आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: तिळा तिळा दार उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी मेंदू म्हणजे कोरी पाटी नव्हे. तोसुद्धा उत्क्रांत होत आलेला अवयव आहे. ‘भाषेची क्षमता’ हीसुद्धा उत्क्रांत झालेली ‘जैविक क्षमता’ आहे. जैविक क्षमता उगाच उत्क्रांत होत नाहीत, त्याला ‘सर्वायव्हल व्हॅल्यू’ - ‘जीवनात तगून राहण्याचं मूल्य’ असतं. भाषेला तसेच भाषेच्या सौंदर्याला तसे मूल्य आहे, हे महत्त्वाचे...
 
लाख एक वर्षांपूर्वीचा कल्पित प्रसंग. होमोसापियन दगडाची हत्यारं करायला केव्हाच शिकला होता. त्या दिवशी मात्र एका आदिम मानवानं दुसऱ्या आदिम मानवाला शंखशिंपल्यातून तयार केलेले मणी दाखवले. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद. ते मणी तो त्याच्या प्रेयसीला शरीरसुशोभनासाठी भेट म्हणून देणार होता. सौंदर्याच्या जाणिवेचा तो अंधुक आरंभ होता.  त्याच सुमारास शब्दसौंदर्याची जाण मानवाला झाली असावी, असा माझा कयास.
मानवी मेंदू म्हणजे कोरी पाटी नव्हे. तोसुद्धा उत्क्रांत होत आलेला अवयव आहे. ‘भाषेची क्षमता’ हीसुद्धा उत्क्रांत झालेली ‘जैविक क्षमता’ आहे. आधी नुसते हातवारे, देहबोली होती; पुढे ‘बोली’ आली, त्यानंतर ‘लिखित भाषा’ आली. जैविक क्षमता उगाच उत्क्रांत होत नाहीत, त्याला ‘सर्वायव्हल व्हॅल्यू’ - ‘जीवनात तगून राहण्याचं मूल्य’ असतं. भाषेला तसेच भाषेच्या सौंदर्याला तसे मूल्य आहे, हे महत्त्वाचं.
संवाद - संपर्क
भाषेची क्षमता हा ‘कमुनिकेशनच्या’ विकासाचा पाया होता. भवतालातून मिळणाऱ्या ‘माहिती’चा (इन्फर्मेशन) जीवनात तगून राहण्यासाठी उपयोग करून घेण्यात भाषेच्या क्षमतेमुळे आमूलाग्र बदल झाला. संपर्क, संवाद, संदेश यात सौंदर्य तर हवंच. दुसऱ्याला मोहून टाकण्यासाठी, ‘आपलासा’ करून घेण्यासाठी सुरूप भाषेसारखं साधन नाही. मग भाषेला, शब्दाला सौंदर्य हवंच. भाषेच्या सौंदर्याचा खजिना उघडण्यासाठी ‘तिळा तिळा दार उघड’ म्हणायला हवं. ‘ओपन सिसेम’, ‘क्लोज सिसेम’ हे ‘अरेबियन नाइट’च्या सुरस कथांमध्ये असतं. ‘सिसेम’ म्हणजे ‘तीळ’. या चमत्कारिक कथांमधला ‘तीळ’ हे जादुई धान्य. त्या शब्दाचा वापर केला म्हणजे, गुहेवरचा दगड सरकतो. मराठीत त्याचं भाषांतर ‘तिळा तिळा’ असं केलं. शब्दजन्माची कहाणी शोधली की त्यातली गंमत कळते.

बहुरूपे
मराठी, गुजराती, बंगाली, फ्रेंच, इंग्लिश ही भाषेच्या क्षमतेची बहुरूपे. प्रत्येक भाषेत सौंदर्य असतेच. मराठी इतर भाषांपेक्षा जास्त सुंदर वगैरे गर्व करण्यात अर्थ नाही. लोकसंख्येवरून ठरवायचं असेल, तर मराठी ही जगातली पंधरावी, तर भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. पण भाषेची महत्ता नुसत्या लोकसंख्येवर अवलंबून नसते. याला अनेक कारणं आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे, भाषेत विविध विषयांत होणारी निर्मिती. ही निर्मिती जितकी जास्त तितकी भाषा समृद्ध. भाषेचा शब्दसंग्रहसुद्धा मोठा व सतत वाढणारा असायला हवा. इंग्लिश, फ्रेंच वगैरे भाषांच्या तुलनेत मराठी मागेच आहे. मराठी समृद्ध करणं, त्यातील शब्दावली वाढवणं हे मराठी भाषकांच्या हातात आहे.

