किंवा कवीचे व्यक्तिमत्त्व - त्यांच्या मनातील आंतरिक साच्याची व्यवस्था - विशिष्ट तत्त्वानुसारी असते.’ याचा अर्थ असा की, सर्वसाधारण मनुष्याचे व्यक्तिमत्त्व आणि कवी-कलावंताचे व्यक्तिमत्त्व या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे वेगळेपण कलात्मक निर्मितीच्या सामर्थ्यापुरते कवी-व्यक्तिमत्त्वाच्या बाजूने असते.
कवी-व्यक्तिमत्त्व ज्या समाजव्यवस्थेचा अपरिहार्य घटक असते, त्या समाजव्यवस्थेत वेगवेगळ्या मूल्यांचे संस्कार मूळ धरून असतात. त्यातून समाजाच्या बदलल्या स्थितीगतीनुसार सांस्कृतिक परिस्थितीचा उद‌्भव होत असतो. ही सांस्कृतिक परिस्थिती किंवा समाजजीवनातील घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया-प्रतिक्रिया कवी-कलावंताच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव-परिणाम टाकत असतात. या प्रभाव-परिणामामुळे कवी-व्यक्तिमत्त्वाचे नवे पोत घडत जातात आणि काळाच्या मुशीतून कलावंताचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असते.
कवी किंवा कलावंताचे व्यक्तिमत्त्व हे सभोवतालच्या सांस्कृतिक परिस्थितीतून मानवी समाजाच्या व्यापक समूहभावनेला आपल्यात शोषून घेते आणि नवे आविष्कारण आपल्या व्यक्तिमत्त्वातून कलाकृतीत साकार करते. कलावंताच्या व्यक्तिगत आवडीनिवडीप्रमावे विवक्षित स्वार्थाप्रमाणे त्याला जगाचा अर्थ कळत असतो. कलावंचाताही हा “मी’ इतरांप्रमाणेच प्रभावी असतो. परंतु त्याला स्वत:च्या “मी’ची तीव्र संवेदनशीलता कायम राखून त्यास “तू’शी समव्याप्त करावे लागते. व्यक्तिमत्त्व विकासाची खरी मानसिक क्रिया “मी’ची “तू’ होत जाण्याची (Becoming) क्रिया असते. ही क्रिया जेवढी जोरदार असेल तेवढे कलावंताच्या जीवनात (त्याच्या मूळ प्रवृत्तीच्या दिशेने) सर्व पातळ्यांवर संघर्ष निर्माण होत जातात. या प्रक्रियेत त्याच्या “मी’मध्ये गुणात्मक परिवर्तन (Qualitative Change) घडून येते. आकाराला येणाऱ्या “मी’चे गुणधर्म श्रेष्ठ मानवतेच्या गुणाशी समांतर बनतात. म्हणजेच या नव्या “मी’तून कलावंताला गवसलेल्या आशयासह वस्तू प्रकट होते. थोडक्यात “मी’पणा सुटून कलावंताच्या प्रक्रियेतून समृद्ध झालेल्या व्यक्तिमत्त्वातून (वस्तूचा, जीवनाचा) आशय फाकतो. “मी’चे तंत्र जाऊन कलावंताचे व्यक्तिमत्त्व आत्मतंत्रात्मक म्हणूनच वस्तूतंत्रात्मक बनते. कलावंत हा “मी’च्या गुलामगिरीतून सुटलेला असतो व तो वस्तूशी तदाकार झालेला असतो. वस्तूचे तंत्र त्याने पिंडत: स्वत: स्वीकारलेले असते. म्हणूनच कवीची आत्मनिष्ठा व तादात्म्य या दोन्ही बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. असे असले तरी आत्मनिष्ठा आणि दातात्म्य यांच्यापेक्षाही महात्मता ही मर्ढेकरांना अधिक मोलाची वाटते. “महात्मता ही मूल्यभावावर अवलंबून असते आणि मूल्यभाव
म्हणजे स्वानुभाव क्षेत्रात संगती उत्पन्न करून तिचा विश्वघटनांच्या वस्तूस्थिती निदर्शक संगतीची समन्वय लावणारे तत्त्व’ अशी या तत्त्वाची व्याप्ती ते विशद करतात आणि वाङ्मयाचा आंतरिक संबंध मूल्यभावाशी जोडतात. सभोवतालची सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती बदलली की, काही प्रमाणात आयुष्याच्या मुळाशी असलेली मूल्यव्यवस्थाही बदलायला लागते. त्यामुळे बदललेल्या मूल्यव्यवस्थेतून लेखकाचा अनुभवही आंदोलीत होऊ लागतो. त्याचा बौद्धिक आणि भावनिक व्यापार बदलू लागतो. पॉल क्लेने कला आणि सांस्कृतिक परिस्थिती यांच्यासंबंधी केलेले विवेचन मोठे अन्वर्थक आहे. त्याने कलाकृतीला वृक्षाची उपमा देऊन वृक्षाची जमिनीत रुतलेली मुळे जीवनरस शोषून घेतात असे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...