आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहब हेल्पर हूँ, पर भिखारी नही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेटकडं टिप जमा केल्याने त्यांच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हा केला होता. हे सगळे मिळून मला मारतील. सतत हाच विचार मनात यायचा. भणाणणाऱ्या आग्यामोहळाच्या माशा कडकडून झोंबायच्या. मी विचार करायचो, ‘कस्टमर्स जेवणाचं बिल देतात, तरीही वेटरला पैसे कसे काय देतात?’
 
शिक्षण हे माणसाला अपमान पचवू देत नाही. नांगराला जुंपलेला बैल जसा फुसफुस करतो, अगदी त्याप्रमाणेच अपमानाची धग उरात धगधगते. खरंच का होतं असं? मला तर वाटतं, आपल्याला अपमान झाला, हे कळलंच नाही पाहिजे. ही अनुभूती माणसाच्या वाट्यालाच आलीच नाही पाहिजे. पण जसजसं वय वाढतं तशी ही वृत्ती बाळसं धरते. माझं असंच झालं. दहावी पास झालेला मी! फार तर पंधरा-सोळा वर्षाचा! या वयात काही गोष्टी मनाला चांगल्याच लागतात. याच वयात माझ्यावर टिप चोरल्याचा आरोप लागला होता. सगळे वेटर, हेल्पर एका बाजूने आणि मी एकटा एका बाजूने. हा कलंक धुऊन टाकण्यासाठी मी कोणतीही लढाई न लढता केवळ काऊंटरवर अश्रू गाळत शेटला स्वत:च्या प्रामाणिकतेची दिलेली हमी, यासोबत शेटजवळ जमा केलेले दहा रुपये, हा भला मोठा पुरावा माझ्या प्रामाणिकपणाचा आधार होता. नंतर भलेही माझ्यावरचा आरोप धुतला गेला, पण माझ्या वाट्याला आलेली खजिलता मला कोणाच्याही नजरेला नजर देऊ देत नव्हती. तरीही शेटची पाठराखण मला उभारी देत होती...
दुपारचे तीन वाजले होते. वस्ताद (कूक) मसाला डोसा बनवत होता. मी खरकट्या भांड्यांचा ट्रे घेऊन मोरीत खाली केला. ट्रेमधला एक ग्लास पातेल्यात पडल्यानं त्यामधलं तिखट पाणी सविताच्या अंगावर उडालं. तशी ती भडकली.
 
‘ए शाहरुख, दिखता नहीं क्या? मेरे आखमें गया ना वो पानी...’
‘.............’ मी शांत.
‘अबे गुंगे, तेरेकू बोलरी मै। कान फट गये क्या तेरे?’
‘सॉरी मावसी, गलती हो गई।’
‘अरे यार, क्या करू में इसका? तेरेकू कितनी बार बताया, मावसी नहीं बोलने का रे।’
मी दाताखाली जीभ दाबून तेथून पळ काढला.
तोच सवितानं पुन्हा आवाज दिला.
मला जवळ बोलवत ती म्हणाली,
‘तुने टिप के दस रुपये चुराये क्या रे?’
मला टिप काय असते, काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी एकही शब्द बोललो नाही.
‘अबे, कस्टमर्सनं जे दहा रुपये ठेवले होते, ते तू घेतले का?’
‘मी ते पैसे काऊंटरवर जमा केलेत, हे सगळ्यांना माहीत आहे.’ एवढ्यात वेटरनं आवाज दिला. नंतर तिला वस्तादकडून सगळं कळलं. तेव्हा सवितानं त्या वेटरच्या आयाबहिणी काढल्या.
 
