आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिस्ट्री कुणी सांगितली?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेसिडेंट असताना वाॅर्डात जेव्हा मी केस प्रेझेंट करायचो, तेव्हा प्रत्येक वेळी ‘हिस्ट्री कुणी सांगितली?’ हा आमच्या प्रोफेसरांचा पहिला प्रश्न असे. त्या प्रश्नाचे उत्तर ‘आईने’ असेच असायचे. आईने सांगितलेली रुग्णाची हिस्ट्री अधिक तंतोतंत असते, याची प्रचिती मला प्रॅक्टिस करतानाही रोज येते. चिमुकल्याचं भरणपोषण, संगोपन, लसीकरण अन् त्याच्या आरोग्याची देखभाल करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ती पार पाडते. तिचं अज्ञान, भ्रामक समजुती, व अंधश्रद्धा यांचे अनिष्ट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना मी पाहिले आहेत. त्याची उदाहरणं अनेक आहेत. त्यामुळे आईचे समुपदेशन करणे, हे अवघड काम असे नेहमी वाटे. त्यातून मग विसंवादही होत असे. मी मनातून निराश होत असे. कालांतराने मी समुपदेशन करताना सांगितलेल्या बाल-आरोग्याच्या शास्त्रीय माहितीची तिने काटेकोर अंमलबजावणी केल्याने बाळाच्या आरोग्यात होत असलेली सुधारणा मला पुन्हा नव्याने समुपदेशन करण्यासाठी प्रोत्साहन देते.

आेपीडीत येणाऱ्या बहुतांश पालकांचा, ‘कितीही प्रयत्न केले तरी आमचे मूल काहीच खात नाही,’ असा सूर असतो. त्यासाठी ते चांगल्या टाॅनिकची मागणी करतात. पण त्यासाठी आईने व कुटुंबातील सर्व सदस्यांनी नीट प्रयत्न केले नाहीत तर टाॅनिक्सचा त्या बाळाला फारसा फायदा होत नाही. मुलांना शिकवणे व सवय लावणे गरजेचे असते. त्यासाठी संयमाची गरज असते. नेमक्या त्या संयमाचा अभाव पालकांत असतो. त्यासाठी पालकांशी चर्चा करताना मी तुम्ही तुमच्या मुलांना भरवताना काही नव्या युक्त्या केल्या असतील तर त्या मलाही सांगा, असं गमतीने म्हणायचो. एकदा सकाळचा नाष्टा महत्त्वाचा असतो, ही बाब एका दांपत्यानं मनावर घेतली. दोन-अडीच वर्षांची त्यांची आत्मजा मोठी चुणचुणीत व गोड मुलगी! तिनं सकाळी खावं, यासाठी तिच्या बाबांनी रोज सकाळी तिच्यासमोर नाष्टा तयार केल्याची गोष्ट मी इतर पालकांशी शेअर केली. त्यानंतर एका आईने केलेल्या प्रयोगाने मी थक्क झालो. तिने तिच्या मुलासमोर नुसता सकाळी नाष्टा बनवला नाही, तर आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे खाद्यपदार्थ ती स्वत: रोज खायची अन् खाताना ती मुलाला दाखवायची, खूप चांगले आहे असं सांगायची अन् पुन्हा खायची. काही दिवसांनी त्या मुलाने तेच मागितले व खाल्ले, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग तिने केलेले प्रयत्न मी मोठ्या अभिमानाने इतरांना सांगतो.

