आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: बोलीभाषांच्या संशोधनावर भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.
 
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन व संशोधन सातत्याने सुरू आहे. मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. पीएच. डी. व एम. फील. पदव्यांसाठी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक तज्ज्ञ व व्यासंगी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध तयार केले आहेत. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. साहित्याच्या अभ्यासामध्ये विशिष्ट आधुनिक ज्ञानदृष्टीचा अवलंब सातत्याने करण्यात आलेला आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.

साहित्याबरोबरच भाषा व बोलींचे संशोधन विभागात गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. या संदर्भांत ‘मराठी भाषेचा भाषाशास्त्रीय विचार’ या विषयावर शं. गो. तुळपुळे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनातून महाराष्ट्री, प्राकृत व मराठी भाषा यासंबंधी प्राकृत अपभ्रंश भाषेचा दुवा मांडण्यात आला. त्यातून मराठीच्या ऐतिहासिक अभ्यासाला नवी दिशा मिळाली. पेशवे दप्तरातील १८व्या शतकातील मराठीचे स्वरूप (ग. ब. ग्रामोपाध्ये), मराठी गद्याचा विकास (श्री. दि. परचुरे) अशा काही मान्यवर संशोधकांनी पूर्ण केलेले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प उल्लेखता येतील. ही प्रमाण मराठीच्या संदर्भातील संशोधन परंपरा आजही सुरू आहे. प्रशासनिक मराठीची घडण, प्रसारमाध्यमातील मराठीचे स्वरूप, राज्यव्यवहारातील मराठी भाषेचे उपयोजन, मराठी शुद्धलेखन परंपरा इ. विषयांवर मौलिक संशोधन अलीकडेच झालेले आहे. या विषयांबरोबरच मुंबईतील व मुंबईबाहेरील अनेक जाती, जमातींच्या बोलींचे अभ्यास झालेले आहेत. सुरू आहेत. मराठीच्या अनेक बोलींची वैशिष्ट्ये भाषावैज्ञानिक अभ्यासाद्वारे मांडण्यात आलेली आहेत. उदा. मालवणी, ठाकरी, आगरी, शिंदी भंडारी, वसई परिसरातील सामवेदी आणि वाडवळ इ. बोलीवरील संशोधन सिद्ध झाले आहे. मुंबईतील कोळी बोली, मुंबईजवळ असलेल्या ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील विविध बोली यांवर भाषावैज्ञानिक अंगाने संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

आज मराठी विभागात संशोधनासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी मुंबई शहरातील व त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही येतो. साहजिकच ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यांबरोबरच मुंबईबाहेरील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातूनही विद्यार्थी सातत्याने येत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्या त्या प्रदेशातील लोकसाहित्य संकलित करण्यात येते, आणि त्या आधारे लोकसंस्कृतीबरोबरच बोलींचा अभ्यासही होत असतो. एम. फिल. व पीएच. डी. पदवीसाठी ठाकरी, कातकरी, वारली व भिल्ली आदिवासी बोली व बोलीसाहित्याचा अभ्यास घडत आहे. याशिवाय मांगेला, कादोडी, मल्हारकोळी, धनगरी, कुणबी, वाडवळी ख्रिश्चन, अहिराणी, उत्तर कोंकणी या बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न चालू आहेत. विविध बोलींचे व त्यातील लोकसाहित्याचे दस्तऐवजीकरण होत आहे. त्याच्या आधारे या बोलींचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बोलींचे व्याकरण लिहिणे, लोकसाहित्य प्रकाशित करणे यांसारखे भविष्यातील उपक्रम व्यवहारभाषा म्हणून मराठीला संपन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. मराठी ज्ञानभाषा म्हणून घडवताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीदेखील हे उपक्रम नक्कीच उपकारक ठरू शकतील, असा माझा विश्वास आहे.

सद्यःस्थितीत आतापर्यंत झालेल्या व सुरू असणाऱ्या संशोधनाचा दर्जा समाधानकारक असून मराठी विभागप्रमुख या नात्याने भविष्यात मराठी भाषा व साहित्य वेगवेगळ्या भाषांच्या अभ्यासाशी जोडले जावे, तसेच आज नव्याने उदयास आलेल्या ज्ञानशाखा मराठीतून उपलब्ध व्हाव्यात व व्यावसायिक दृष्टीनेही मराठीत संशोधन व अभ्यास घडावा, अशी भूमिका व धोरण विभागप्रमुख म्हणून आमच्या विभागात राबविण्याचा माझा प्रयत्न आहे.

विभागप्रमुख, मराठी विभाग.
मुंबई विद्यापीठ, मुंबई
---------------------
bharatinirgudkar@yahoo.in
संपर्क क्रमांक : 9892499645
बातम्या आणखी आहेत...