आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्‍युदयाची आशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अडीच अक्षरांची गोष्ट’ हा माझ्या आयुष्यातील एक सुंदर अपघात आहे. कुठं भेटतील अशी लाखमोलाची माणसं... 
पण माणसं भेटतच गेली. मी वेड्यासारखा त्यांना कवेत घेत होतो, आतून आतून उचंबळून येत होतो. त्यांना शब्दांत चितारताना रोज माणूसपणाची वाट चालत होतो...

‘प्रिय प्रदीप,
तुझा रविवारच्या ‘दिव्य मराठी - रसिक’मधील ‘राचेल कोरी’ वरचा लेख वाचला आणि भडभडून आले. त्याच सिरीजमधले इतर लेख एक एक करून वाचले आणि प्रत्येक वेळी तळापासून हललो. डोळ्यात आलेल्या पाण्याची मला कधीच लाज वाटत नाही. पण दुर्दैव असे की, इतक्या आतड्याने लिहिलेले कधी वाचण्यातच येत नाही, कारण तसे लिहिण्याइतके संवेदनशील लोक कुठे हरवून गेलेत कुणास ठाऊक. तुझी ती राचेल, तो झाक, ती लक्ष्मी, त्यानेच हत्या केलेल्या राणी मारियाच्या कुटुंबाने आपलासा करत पुन्हा जीवनसन्मुख केलेला समुंदर, तिलाकम आणि काथिर, सारेच या जगात उपरे म्हणावे लागतील. कुठे सापडतात तुला ही माणसं... हजारो, लाखो उन्मादी नृशंसांच्या समाजात कुठल्या सांदीकोपऱ्यात असतात ही माणसं? कसा पोचतोस तू त्यांच्यापर्यंत?’

‘अडीच अक्षरांची गोष्ट’, मधल्या माणसांना भेटून भावूक झालेला माझा मित्र मंदार काळे मला विचारत होता. हाच प्रश्न अरविंद जगताप, कविता ननवरे आणि अनेकांना पडत होता, पण माझ्याकडं तरी कुठं उत्तरं होती त्यांच्या प्रश्नांची! कारण, मीही या माणसांना भेटून आवाक होत होतो. 
 
‘अडीच अक्षरांची गोष्ट’ हा माझ्या आयुष्यातील एक सुंदर अपघात आहे. एरवी, कुठं भेटतील अशी लाखमोलाची माणसं... पण कबीराला हवीहवीशी वाटणारी अडीच अक्षरं उमजलेली म्हणून मी शोधासाठी बाहेर पडलो आणि रस्त्यात अॅसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झालेली लक्ष्मी आणि तिच्यावर प्रेम करणारा आलोक भेटला. मग अश्विनी आणि श्रीकिसन, समीना आणि प्रशांत, जितेंद्र आणि नताशा, पंकज आणि शहनाझ, फैजूल हसन काद्री, नादिया, मोहमद अली, केशव मंजुळे, शहाजी कांबळे, अभिजित देशपांडे आणि मोहमद अमीर खान… माणसं भेटतच गेली. मी वेड्यासारखा त्यांना कवेत घेत होतो, आतून आतून उचंबळून येत होतो. त्यांना शब्दांत चितारताना रोज माणूसपणाची वाट चालत होतो. आणि मी एकटा नव्हतो. अपरंपार प्रेमाची ताकद असणारी किती तरी  माणसं माझ्यासोबत होती. रविवारची सकाळ व्हायची आणि औरंगाबाद, जळगाव, नाशिक, सोलापूर, अकोला कुठून कुठून माणसं बोलत राह्यची. संवादातून नवे पूल बांधत राह्यची. ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी’, या ओळीतील ‘कुछ बात’ या संवादातून उलगडत जायची. जात, धर्म, लिंग, वय, देश, प्रांत  या सगळया सीमा ओलांडून ‘या हृदयीचं त्या हृदयी’ घालणारं काही गवसत होतं. रसिक मधले लेख वाचून या जगावेगळया माणसांनाही नवी ओळख मिळत होती. सामाजिक रोषाच्या भितीनं दबलेले आप्तमित्र त्यांना आता खुलेपणाने भेटत होते. शब्दांचं मागणं अजून काय असतं? या सगळ्यांंसोबत मी ही अडीच अक्षरं  मोडकी तोडकी गिरवू पाहत होतो. 
 
...आणि कागदावरून नजर काढून आजूबाजूला पाहतो तर काय... किती माणसं… निखळ माणसं माझ्या अवतीभवती जमा झाली होती. कुठल्या अनामिक नात्यानं माझ्याशी बांधली गेली होती. तुमच्या माझ्या सर्वांच्या अभ्युदयाची आशा मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती...

 
बातम्या आणखी आहेत...