Home | Magazine | Niramay | dr. shital gaidhani writes about Useful for health

फिटनेससाठी अाराेग्यदायी जवस

डाॅ. शीतल गायधनी | Update - Jul 31, 2017, 03:01 AM IST

वरण-भात, भाजी-पाेळी म्हणजेच जेवण असा अाता एक समज झालेला अाहे. अाहारातील अनेक पदार्थ गायब झालेले दिसतात.

 • dr. shital gaidhani writes about Useful for health
  वरण-भात, भाजी-पाेळी म्हणजेच जेवण असा अाता एक समज झालेला अाहे. अाहारातील अनेक पदार्थ गायब झालेले दिसतात. पण, पूर्वी किंवा सध्याही म्हटलं तरी चालेल. ग्रामीण भागात अाजही चटणी-भाकरीला अत्यंत महत्त्व अाहे. त्यातही खुरासणी, जवस याची चटणी अाराेग्यदायीच समजली जाते. पण, शहरात जेवणाच्या पानातून चटणी गायब झालेली दिसते. यात एक चटणी हाेती ती जवसाची. काही अाराेग्यदायी फायदे अाजच्या लेखातून...
  मराठी माणसांच्या खाण्यामधले कितीतरी पदार्थ आता कमी झाले आहेत. आपण सगळे पोळीभाजीलाच मराठी खाणे समजायला लागलो आहोत. खरे म्हणजे आपल्या मराठी माणसांच्या खाण्यातल्या नुसत्या चटण्यांची यादी केली तरी आपल्याला असे लक्षात येईल की त्यातल्या कितीतरी चटण्या खाण्यातून बाद झाल्या आहेत. नव्या पिढीला त्या चटण्यांची नावेसुध्दा माहीत नाहीत. परंतु त्या जोपर्यंत आपल्या खाण्यात होत्या तोपर्यंत त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराच्या गरजांचा समतोल आपोआप साधला जात होता. जवस, कारळ, पुडचटणी, मेतकूट इत्यादी गोष्टी आता फक्त कागदावरच शिल्लक राहिल्या आहेत. जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये
  अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. कर्करोगापासून सुटका करणारे फायबर जवसामध्ये विपुल असते. त्यामुळे जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.
  जवसमध्ये प्रोटीन्स २०.३ ग्रॅम, फॅट्स ३७.१ ग्रॅम, मिनरल्स २.४ ग्रॅम, फायबर ४.८ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स २८.९ ग्रॅम, कॅल्शियम १७० मिली ग्रॅम, फॉस्फोरस ८७० मिली ग्रॅम, आयर्न २.७ ग्रॅम.
  त्याचा उपयोग खालील रोगावर होतो. टाईप – टू डायबेटीस अस‍णाऱ्या रुग्णांमध्ये जवसातील लिग्नन उपयुक्त ठरते. कारण हे लिग्नन ब्लड शुगरचा समतोल साधते. हृदयरुग्णांसाठीसुद्धा जवसातील काही गुणधर्म उपयोगी पडतात. जवस कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. कर्करोग आणि अन्यही काही विकारांवर जवस उपयुक्त ठरते. जवसाची पूड चमचाभर घेऊन ती पाण्यात मिसळून सकाळी सकाळी प्राशन केली तर हे सारे गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात. स्वयंपाक करताना खाद्यपदार्थांवर वरून जवसाची चमचाभर पूड पसरवली तरीही जवस आपल्या शरीरात जाऊन योग्य ती कामगिरी बजावतो. असे असले तरी अती तिथे माती हा नियम जवसालाही लागू आहे. जवसाचे खाण्याचे प्रमाण राखले गेले पाहिजे आणि ते मर्यादेतच ठेवले पाहिजे त्याचे अधिक प्राशन आरोग्याला घातक ठरू शकते.

 • dr. shital gaidhani writes about Useful for health
  डाॅ. शीतल गायधनी

Trending