शब्दप्रभाव 
भाषेची शब्दसंख्या जास्त असली म्हणजे, अनेक अर्थांचे शब्द त्यात येतात. भाषेचं संवाद कौशल्य हे त्यावर अवलंबून असतं. भाषा हे संवादाचं महत्त्वाचं साधन आहे. ही संकल्पना मूलभूत आणि दृढ आहे. व्यवहारातल्या भाषेपासून ललित साहित्य, वैचारिक साहित्य, विज्ञान विषय वगैरे हे सर्व परस्परसंवादाचे प्रकार आहेत. या सगळ्यांसाठी भाषा लागतेच. भाषेतील शब्दार्थाला जितक्या जास्त ‘छटा’ तितकी भाषा लवचीक आणि प्रभावी ठरते.
शब्द(भाषा) मानवी मेंदूत विचाराने तयार होतात. विचार प्रक्रिया ही मेंदूतील जोडण्यांवर आधारित असते. म्हणून शब्दांमध्ये मेंदूतील जोडण्या बदलण्याची क्षमता असते. म्हणजेच माणसाचे विचार बदलण्याची ताकद असते. हा शब्दप्रभाव.
शब्दप्रभावाचे एक उदाहरण पाहू. माणसानं दगडाची हत्यारं केली, तेव्हापासून ‘टेक्नॉलॉजी’ होती. पण ‘टेक्नॉलॉजी’ हा शब्द नव्हता. औद्योगिक क्रांती भर वेगात असताना १८०२मध्ये जर्मन प्राध्यापक जोहॅन बेकमन यांनी ‘टेक्नॉलॉजी’ हा शब्द गुंफला. ‘यंत्र व अवजारं यांची पद्धतशीर व्यवस्था’ हा त्याचा अर्थ. तेव्हा हा शब्द मानवी मेंदूविश्वात कायमचा ठसला. शब्द ज्या मेंदूत तयार होतो, तोच शब्द मेंदूतील जोडण्या बदलूही शकतो. मानवी मेंदूनं ‘टेक्नॉलॉजीचा’ ध्यास घेतला म्हणून ‘टेक्नॉलॉजी’ वेगानं फोफावली. एक टेक्नॉलॉजी दुसऱ्या टेक्नॉलॉजीला जन्म देते, म्हणून तर हा जणू निसर्गासारखा जिवंत फोर्स. त्याचं नाव ठेवलं, ‘टेक्नियम’. या टेक्नियमनं माणसाभोवती एक जटिल, एकमेकांना जोडणारं व सतत वाढणारं जाळं विणलं. त्या जाळ्यातून माणसाची आता सुटका नाही. केविन केली या विचारवंतानं ही संकल्पना मांडली आहे. या ‘टेक्नियमला’ मराठीत शब्द नाही.

