आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: संशोधनाचा वऱ्हाडी खाक्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलत्या काळानुरूप आदिवासी संस्कृतीवर शहरीकरणाचे आक्रमण होत आहे. त्यातली कोरकू संस्कृतीसुद्धा आक्रमणाच्या विळख्यात आहे. तिचे मूळ रूप हरवत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. मनोज तायडे यांचा ‘मेळघाटातील कोरकू आदिवासींची भाषा, त्यांचे साहित्य व संस्कृती’ जतन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर केला. प्रकल्पांतर्गत कोरकू जनजीवनाचा (अचलपूर येथील स्व. मूलजीभाई कढी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. काशिनाथ बहाटे यांनी डॉ. मधुकर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरकू भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला. हे संशोधन एवढे मूलगामी आहे की, डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकाने त्याची दखल घेतली आहे.) जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास चित्रित करून रीती-रिवाज, घटना-प्रसंग यांचे विश्लेषण करून अभिलेख जतन करून ठेवला आहे.
विभागातर्फे दुसरा पूर्ण झालेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, ‘वऱ्हाडी बोलीचा शब्दकोश’. 

या प्रकल्पात सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी-लेखक डॉ. विठ्ठल वाघ यांनी मुख्य संशोधकाचे कार्य स्वीकारले. या कामी संशोधकांनी अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा पिंजून काढला. ‘शब्दयात्रा’ हा उपक्रम राबवून खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून, बायाबापड्यांकडून, शेतकरी-शेतमजुरांकडून शब्द गोळा केले. डॉ. वाघांनी त्याचे वर्गीकरण केले. अर्थ लिहिले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. हे तिन्ही कोश महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्रकाशनार्थ देण्यात आले.

संशोधनाच्या नव्या दिशा धुंडाळणे ही विद्यापीठातल्या संशोधकांची सहज प्रवृत्ती ठरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेळघाटातील कोरकू लोकसंस्कृतीचा शोध घेणारा ‘कोरकू लोकगीतांचे संकलन आणि लिप्यंकन’ (डॉ. सुखदेव ढाकणे), ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम’ आणि ‘अनुवादित मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा मराठी कथात्म साहित्यावर होणारा प्रभाव’ (डॉ. मोना चिमोटे) असे दोन प्रकल्प पूर्ण करताना मूळ मराठीतून निर्माण झालेले विज्ञानसाहित्य आणि मराठीत अनुवाद झालेले विज्ञानसाहित्य या दोन्ही प्रकाराचा अभ्यास मांडला गेला. याशिवाय ‘अर्वाचीन मराठीतील काव्यविचार’ (डॉ. हेमंत खडके) हा विद्यापीठ अनुदान आयोगाने साहाय्य केलेला प्रकल्प पूर्ण करून साहित्य-सौंदर्यशास्त्र विचारात मोलाची भर घातली गेली. कृषीतील अनेक संकल्पना आज कालबाह्य ठरत आहेत. यांत्रिकीकरणामुळे कित्येक अवजारे आज तयारही होत नाहीत. अशा प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने ‘कृषी साधनांचा कोश’ आणि ‘महाराष्ट्रातील शेती व्यवसाय संकल्पना कोश’ (डॉ. माधव पुटवाड) असे दोन कोश तयार केले.

अलीकडील काळात डॉ. पंकज वानखडे यांनी ‘संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य' या संदर्भात प्रकाशित झालेल्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ डॉ. राजेंद्र मुंढे यांनी ‘उत्तम कांबळे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’, डॉ. शीला लोखंडे यांनी ‘तुकारामांच्या काव्याची स्वातंत्र्योत्तर समीक्षा’ या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. सध्या विभागात लोककला व लोककलावंत यांच्या माहितीचे संकलन व संशोधन करणारा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाकरिता हे कार्य डॉ. प्रणव कोलते आणि डॉ. काशीनाथ बहाटे, डॉ. टी. एस. राठोड, डॉ. सीमा साठे, डॉ. चंदू पाखरे, प्रा. अतुल सारडे, डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. रावसाहेब काळे हे त्यांचे सहकारी करत आहेत. 
(मराठी विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)
 
इमेल- manojtayade1563@gmail.com
संपर्क- 9405352536
बातम्या आणखी आहेत...