आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्त होण्याची संधी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण भारतीय लोक मुळातच उत्सवप्रिय. कुठलाही सण-समारंभ पूर्वापार साग्रसंगीत साजरा करत आलेलो आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये सण साजरे करण्याच्या पद्धती जरा बदलल्यात, पण उत्साहात कुठेच कमतरता आलेली नाही, उलट त्याची भव्य-दिव्यता वाढली आहे, दिखाऊपणा आला आहे. यात व्यापारीकरणाचा मोठा हात आहे, असं मान्य केलं तरी दुरावलेल्या माणसांना एकत्र आणण्याची ताकद यात नक्कीच आहे.

 पूर्वापार चालत आलेल्या भारतीय सणांसोबतच पाश्चात्त्यांकडून घेतलेले डेजसुद्धा आपण तितकेच आनंदाने साजरे करतो. फ्रेन्डशिप डे, मदर्स डे, फादर्स डे, डॉटर्स डे, व्हॅलेंटाइन डे असे कोणते न कोणते डेज वर्षभर आहेतच साजरे करण्यासाठी. तथाकथित संस्कृतिरक्षकांनी आता आईवडलांचे जिवंतपणीच दिवस घालायचे बाकी राहिले होते, अशी आरोळी फोडली.
 
प्रेमाचे कसले दिवस साजरे करता? प्रेमाच्या नावाखाली स्वैराचार सुरू आहे न काय काय म्हणत तोडफोडही केली. करणाऱ्यांनी तेव्हाही लपूनछपून व्हॅलेंटाईन डे साजरा केलाच, उलट व्हॅलेंटाईन डे साजरा करताना त्यात त्यांना जास्तच थ्रिल वाटले असेल. विरोधाला विरोध करणे, नको करू म्हटले की मुद्दाम करणे हा अंगभूत किडा असतोच सगळ्यांमध्ये. असो. मुद्दा हे दिवस साजरे करणे योग्य की अयोग्य हा नाहीये. हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो.
 
मुळात कोणत्याही नात्याप्रती असणारी भावना व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा ठरतो का? एका दिवसापुरतेच असते का प्रेम? आईवडिलांविषयी वाटणारी कृतज्ञता एका दिवसापुरतीच व्यक्त करायची का? नाही. प्रश्न आहे दृष्टिकोनाचा. तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कसे बघता याचा. कोणत्याही नात्यात अमुक एक दिवस साजरा केला तरच नात्याविषयी काही भावना आहेत अन्यथा नाहीत, असे काहीच नसते. पण व्यक्त होणे खूप गरजेचे असते. 

वेळोवेळी भावना व्यक्त करणे आणि भावनांचा योग्य रीतीने निचरा होणे नात्यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हितकारक ठरते. व्यक्त होण्यासाठी वेळोवेळी मिळणारी संधी म्हणून आपण याकडे बघू शकत नाही का? एखादा डे, एखादा सण साजरा केला नाही तर आपल्या आयुष्यात फरक पडत नाही, पण तो साजरा केला तर मात्र नक्कीच सकारात्मक फरक पडतो.

 आपण साजरे करतो त्या सण-उत्सवातूनदेखील आपण आपल्या भावनाच व्यक्त करत असतो, अगदी श्राद्धपक्षापासून होळीपर्यंत सगळ्यातूनच. श्राद्ध करून पितरांबद्दलचे ऋण व्यक्त करतो, दसऱ्याला सोने वाटून संपन्नतेसाठी शुभेच्छा देतो, दिवाळीतसुद्धा लहानथोरांविषयी भावना व्यक्त करतो, राखीपौर्णिमा, गुरूपौर्णिमा, वटसावित्री, पाडवा अशी मोठी यादी आहे.
 
मराठी वर्षाच्या शेवटी येणारा होळीचा सण काय सांगतो, मनातला राग जाळून टाका, जो राग आत असेल तो मोकळा करा, शिव्या द्या ओरडा पण मोकळे व्हा. आणि मोकळे झालात की बघा, आयुष्य किती सुंदर रंगांची उधळण करत असतं. आपले सण हे भावनिक ऑडिटचं परफेक्ट पॅकेज आहे. त्यात भर पडली तर हरकत का असावी? 

आयुष्य पुढे सरकत जाते तशी नात्यांची आयुष्यात असणारी संख्याही वाढलेली असते. आयुष्यात असणाऱ्या अशा कित्येक नात्यांना आपण वेळ देऊन भावना व्यक्त करू शकत नाही. वेगवेगळ्या सण आणि डेजच्या माध्यमातून सकारात्मक भावना व्यक्त केल्या जाऊ शकतात. नुकताच व्हॅलेंटाइन डे झाला, प्रेम व्यक्त करा असं सांगणारा हा दिवस, नव्हे संपूर्ण आठवडाच. 

या दिवसाचा विचार फक्त तरुणाईपुरताच केला जातो; पण थोडं पुढे जाऊन नात्यात स्थिरावलेल्या व्यक्तींनी याकडे रिफ्रेश करणारी संधी म्हणून बघता येईल का, याचा विचार करावा. ज्यांना मनात असलेल्या भावना व्यक्त करणे चटकन जमत नाही, आज बोलू, उद्या बोलू, असं म्हणत जे व्यक्त होण्यासाठी योग्य वेळ शोधत असतात, त्यांना योग्य वेळ सापडतच नाही, अशांसाठी हे डेज टाइमलाइनसारखे उपयोगी पडू शकतात. हेच बघा ना, की नणंद एखाद्या दिवशी आपल्याला आवडते म्हणून खास भाजी करून आणते आणि खाऊ घालते. 
 
 
आपण भरभरून व्यक्त करत नाही. नणंदेप्रती असणारी भावना आपण व्यक्त करू शकतो. अशी कित्येक नाती कित्येक क्षण असतील. या भावना व्यक्त करण्यासाठी बाजारातील महागड्या वस्तूच देणे गरजेचे नाही. भावना व्यक्त करणे म्हणजे दिखावा करणे नव्हे, सध्या बाजारपेठेत दिसणाऱ्या आणि आकर्षित करणाऱ्या महागड्या भेटवस्तू देणे-घेणे आणि जगासमोर ते दाखवत मिरवणे, इंटरनेटवरून शुभेच्छा संदेश कॉपी करणे आणि सेंड टू ऑल करणे ही फॅशन झाली आहे.
 पण मनातून मनाकडे जाणारी एक भाषा प्रत्येक नात्यात असते.
 
प्रत्येक नात्याचे एक स्वतंत्र विश्व असते. त्यानुसार तुम्ही त्यांना खास असे पर्सनलाइज्ड गिफ्ट देऊन व्यक्त होऊ शकता. पर्सनलाइज्ड गिफ्ट म्हणजे अर्थात समोरच्या व्यक्तीला आवडणारी कोणतीही गोष्ट करू शकता. काहीही असे, जे समोरच्याला आवडू शकते, असे वाटेल ते. व्यक्त करण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन विचार करा. 
 
याचे दोन फायदे होतील. ज्या व्यक्तीसाठी आपण हे करत आहोत त्या व्यक्तीसाठी हे अविस्मरणीय आणि रोमांचित करणारे असेल. दुसरे म्हणजे आपण काही नावीन्यपूर्ण करू शकतो, आपल्यात ती ऊर्मी जिवंत आहे, याची नव्याने जाणीव होईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, जसे इतरांप्रती असलेले प्रेम व्यक्त कराल, तसे ते स्वतःप्रतीही व्यक्त करण्यास विसरू नका.

(v.nishigandha@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...