आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचं माझं प्रतीक ‘क्वीन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘क्वीन’मधली एकटी हनिमूनला जाणारी, परदेशातल्या वास्तव्यात आधी भांबावलेली पण नंतर अंतर्बाह्य बदललेली राणी. पुरुष मित्रांबरोबर रूम शेअर करताना घाबरलेली आणि नंतर त्याच मित्रांमध्ये जिवाभावाचे सखे शोधणारी. संशोधनासाठी परदेशात जावं लागल्यावर असाच काहीसा अनुभव आल्याने पेटंट कायदा तज्ज्ञ असलेल्या या लेखिकेला कंगना उर्फ राणी जवळची न वाटली तरच नवल.

कंगना राणावतचा ‘क्वीन’ पाहिला आणि भारावून गेले. मला हा चित्रपट इतका का भावला याचा विचार करायला गेले आणि जाणवलं की, मला ही माझीच गोष्ट वाटली. आणि मी कोण आहे? तर एका साधारण आकाराच्या शहरात राहणारी एक मध्यमवर्गीय स्त्री, जी आपली स्वत:ची ओळख घडवायला धडपडते आहे. जी नुकतीच एकटी एक मोठा परदेशप्रवास करून आली आहे आणि त्यामुळे ती अंतर्बाह्य बदलली आहे. इतकी की त्या प्रवासाच्या आधीचे आणि नंतरचे असे स्वत:च्या आयुष्याचे सरळसरळ दोन भाग तिला दिसतायत! या अर्थाने क्वीन ही आपल्या एका ठरावीक कोशातून बाहेर पडून आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या कुठल्याही सामान्य स्त्रीची कहाणी वाटते मला.

सुरक्षित आयुष्य जगत आलेल्या एखाद्या मुलीला अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जेव्हा आपलं घर, गाव, देश सोडून निघायला लागतं तेव्हा सगळ्यात जास्त अस्वस्थता असते याच गोष्टीची की, इथून पुढे ओळखीचे कुणी दिसणार नाही. कुठलीही अडचण आली आणि हाक मारली तर इच्छा असूनही कुणालाही मदतीला येता येणार नाही. कुणी तरी तिला तिच्या सवयीच्या, कुंपण घातलेल्या, मशागत केलेल्या जमिनीतून उपटून लांब कुठेतरी फेकून दिलंय, असं तिला वाटतं. आणि या अनोळखी मातीत रुजून उभं राहणं तिला आता भागच असतं. ‘मला मदत करायला आता फक्त मीच आहे,’ याची जाणीव लखलखीतपणे होते. अनेक छोट्या छोट्या लढाया एकटीने लढून झाल्यावर आधी घाबरत तिथे जगणारी ती नंतर तेच राहणं एंजॉय करायला लागते. अनेकदा धडपडते. त्यातून मार्ग काढते. आत्मविश्वास कमावते. स्वत:च्या जिवावर मैत्री करते. माणसं जोडते. हे सगळं करताना स्वत:ला नव्याने शोधते. स्वत:ला सापडते. आणि मग निर्भीडपणे स्वत:चे निर्णय स्वत: घेताना दिसते.

एका साधारण मुलीचा हा साधारण प्रवास. तिला स्वत:च्या नजरेत असाधारण बनवणारा. आणि हेच या चित्रपटाचं सौंदर्य आहे.
क्वीनमधली राणीची भूमिका कंगना राणावतने इतक्या ताकदीने रंगवली आहे की, पाहतच राहावं. सुरुवातीला साध्या साध्या गोष्टींसाठी आईवर, वडलांवर, भावावर, होऊ घातलेल्या नवऱ्यावर प्रचंड अवलंबून असलेली राणी. आपलं आपण काहीही करू शकत नाही आहोत याची जाणीवही नसलेली. नंतर लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी नवऱ्याने लग्न करायला नकार दिल्याने कोसळलेली, त्या लग्नाला तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारी राणी. नंतर स्वत:च्या हनिमूनची बुकिंग्स झाली आहेत म्हणून एकटीच प्रवासाला निघालेली राणी. परदेशवास्तव्यातल्या परखड वास्तवाने हादरलेली, गलितगात्र झालेली राणी. पासपोर्ट आणि पैसे चोरीला जाण्याच्या अनावस्थेतून कशीबशी वाचलेली राणी. तिथल्या मैत्रिणीच्या बिनधास्त राहणीने कल्चर शॉक बसलेली राणी. पुरुष मित्रांबरोबर रूम शेअर करताना भांबावलेली राणी. नंतर याच मित्रांत जिवाभावाचे सखे शोधणारी, त्यांच्यातल्या माणूसपणाने भारावून गेलेली राणी. या शिकण्याच्या प्रक्रियेतून जाताजाता अंतर्बाह्य बदललेली राणी. आणि नंतर गुडघ्यांवर रांगत परत आलेल्या प्रियकराला शांतपणे पण तितक्याच ठामपणे नाकारणारी राणी. चित्रपटाच्या प्रारंभी आपल्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषेतून स्वत:चा बावळटपणा व्यक्त करणारी कंगना चित्रपटाच्या शेवटी विमानतळाबाहेर ज्या प्रचंड आत्मविश्वासाने चालत येते, ते तिचं परिवर्तन थक्क करायला लावणारं असतं. चित्रपटातली मजेमजेत उच्चारली गेलेली काही वाक्यं विचार करायला लावतात. अंतर्मुख करतात. दारूच्या नशेत धुत असताना राणी जेव्हा तिच्या इंडो-फ्रेंच मैत्रिणीला म्हणते, माझ्या घरात माझ्या मर्जीने ढेकर द्यायचीसुद्धा परवानगी नाही. किंवा ट्रेडमिलवर पळणारी राणीची मैत्रीण जेव्हा तिला म्हणते, ‘ तू मजा कर. मी मुलाचा डायपर बदलते,’ तेव्हा आतल्या आत कुठे तरी तुटायला होतं. अल्बर्ट एलिस या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने साकारलेली विवेकनिष्ठ विचारसरणी किंवा rational emotive behavioral therapy हा जीवनशैली बदलणारा एक विचार आहे.

