आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रतिक्रिया म्हणून धर्म त्याग कदापि योग्य नाही’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उना दलित अत्याचार प्रकरणानंतर गुजरात राज्यात हिंदू धर्म त्यागण्याची लाट आली. अहमदाबाद, कलोल, सुरेंद्रनगर येथे मागच्या वर्षी सुमारे दोन हजार दलित बांधवांनी (यात मजूर, विणकर, भूमिहीन शेतमजूर यांच्याबरोबर निम्न मध्यवर्गीय मंडळीसुद्धा आहेत.)बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पण, बौद्ध धर्म स्वीकाराकडे अत्याचाराची एक प्रतिक्रिया म्हणून पाहणे योग्य होणार नाही. दुसरी गोष्ट, देशातील हिंदू दलितांपेक्षा बौद्ध धर्मियांची परिस्थिती बरीच सुधारली आहे. हिंदू दलितांचे शिक्षणाचे आजचे प्रमाण ५५ टक्के आहे, तुलनेत बौद्ध धर्मियांचे तेच प्रमाण ७२ टक्के आहे. रोजगारातसुद्धा बौद्ध धर्मियांनी मोठी आघाडी घेतलेली दिसते. बौद्ध धर्मामुळे आपले उत्थान होईल, असे दलितांना वाटते आहे. परिणामी, १९९१ ते २००१ दरम्यान देशात बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये २४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. 

उत्तर प्रदेशात आज बौद्ध धर्म स्वीकाराच्या घटना वाढल्या आहेत. तेथे भाजपच्या योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. मध्यंतरी सहारनपूर जिल्ह्यात शब्बीरपूर गावी सवर्णांकडून दलितांवर अत्याचार झाले. भीम आर्मीचा नेता अॅड. चंद्रशेखर रावण यालाच तुरुगांत टाकले गेले. त्याची ही प्रतिक्रिया मानावी लागेल. मात्र, उत्तर प्रदेश आिण गुजरातमधील धम्म चळवळीत मोठा फरक दिसतो. उत्तर प्रदेशात प्रतिक्रिया म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला जातोय. तसे गुजरातमध्ये होत नाही. बदला किंवा प्रतिक्रिया म्हणून इथे फारच थोड्यांनी धर्मांतरे केल्याचे दिसते. इथे समजून-उमजून बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तुम्ही हिंदू धर्मातील जातप्रथेला वैतागून बौद्ध धर्म स्वीकाराल; पण पंचशील तत्त्वांचे पालन करणार नाही, मग बौद्ध धर्म स्वीकाराचा उपयोग काय?

१९५६मध्ये बाबासाहेबांनी नागपुरात धर्मांतर केले. त्याला गुजरातमधून काही लोक गेले होते. त्यानंतर अकरा वर्षांनी १९६७मध्ये गुजरातमध्ये बौद्ध धर्माची पहिली सामूहिक दिक्षा घेतली गेली. आज त्यातल्या दोन व्यक्ती जिवंत आहेत. पैकी मी एक आहे. गुजरातमध्ये पुढे ‘महाबोधी आंबेडकर मिशन’ नावाची संस्था स्थापन झाली. सौराष्ट्र, जुनागढ, अहमदाबाद, राजकोट, जामनगर येथे बौद्ध परिषदा भरवल्या गेल्या. बापूनगर, सुरत इथे विहार उभे राहिले. भिख्खूंचे येणेजाणे सुरू झाले. लोकांची बौद्ध धर्मातील रुची वाढीस लागली. या प्रभावातूनच गुजरात राज्यात आजपर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी बौद्ध धर्म स्वीकारला असावा. इथे धम्म चळवळ पुढे नेण्यात मी चालवलेल्या ‘ज्योती’ मासिकाचा मोठा वाटा आहे.

