आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथकांची कल्चरल करन्सी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अनेकदा व्यवहारात स्त्री-पुरुष नात्याला कोणते तरी नाव देण्यासाठी आग्रही असतो. अशा कोणत्याही नात्यापलीकडील नातं आपलं आकलन कुंठित करतं की काय, कोण जाणे? नात्याचा हा स्पेक्ट्रम आपल्या आवाक्यातच येत नाही. आणि म्हणूनच ही सारी मिथकं हाताला न लागणारी, कवेत न येणारी आभासी स्वप्नं होऊन बसतात आणि प्रत्यक्ष व्यवहारात मुथू आणि पोथीअम्मल यांची गोष्टच आपलं जगणं व्यापून टाकते आणि आपण मनोज-बबलीसारखी नवी जिवंत मिथकं घडवत जातो.
“तू नशीबवान होतीस बाई, बलवान होता तुझा कृष्ण” डोळे भरून आलेले होते बबलीचे. स्वतःतच हरवलेली रुक्मिणी बबलीची कर्मकहाणी ऐकत होती.

“सोपं नव्हतं गं माझंही गाणं...! श्वास कोंडला होता अगदी. थोरला बलदंड भाऊ रुक्मा आणि जरासंधासारखा बलाढ्य राजा हे सारे विरोधी ठाकले होते माझ्या प्रेमाच्या...! मी निरोप धाडला कृष्णाला, कृष्ण आला, मंदिराच्या पायरीवरून त्यानं ओढली मला रथात...! त्या सावळ्याचा स्पर्श झाला दंडाला आणि वाटलं, ...आता घडू दे वर्षाव मरणाचा...! तुंबळ युद्ध झालं रुक्माचं आणि माझ्या सावळ्या कृष्णाचं. रुक्मा मरायचाच, पण मीच वाचवलं त्याला कृष्णाची विनवणी करून. मग द्वारकेत धुमधडाक्यात साजरा झाला आमचा विवाह सोहळा.” रुक्मिणी स्वतःशीच पुटपुटल्यासारखं बोलत होती.

“रुक्मिणी, देव होता गं तुझा कृष्ण! रुक्मा काय, जरासंध काय, या सगळ्यांचा पराभव करणं त्याच्या डाव्या हातचा खेळ होता; पण मी आणि मनोज आम्ही सामान्य माणसं होतो गं...! सगळं गाव लांडग्यासारखं चालून आलं आमच्यावर! दोघांच्या फक्त आया होत्या गं आमच्या मागं. पण त्यांचं काय चालणार? तुझ्या रुक्मापेक्षा क्रूर असते आमची खाप पंचायत…! बाईला श्वास घेतानाही परवानगी घ्यावी लागते त्यांची.” बबलीच्या डोळ्यांतून धारा लागल्या होत्या, “तू वाचवलंस तुझ्या भावाला पण इथं माझ्या सख्ख्या भावानंच विष पाजलं मला बळजबरीनं आणि माझ्या डोळ्यांसमोर माझ्या दुष्ट काकानं फाशी दिलं ग माझ्या मनोजला.”

मिथक वास्तवाला भेटतं तेव्हा… मिथक विरघळत जातं का वास्तवाच्या तेजाबात, की मिथक वास्तवाला शोभेल असं रूपडं धारण करतं? प्रेमाची अनेक मिथकं आपल्या समाजात प्रचलित आहेत. रुक्मिणी स्वयंवराची कथा या साऱ्यामध्ये आपलं विशिष्ट स्थान राखून आहे. आपल्या वडीलभावाच्या विरोधाला न जुमानता ‘मला पळवून घेऊन जा,’ असा निरोप सुनंद ब्राह्मणाच्या हाती श्रीकृष्णाला पाठविणारी रुक्मिणी आजही आधुनिक वाटावी, अशी आहे. तिची कथा पोथ्या-पुराणात आली. लग्न न जमणाऱ्या कुमारिकांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथाची पारायणं करावीत, अशा धार्मिक कर्मकांडात तिला स्थान मिळालं. पण रुक्मिणी आणि तिच्या कृष्णप्रेमाच्या मिथकाचा आशय या कर्मकांडात हरवून गेला. जी गोष्ट रुक्मिणीची तीच सावित्री आणि सत्यवानाची. राजकन्या असलेली सावित्री वडलांच्या इच्छेविरुद्ध दरिद्री आणि अल्पायुषी सत्यवानाला वरते. आपण फक्त वडाला दोरे गुंडाळत बसलो. ‘स्वयंवर’ या शब्दाचा अर्थ मात्र आपण पद्धतशीरपणे विसरलो. मुलीला आपला वर स्वतः निवडण्याचा अधिकार या शब्दातच दडलेला आहे, तो आपल्याला उलगडलाच नाही. आपण फक्त हातात पोथी दिली; पण ‘एक तरी ओवी अनुभवावी,’ हे आपल्याला झेपलंच नाही का? म्हणून तर मनोज- बबलीसारखी अडनिड्या वयाची पोरं आपण जिवंत मारत गेलो. आपली आधुनिक मिथकं रुपेरी पडद्यावर पाहात राहिलो. ती मनोरंजनापुरती उरली.