एकदा एक आई तिच्या नवजात बाळाला तपासणीसाठी माझ्याकडे घेऊन आली. नेहमीप्रमाणे मी त्याची काळजी कशी घ्यायची, याची माहिती तिला देत असताना तिने मला थांबवून विचारले, बाळाला वरचा आहार कधी देता येतो? ‘जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत बाळाच्या आरोग्यासाठी फक्त अंगावरचे पाजणे उत्तम असते. त्यानंतर आपण वरचा आहार सुरू करू शकतो,’ असे मी उत्तरलो.
मला राहवले नाही अन् तुम्ही असे का विचारता, असा प्रतिप्रश्न मी तिला केला. डाॅक्टर, हे बाळ मला माझ्या नणंदेला दत्तक द्यायचे आहे. कधी द्यायचे, हे ठरवण्यासाठी मी हे विचारले! बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर परत ती माझ्याकडे आली. बाळ गोंडस, गुटगुटीत होतं. ‘डाॅक्टर, आता मी बाळाला सहा महिने स्तनपान केले आहे. उद्या हे बाळ त्यांच्या घरी जाणार आहे. माझी नणंद आता तुमच्याकडे या बाळाला घेऊन येत जाईल. तुम्ही त्याला वरचे काय खाऊ घालायचे अन् बाळाची काळजी घ्यायची, हे तिला सांगा,’ असे ती मला सांगत होती. हे सांगताना ती आनंदी होती. मला पुन्हा राहवले नाही, म्हणून तुम्हाला बाळ देताना दु:ख होत नाही का, असे तिला विचारले. आमची परिस्थिती नाजूक आहे. आता हे बाळ चांगल्या घरी जाणार आहे. त्यांना मूल नाही. ते बाळाची काळजी घेतील, नीट शिकवतील अन् त्याला मोठं करतील, असे तिने सांगितले. हसता-हसता तिचे डोळे पाणावले. बाळाला कुशीत घेऊन तिने त्याचे पापे घेतले अन् निघून गेली. मी विचार करत क्षणभर स्तब्ध उभा राहिलो. केव्हा मोठा त्याग होता तो! जन्म दिल्यानंतर आईने करायचे सर्वात मोठे कर्तव्य तिने केले होते. मुलाचे आरोग्य जपण्यासाठी, त्याला सुदृढ बनवण्यासाठी माहितीचा तिने किती डोळसपणे उपयोग केला होता. रायगडावर अडकलेल्या अन् आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी उभा कडा उतरून गेलेल्या हिरकणीचे मला स्मरण झाले. यातून तिने स्तनपानाचे तसेच, ‘पहिले सहा महिने केवळ स्तनपान करायचे,’ यासारख्या बाळाच्या आरोग्यासाठीच्या नियमाचे महत्त्व अधोरेखित केले.

दत्तकासारख्या संवेदनशील बाबींवर प्रश्न विचारण्यासाठी पालक येतात, तेव्हा हाच सल्ला मी त्यांना देतो. तेव्हा मला तिची आठवण आल्यावाचून राहात नाही. सरकारी नोकरीत असतानाची ही गोष्ट आहे. हुमेरा नावाची आठ-दहा वर्षांची एक मुलगी गंभीर अवस्थेत दाखल झाली. तिला पॅरालिसिस झालेला होता. तिची नखं निळ्या रंगाची होती. माझी शंका खरी ठरली. तिला ब्रेन अॅबसेस (मेंदूत पू) झालेला होता. निळ्या पडणाऱ्या गुंतागुंतीच्या हृदयविकाराची शंका होती. तिला झटके येत होते. तिच्यावर उपचार करून ती थोडीशी स्थिर झाल्यावर तिला औरंगाबादला किंवा पुण्याला नेण्याचा सल्ला दिला. तिचे वडील पेंटर. परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट. तिला दुर्धर आजार असूनही अन् काहीही उपयोग नसूनही तिच्या वडिलांनी, गनीभाईंनी तिला वाचविण्यासाठी जो त्याग केला, पराभव होणार हे माहीत असूनही निकराचा लढा दिला. शेवटी हुमेराने या जगाचा निरोप घेतला, तेव्हा गनीभाईंनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून केलेला अाक्रोश मी आजही विसरू शकत नाही. त्याच वेळी स्त्रीभ्रूणहत्येस कारणीभूत ठरलेल्या डाॅक्टरांवर कारवाई सुरू होती. मुलगाच हवा, या हव्यासापोटी भ्रूणहत्या करणारे हे घायकुते पालक एकीकडे व हुमेराच्या जगण्यासाठी लढा देत असलेले गनीभाई दुसरीकडे! केवढा हा विरोधाभास.

डाॅ संजय जानवळे, बीड
लेखक बालरोगतज्ज्ञ आहेत.
dr.sanjayjanwale@icloud.com
बातम्या आणखी आहेत...