आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारूड परंपरेचे चालतेफिरते व्यासपीठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुजनातील अज्ञान, अंधकार दूर व्हावा, यासाठी संतांनी भारुडाची निर्मिती केलेली आहे. भारुडातून अध्यात्म सांगत, समकालीन मूल्य साधण्याचा प्रयत्न अनेक संतांच्या रूपकातून झालेला आहे. मात्र अध्यात्म ही संकल्पना प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाला अतिशय गुंतागुंतीची वाटते. त्यामुळेच सर्वसामान्यांना अतिशय गंभीर आणि अनाकलनीय वाटणारे जे तत्त्वज्ञान आहे, ते फार मोठ्या प्रमाणात भारूड या प्रयोगात्मक लोककला प्रकारातून बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक संतांनी केला आहे.

भारुडाचा उगम कधी आणि केव्हा झाला, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण हरिकीर्तनाच्या परंपरेतून भारुडाचा जन्म झाला असावा. कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रात संत नामदेवांनी सुरू केली. लळितामधून ‘रूपक’ हा नाट्यप्रकार उदयास आला. भक्ताने रूपधारी पद्धतीने केलेले गुणगाण म्हणजेच, भारूड होय. संतानी अनेक रूपके रचून त्याचे सादरीकरण बहुजनांपुढे केले. भारुडाला रूपक म्हणून संबोधण्याचे कारण ते द्वयर्थी असते. शब्दरचना जरी एक असली तरी त्याचे अर्थ दोन निघतात. त्यातला एक अर्थ व्यावहारिक असतो, तर दुसरा पारमार्थिक. भारूड हे जरी काव्य असले तरी त्यात नाट्यांग मोठ्या प्रमाणात दिसून येते. संत एकनाथ महाराजांनी आपली भारुडे अठरापगड जातीच्या आख्याड्यात वावरणाऱ्या बहुरूप्यासारखी केली आहेत. म्हणून त्यांच्या रूपकांसाठी डौरी, गोंधळी, वाघे, गोपाळ, महार इ. भटका समाज वापरला आहे. अध्यात्म हे सरळसरळ न सांगता ते रूपकांच्या माध्यमातून सांगण्याची खुबी नाथांनी लीलया पेलली आहे. भारुड सादरीकरणाच्या पद्धतीचे दोन प्रकार पडतात- एक भजनी भारूड आणि दुसरे सोंगी भारूड.

भारुडाची परंपरा जोपासणारे लोककलावंत महाराष्ट्रात आपणास पुष्कळ दिसतात. त्यातले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे, भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पंढरपूरच्या चंदाबाई तिवाडी. प्रवाहाच्या विरोधात उभे राहून संत परंपरेची पताका डोईवर घेऊन चंदाताई सन १९७२पासून भारुडाचे बहुजनांच्या मनावर गारूड करत आल्या आहेत. चंदाताईंची भारूड सादरीकरणाची पद्धती ही सोंगी भारुडाची आहे.

चंदाताईंची वेषभ्ूषा धारण केल्यानंतरची छटा वेगळीच असते. त्यातूनच त्या समाजाला पारमार्थिक अर्थाचा बोध पटवून देतात. उत्कृष्ट वक्तृत्व, अभिनयशैली, त्याला नृत्याची झालर लावून त्या कधी समाजाला उपदेशात्मक चिमटे काढून तर कधी विनोदातून उपहास व्यक्त करतात. मुंबई-पुण्याचा नागर समाज असो, की सभा, साहित्य, नाट्य संमेलने असो; हजारो लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकद चंदाताईंच्या सोंगी भारुडात आहे. चंदाताई या बहुआयामी आहेत. त्यांना संतसाहित्याचा सखोल अभ्यास आहे. परिवर्तनाची कास धरलेल्या चंदाताई नुसत्याच संतांनी रचलेल्या पारंपरिक रचना साभिनय सादर करत नाहीत, तर एड्स, पल्स पोलिओ, गुटखा बंदी, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, प्राणीप्रश्न, महिला सबलीकरण, राष्ट्रीय एकात्मता याविषयी आत्मीयतेने दृष्टांत देतात. अशा हरहुन्नरी चंदाताईंचा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची, म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही. 

जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चंदाताई आज भारूड परंपरेतील चालतेबोलते विद्यापीठच मानावे लागेल. सन १९६५मध्ये पंढरपूरच्या तिवाडी कुटुंबातील जगदीश प्रसाद तिवाडी यांच्याशी चंदाताईंचा विवाह झाला. बालवयापासूनच चंदाताईंना शिवणकामाची मोठी आवड होती. हेच सामाजिक भान ठेवून चंदाताईंनी गरीब, कष्टाळू, विडी कामगार महिलांसाठी शिवण उद्योगही सुरू केले. विवाहबद्ध झाल्यानंतर चंदाताईंना दोनच वर्षांत क्षयरोगाने ग्रासले. परंतु त्यांनी पांडुरंगाच्या आशीर्वादाने क्षयरोगावर मात केली. पांडुरंग म्हणजेच प्राणायाम. पांडुरंग म्हणजेच, त्यांना आत्मसात असलेली टीपेतील गायकी. याच भांडवलावर क्षयरोगावर मात करून त्या परमार्थाला लागल्या आणि सामाजिक बंधने झुगारून भारूड परंपरेत स्वतःला झोकून दिले. चंदाताईंना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुंडा महाराज देंगलूरकर यांचे सान्निध्य लाभले. दुंडा महाराजांचा आदर्श ठेवून त्यांनी आपल्या भारूड सादरीकरणाला सुरुवात केली.

भारूड पाठांतर आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याचे सादरीकरण ही खुबी चंदाताईंनी आत्मसात केली. १९८१मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रातून त्यांना भारूड सादरीकरणाची पहिली संधी चालून आली. पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे त्या लोकांच्या घराघरात पोहोचल्या. पुढे नागपूरला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी त्यांना निमंत्रित केले. आणि तेथून पुढे जणू काही भारूडरूपी चंदाताई एक्स्प्रेस वाऱ्याच्या वेगाने धावू लागली. अध्यात्माबरोबर समाजाला त्या उपदेश करू लागल्या. अशातच त्यांना डॉ. प्रकाश खांडगे यांनी नागर रंगभूमीवर सादरीकरणाची संधी दिली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत मानद व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले. 

नेहरू युवा केंद्र, सोलापूर येथील मानाचा समजला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, सखीमय पुरस्कार इ. पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. हेच त्यांचे कार्य पाहून २०११मध्ये भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने सर्वोच्च मानाचा वरिष्ठ गटातील लोककलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चंदाताईंनी १९८२मध्ये पंढरपूरजवळ गोपाळपूर या खुरटही न उगवणाऱ्या माळरानावर एकूण १५० गोरगरीब कुटुंबांना घरकुल योजनेतून निवारा उपलब्ध करून दिला आहे. अशा या चंदाताई तिवाडी मारवाडी कुटुंबातल्या, पण व्यवसाय न करता अाध्यात्मिक मार्गाने समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे. त्यांना व त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!

- डॉ. गणेश चंदनशिवे
 संपर्क - ९८२०४५१७१६