‘कसं रहावं रे तुमच्या सोबत?, माणसं मारता तुम्ही आणि...
त्यांच्याच रक्तानं, रोज नवा देव निर्मिता तुम्ही?’

डी. जयकांतम या ज्ञानपीठ विजेत्या तामीळ लेखकाची ही ओळ...! ही ओळ तामीळनाडूमध्ये प्रचलित अनेक लोककथांना लागू पडते. एस मडास्वामी आणि सिवसुब्रमणियन यांनी या राज्यातील जवळपास ३०० लोकदेवतांचा केलेला अभ्यास आपल्याला अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही. पोथीअम्मन या गावातील पोथीअम्मल या देवीची लोककथा अंगावर काटा आणणारी आहे. पोथीअम्मल ही एका सोनाराची रूपवती कन्या. ती आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असताना तिच्यावर गावातल्या जमीनदाराच्या मुलाची नजर पडली आणि तो तिच्यावर भाळला. या मुलीच्या ते लक्षात येताच ती अतिंद्रिय शक्तीने जागीच नाहीशी झाली म्हणे. पण लोकांना थोडं खोदून विचारलं की, आणखी एक कहाणी समोर येते. जमीनदाराच्या मुलाच्या मनात आपली कन्या भरली आहे, हे लक्षात येताच तिचे नातेवाईक सावध झाले. त्यांनी हे संकट दूर व्हावे, म्हणून तिला एका खोल अशा खड्ड्याच्या एका कोपऱ्यात एक दिवा लावायला सांगितला आणि ती खड्ड्यात उतरली असताना सगळ्यांनी मिळून खड्डयात वाळू टाकायला सुरुवात केली, तिला चक्क जिवंत गाडली. आजही या गावात जमीनदाराच्या हवेलीसमोर पोथीअम्मलचे मंदिर आहे. त्यात ती आपल्या मैत्रिणीसोबत खेळतानाची मूर्ती आहे. शिवरात्रीत तिची यात्रा भरते. दूरदूरचे लोक या यात्रेला येतात.

पुडूपत्ती गावातल्या मुथारमन देवळाची गोष्टही अशीच आहे. मुथू ही सात भावात एक बहीण... अत्यंत देखणी. तिच्या देखणेपणामुळं तिचे भाऊ तिला घराबाहेर पडू देत नसत. पण एके दिवशी ताक विकायला जाणाऱ्या आपल्या वहिनीसोबत मुथू घराबाहेर पडली आणि गावातल्या जमीनदार तरुणाच्या नजरेत ती भरली. हे कळल्यावर तिच्या सात भावांनी तिला काठ्यांनी झोडपून मारली. या साऱ्या कथेची आठवण व्हावी, असेच हे मंदिर आहे. तिथं कसलीही मूर्ती नाही. फाल्गुन महिन्यात जेव्हा या देवीची यात्रा भरते तेव्हा एक मातीची कच्ची, न भाजलेली मूर्ती तिथं ठेवण्यात येते आणि काठ्यांनी झोडपून ती मूर्ती फोडण्यात येते. देवळाच्या चबुतऱ्यावर एक काटेरी झुडूप आहे. आपल्याला मारायला आपले भाऊ आले आहेत, हे कळल्यावर मुथू या झुडपाआड लपून बसली, अशी एक धारणा आहे. आजही वार्षिक उत्सवाच्या वेळी आलेल्या आयाबाया या झुडपाला बांगड्या, छोटे पाळणे आणि मंगळसूत्र बांधून आपल्या वैवाहिक अडीअडचणीकरिता नवस बोलतात. पण यासाठी बिचाऱ्या मुथूच्या पायाशी डोकं टेकवायचं, जिचं बिचारीचं ना लग्न झालं होतं, ना मूलबाळ...! अशा किती गोष्टी. आपल्या जुन्या सरंजामशाही व्यवस्थेतील स्त्री-अत्याचाराला तोंड फोडणाऱ्या... स्त्रीला मारायची आणि तिला देवत्व बहाल करायचं...! समाजाच्या मनातलं गिल्ट असं व्यक्त होत असावं किंवा दहशतीची ही मूक भाषा असावी; आणि बायाबापड्या, समाजबाह्य घटक, परंपरेतून उभा राहिलेल्या परंतु प्रस्थापितांचे हित जपणाऱ्या अशा कर्मकांडांभोवती आपली स्वप्नं विणत राहतात. २००७मध्ये झालेलं मनोज आणि बबलीचं ऑनर किलिंग असं वर्षानुवर्षे इथं होतं आलं आहे. पोथीअम्मल आणि मुथू त्याच्या साक्षीदार आहेत.

