पुरुष नसबंदीचं प्रमाण भारतात आजही नगण्यच आहे. या शस्त्रक्रियेसंदर्भातले अनेक गैरसमज हे त्यामागचं महत्त्वाचं कारण. मात्र या विषयीच्या सर्व समजुतींना फाटा देत स्वत: नसबंदी केलेल्या आणि ही कृती सर्वांसोबत शेअर करण्याची परिपक्वता दाखवणाऱ्या डॉक्टरचा हा अनुभव...
मी पुरुष नसबंदी (Vasectomy) शस्त्रक्रिया करून घेतली, तीही सरकारी दवाखान्यात. कुटुंब नियोजन हा लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम. इथेही कुटुंब नियोजनाचा सारा भार आपण स्त्रीवर टाकला आहे. बिनटाक्याची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सुरू होऊनही ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या पुरुषांचे प्रमाण नगण्य, एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. आश्चर्य म्हणजे, नवऱ्याच्या नसबंदीला विरोध करून स्वत:ची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या स्त्रियांची संख्याही कमी नाही. नवऱ्याच्या नसबंदीला स्त्रीने विरोध करताना हेही एक कारण तिच्या अबोध मनात दडलेले असावे. ग्रामीण भागात पुरुषांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात, त्यामुळे नवऱ्याला ‘अधू’ करू नका, असाही एक सूर बायकांचा आढळतो. कारण कोणतेही असो, पण गर्भप्रतिबंधक उपायांच्या बाबतीत ग्रामीण महाराष्ट्रात ५७% स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया होतात तर अवघ्या ३% पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया. ही शस्त्रक्रिया म्हणजे एक सर्वसामान्य, केवळ १० मिनिटांची प्रक्रिया असून दुसऱ्या दिवसापासून आपण आपल्या रोजच्या कामधंद्याला जाऊ शकतो. केवळ काही दिवस जड ओझे उचलायचे नाही फक्त.
मी सायकलिंग करतो, एक महिन्यानंतर पुन्हा सायकलिंग सुरू केलं आहे. सर्वसामान्य पुरुषांचे सोडा, परंतु स्वतःला उच्चशिक्षित मानणारी किती डॉक्टर मंडळी ही शस्त्रक्रिया करून घ्यायला पुढे येतात? उत्तर अत्यंत कमी अर्थात अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी. कारणांविषयी अभ्यास केला तर पुढील कारणे लक्षात येतात. पुरुषी अहंकार, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबद्दल असलेले गैरसमज, अाणि पुढील लैंगिक आयुष्याबद्दलची अकारण भीती. मला दोन मुली आहेत. पहिली मुलगी तीन वर्षांची झाल्यानंतरच मी ही शस्त्रक्रिया करून घेणार होतो, परंतु ती थोडी पुढे ढकलावी लागली. हा निर्णय घेण्यापूर्वी मी घरच्या सगळ्यांना विश्वासात घेतले. माझ्या आईने तर पाठिंबाच दिला. आपल्याकडे स्त्रियांच्या नशिबी नेहमीच परिश्रम. लग्नानंतर बाळंतपण व आई होण्यासाठी स्त्रीला नऊ महिने घ्यावे लागणारे परिश्रम व प्रसूतीनंतर घ्यायची काळजी काय कमी असते का? इथे तर मी पहिली मुलगी झाल्यानंतर लगेच आठ दिवसानंतर बायकोचे सिझरियन होऊनसुद्धा रात्री जागून बाळाची काळजी घायचं सोडून सायकल रेसच्या तयारीसाठी पहाटे उठून पळायच्या घाईत. त्यातही आम्ही पुरुष लोक आमचा स्वार्थ पाहतो.