शेट, वस्ताद आणि सविता माझ्या बाजूनं असल्यानं मी खूप मोठी लढाई जिंकली होती. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळे वेटर, हेल्पर जेवणावर नुसते तुटून पडले होते. खातानाही त्यांच्या तोंडाला कुलूप नव्हतं. जो तो आपल्या कस्टमर्सचे किस्से रंगवून सांगत होता. कोणत्या टेबलनं किती टिप दिली अन् कोणी दिली नाही, याच्याच गप्पांना ऊत आला होता. टिप न देणाऱ्या कस्टमर्सची काही जणं मायबहिणी उधडत होते. सुनिल नावाचा वेटर त्याच्याच धुंदीत जगायचा. त्याला फॅमिली कस्टमर्सची सर्व्हिस करायची फार हौस. काय हवं काय नको, तो अगदी मनापासून करायचा. कॉलेजच्या पोरीसोरी आल्यावर त्यालाच विचारायच्या, त्यामुळे तो सतत हवेत असायचा. आजही तो मोरीवाल्या मावशीला पाच नंबरवरच्या गोऱ्यापान पोरीच्या बोलण्याचं आणि तिच्या गोड गुळचट आवाजाचं कौतुक करत होता.
‘मावसी वो ना लिक्विड गुलाबजाम है।’
‘मेल्या कायपण बोलतो का रे!’
‘मावसी तेरी कसम! मैने उससे टिप नही लिया बाॅस!’
‘अरे ऐसी लडकिया सिर्फ अच्छी सर्व्हिस मिलने तकही मिठी मिठी बाते करती है।’
‘लालजरद बिट होता है ना मावसी, तू काटकर स्लाडपर रखती है, बस्स उसिके माफिक है वों!’
‘सडक्या लाज हे तुह्या तोंडाला काही? तोंड पाह्यलं का आरशात? तिच्या तळपायावाणी तुपलं तोंडही नसल मेल्या! पोरीसोरींबद्दल असं बोलू नये माघारी. चांगलं नसतं ते.’
त्यांच्या गप्पा अधिकाधिक रंगत गेल्या.
 