या REBTची एलिसने शिकवलेली अनेक तत्त्वं मला या क्वीनमध्ये आढळतात. एलिस म्हणतो, जी गोष्ट करून पाहायची भीती वाटते किंवा लाज वाटते, ती पुन्हा पुन्हा करून पाहणं. लाज वाटणं बंद होईपर्यंत किंवा भीती जाईपर्यंत करून पाहणं, हा त्यावर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांना एलिस म्हणतो shame attacking exercise! क्वीनमधली राणी तिला ज्याची भयंकर लाज वाटत असते किंवा संकोच वाटत असतो अशा गोष्टी, उदाहरणार्थ दारू पिऊन बिनधास्त नाचणे, छोटे कपडे घालणे, मुलांबरोबर एका खोलीत राहणे, अॅमस्टरडॅमच्या सेक्स शॉप्समध्ये जाणे, करून पाहाते. या गोष्टी करून ती बिघडत नाही किंवा वाया जात नाही. स्वत:च स्वत:वर लादून घेतलेल्या बंधंनातून मुक्त होण्याचा तो एक प्रयत्न असतो इतकंच!

१०-१५ दिवसांचा पॅरिस, अॅमस्टरडॅमचा छोटासा प्रवास राणीचं आयुष्यच बदलतो. आपल्या बदललेल्या रूपाचे, मॉडर्न कपड्यातले फोटो राणी आपल्या लंडनमधल्या लग्न मोडून बसलेल्या नवऱ्याला पाठवते. केवळ बाह्यरूपाला, कपडे, चेहरा वगैरेला महत्त्व देणारा तो मूढ ते फोटो पाहून लगेचच राणीच्या पायाशी लोळण घेत येतो. पण आता राणीला तो हवा आहे की नाही याचा विचार करायला लागतो. हा विचार करण्याची क्षमता आता तिच्यात आलेली असते. आरईबीटीचं आणखी एक तत्त्व आहे. कुणालाही जगण्यासाठी कुणी व्यक्ती हवीच असते, असं असूच शकत नाही. हो, कठीण असू शकतं एखाद्याशिवाय जगणं, पण अशक्य नव्हे. एक मार्ग बंद झाला तर इतर अनेक मार्ग सापडतातच जगायला. आपलं बदललेलं बाह्यरूप पाहून गोंडा घोळत आलेल्या प्रियकराच्या बाबत राणीचं हेच झालेलं दिसतं! शिवाय तिच्या प्रियकराने तिला गृहीत धरलेलं असतं. आपण जवळ घेतलं काय, लांब ढकललं काय, राणी आपलीच आहे, हा त्याला असलेला ठाम विश्वास. पण राणी तो विश्वास हाणून पाडते. तिच्याशी हवं तसं खेळायला ती कुणी वस्तू नाही, हे तिला आता कळून चुकलेलं असतं.

चित्रपटातला अत्यंत उंचीवर जाणारा प्रसंग म्हणजे त्याचा शेवट. परदेश वास्तव्यानंतर अंतर्बाह्य बदलून परत आलेली राणी विमानतळावरून भाजी आणायला जावं तितक्या सहजपणे तिच्या प्रियकराच्या घरी जाते, काहीही न बोलता अत्यंत शांतपणे तिच्या प्रियकराला बोटातली अंगठी काढून देते. त्यावेळचा तिचा चेहरा कधीही विसरता न येण्यासारखा. कुठलाही त्रागा नाही. राग नाही. बदल्याची भावना नाही. तिच्या चेहऱ्यावर फक्त एक स्पष्ट आणि शांत आत्मविश्वास. तिच्यासारख्या सामान्य भारतीय स्त्रीमध्ये सहजासहजी पाहायला न मिळणारा आत्मविश्वास. याच्यावर कडी म्हणजे अंगठी परत दिल्यावर ती तिच्या प्रियकराला चक्क मिठी मारते आणि “थँक यू” म्हणते. तिने त्याने केलेले अपमान मागे टाकले आहेत. मोडलेलं लग्न विसरली आहे ती. ती आता फक्त कृतज्ञ आहे. त्याने मोडलेल्या लग्नामुळेच ती स्वत:ला सापडली आहे म्हणून कृतज्ञ आहे. ती आता स्वत:चं आयुष्य स्वत:च्या जिवावर जगायला तयार आहे. मुक्त आहे. आणि म्हणूनच ती कृतज्ञ आहे. आज सामान्य भारतीय स्त्री स्वत:ला कशी बघू इच्छिते, स्वत:बद्दलच्या तिच्या आकांक्षा काय आहेत याची क्वीनमधली कंगनाची राणी हे मला चालतंबोलतं प्रतीक वाटते. मला आणि माझ्यासारख्या हजारो स्त्रियांना ती म्हणजे मीच वाटते. आणि हेच या व्यक्तिरेखेचं शक्तिस्थळ आहे!

डॉ. मृदुला बेळे, नाशिक
mrudulabele@gmail.com
बातम्या आणखी आहेत...