आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: गोमांतकात नांदते मराठी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गोवा विद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही...
 
कोणत्याही विद्यापीठाच्या  ज्ञानशाखांचे कार्य हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक अध्यापन आणि दुसरे संशोधन. गोवा विद्यापीठाच्या कला विभागात भाषा आणि साहित्य उपविभागांतर्गत मराठी भाषा विभागही याला अपवाद नाही. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच म्हणजे १९८५ पासून संशोधनाचे कार्य या विभागामध्ये चालत आलेले आहे. गेल्या काही वर्षांत त्यात संख्यात्मक वाढ झालेली आहे. परंतु गुणात्मक वाढीचे काय? असा प्रश्न साहजिकच कुणाही अभ्यासकाच्या मनात निर्माण होणे अपरिहार्य आहे. 

आजमितीला या विभागातून सुमारे १२ संशोधक विद्यार्थी पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. सध्या असा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या कार्यात १४ विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन विषय असे आहेत : मराठी एकांकिकेचा रूपबंध आणि आशय : एक चिकित्सात्मक अभ्यास, अरुण हेबळेकर यांचे कथानक साहित्य - एक चिकित्सात्मक अभ्यास, संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा वाङ‌्मयीन व भाषिक अभ्यास, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी कविता : स्वरूप आणि शैली, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी ललित निबंधाचा चिकित्सात्मक अभ्यास, मराठीतील क्रौर्यनाट्य : एक चिकित्सक अभ्यास, दक्षिण कोंकण प्रदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कादंबरीतील कथनाचा सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लेखकांचे मराठी प्रवासवर्णन : एक चिकित्सक अभ्यास, १९९० नंतरच्या मराठी कादंबरीचा चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय मराठी आत्मचरित्रात्मक लेखनाचा चिकित्सक अभ्यास (प्रारंभ ते २०१०), शांता शेळके, सुनीता देशपांडे, इंदिरा संत, प्रतिमा इंगोले, अरुणा ढेरे या साठोत्तरी लेखिकांच्या विशेष संदर्भात ललित निबंधाचा चिकित्सक अभ्यास. गोमंतकीय ख्रिस्ती मराठी साहित्याचे संशोधन व संशोधक : एक चिकित्सक अभ्यास, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांचे मराठीतील संशोधन कार्य : एक चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लोकनाट्य : रणमाले याचा चिकित्सक अभ्यास.
उपरोक्त अभ्यास/संशोधन विषयक सूचीवर एक नजर टाकली असता, गोवा विद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही. येणाऱ्या काळात इथले संशोधक छात्र संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्राचा अभ्यास करून नव्या व उपेक्षित वाटा व दिशांचा धांडोळा आपल्या संशोधनकार्याचा विषय बनवतील, अशी अपेक्षा आहे.

विद्यापीठातील सर्वच संशोधक विद्यार्थ्यांची मातृभाषा कोंकणी/ मराठी असून एकतर ते खुद्द गोव्यातील वा दक्षिण कोकणातील असून एक-दोन देशावरचे आहेत. अगदी मोजक्याच विद्यार्थ्यांच्या संशोधन अभ्यासविषयाच्या निवडीवर परिसर-प्रभाव असलेला जाणवतो. 
आंतरविद्यापीठीय आदानप्रदान आवश्यक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील विद्यापीठीय संशोधनाचा विद्यमान दर्जा आणि त्याची मराठीचा प्रसार-प्रचार आणि वृद्धी-समृद्धीच्या अंगाने असलेली उपयुक्तता याबाबत खरे तर मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कारण या विद्यापीठातील अध्यापक वा संशोधक विद्यार्थ्यांशी माझा व्यक्तिश: कधी संबंध आलेला नाही. भाैगोलिक दूरता हे याचे एक प्रमुख कारण असू शकते. नाही म्हणायला, गेल्याच वर्षी एका प्रबंधाचे मूल्यमापन करण्याविषयी मला विचारले होते. परंतु विषय होता, संत गाडगेबाबा यांचे साहित्य. संत गाडगेबाबा यांच्या साहित्याचा माझा सखोल अभ्यास नसल्याने साहजिकच ही निवड मी सखेद नाकारली. या निमित्ताने जाता जाता एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयक संशोधनाची व्याप्ती आणि दर्जा वाढवायचा असेल तर विविध विद्यापीठांतर्गत आदानप्रदान वाढविण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबवावे लागतील. अधिक काय सांगणे?
 
(मराठी विभागप्रमुख, गोवा विद्यापीठ)
hodmar@unigoa.ac.in
संपर्क क्रमांक - ९४२११५६११६
बातम्या आणखी आहेत...