आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहवेदनेची व्हायरल पोच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच आई वारली.बाळाच्या पित्याने नैराश्यातून आत्महत्या केली. बाळ लौकिकार्थाने अनाथ झाले. त्या छोट्या जिवाचं असं आपल्या डोळ्यांसमोर निराधार होणं, बाळावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना निखशिखांत हादरवून गेलं. एक दिवस बाळाचे आजोबा डॉक्टरांना भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, यापुढे बाळाच्या तब्येतीची जबाबदारी माझी. डॉक्टरांचे हे बोल ऐकून दुष्काळग्रस्त आजोबांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाले, पैशांची अडचण नाही. ते मी कसेही गोळा करेन, तुम्ही धीर दिलात हेच खूप झालं. आईचं जाणं - पाठोपाठ पित्याची आत्महत्या - बाळाचं निराधार होणं आणि आजोबांच्या डोळ्यांतले अश्रू हे सारं डॉक्टरांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेलं. न राहवून हा अनुभव त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवला. आठवडाभराच्या कालावधीत देश-विदेशातून तब्बल १३ लाखांहून अधिक लोकांनी या अभिव्यक्तीला प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर प्रतिसादाचा एक इतिहास नोंदला गेला. मराठवाड्यातल्या छोट्याशा गावात घडलेल्या एका घटनेला इतका अकल्पित प्रतिसाद मिळणे, 
याचा समाजमाध्यम विश्वाच्या संदर्भातला अर्थ काय आहे? या प्रतिसादाचे समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय अर्थ काय आहेत? ही घटना नेमकं काय सुचवत आहे?
 
गंभीर अवस्थेतल्या रुग्णांना (क्रिटिकल केअर) वैद्यकीय सेवा पुरवत असताना स्वतःच्या भावनांना काही मर्यादा घालून घ्याव्या लागतात. त्यातच माझ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्याला या मर्यादांचे रोजच भान ठेवावे लागते. कारण रोज तुमच्यावर आदळणारी रुग्णांची दु:खे इतकी तीव्र असतात, की तुम्ही त्या प्रत्येक दु:खात गुंतत गेलात तर तुम्हालाच तुमचा भावनावेग जगू देणार नाही आणि रुग्णांच्या कामी येण्याचा मूळ हेतूच नष्ट होऊन जाईल. पण तरीही असा एखादा क्षण येतो, जो तुम्ही स्वतःला घालून घेतलेल्या सगळ्या मर्यादा ओलांडतो. तुम्हाला भावनिक प्रतिसाद देण्यास भाग पडतो.

१३ जूनच्या रात्री असेच काहीसे घडले. चार महिन्यांचे बाळ झटके आणि ताप घेऊन रात्री ११ वाजता रुग्णालयात आले. जन्म झाल्यावर पंधराव्या दिवशी आई-वडील गमावून बसलेल्या बाळाची कहाणी ऐकून औषधांच्या डोसच्या कॅलक्युलेशननंतर, त्या चिमुकल्याच्या आयुष्याचे कॅलक्युलेशन माझ्या मनात सुरू झाले. आपण काय करू शकतो? आपले बिल कमी करण्याच्या पलीकडे दुसरे आपण करणार तरी काय? ही हतबुद्धता व्यक्त तरी कुठे आणि कशी करायची, म्हणून सहज सगळा वृत्तांत जसाचा तसा लिहून फेसबुक पेजवर पोस्ट केला. आजवर असे रुग्णाच्या दु:खावर थेट तेही समाज माध्यमावर प्रत्यक्ष लिखाण केले नसल्याने, घरी गेल्यावर मनात वेगळेच द्वंद्व सुरू झाले. या लिखाणातून नातेवाइकांच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना? पोस्टमध्ये कुठेही रुग्णाचे, कुटुंबाचे नाव जाहीर केले नव्हते, तरी रुग्णाचे खाजगी आयुष्य कधी खुले करायचे नसते, या वैद्यकीय नीतिमूल्याच्या तत्त्वाची पायमल्ली तर होणार नाही ना? असे प्रश्न मनाला छळू लागले. तेव्हा याचा मनाला खूप त्रास होऊ लागला तर सकाळी पोस्ट डीलिट करू या, असं म्हणून माझ्यापुरता विषय थांबवला.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियास्थित बहिणीचा फोन आला. तिला काही भारतीयांकडून ही पोस्ट व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड झाल्याचे कळले. माझ्या कौतुकापोटी ती असे काही सांगत असेल, म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष केले; पण दुपारी पोस्ट उघडल्यावर लक्षात आले की, १२ तासांत एक लाख लोकांपर्यंत माझ्या भावना पोहोचल्या होत्या. मग समाज माध्यमतज्ज्ञ व मित्र पराग पाटील यांनी रात्री ही पोस्ट इतिहास घडवणार, असे सांगितल्यावर मला या प्रतिसादाचे महत्त्व कळत गेले. यातील रिच, ‘लाइक्स’, ‘कॉमेंट्स’ या समाज माध्यमातील आकर्षक गोष्टींच्या पलीकडे जाऊन अनेक जण या बाळाच्या आणि कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावले. अवघ्या ७२ तासांत या बाळासाठी व त्याच्या कुटुंबासाठी २५ लाखांची मदत सहृदयी लोकांनी देऊ केली. तीन कुटुंबांनी (ज्यात आयर्लंडस्थित एका डॉक्टरांचाही सहभाग आहे.) या बाळाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. याही पुढे अनेकांनी या बाळासाठी अश्रू ढाळले आणि आम्हाला या कुटुंबामागे उभे राहायचे आहे, ही इच्छा व्यक्त केली. ही गोष्ट मला आर्थिक मदतीइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटली.
 
