आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: उपेक्षितांमध्ये संशोधनाची उर्मी मोठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएच.डी. पदवीचे सर्वप्रथम मानकरी डॉ. द. न. गोखले (१९५२) हे ठरतात. त्यानंतर गेल्या ६५ वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण ५१८ व्यक्तींनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. विभागामध्ये १९८२ ते नोव्हेंबर २०१६ या गेल्या ३४ वर्षांच्या कालावधीमध्ये ४१२ व्यक्तींनी प्रबंधिका सादर करून एम. फिल. ही पदवी प्राप्त केली आहे... 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा आणि साहित्य या दोहोंवर मराठी विभागातून झालेले आजवरचे संशोधन हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नावाजले गेले आहे. १९९० नंतर मराठी समाजात, साहित्यात जे बरेवाईट बदल झाले; ते मुळात जाऊन धुंडाळण्याचा प्रयत्न एम. फिल. व पीएच.डी.च्या माध्यमातून सध्याचे विद्यार्थी करीत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर आजचे आघाडीचे  कवी प्रा. संतोष पद्माकर पवार (मंचर/श्रीरामपूर) हे ‘नव्वदोत्तरी मराठी कविता ः स्वरूप, संकल्पना आणि वाटचाल’ या विषयावर पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत.
अर्थात, मराठी भाषेच्या किंवा तिच्या बोलीभाषेच्या अंगाने फारसे संशोधन होताना दिसत नाही. आमच्या विभागामध्ये केवळ दोनच अभ्यासक या विषयावर संशोधन करीत आहेत. भानुदास कुलाल हे ‘लोकराज्य नियतकालिकाचे वाङ‌्मयीन कार्य’ (संतविषयक, लेखकविषयक, नाट्यविषयक, भाषाविषयक विशेषांकांच्या संदर्भात) या विषयावर संशोधन करीत आहेत, तर पुरुषोतम तायडे हे ‘वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींमधील म्हणींचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर संशोधन करीत आहेत. तौलनिक अभ्यासाकडे मात्र आजच्या अभ्यासकांचा कल काहीसा वाढलेला दिसतो आहे. हे अभ्यासक भाऊ पाध्ये आणि सआदत हसन मंटो, भालचंद्र नेमाडे आणि एंगुगी वा थियोन्गो, संत सेनामहाराज आणि संत रविदास यांचा तुलनात्मक अभ्यास करीत आहेत.

मध्यपूर्व आशियातील साहित्य, भारतीय लेखिकांच्या कादंबऱ्या, डॉ. यु. आर. अनंतमूर्तींचे  साहित्य हे सर्व मराठीत अनुवादित झाले असून त्याचाही धांडोळा काही अभ्यासक आपल्या प्रबंधांमधून घेत आहेत. दोन अभ्यासक हे ‘दै. सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ यांचे कार्य आपल्या प्रबंधांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गौतम बुद्ध, अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, म. फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. गोविंद गारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, नामदेव ढसाळ, सतीश आळेकर यांच्याशी संबंधित विषय घेऊन पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत. मुस्लिम समाज आणि आदिवासी समाजही आता पुढे येत चालला आहे. अभ्यासकांचेही लक्ष या समाजाच्या साहित्याकडे वेधले जात आहे. आमच्या विभागामध्ये या विषयांशी संबंधित विषयांवर संशोधनकार्य काही अभ्यासक करत आहेत. 
सध्या एम. फिल. आणि पीएच. डी. करणाऱ्यांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असलेले अधिक दिसतात. शिवाय  ते दलित, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम अशा उपेक्षित समाजघटकांतूनही आलेले दिसतात. पुष्कळदा ते त्यांच्या घराण्यातील पहिलेच उच्चविद्याविभूषित ठरत आहेत. 

(मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे )
भ्रमणध्वनीः ९८५०६१३६०२
avinashsangolekar@unipune.ac.in
बातम्या आणखी आहेत...