भाषेची साखळी
जुन्या भाषेतून नवीन भाषा तयार होत असते. याला भाषेची परंपरा असेही म्हणतात. मराठीला अशीच भव्य परंपरा आहे. या परंपरेचं वर्णन दुर्गाबाई भागवत यांनी चपखल शब्दांत केलं आहे. ‘जुनेनवे ग्रंथ माझीच अनंत जन्मींची अनंत रूपे मला वाटायची.’ पण नुसत्या परंपरेवर विसंबून शब्दशक्ती वाढत नाही.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानातले शब्द मराठीत कमी असले, तर तो मराठी भाषेचा दोष नाही. जे ज्ञान इथं निर्माण झालं नाही, तर त्याचे शब्द कसे या भाषेत उगवणार? ज्या भाषेत नवीन ज्ञान निर्माण होतं त्याच भाषेत नवीन शब्द उगवतात. आज मराठीला ते शब्द आयात (इम्पोर्ट) करावे लागतात, आपलेसे करावे लागतात. पाश्चात्त्य भाषांच्या साखळीशी मराठीची साखळी जोडावी लागते. त्यानेच भाषाबळ वाढते. पण शब्दसौंदर्यात मराठी मुळीच कमी पडत नाही. ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते आधुनिक लेखक, कवी, विचारवंत यांनी अमृताते पैजा जिंकणारी निर्मिती केली आहे. नानाविध संवेदनांची अनुभूती मराठी भाषकांना दिली आहे.  
शब्दरंगाची किमया करत ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ अंथरणारे बालकवी काजव्यांना ‘इवल्याशा दिवल्या’ म्हणतात.
 संध्यापर्वाचं वर्णन करताना कवी ग्रेस ‘लाल डाळिंबाचे दाणे/मेघ घट्ट रंगविले’ अशी रंगसंवेदना देतात.
तुम्ही सागरतिरी उभे आहात, समोरून येणारी लाट दगडावर फुटते. "खडकावर फुटलेल्या नि:संकोच लाटेतून कबुतरे उडाली’ कवी अरुण कोलटकर अशी दृक‌्संवेदना आपल्याला देतात.
कुमारिकेबद्दल सांगताना ‘जिच्या हिनकळत्या देहाला होताहेत फक्त बहरांचेच स्पर्श’ अशी तरल स्पर्शसंवेदना वाचकाला कविता महाजन करून देतात.
‘गिरीचे मस्तकी गंगा तेथूनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे’ शिवथरघळीच्या धबधब्याची अनुभूती रामदास अशी समर्थपणे वाचकाचे कान व डोळे तृप्त करत देतात. 
जशी पद्याची उदाहरणं दिली, तशी गद्याचीही देता येतील. जुन्यातून नव्यात व नवं परत ‘जुनं’ पुढच्यांकरता तयार करून ठेवण्यासाठी. अशी ही साखळी. ‘मऱ्हाठी लावणी’बद्दल म. वा. धोंड लिहितात, ‘लावणी ही शुद्ध मराठी काव्यातूनच कशी उत्क्रांत झालेली आहे.’ यातील ‘उत्क्रांत’ शब्द महत्त्वाचा. भाषेची साखळी, परंपरा म्हणजे, भाषा उत्क्रांत होणं. जैविक क्षमता उत्क्रांत होत असतात. जुन्या भाषा तशा मृत होत नाहीत. त्या ‘जीवाष्म’ असतात. मराठीत नवे शब्द तयार करण्यासाठी संस्कृतकडे जावं लागतं. ‘पृथ्वी’ हा अर्थ असलेले ३७ शब्द अमरकोशात दिले आहेत. नवे शब्द तयार करण्यासाठी इंग्लिश लॅटिन, ग्रीकचा आधार घेते, तर मराठी संस्कृतचा. 

अमूर्ततेतून मूर्ततेकडे
विचार अमूर्त असतात, त्याचा आविष्कार मूर्त शब्दातून होतो. याची कवी-लेखक यांना जाण असते. ‘कारण शब्दांनीच/अमूर्त आशयाचे/मूर्त ध्वनींशी लागते मंगल.’ असे विंदा करंदीकर यांनी ‘शब्दब्रह्म’ या कवितेत म्हटले आहे. 
परा, पश्चन्ती, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे भाग भारतीय मानतात. परा, पश्चन्ती या अमूर्त, मध्यमा आणि वैखरी या मूर्त. आपण मनातल्या मनात बोलतो ती मध्यमा. माणूस वाणीने बोलतो, ती वैखरी. कवी ‘बी’ यांनी, या वैखरीला ‘राठ वैखरी’ असे म्हटले आहे. 
विचार अमूर्त म्हणजे, विचारांची प्रक्रिया अमूर्त. ती मेंदूत नेणिवेत चालते. पण विचार आपण भाषेत करतो, असे माझे मत आहे. हे विचार माणूस बोलतो-लिहितो. त्यालाच आपण ‘शैली’, ‘स्टाइल’ म्हणतो. ब्युफों या फ्रेंच जैवशास्त्रज्ञाच्या सुप्रसिद्ध उक्तीचं ‘स्टाइल इज नथिंग लेस दॅन मॅन' असं इंग्लिश भाषांतर भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांनी केलं आहे. 

‘ब्युफोंला म्हणायचे आहे ते असे- लेखनाचा विषय माणसाबाहेरचा असतो. मात्र लेखनाची भाषाशैली ही थेट माणूसच असते - विचारशक्ती, चित्त, अभिरुची हे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे तिन्ही पैलू भाषाशैलीच्या रूपाने उपस्थित असतात. ब्युफों हा मूलत: जीवशास्त्रज्ञ होता, हे लक्षात घेण्याजोगे आहे.’ असे अशोक केळकर यांनी ‘रुजुवात’मध्ये एका तळटीपेत लिहिले आहे.
मानवी जैविक क्षमता या प्रयत्नाने किती वाढवता येतात, हे आपण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये बघतो. भाषा या जैविक क्षमतेचं बळही प्रयत्नानं वाढवता येतं. त्यामुळे ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही सुरेश भट यांची काव्यपंक्ती जर प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर मराठी भाषकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्याला पर्याय नाही.

drjoshianand628@gmail.com
लेखक संपर्क : ९८३३०२९६६९
बातम्या आणखी आहेत...