‘समाजातील हा घटक दुर्लक्षून आपण मोठे होऊ शकत नाही’, हे वाक्य आम्हाला अस्वस्थ करून गेले, असे सांगणारे कित्येक मेल, मेसेज, कॉमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचल्या. विशेष म्हणजे, यात आपल्या यशस्वी करिअर असलेल्या तरुण पिढीचा लक्षणीय सहभाग आहे. या पोस्टवर पडणारा हा प्रतिक्रियांचा पाऊस, कमी वेळात विक्रमी १५ लाखांपर्यंतचा रिच आणि तिचे लाखो माणसांच्या हृदयाला भिडणे, याने मला पुढे काय करता येईल व समाजशास्त्राच्या निकषावर याचे विश्लेषण कसे करता येईल, हा विचार करायला भाग पाडले. एक मोठा वर्ग आहे, जो समाजाबद्दल, शेतकरी, मजूर व शेवटच्या माणसाच्या जगण्या आणि झगड्याबद्दल खूप संवेदनशील आहे. त्याला यांच्यासाठी सक्रिय होऊन काही तरी करावे वाटते, पण काय आणि कसे करावे, हे कळत नाही. हा वर्ग राजकारणात येण्या व त्यात स्थिर होण्याइतपत चलाख व कावेबाज नाही. तो खूप साधा, सरळ व निरलस आहे. पण या वर्गातून मोठे सामाजिक नेतृत्व निर्माण होऊ शकते, असे या पोस्टच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते. त्यातून रूढ मार्गाने जाऊन फक्त रुग्ण किंवा गरजूंसाठी आर्थिक मदत उभी करणे, हे खूपच मर्यादित व वैचारिकदृष्ट्या अरुंद कक्षेचे कार्य ठरेल. तो त्याचा एक भाग असू शकतो, पण या दोन वर्गांना जोडणारा, त्यांचा वैचारिक संपर्क घडवून आणणारा, ‘नाहीरे’ वर्गाला जगण्यासाठी, संपत्ती निर्मितीसाठी, आपल्या पातळीवर आंत्रप्रोन्युर बनवण्यासाठी मागे उभे राहण्याचे कार्य या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांकडून झाले, तर त्याचे परिणाम अधिक दूरगामी असतील. याचा अजून एक भाग म्हणजे, आज वैद्यकीय क्षेत्र व सर्वसामान्य रुग्णांमध्ये ही एक सामाजिक दरी निर्माण झाली आहे. असे सोशल इंजिनिअरींगचे प्रयत्न वैद्यकीय क्षेत्रातून समाज माध्यमातून झाले, तर ही दरी बऱ्याच अंशी कमी होईल.
शेवटी पुढे काय? हा विचार करताना मला ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत नेहमी सांगत असतात तो ‘शिवसेना’ स्थापनेच्या वेळी प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना विचारलेला प्रश्न वारंवार आठवतो. ‘वाचा आणि थंड बसा’ या ‘मार्मिक’मधील सदरावर जेव्हा प्रतिक्रियांचा प्रचंड ओघ सुरू झाला, तेव्हा प्रबोधनकारांनी विचारले, ‘बाळ, या ऊर्जेचे तू काय करायचे ठरवले आहेस?’ स्वतःची तुलना मी इथे बाळासाहेबांशी मुळीच करत नाही, पण हाच प्रश्न या क्षणी मी वारंवार स्वतःला विचारतो आहे. ही ऊर्जा निर्माण करणाऱ्या लाखांनीच याचे उत्तर सुचवावे, ही या प्रसंगी विनम्र विनंती आहे.
 
लेखकाचा संपर्क : ९४२२७५७३११
Dr. Amol Annadate
amolaannadate@yahoo.co.in
बातम्या आणखी आहेत...