आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: भाषा विकास हेच ध्येय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव, धुळे व नंदुरबार या एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकक्षेत अहिराणी ही प्रमुख बोली बोलली जाते. त्यामुळेच अहिराणी बोली   व अहिराणी साहित्याच्या अनुषंगाने महाविद्यालय व विद्यापीठीय स्तरावर लक्षवेधी काम झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयपत्रिकेच्या शीर्षकासाठी ‘संशोधन प्रकल्प’ दिला जातो. या संशोधन प्रकल्पाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपल्या ग्रांथिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांशी सर्वेक्षणदृष्ट्या व संदर्भ नोंदवण्याच्या दृष्टीने जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सर्वेक्षण कसे करावे? संदर्भ कसे नोंदवावेत? यासह संशोधनाच्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी संशोधन कसे करावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. संशोधन काटेकोरपणे व्हावे, म्हणून स्वतंत्रपणे संशोधनपद्धती हा एक पेपरच अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आला आहे.

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास हा निव्वळ चाकोरीबद्ध राहू नये, तर तो विश्वात्मक पातळीवर प्रसरण पावणारा असला पाहिजे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, पारशी, अरबी, जर्मनी अशा अनेक भाषांसोबत व साहित्यासोबत तुलना होत चांगल्या गोष्टींचे आदान-प्रदान करीत मराठी भाषेची समृद्धी अधिकाधिक भक्कम झाली पाहिजे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा ‘मुख्य दरवाजा’ हा मराठी भाषेचा असला पाहिजे, परंतु त्याबरोबरच विविध भाषांच्या खिडक्यादेखील आमच्या साहित्य संशोधनाला असल्या पाहिजेत. कारण त्यामुळे हवा खेळती राहते. ज्ञान, विवेक, संस्कार आणि संस्कृती यांचे सक्षम आदान-प्रदान होते. या आदान-प्रदानातून मराठी भाषेचा आणि साहित्याचा खूप चांगला विकास होऊ शकतो. अशा व्यापक पटलावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विभाग संशोधनाची विकसनशील भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे.    

बहुपेडी-बहुढंगी संशोधन
उ. महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘भिलोरी लोकगीतांचा अभ्यास’, ‘आदिवासी लोकसाहित्याचा अभ्यास’, ‘मावची’, ‘गावीत', ‘पावरा’ इ. भाषांचा अभ्यास, ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकसाहित्यातील लोकतत्त्वे’, ‘समाजभाषेचे स्वरूप’, ‘ग्रामीण साहित्याचे स्वरूप’, ‘ग्रामीण-दलित साहित्याची तुलना’, ‘दलित साहित्याची प्रेरणा’, ‘ग्रामीण साहित्याची प्रेरणा’, ‘दलित-आदिवासी साहित्याची प्रेरणा’, ‘दलित साहित्यविषयक चळवळी’, ‘दलित कार्यकर्त्यांच्या चळवळी’, ‘आदिवासी अभ्यासकांच्या मुलाखती’, ‘ग्रामीण लेखकांची माहिती’, ‘नाट्यविषयक चळवळ’, ‘प्रायोगिक नाटक रंगभूमी’, ‘व्यावसायिक रंगभूमीचे स्वरूप’, ‘प्रबोधनाची चळवळ’, ‘महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यास’, ‘सार्वजनिक सत्य धर्माचे स्वरूप’, ‘आंबेडकरी जलसे’, ‘इहवादाचे स्वरूप’, ‘तमाशा’, ‘वगनाट्य’, ‘लळीत’ इत्यादीचे स्वरूप, ‘संतांच्या साहित्यातील सामाजिकता’, ‘शाहिरांच्या काव्यातील सौंदर्यानुभव’, ‘तुकाराम व कबीर यांच्या कवितेतील साधर्म्य-वैधर्म्य’ अशा अनेक विषयांवर संशोधन करण्यास प्राधान्य दिले आहे.  
(संचालक व मराठी विभाग प्रमुख, भाषा अभ्यास प्रशाला व संशोधन केंद्र, जळगाव)

इ-मेल : dr.mspagare@gmail.com
मोबाइल :  9423159623
 
बातम्या आणखी आहेत...