टेबल संपल्यावर हॉटेलचं वातावरण मस्त मोकळं असतं तरी शेटचा अन् वस्तादचा धाक पाळावाच लागतो. फक्त टेबल चालू असताना कोणी कोणाशी गप्पा मारत नाही. सर्व्हिस देताना वेटर, हेल्पर तिथेच पाहिजे. नसता शेट किचनमध्ये वा स्टाप रूममध्ये येऊन चांगली खरडपट्टी काढतो. आम्ही किचनमध्ये दिसलो की वस्ताद सगळ्यांना बजावून सांगायचा. त्यामुळे वस्तादला सगळेच घाबरायचे. पण उस्तादच्या हाताला चव होती. हॉटेल फुल्ल भरायचं. हे चित्र सगळ्याच हॉटेलमध्ये असतं. बियरबार, रेस्टॉरंटमध्येसुद्धा. ज्या हॉटेलच्या जेवणाची लोक बाहेर चर्चा करतात, त्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये रात्री सहसा जागा सापडत नाही. या हॉटेलमध्ये रात्री फॅमिली कस्टमर्स खूप यायचे. व्यवस्था चोख असायची. सर्व्हिस आणि टेस्ट या दोन गोष्टी शेटनं फार बारकाईनं सांभाळल्या होत्या. टेबल क्लाॅथ व ग्लासमधील मऊ पेपर, ज्याला ‘टिश्यू पेपर' म्हणतात. सुरुवातीला मी टिश्यू पेपरच्या खूपच प्रेमात पडलो होतो. मीच काय कोणालाही ते पेपर आवडतील, इतके ते मऊ असतात. पण जेवल्यावर त्या पेपरला हात, तोंड पुसून तो कागद कस्टमर्स तिथंच टाकायचे. काही दिवस तर मला सारखा प्रश्न पडायचा की, कस्टमर्स कागदाला तोंड का पुसतात? त्यांच्याकडे हातरुमाल नाही का? नंतर एका वेटरनं त्याविषयी माहिती सांगितली. गप्पा चालू असताना भस्सकन वस्ताद आला.
‘ए आटप ना जल्दी। कितना खायेगा? दो दिनसे भुका था क्या? आटपो जल्दी, किचन धोना है।'
माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता. मी शेटकडं टिप जमा केल्याने त्यांच्या दृष्टीने खूप मोठा गुन्हा केला होता. हे सगळे मिळून मला मारतील. सतत हाच विचार मनात यायचा. भणाणणऱ्या आग्या मोहळाच्या माशा कडकडून झोंबायच्या. मी विचार करायचो, ‘कस्टमर्स जेवणाचं बिल देतात, तरीही वेटरला पैसे कसे काय देतात? मला ते नको वाटायचे. माणसानं कसं स्वाभिमानानं जगावं. लहानपणी घरी कोणी पाहुणे आल्यावर पैसे देताना, आम्ही भावंडं अगोदर बयकडं (आई) बघायचो. ती जोपर्यंत घे म्हणत नाही, तोपर्यंत बिलकुल घ्यायचो नाही. तेव्हा पाहुणे म्हणायचे, ‘अनुसया, तुह्ये लेकरं तुह्यावरच पडलेत.’ तेव्हा आईचा चेहरा उजळून निघायचा. म्हणून मला कोणी देऊ केलेले पैसे घ्यायला बरं वाटत नव्हतं. आता मी येथे काम करतो, त्याच्या मोबदल्यात शेट मला पगार देतो. मीदेखील कष्टाचा पैसा स्वाभिमानानं घेतो. हे असं भिकाऱ्यासारखं पैसे घेणं, माझ्या मनाला पटत नव्हतं. कधी कधी ‘हॉटेलमध्ये काम करतो म्हणून कस्टमर्स खालच्या दर्जाचं तर समजत नाहीत ना?’ असे अनेक विषारी साप मला डंक मारायचे...
सगळे हेल्पर किचन धूत होते. मी जेवत होतो. एवढ्यात सुनील वेटर कानात कुजबुजला, ‘वस्तादने तरेकू बुलाया है।' आणि तसाच तो काऊन्टरकडं पळाला. मीही कसाबसा आटोपून किचनमध्ये गेलो. वस्ताद मला पाहताच सुरू झाला.
‘ए छोकरे, इधर काम करने आया है तू, बैठने को नही, और एकेक घंटा खाना खायेगा तो काम कब करेगा? अबे, थोबडा क्या देख रहा है? वों ग्राईंडरमें पानी डाल। अच्छा खसखस धोले उसको।’
मी ग्राईंडरमध्ये पाणी टाकून धूत होतो. वस्ताद परत म्हणाला, ‘इस शहरमें कोई है क्या तेरा?’
मी धुता धुताच मानेनं "नाही' म्हणालो.
‘फिर रहेने का इंतजाम क्या है? और हा! रातमें किधर सोया था तू? काऊन्टर के सामने? तुझे पता है कितना चिल्लाया शेट? बहुत गुस्सा किया उसने। बोला किसी बी छोकरे को काऊन्टर के सोने मत देना। तुम लोग टेबल क्लाॅथ ओढणे को लेते बोले। खबरदार किसी ने भी क्लाॅथ को हात लगाया तो उसको खाना नही दुंगा।’
मी खाली मान घालून सगळं ऐकत होतो. बोलता बोलता वस्तादनं एका हेल्परला आवाज दिला,
‘आज ए तेरे साथ सोयेगा। लेकिन रातभर गप्पे मत लडाना, सबेरे जल्दी उठना है।'
अख्खं हॉटेल शांत झालं होतं. बाहेर रोडवरही कोणी दिसत नव्हतं. वस्तादही घरी निघून गेला होता. वाॅचमननं शटर्स खर्रकन खाली ओढलं. आम्ही कैद्यांसारखं आत होतो. स्टाफ रुममध्ये आणखी चौघं जण होते. माझ्यापेक्षा वयानं चांगलेच मोठे होते ते! मी नुकताच दहावी पास झालो होतो. ओठांवर आताशा काळ्या मिशा फुटू लागल्या होत्या. चौघांपैकी दोघे जण झोपले होते. दोघे गप्पा मारत बसले होते. कस्टमर्सच्या टेबलवर विसरलेल्या फुकटच्या सिगारेटचा धूर उडवत होते. छताचा पंखा आचके देत फिरत होता. माझ्याकडे अंथरायला-पांघरायला काहीही नव्हतं. आता झोपायचं कशावर? बाजूला टोमॅटो साॅसच्या बाटल्यांचा खोका होता. कांद्याचे चारपाच कट्टे. काही मोकळे पडलेले. त्यावर डास घोंगावत होते. हातानं कुठवर उडवायचे? झोप येत नव्हती. सोबतचा हेल्पर बोलला.
‘क्या नाम तेरा?’
‘रमेश' मी उत्तर दिलं.
‘चद्दर-बिद्दर कुछ नही लगता तेरे पास? पर टेंशन मत ले मेरे पास बडी चद्दर है। बाट लेंगे आपन। ये हॉटेल है बॉस! मिलजुलके रहेना पडता। पता नहीं कब कोणसा टाईम आयेगा। पहले में भी तेरे जैसा था।’