सातव्या महिन्यात बाळ जन्मल्यावर दोन महिने नवजात अतिदक्षता केंद्रात बाळाची घेतलेली काळजी व माझ्या दोन्ही मुलींचे संगोपन इतके परिश्रम घेत असताना आपण साधा व सोपा पुरुष नसबंदीचा निर्णय घेऊ शकत नाही का? या निर्णयावरदेखील काही मित्रांचा आक्षेप आपला मारवाडी समाज अल्पसंख्याक समाज आहे, असा होता. तुला दोन मुली आहेत, अमुक अमुक डॉक्टर आयुर्वेदिक गोळ्या देतो म्हणे मुलगा होईल वगैरे कुलदीपकच्या गप्पा. तेव्हाच त्यांना खडे बोल सुनावले. काही जणांचं म्हणणं होतं की, तिसरा चान्स घेणे अवघड होईल वगैरे. आम्ही आमच्या दोन मुलींसोबत समाधानी व पूर्ण असून आता कुटुंब नियोजनास काहीही हरकत नाही, तर पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याऐवजी मी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणे मला अधिक सोयीचे, सोपी व सुलभ वाटले. मी डॉक्टर असूनदेखील सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया केली म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये मेडिकल ऑफिसर चांगले पारंगत असून त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षण, नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरे यामुळे त्यांना मिळणारा अनुभव, या सर्व तांत्रिक बाबींमुळे मी सरकारी दवाखान्याला प्राधान्य दिलं.
५ मे रोजी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. आदल्या दिवशीपासून उद्या शस्त्रक्रिया होणार म्हणून कोणतीही विशेष भीती नव्हती, केवळ लोकल पद्धतीने भूल देणार म्हणून विचार की, काही त्रास होईल का, वगैरे. सकाळी नऊ वाजता सरकारी दवाखान्यात आल्यावर फॉर्म वगैरे भरून कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केली. पहिल्यांदाच सर्जिकल ड्रेस घातला. मग टीटी, अॅट्रॉपिन वगैरे इंजेक्शन झालं. ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यावर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्याशी बोलत बोलत शस्त्रक्रियेचा सुरुवात केली. केवळ लोकल झायलोकेन देताना सुई टोचते इतकाच त्रास, मग काहीतरी वृषणामध्ये हालचाल जाणवत होती. मोजून १० मिनिटांनी शस्त्रक्रिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मग ड्रेसिंग करून मला दोन तास रिकव्हरी रूममध्ये आराम करायला सांगितले. पुन्हा डॉक्टरांनी एकदा तपासले. काही रक्तस्राव तर होत नाही ना, याची खात्री करून पाच दिवसांची औषधं देऊन सुट्टी दिली. म्हणजे केवळ दोन तासांत सुट्टी मिळाली. मी वडिलांसोबत गाडीवर बसून घरी गेलो. घरच्यांना काळजी होती, पण घरी आल्यावर माझा प्रसन्न चेहरा पाहताच त्यांची काळजी दूर झाली.
शस्त्रक्रियेच्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवसापासून नियमितपणे क्लिनिकला स्कुटी चालवत जाऊ लागलो. तेव्हापासून ते आज शस्त्रक्रिया होऊन दोन महिने उलटून गेले, मला कोणताही त्रास झाला नाही. १५ दिवसांनंतर मी रोज पाच किमी चालणं, ५ जूनपासून नियमितपणे सायकलिंग अर्थात आठवड्यातून १५० किमी सायकलिंग व १२ किमी धावणं नियमितपणे चालू आहे. सांगण्याचा उद्देश हा की, अनेक वेळा अशा चुकीच्या समजुती असतात, शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना श्रमाची कामे करण्यावर कायम मर्यादा येतात, वगैरे. तर असे नाही. केवळ ८-१० दिवस तुम्हाला जड वजन उचलणे, धावणे, सायकलिंग, ओझे उचलणे यावर मर्यादा असतात, नंतर तुम्ही हळूहळू नियमितपणे रोजची कामे करू शकता.
हे कोणतेही क्रांतिकारक पाऊल नसून केवळ आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. बदल आपोआप घडेल, यावर माझा विश्वास आहे.
- डॉ पवन चांडक, परभणी