१९८१मध्ये गुजरातमध्ये आरक्षणविरोधी चळवळ उभी राहिली. ही चळवळ राज्य सरकार पुरस्कृत होती. तेव्हा काँग्रेसचे माधवसिंग सोळंकी मुख्यमंत्री होते. त्या चळवळीने सवर्ण आणि दलित यांच्यातली दरी अधिक रुंदावली. गावागावांत त्याचा दलितांना त्रास झाला. त्यामुळे हिंदू धर्म त्यागण्याकडे लोकांचा कल वाढला. यात विणकर समाजाचा वाटा मोठा होता. चर्मकार समाजही होता. गुजरामध्ये अनुसूचित जातीमध्ये एकूण ३२ पोटजाती आहेत. या जातीचे बहुसंख्य लोक भूमिहीन मजूर होते. 

१९८५मध्ये जुनागढमध्ये पाच हजार दलितांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. गुजरातचा विचार करता सौराष्ट्रात बौद्ध धर्मांतरे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. कारण, हा परिसर सामाजिकदृष्ट्या जागरूक आहे. पुढे बुद्धिस्ट अकादमी, गुजरात बुद्धिस्ट सोसायटी अशा संस्था स्थापन झाल्या. त्यांनी धम्म चळवळ पुढे नेली.

गुजरातमध्ये बौद्ध धर्म स्वीकारणारी चळवळ फोफावली, त्याला ठोस कारणे आहेत. १९३१मध्ये बाबासाहेबांनी गुजरातला पहिल्यांदा भेट दिली होती. दलित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केले. ‘शेड्युल कास्ट फेडरेशन’ची इथे शाखा निघाली. १९६४मध्ये भूमिहीनांचे आंदोलन झाले. १९७८ मध्ये दलित पँथरची स्थापना झाली. पण, गांधींच्या चळवळींचा इतिहास जसा पुढे आला, तसा आंबेडकरी चळवळीचा आला नाही. कम्युनिस्ट, सोशलिस्ट इतिहासकारांनी गांधीजींच्याच चळवळीची दखल घेतली. 

मात्र, इतर ठिकाणी अनेकदा काही लोक बौद्ध धर्म स्वीकारतात. त्यांची कारणे वैयक्तिक असतात. मागण्या मान्य झाल्या नाहीत, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणून काही जातगट धर्म त्यागण्याचे इशारे देतात. त्याला अर्थ नाही. तिला चळवळ नाही म्हणता येणार.

नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आले. त्यानंतर ख्रिश्चन, मुस्लिम समाजाला जाग आली. या समुदायांना अल्पसंख्याकवाद आठवला. नवबौद्धसुद्धा अल्पसंख्याक आहेत, तेसुद्धा आपले भाई आहेत, हे त्यांना पटले. पण अाजपावेतो त्यांच्या लेखी आम्ही अस्पृश्य होतो. त्यांनी आमच्याकडे दलित म्हणूनच पाहिले. अल्पसंख्याक समुदायाच्या देशभर शैक्षणिक संस्था आहेत. त्यात किती दलित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला? 

भाजपचे नरेंद्र मोदी २००१मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतरच इथले दलित बौद्ध धर्म स्वीकारू लागले, असे म्हणता येणार नाही. खरे पाहता, कम्युनिस्ट, काँग्रेस आणि समाजवाद्यांनी मोदींविषयी चुकीचा समज पसरवला आहे. गुजरातमध्ये जसे दलितांवर अत्याचार होतात, तसेच काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही झाले आहेत. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सत्तेत आल्यानंतर दलितांवरील हल्ले अचानक वाढले, ही माझ्या मते िनव्वळ अफवा आहे.

- डाॅ. पी. जी. ज्योतीकर, अहमदाबाद 
dramitjyotikar@gmail.com
 
(लेखक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष असून गुजरातमधील आंबेडकरी चळवळीचे इतिहासकार आहेत.) 

शब्दांकन - अशोक अडसूळ
बातम्या आणखी आहेत...