खरं म्हणजे, स्त्री-पुरुष संबंधाकडे निकोप नजरेने पाहणारीही एक विचारधारा इथं वाहताना दिसते. खजुराहोची कामशिल्पं असोत, की कामसूत्राची निर्मिती असो... शरीरसंबंधाकडे पाहण्याची निरामय दृष्टी यातून व्यक्त होत राहते. विवाहपूर्व संबंधाबाबत आपलं व्यक्तिगत मत व्यक्त करणाऱ्या खुशबू या अभिनेत्रीवर अनेकांनी खटले दाखल केले, त्या वेळी त्या सगळ्या तक्रारींचा आढावा घेताना साक्षात सुप्रीम कोर्टानं लिव इन रिलेशिनशिपवर भाष्य करताना, ‘दोन प्रौढ व्यक्तींनी लग्न न करता एकत्र राहणं, यात काहीही वावगं नाही. यात अनैतिक असं काय आहे? आपल्या पुराणकथांनुसार कृष्ण आणि राधा यांचे नातेदेखील आजच्या लिव्ह इन रिलेशनशीपसारखेच होते.’ अशी टिपणी केली होती. विशेष म्हणजे, या वेळी के जी बालकृष्णन हेच भारताचे सरन्यायाधीश होते. कृष्ण-राधा आपल्याला कळतात, पण त्यांच्या नातेसंबंधाचा पोत आपल्याला कळतो का? श्रीकृष्णाच्या एकूणच जगण्यात स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे एक विलोभनीय इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळते. रुक्मिणी, राधा यांबरोबरच त्याचे आणि द्रौपदीचे नातेसंबंध आपल्याला स्त्री-पुरुष नात्याचा एक वेगळाच रंग दाखवितात. या नातेसंबंधाला कोणतेही नाव नाही. द्रौपदी ही त्याची सखी आहे. त्याचं आणि तिचं नातं रूढ रंगात रंगविता न येणारं आहे. त्याला कोणतं नाव देणंही कठीण आहे. तरीही आपण अनेकदा व्यवहारात स्त्री-पुरुष नात्याला कोणते तरी नाव देण्यासाठी आग्रही असतो. अशा कोणत्याही नात्यापलीकडील नातं आपलं आकलन कुंठित करतं की काय, कोण जाणे? नात्याचा हा स्पेक्ट्रम आपल्या आवाक्यातच येत नाही. आणि म्हणूनच ही सारी मिथकं हाताला न लागणारी, कवेत न येणारी आभासी स्वप्नं होऊन बसतात आणि प्रत्यक्ष व्यवहारात मुथू आणि पोथीअम्मल यांची गोष्टच आपलं जगणं व्यापून टाकते. आणि आपण मनोज-बबलीसारखी नवी जिवंत मिथकं घडवत जातो.

अनेकदा ही मिथकं, त्यातला अत्याचार कालानुरूप स्वच्छ करून घेऊन प्रस्थापित सरंजामी आणि पुरुषी व्यवस्थेला रुचेल, आवडेल अशी मिथकांची मांडणी होत जातानाही पाहायला मिळते. कारण अशा मांडणीतूनच प्रस्थापित व्यवस्थेला हवी असणारी ‘कल्चरल करन्सी’ विकसित होत असते. ग्रीक दंतकथेतील युरोपा या देखण्या कन्येचे मिथक याबाबत बोलके आहे. झेऊस या आकाशीच्या देवाची नजर एकदा युरोपा या देखण्या तरुणीवर पडली आणि तो तिच्यावर लुब्ध झाला. ती गुरं राखत असताना त्यानं बैलाचं रूप घेतलं आणि तिच्या जनावरांमध्ये मिसळला. युरोपा लाडानं या धष्टपुष्ट बैलाची मान चोळत असताना त्यानं तिला पाठीवर घेतलं आणि धूम ठोकली. समुद्र ओलांडून तो क्रेटाला पोहोचला आणि त्यानं त्याचं खरं रूप प्रकट केलं. तिच्याशी रत होत त्यानं आपली इच्छा पूर्ण केली. आधुनिक कायद्याच्या भाषेत हा बलात्कार होता, पण २००२मध्ये युरोपियन युनियननं जेव्हा आपलं नाणं तयार केलं तेव्हा बैलावर आरूढ झालेल्या अर्धनग्न युरोपाचं चित्र त्यावर होतं. युरोपाच्या कहाणीचा अवघा आशय काळाच्या ओघात बदलला होता. रेप झालेली युरोपा युरोपिअन युनियनला जोडणारं प्रतीक झाली होती. याला मिथकांचं सॅनिटायझेशन म्हणतात. आपल्याकडंही तुळशीच्या कथेबाबत असंच काहीसं झालं आहे. जबरदस्ती करून बाईला आपलीशी करणे, ही पुरुषी मानसिकता या साऱ्यातून व्यक्त होत राहते. मग बायकाही या कल्चरल करन्सीच्या बळी होत जातात. ‘अजूनही बायका पुरुषांच्या स्वप्नांतून आपली स्वप्नं पाहतात,’ हे सिमॉन द बुवाचं निरीक्षण शेवटच्या स्तरापर्यंत बदलत जायला किती तरी कालावधी जावा लागतो. खरं म्हणजे, आपण कोण आहोत, आपण कोठून आलो आहोत, आणि आपल्याला काय व्हायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या मिथकांमध्ये आणि आपल्या मिथकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडली आहेत, हे जितक्या लवकर आपल्याला कळेल तेवढे चांगले...!!!
(dr.pradip.awate@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...