आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: निखळ संशोधन व्यवहाराचा आग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाची स्थापना १९७९ मध्ये झाली. या विभागात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील गोरगरीब मुले शिक्षणासाठी येत असतात. यांची जडणघडण खेड्यापाड्यांत झाल्यामुळे आपापल्या मौखिक परंपरा, बोली यांसह ही मुले विभागात वावरत असतात. या मुलांच्या पाचवीलाच दारिद्र्य पुजलेले असते. तरीही परिस्थितीशी चिवट झुंज देत त्यांचे अध्ययन सुरू असते. मुलांना संशोधनाची गोडी लागावी, म्हणून एम. ए. भाग १ व २ मध्येच क्षेत्रीय अभ्यासाची सवय लावण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये लोकगीते, लोककथा, दैवतकथा, बोलीतील म्हणी, बोलीतील संपत चाललेले शब्द संकलित करून त्याबाबत स्वतःचे अनुभव मांडण्याची संधी दिली जाते. एम. फिल. व पीएच. डी. साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन, बोलींचा अभ्यास, लोककलांचा अभ्यास याकडे विशेष आस्थापूर्वक वळविण्याचे काम सुरू असते. विभागात आजमितीस ६३ विद्यार्थी एम. फिल. करत असून पीएच. डी. पदवीसाठी १०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंपरागत विषय टाळून अभ्यासाच्या नव्या क्षेत्राकडे त्यांनी वळावे, यासाठी विभागात विशेष प्रयत्न केले जात आहेत.

वाहन व्यवहारातील मराठीचा वापर, वाड्या-वस्तीतील दलित समाजाची वाचन अभिरुची, महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे अध्यापन, मराठी अध्यापनाच्या नव्या पद्धती, संशोधन व्यवहारातील समस्या, मराठीतील कोश वाङ‌्मय इत्यादी विषयांवर सध्या विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन सुरू आहे. विभागात मोडी व देवनागरी लिपीबाबतही संशोधन सुरू असून छत्रपती घराण्यातील मोडी दस्तऐवज भाषेच्या दृष्टीने अभ्यासण्याचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकवाद्यांच्या संकलनाचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले असून प्रत्येक वाद्याच्या वाजविण्याच्या विविध पद्धती ध्वनिमुद्रित करून वाद्यखोली तयार करण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांनी पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच या तिन्ही जिल्ह्यातील दैवतकथांवर वेगवेगळे प्रबंध सिद्ध झालेले आहेत.
 
विभागामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील लेखक सूची बनविण्याचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पात प्रत्येक खेड्यात लिहिणाऱ्या लेखकाची नोंद संकलित केली आहे. आयुर्वेद, खगोलशास्त्र, शेती, हवामानशास्त्र, आहारशास्त्र, पोवाडे, पाळणे, दैवतकथा, कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, तमाशांचे वग इत्यादी लिहिणाऱ्यांची नोंद या सूचीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे काळाआड गेलेल्या अनेक लेखकांचे साहित्य या निमित्ताने प्रथमच वाचकांसमोर येत आहे. या प्रकल्पाचा उपभाग म्हणून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील सर्व विषयांच्या लेखकांचे प्रकाशित ग्रंथ विभागात संकलित केले जात आहेत. आजवर १,२१३ ग्रंथ उपलब्ध झाले असून संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. यामुळे विभागात संपन्न ग्रंथालयही निर्माण होत आहे. 

विभागात चंदगडी बोलीचा अभ्यास, श्रद्धा व अंधश्रद्धेची भाषिक संरचना, मराठी कवितेवरील बुद्ध विचाराचा प्रभाव, कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे साहित्य प्रकाशित केले जाणार आहे. या प्रकल्पाचे कामही या विभागात सुरू आहे. याबरोबरच ‘तृतीयपंथीयांच्या बोलीचा अभ्यास’ हा बृहद प्रकल्प विभागामार्फत घेतलेला आहे. उपरोक्त प्रकल्पांव्यतिरिक्त मराठी अध्यापनांबाबत संशोधन गरजेचे असल्यामुळे याबाबतचे प्रकल्पही हाती घेण्यात आलेले आहेत. 

