आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: नवसाहित्यप्रवाहकेंद्री संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने   महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील  संशोधनामुळे  मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे...

भाषाव्यवहार हा जीवनाच्या विविध पातळ्यांवरून चालणारा व जीवनाला सर्व अंगांनी व्यापून टाकणारा व्यवहार असतो. कोणताही भाषिक समाज त्यांच्या भाषेतून केवळ लोकव्यवहार व समाजव्यवहार करीत नाही, तर तो त्या भाषेतून ज्ञानव्यवहार व बौद्धिक व्यवहारही करीत असतो. त्यामुळे कोणत्याही भाषेचा विचार करताना भाषेच्या संबंधात सुरू असलेल्या तत्संबंधित विविधांगी क्रिया-प्रक्रियांचा, तसेच त्यातील ज्ञानात्मकतेचा विचार करणे आवश्यक ठरते. मराठी भाषेचाही विचार याच प्रकारच्या ज्ञानव्यवहारात्मक दृष्टीतून करणे गरजेचे ठरते.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने   महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील संशोधनामुळे मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे. विशेषतः ग्रामीण, दलित, आंबेडकरवादी, आदिवासी व स्त्रीनिर्मित साहित्यप्रवाहांतील साहित्य व साहित्यिकांसंबंधी आस्थेवाईक आकलन पुढे येत आहे. साहित्य आणि समाजवास्तव, साहित्य आणि सामाजिक भान आणि साहित्यातून होणारे सामाजिक अभिसरणदेखील या संशोधनातून पुढे येत आहे. 
 
सद्यःस्थितीत सुरू असलेल्या मराठीतील संशोधनाला  विषयवैविध्याचे व लेखनाविष्काराचे विवक्षित स्वरूपाचे मूल्य आहे. मात्र अलीकडे विशेषतः संशोधनाच्या गुणात्मकतेच्या संबंधात विविध प्रकारच्या समस्यादेखील निर्माण झालेल्या आहेत. या समस्या विद्यार्थ्यांशी संबंधी, विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासंबंधी, विद्यार्थ्यांच्या संशोधनदृष्टीसंबंधी, संशोधनाच्या साधनसामग्रीविषयी, संशोधनाच्या अभ्यासपद्धतीसंबंधी, संशोधकांच्या पुनरावलोकनासंबंधी, एकूण संशोधनप्रक्रियेसंबंधी, संशोधनातील एकंदर ज्ञानव्यवहारासंबंधी, संशोधकांच्या रोजगारासंबंधी, संशोधकांच्या भवितव्यासंबंधी तसेच संशोधनाच्या मौलिकतेसंबंधी, अशा विविधांगी स्वरूपाच्या आहेत.
 
या विविध पातळ्यांवरील संशोधनविषयक समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करता आली व सामूहिकपणे मात करता आली, तर भाषा व साहित्यविषयक संशोधनाला तसेच समग्र मानव्यविद्या शाखेतील संशोधनाला मौलिकता मिळू शकेल. अंतिमतः समग्र ज्ञानव्यवहार खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध व अधिक सकस आणि अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल.
 
संशोधनाचा भर कविता आणि कादंबऱ्यांवर...
सद्यःस्थितीत कविता आणि कादंबरी हे दोन ठळकसंशोधनविषय आहेत. जागतिकीकरणाचा मराठी कवितेवर पडलेला प्रभाव, तसेच देशीवादाचा मराठी कादंबरीवर पडलेला प्रभाव, या विषयावर विभागात संशोधनकार्य सुरू आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, शरणकुमार लिंबाळे, भुजंग मेश्राम, महादेव मोरे, सदानंद देशमुख, योगेंद्र मेश्राम, उर्मिला पवार  या साहित्यिकांच्या साहित्यावर लेखकनिष्ठ संशोधनकार्य विभागामध्ये सुरू आहे. संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील प्रबोधनपरतेचाही तुलनात्मक अभ्यास विभागात सुरू आहे. 

युजीसीच्या कनिष्ठ संशोधन छात्रवृत्ती व मनोहर सप्रे यांच्या साहित्यावर संशोधनकार्य सुरू आहे. विद्यापीठाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन छात्रवृत्ती या दोन्ही छात्रवृत्तींच्या अंतर्गत आदिवासी कविता, अर्वाचीन संत कविता व समकालीन कथा-कादंबरी यांच्या संबंधात विशेषत्वाने संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये विनायक तुमराम, ह. मो. मराठे, मनोहर सप्रे या लेखकांवरील संशोधनाचा समावेश आहे. सद्यःस्थितीमध्ये मराठी विभागाच्या संशोधनकेंद्रामध्ये जवळपास १०० संशोधनकर्ते विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
 
संशोधनकर्त्यांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. इ.स. २००० ते २०१० या कालखंडात नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयात पीएच. डी. करण्यासाठी एकूण ५२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून येते. इ.स. २०११ ते २०१५ या काळातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठीच आहे.

इमेल - shailendra.rtmnu@gmail.com
संपर्क  - 7038731533
( प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर )
बातम्या आणखी आहेत...