खूप बरं वाटलं मला त्याचं ऐकून. त्याच्या बोलण्यात आपलेपणा जाणवला. गप्पा मारताना तो पटकन झोपी गेला. दिवसभराचा कामाचा थकवा स्पष्ट चेहऱ्यावर दिसायचा. शरीर थकून जायचं. केव्हा पडतो, असं व्हायचं. रात्रीचे अकरा वाजले तरी कळायचं नाही. सगळं आवरायला बारा वाजायचे. काऊन्टरपासून मोरीपर्यंत सगळ्यांची कामं वाटलेली. पण हेल्पर्सला सगळ्यात जास्त काम. पगार तेवढा कमी! का तर हेल्पर्सला आॅर्डर घेता येत नाही. कस्टमर्सशी व्यवस्थित बोलण्याचा सराव नसतो. डिशेसची नावं माहीत नसतात. बोलण्याच्या कौशल्याने चांगली आॅर्डर घेता आली पाहिजे, हे कसब वेटरनं सरावानं कमावलेलं असतं. कस्टमर्सची कम्प्लेंट वेटरला टेबलवरच सोडवता आली पाहिजे, नसता कॅन्सल झालेली आॅर्डर त्याच्या नावावर पडते. बिचाऱ्या हेल्पर्सला सकाळी उठून टेबल साफ करावी लागतात. फरशीवर चिंधी मारून ग्लास, अॅश-ट्रे धुऊन काढावेत. वेटरनं आॅर्डर घेऊन कस्टमर्सना सर्व्हिस द्यावी. बाकीचं जड काम हेल्परच्या वाट्याला. हळूहळू मी हे सगळं शिकत होतो. पण तरीही अनुभव आवश्यक आहेच.

मला झोप येत नव्हती.
उठून वाॅचमनजवळ गेलो.
‘काय रे, काय झालं?’
‘बाहेर बसतो जरा.’
‘एवढ्या रात्री! पोलिस फिरतात रस्त्यावर. पकडून नेतील बेट्या. तू नवीन आहेस अजून. तुला इथली माहिती नाही अजून. जाऊन झोप.’
‘मी इथंच बसतो थोडा वेळ.’
‘नाही रे बाबा! मला आता शटर्स उघडता येणार नाही.’ वाचमॅननं शटर्स उघडलं नाही, पण तो मराठीत बोलला, खूप बरं वाटलं मला.
शेवटी जाऊन अंग टाकलं.
रात्री झोपेतून अचानक जाग आली. बाजूचा माझ्या पोटावरून हळुवार हात फिरवत होता. कदाचित चुकून झालं असेल, म्हणून मी एवढं मनावर घेतलं नाही. थोडा डोळा लागला तर पुन्हा माझ्या पोटावरून शेजारचा हात फिरवायला लागला. मी रागानं त्याचा हात दूर फेकला तर म्हणतो कसा -
‘कुछ नहीं होता ना यार.’
हे ऐकताच शाॅक लागावा तसा मी पटकन उठलो. आणि ‘तुझ्या आय...’
माझ्या आवाजाने सगळेच जागे झाले. अंगाला कापरे सुटले तरी उसन्या बळानं मी त्याच्या तोंडावर जबरदस्त हल्ला चढवला. त्याला काय बोलावं, काही कळेना. मेल्याहून मेल्यासारखा झाला तो! माझ्या धमण्यातलं रक्त सळसळत होतं. एका मुलाने माझ्या अंगाला हात लावावा, ही गोष्टच माझ्यासाठी मोठी किळस आणणारी होती. ग्राईंडमधला फिरणारा दगड आणून त्याच्या डोक्यात टाकावा, नसता भिंतीवर त्याचं डोकं आपटून खात्मा करावा त्याचा! हाच विचार मनात घोळत होता. रात्र सरत गेली तसा रागही कमी होत गेला. शेवटी काम करायचं होतं. शिकण्यासाठी गाव सोडलं होतं...