अलीकडच्या काळात खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी धुमाकूळ घातल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. या परिस्थितीशी मुकाबला करता यावा, म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना विभागाने स्वतःशी जोडून घेतले आहे. या शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग त्यांच्या त्यांच्या गटविभागात घेतले जात आहेत. यासाठी या शिक्षकांना सततच्या संपर्कात ठेवले गेले आहे. माध्यमिक शाळांतील सर्व विषयांच्या शिक्षकांना मराठीबाबत साक्षर करण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलेला आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मराठीबाबत प्रत्येक मराठी विभागाने भरीव काम केले तर इंग्रजी शाळांचे वाढते वर्चस्व कमी करण्यात यश मिळणार आहे, अशा निष्कर्षाला हा विभाग आलेला आहे. 

विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, चर्चासत्रे सातत्याने घेतली जात आहेत. या वर्षीपासून विद्यापीठ परिसरात सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी या विद्यापीठ क्षेत्रातील ६० नवोदित लेखकांची कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यात आली. याबरोबरच विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयातील लिहिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विद्यार्थी-लेखक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. वाचनविकास कार्यशाळाही घेण्यात आली. वाचनाभिरुची वाढविणे, वाचनाचे दृष्टिकोन समजावून देणे व वाचन ही गंभीर प्रक्रिया आत्मसात करण्यासाठी घ्यावयाचे परिश्रम याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अशा स्वरूपाच्या कार्यशाळांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. 

विभागामार्फत ग्रंथ प्रकाशनाचे प्रयत्नही गंभीरपणे केले जात आहेत. ज्येष्ठ लेखक दत्ता देसाई यांनी विभागात ‘आधुनिकता व उत्तरआधुनिकता’ या विषयावर दिलेली तीन व्याख्याने विभागामार्फत प्रकाशित केली जात आहेत. याबरोबरच ‘समकालीन भारतीय साहित्य’ या विषयावर विभागात झालेली व्याख्याने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विभागात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे आधुनिक मराठी साहित्य हे ज्ञानमंडळ कार्यान्वित झाले असून ‘नोंद लेखनाचा प्रशिक्षण वर्ग’ लवकरच घेण्यात येणार आहे.

संशोधन व्यवहार निखळ राहावा, यासाठी शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग सततच आग्रही राहिला आहे. विभागाची कामगिरी वेगवेगळ्या प्रकारे उल्लेखनीय असली तरी, अलीकडे मराठी विषयाची निवड बुद्धिमान विद्यार्थी कमी करत असल्यामुळे, विविध अडचणी निर्माण होत आहेत. बुद्धिमान मुलांना मराठी विषयाकडे वळविण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध सुरू आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच यासाठी भरीव श्रम घेण्याची गरज असल्यामुळे विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे.
 
साहित्यातले समाजअंग उजळले...
१९८२मध्ये पॉप्युलर प्रकाशन व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘मराठी कादंबरी ः प्रेरणा व स्वरूप’ हा निबंध सादर केला. आणि मराठी समीक्षेतील केंद्र, परीघ ही संकल्पनाच बदलून गेली. या चर्चासत्रातील निबंधांचे एकत्रीकरण करून ‘मराठी वाङ‌्मय प्रेरणा व स्वरूप’ हा ग्रंथ सिद्ध झाला. हे नोंदविण्याचे कारण असे की, यानंतरच मराठी साहित्यात सामाजिक दृष्टीने अभ्यासाची परंपरा निर्माण झाली. विभागाने आजवर दिलेले योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे.
(विभाग प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
 
इमेल आयडी : rajan.gavas@gmail.com
संपर्क क्रमांक : ९४२२५८०५१७
 
बातम्या आणखी आहेत...