माझी लादी मारून झाली होती. मोरीवाली मावशी बेसिन धूत होती. वस्ताद आॅर्डर बनवण्यात गुंग होता. सविताच्या बोलण्याचा आवाज काऊन्टरपर्यंत येत होता. शेटनं हजारदा सांगूनही तिच्या बोलण्यात काहीच फरक पडत नव्हता. तिचं बोलणं आता सगळ्यांना सवयीचं झालं होतं. मला टेबल पुसून पाण्याचे ग्लास आणि जग भरून ठेवायचे होते.
एवढ्यात एक कस्टमर आलं. नऊ नंबरवर बसताच त्यानं मला आवाज दिला. वेटर स्टाफ रुममध्ये कोट घालत होता, म्हणून मला जावंच लागलं.
‘फास्ट एक इडली वडा सांबर लेना। मेरी ट्रेन है अभी।’ मी त्याला चटकन गरमागरम इडली वडा दिला आणि टेबल वेटरला हँडवर्क केला. दुसऱ्याच दिवशी मी कस्टमरला आॅर्डर दिली, याचा मला खूपच आनंद झाला. खरे तर त्यानंच नाव सांगितलं. नेऊन देण्याचं काम मी केलं. काऊन्टरवर बिल देताना कस्टमरनं मला बोलवून माझ्या हातात दोन रुपयाची नोट दिली.
‘रख ले.’
‘मला नाही पाहिजे.’
‘क्यों?’
‘.............’ मी शांत.
‘अरे मेरे तरफसे रख ले। तुने मुझे फास्ट सर्व्हिस दि इसलिये दे रहा हूँ।’
‘मुझे शेट पगार देता है।’
‘अरे यार फिर भी ले ले।’
‘जी नहीं में नही लुंगा।’
‘कितनी अखड दिखाता बे? अरे टेबल पोछनेवाला है तू। क्या किमत है तेरी? हेल्पर तो है तू, फिर भी इतना घमंड?’
हे ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. तसा मी पटकन बोललो,
‘साहब हेल्पर हूँ पर भिखारी नहीं।’
असे म्हणताच शेट माझ्यावर चांगलाच संतापला.
‘ऐसी बात करता है, कस्टमर्ससे? एक कान के नीचे लगा दुंगा तेरे। उनसे ही हमारा होटल चलता है। तू नया है इसलिये छोड रहा हूँ। चल निकल यहां से। दोबारा आना नही इधर।’ शेटनं मला दंडाला धरून बाहेर काढलं.

मी विचार करत होतो, माझं काय चुकलं? मी पैसे घेतले नाही, हा माझा गुन्हा होता का? चालत चालत ‘क्रांती चौका’त आलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात शिवाजी महाराजांचा घोडा न्हाऊन निघत होता आणि माझ्या डोळ्यासमोर एक रस्ता पैठण गेटकडं जाणारा आणि दुसरा बाबा पेट्रोल पंपाकडं जाणारा, तिसरा जालना रोड... मला मात्र काहीच कळत नव्हतं, मी कोणत्या रस्त्यानं जाऊ?

rameshrawalkar@gmail.com
(लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी आहेत.)
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४
बातम्या आणखी आहेत...